चेकॉव्ह, अंतॉन: (२९ जानेवारी १८६० – १५ जुलै १९०४). विख्यात रशियन कथाकार व नाटककार. जन्म टॅगनरॉग येथे. मॉस्को विद्यापीठातून वैद्यकातील पदवी घेतली (१८८४) परंतु वैद्यकीचा व्यवसाय मात्र केला नाही. Pestrye rasskazy (१८८६, इं. शी. मॉट्ली स्टोरीज) हा त्याचा पहिला कथासंग्रह आणि Ivanov (१८८७) ही त्याची रंगभूमीवर आलेली पहिली नाट्यकृती. आपल्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी, तसेच आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी चेकॉव्हने सेंट पीटर्झबर्ग आणि मॉस्को येथील नियतकालिकांतून कथालेखन केले होते. ह्या कथा मुख्यतः विनोदी होत्या. अन्याय, दु:ख, सामाजिक विसंगती ह्यांवर त्यांतून अधूनमधून भर असला, तरी एक प्रसन्न, विनोदी कथालेखक अशीच त्याची वाङ्मयीन प्रतिमा निर्माण झालेली होती. साहित्यिक ह्या नात्याने आपल्यावरील सामाजिक जबाबदारीची जाणीव त्याला तीव्रतेने होती. तीतूनच तो सॅकालीन बेटावरील कुप्रसिद्ध तुरुंग पाहण्यास गेला व तेथील कैद्यांच्या दुः स्थितीचा वृत्तान्त त्याने लिहिला. ‘द आयलँड सॅकालीन’, ‘द कॉसॅक’, ‘द मीटिंग’, ‘अ मिस्फॉर्च्यून’, ‘द बेगर’ ह्या त्या काळात चेकॉव्हने लिहिलेल्या उल्लेखनीय कथा तथापि ‘स्लीपी’ आणि ‘द स्टेप’ ह्या विशेष महत्त्वाच्या होत. ‘स्लीपी’मध्ये बालमनाचे अंतःस्फूर्त आकलन जाणवते, तर ‘द स्टेप’ मध्ये गवताळ प्रदेशातील एकसुरी, कंटाळवाण्या प्रवासाचे स्मृत्यानुकूलतेची भावना चाळवणारे वर्णन आहे. त्याच काळात चेकॉव्हने, ‘द ड्युएल’ व ‘वॉर्ड नंबर सिक्स’ सारख्या कथा लिहिल्या. ‘वॉर्ड नंबर सिक्स’ ही एका सुशिक्षित व भावविवश डॉक्टराबद्दलाची नैतिक कथा आहे. तो डॉक्टर स्वतःच वेडा आहे असे ठरविण्यात येते व नंतर मारहाण केल्यामुळेच तो प्राणास मुकतो.
जीवनाच्या क्षुद्रतेमुळे येणारा कंटाळवाणेपणा, हे त्याच्या अनेक कथांचे सूत्र आहे. रशियन समाजातील सर्व थरांतील व पेशांतील व्यक्तींचे प्रातिनिधिक चित्रण त्याच्या कथांत आढळते. सर्वसामान्यांच्या जीवनातील
बाह्यतः साध्या वाटणाऱ्या घटनांच्या किंवा तपशिलांच्या चित्रणातून परिणामकारक कथा उभी करण्याचे सामर्थ्य चेकॉव्हच्या ठायी होते. त्याच्या कथेने ‘कथा’ ह्या साहित्यप्रकारालाच नव्या परिणामांचा लाभ करून दिला आणि त्याच्या प्रभावाने कथालेखनाची एक जागतिक परंपरा उभी राहिली. आजच्या कथासाहित्यावर त्याचा किंवा त्याच्या परंपरेचा परिणाम या ना त्या स्वरूपात जाणवतोच.
