गॉस, एडमंड : (२१ सप्टेंबर १८४९ — १६ मे १९२८). इंग्रज साहित्यिक. जन्म लंडन येथे. विख्यात प्राणिशास्त्रज्ञ फिलिप गॉस ह्याचा पुत्र. त्याचे शिक्षण खाजगी रीत्या झाले. १८६७ साली ‘ब्रिटिश म्यूझिअम’ मध्ये साहाय्यक ग्रंथपाल झाला. त्यानंतर १८७५ — १९०४ ह्या काळात ‘द बोर्ड ऑफ ट्रेड’मध्ये भाषांतरकार म्हणून काम केले. त्यानंतर ‘हाउस ऑफ लॉर्ड्स’चा ग्रंथपाल (१९०४ — १४). १८८४ ते १८९० ह्या काळात त्याने केंब्रिज येथील ‘ट्रिनिटी कॉलेजा’त प्राध्यापक म्हणूनही काम केले.
एडमंड गॉस म्हणजे तत्कालीन इंग्रजी साहित्यक्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्ती होय. इंग्रजी वाड्मयाच्या आस्थेवाईक अभ्यासाबरोबरच यूरोपीय साहित्याचा —विशेषतः स्कँडिनेव्हियन भाषांतील साहित्याचा – त्याचा व्यासंग मोठा होता. त्याच्या नॉर्दर्न स्टडीज (१८७९) मध्ये डॅनिश, स्वीडिश, नॉर्वेजियन आणि डच कवींवरील त्याचे निबंध संगृहीत केलेले आहेत. त्याने इब्सेनची नाटके अनुवादून व समीक्षून इंग्लंडमध्ये लोकप्रिय केली. इब्सेनचे चरित्रही लिहिले (१९०८). सेव्हन्टींथ सेंच्यूरी स्टडीज (१८८३), हिस्टरी ऑफ एन्टीथ सेंच्यूरी लिटरेचर (१८८९) आणि शॉर्ट हिस्टरी ऑफ मॉडर्न इंग्लिश लिटरेचर (१८९७) हे त्याचे इंग्रजी वाङ्मयेतिहासग्रंथ. सतराव्या-अठराव्या शतकांतील इंग्रजी साहित्याचा त्याचा विशेष व्यासंग होता. ‘इंग्लिश मेन ऑफ लेटर्स’ ह्या मालेसाठी त्याने जॉन डन, ग्रे, जेरेमी टेलर आणि टॉमस ब्राउन ह्यांवर ग्रंथ लिहिले. विल्यम काँग्रीव्ह आणि स्विन्बर्न ह्यांचीही चरित्रे त्याने लिहिली. फ्रेंच साहित्याचाही त्याने चांगला अभ्यास केला होता.
त्याने लिहिलेल्या फादर अँड सन (१९०७) ह्या आत्मचरित्रात निर्भयता, सत्यशोधन आणि निःसंकोच आत्मकथन आढळते. त्याने काव्यलेखनही केले आहे. आधुनिक समीक्षामूल्यांच्या कसोटीला त्याचे लेखन फारसे उतरत नसले, तरी वाङ्मयीन विकासविस्ताराचे दिग्दर्शन करण्याचे त्याचे कार्य त्या काळी महत्त्वाचे ठरले. व्हिक्टोरियन युगाच्या अखेरीस दिसू लागलेल्या नव्या वाङ्मयीन प्रेरणांचे संवर्धनही त्याने केले. तोरू दत्त, सरोजिनी नायडू ह्या भारतीय कवयित्रींच्या काव्यलेखनाला त्याने उत्तेजन दिले होते.
१९२५ मध्ये त्याला नाइट करण्यात आले. तत्पूर्वी, १९०१ मध्ये नॉर्वेजियन सरकारने त्यास नाइट केले होते. लंडन येथे तो निवर्तला.
संदर्भ : Charteris, Evan E. The Life and Letters of Sir Edmund Gosse, New York, 1931.
देशपांडे, मु. गो.