चेंबरलिन, चार्ल्स जोसेफ: (२३ फेब्रुवारी १८५३ – ५ फेब्रुवारी १९४३). अमेरिकी वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म सलव्हनजवळ झाला. १८८८ साली त्यांनी ऑबर्लिन महाविद्यालयातून पदवी व १८९७ साली शिकागो विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. बॉन (जर्मनी) मध्ये एडूआर्ट श्ट्रासबुर्गर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक वर्ष संशोधन कार्य केले व शिकागो (अमेरिका) विद्यापीठात वनस्पतींचे आकारविज्ञान (जीवांची संरचना व आकार यांचे शास्त्र) व कोशिकाविज्ञान (पेशींची संरचना, कार्ये व जीवन-वृत्त यांच्या अभ्यासाचे शास्त्र) या विषयांचे ते प्राध्यापक होते. सायकॅड्स [→ सायकॅडेलीझ] या प्रकटबीज वनस्पतींच्या गणातील जातींबद्दलचे त्यांचे संशोधन वैशिष्ट्यपूर्ण आहे. जे. एम्. कूल्टर व चेंबरलिन या दोघांनी आकारविज्ञान व कोशिकाविज्ञान या वनस्पति–विज्ञानाच्या दोन शाखांतील श्रेष्ठ दर्जाच्या संशोधनाबद्दल शिकागो विद्यापीठाला उच्च स्थान प्राप्त करून दिले. त्या दोघांनी मिळून मॉर्फॉलॉजी ऑफ अँजिओस्पर्म्स (१९०३) व मॉर्फॉलॉजी ऑफ जिम्नोस्पर्म्स (१९१७) हे बहुमोल ग्रंथ लिहिले. चेंबरलिन यांनी स्वतःमेथड्स इन प्लँट हिस्टॉलॉजी ह्या उपयुक्त ग्रंथाची पाचवी आवृत्ती १९३३ मध्ये प्रसिद्ध केली तसेच लिव्हिंग सायकॅड्स (१९१९) व जिम्नोस्पर्म्स, स्ट्रक्चर अँड एव्होल्यूशन (१९३५) हेही ग्रंथ प्रसिद्ध केले.
जमदाडे, ज. वि.
“