चेकॉव्हच्या कथांप्रमाणेच त्याच्या नाट्यकृतींनीही त्याला रशियाबाहेर कीर्ती मिळवून दिली. त्याची आरंभीची बहुतेक नाटके एकांकी असून त्यांचे स्वरूप प्रहसनात्मक आहे. Platonov हे त्याच्या उपलब्ध असलेल्या नाटकांपैकी (ह्यांत एकांकिका धरलेल्या नाहीत) पहिले होय. चेकॉव्हच्या मृत्यूनंतर त्याचे हस्तलिखित गवसले व रशियात ते प्रथम १९२३ मध्ये प्रकाशित झाले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत रशियन जीवनाची जडणघडण करणाऱ्या सामाजिक शक्तींचे चित्रण करण्याचा चेकॉव्हचा हा प्रयत्न होता. त्यानंतर Chaika (१८९६, इं. शी. द सी गल) Dyadya Vanya (१८९९, इं. शी. अंकल व्हान्या) Trisestry (१९०१, इं. शी. द थ्री सिस्टर्स) आणि Vishnyovy sad (१९०४, इं. शी द चेरी ऑर्चर्ड) ही नाटके त्याने लिहिली. बुद्धिमंताचे वैफल्य आणि नव्या जीवनाची स्वप्ने हे त्याच्या नाटकांतून लक्षणीयपणे येणारे विषय.
चेकॉव्हचे नाट्यलेखनतंत्र नवे होते. त्यात एकनायकत्वाची कल्पना आढळत नाही. त्याच्या नाटकांतील पात्रांच्या संदर्भात घडणाऱ्या प्रक्षोभक घटना त्याने नाटकात प्रत्यक्षपणे आणल्या नाहीत. वरवर आकारहीन वाटणाऱ्या त्याच्या नाट्यकृती ‘मॉस्को आर्ट थिएटर’ च्या कॉन्स्टँटिन स्टॅनिस्लॅव्हस्कीसारख्या समर्थ निर्मात्याच्या हाती आल्यानंतरच त्यांचे मर्मस्पर्शी स्वरूप आणि तरल भावार्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचले तसेच त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण नाट्यतंत्रांची परिणामकारकताही सिद्ध झाली तथापि चेकॉव्हचा नाट्याशय धूसर राहू नये, म्हणून स्टॅनिस्लॅव्हस्कीलाही खास निर्मितितंत्र आणि अभिनयशैली ह्यांची योजना करावी लागली होती. यूरोपीय नाट्यपरंपरेच्या विकासात चेकॉव्हने महत्त्वाची भर घातली. चेकॉव्हचे साहित्य अनेक भाषांत अनुवादित झालेले आहे.
चेकॉव्ह हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हता तथापि १९०२ मध्ये रशियन विज्ञान अकादमीचा सदस्य म्हणून त्याचा मित्र ⇨ मॅक्झिम गॉर्की हा निवडून आला असतानाही रशियन सरकारने जेव्हा ती निवडणूकच रद्द केली, तेव्हा त्या अन्यायाच्या निषेधार्थ चेकॉव्हने त्या अकादमीवरील स्वतःचे सदस्यत्वही सोडून दिले.
त्याला क्षयाचा विकार होता. १८९७ मध्ये त्याची तीव्रता वाढली. तेव्हापासून अखेरपर्यंत तो कुठल्या ना कुठल्या आरोग्य केंद्रातच राहत असे. १९०१ मध्ये ‘मॉस्को आर्ट थिएटर’ मधील ओल्गा निपर ह्या अभिनेत्रीशी त्याने विवाह केला होता. बाडनव्हायलर येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Bruford, W. H. Anton Chekhov, New Haven, 1957.
2. Garnett, Constance Trans. Chekhovs’ Works, 13 Vols., London, 1916 — 22.
3. Garhardi, W. A. Anton Chekhov : A Critical Study, London, 1949.
4. Magarshack, David, Chekhov : A Life, London, 1952.
5. Magarshack, David, Chekhov the Dramatist, London, 1960.
मेहता कुमुद
“