ग्रेगोरी, जॉन वॉल्टर : (२७ जानेवारी १८६४-२ जून १९३२). ब्रिटिश भूवैज्ञानिक व समन्वेषक. त्यांचा जन्म व शिक्षण लंडन येथे झाले. १८८७ ते १९oo दरम्यान त्यांनी ब्रिटिश संग्रहालयाच्या भूविज्ञान विभागात पुराजीववैज्ञानिक (जीवांच्या अवशेषांचा अभ्यास करणारा) म्हणून काम केले. तेथेच त्यांनी जुरासिक (सु. १८.५ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील ब्रायो-झोआवरील (प्राण्यांच्या एका संघावरील) लेखन केले. नंतर १९o४ पर्यंत मेलबोर्न विद्यापीठात व तदनंतर १९२९ पर्यंत म्लासगो विद्यापीठामध्ये ते भूविज्ञानाचे प्राध्यापक होते. मेलबोर्नला असताना ते खाणकामाचे भूविज्ञान व पाणीपुरवटठा यांतील तज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. तेथे ते जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ व्हिक्टोरियायचे संचालक होते. ते रॉयल सोसायटीचे सदस्य (१९oo) व जिऑलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष (१९२८) होते. जगातील जवळजवळ सर्व भागांमध्ये गेलेल्या मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि भूविशानाचे व भूगोलाचे अध्ययन केले. द. ऑस्ट्रेलियातील एअर सरोवर (१९o१-o२), पूर्व लिबियातील सायरेनेइका प्रदेश (१९o८), दक्षिण अंगोला (१९१२), तिबेटमधील पर्वत (१९१२) या मोहिमांचे ते नेते होते. पुराजीवविज्ञानातील व भूविज्ञानातील इतर शाखांमधील विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांची वीस पुस्तके व तीनशे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. द ग्रेट रिफ्ट व्हॅली (१८९६), द फाउंडेशन्स ऑफ ब्रिटिश ईस्ट आफ्रिका (१९o१), द डेड हार्ट ऑफ ऑस्ट्रेलिया (१९o६), जिऑग्राफी : स्ट्रक्चरल, फिजिकल अँड कंपॅरेटिव्ह (१९o९), ओरिजिन ऑफ फिओर्डस (१९१३), द रिफ्ट व्हॅलिज अँड जिऑग्राफी ऑफ ईस्ट आफ्रिका (१९२१), मिनॅस ऑफ कलर (१९२५), ह्युमन मायग्रेशन अँड द फ्यूचर (१९२८) आणि स्टोरी ऑफ द रोड (१९३१) ही त्यांनी प्रमुख पुस्तके होत. पेरूमधील ऊरूबांबा नदीच्या प्रवाहांचे होडीमधून छायाचित्रण करीत असताना नदीत बुडून ते मृत्यू पावले.
ठाकूर, अ. ना.