चेदि: मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा पूर्व भाग व त्याच्या आसपासच्या प्रदेशाचे प्राचीन नाव. ऋग्वेद, महाभारत, बौद्ध साहित्य इत्यादिकांत याचा उल्लेख आढळतो. श्रीकृष्णाचा आतेभाऊ शिशुपाल हा चेदी देशाचाच राजा होता. अयोध्येच्या सगर राजाच्या मृत्यूनंतर विदर्भातील राजे प्रबळ होऊन त्यांनी उत्तरेकडे राज्यविस्तार करावयास सुरुवात केली. त्या वंशातील चेदी राजाने यमुनेच्या दक्षिण तीरावर राज्य स्थापले म्हणून यास चेदी नाव मिळाले. सोळा महाजनपदांपैकी एक म्हणून याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो. बौद्ध साहित्यात वत्स, काशी आणि चेदी ही एकमेकांच्या शेजारील राष्ट्रे होती, असा उल्लेख असून चेदी प्रदेश वत्सांच्या दक्षिणेस व काशीच्या नैर्ऋत्येस होता. मध्ययुगात नर्मदा नदीकाठापर्यंत चेदी राज्य पसरलेले असून मेखलीसुत म्हणून ते ओळखले जाई. याचा विस्तार यमुनेच्या दक्षिणेस, नर्मदेच्या उत्तरेस आणि शोण नदीच्या पश्चिमेस चंदेरी किल्यांपर्यंत होता. हेमकोशात त्रिपुरीलाच चेदीनगरी म्हटले असून तिचे स्थान नर्मदा नदीजवळच जबलपूरपाशी असलेल्या चेदीनगरीपाशी दाखविले जाते. काहींच्या मते चेदी इंद्रप्रस्थाच्या (दिल्लीच्या) आग्नेयीस असून त्याची राजधानी शुक्रिमती होती. 

कापडी, सुलभा