गाँकूर बंधू : एद्‌माँ ल्वी आंत्वान‌ यूओ द गाँकूर (ज. नॅन्सी येथे २६ मे १८८२ – मृ.- शांपरोसे येथे १६ जुलै १८९६) आणि झ्यूल आल्फ्रेद यूओ द गाँकूर (ज. पॅरिस येथे १७ डिसेंबर १८३० – मृ. पॅरिस येथे २० जून १८७०). हे दोन फ्रेंच बंधू इतिहासकार, कलासमीक्षक व कांदबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्या तिन्हीं क्षेत्रांतील कामगिरी त्यांनी एकमेकांच्या निकट सहकार्याने पार पाडली  असल्यामुळे त्यांचा उल्लेख बहुधा एकत्रच केला जातो. जुन्या–विशेषतः अठराव्या शतकातील–कलावस्तू, ऐतिहासिक कागदपत्रे, जुनी वर्तमानपत्रे इत्यादींचा संग्रह करण्याचा त्यांना छंद होता. ह्या छंदातूनच ते  इतिहासलेखनाकडे वळले आणि Histoire de la societe francaise pendant la Revolution (१८५४, इं. शी.  हिस्टरी ऑफ फ्रेंच सोसायटी ड्यूरिंग द रेव्हलूशन), L’ Art du XVIIIe siecle (१८५९ – ७५ इं. शी. एटीन्थ सेंच्यूरी आर्ट) आणि La Femme au dix-huitieme siecle (१८६२, इं. शी. द. वूमन ऑफ द एटीन्थ सेंच्यूरी) असे ग्रंथ लिहून अठराव्या शतकातील सामाजिक जीवनाच्या अभ्यासासाठी  मोलाची सामग्री त्यांनी उपलब्ध करून दिली. Germinie Lacerteux (१८६४), Renee Mauperin (१८६४)ह्यांसारख्या  काही कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. नाट्यलेखनाचाही त्यांनी प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला.  

गाँकूर बंधूंनी एक विशिष्ट खानदानी कलाभिरूची जोपासण्याचा प्रयत्न केला. जपानी कलेबद्दल त्यांना फार आस्था वाटे. फ्रान्समध्ये तिच्याविषयी आस्था जागृत करण्याचे श्रेय एद्‌माँच्या तद्विषयक ग्रंथांना दिले जाते. ‘एटीन्थ सेंच्यूरी आर्ट’ मधील कलेतिहासविषयक दृष्टिकोनाच्या मर्यादा आणि इतर उणिवा लक्षात घेऊनही अभिजात फ्रेंच ग्रंथांत त्याची गणना आजही केली जाते. मनोरुग्णांचे मनोविश्लेषण आपल्या कांदबऱ्यांतून करणाऱ्या प्रारंभीच्या कादंबरीकारांपैकी ते होत. दृक्‌प्रत्ययवादी शैली आणि नवशब्दनिर्मिती ही त्यांच्या कादंबरीलेखनाची आणखी काही वैशिष्ट्ये. त्यांच्या कादंबऱ्यांतून त्यांनी वापरलेले अनेक नवे शब्द फ्रेंच  भाषेत सहजपणे मिसळून गेलेले आहेत. कादंबऱ्यांतील वर्ण्य विषयांचा सांगोपांग अभ्यास करून त्यांची मांडणी कमालीची वास्तव करण्याचा त्यांचा प्रयत्न असे परंतु कदाचित त्या प्रयत्नातच अतिवर्णनासारखे दोष त्यांच्या कादंबऱ्यांत शिरले आणि अनेक टीकाकारांच्या मते त्यांचा कलात्मक दर्जा कमी झाला. ते स्वतःला निसर्गवादाचे पूर्वसूरी समजत आणि ⇨एमिलझोलासारख्या विख्यात निसर्गवादी साहित्यिकावर त्यांचा काहीसा प्रभाव जाणवतो. गाँकूर बंधूंना फारशी लोकप्रियता लाभली नाही आणि हे शल्य त्यांच्या मनात होते. एद्‌माँने एक वाङ्‌मयीन अकादमी स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता ( १८८२ ) परंतु प्रत्यक्षात ही ‘अकादमी गाँगूर’ १९०३ मध्ये कार्यान्वित होऊ शकली. ह्या अकादमीतर्फे प्रतिवर्षी, आदल्या वर्षीच्या उत्कृष्ट फ्रेंच ललित गद्यकृतीला–शक्य तो कादंबरीला–पारितोषिक दिले जाते.

आज हे दोन्ही बंधू डिसेंबर १८५१ ते जुलै १८९६ ह्या काळात लिहिलेल्या त्यांच्या नवखंडात्मक जर्नलसाठी मुख्यतः प्रसिद्ध आहेत. त्यातील आत्मचरित्रात्मक तपशीलांबरोबरच एकोणिसाव्या शतकातील पॅरिसमधील सामाजिक आणि वाङ्‌मयीन जीवनाचे त्यात पडलेले प्रतिबिंब महत्त्वाचे आहे.

कुलकर्णी, अ. र.