चूषमीन: एकिनिइडी मत्स्यकुलातील एकिनीज आणि रेमोरा या दोन वंशांचे मासे. या माशांचे शरीर लांबोडके असून डोके वरून खाली दबलेले असते. पहिल्या पृष्ठपक्षाच्या (पाठीवरील पराच्या म्हणजे हालचालीसाठी व तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घडीच्या) परिवर्तनाने डोक्यावर एक लंबवर्तुळाकार, बळकट, पटलित (पडदे असलेले) चूषणबिंब (चिकटण्याकरिता असलेली चकती) तयार झालेले असते. या शीर्ष-चूषकाने हे मासे जहाजे अथवा शार्क, कूर्म (पाणकासव), देवमासे आणि इतर वेगाने पोहणाऱ्या मोठ्या प्राण्यांना घट्ट चिकटतात. हे मासे कूर्माच्या पृष्ठवर्माला (पाठ झाकणाऱ्या ढालीसारख्या अस्थिमय संरचनेला) असाधारण चिकाटीने चिकटत असल्यामुळे आफ्रिकेच्या पूर्वकिनाऱ्यावर तेथील मूळ रहिवासी कूर्मांना पकडण्याकरिता यांचा उपयोग करतात.
एकिनीज वंशातील माशांचे चूषणबिंब मोठे असते आणि त्यांना ३० कशेरुका (मणके) असतात, पण रेमोरा वंशाच्या माशांचे शरीर आखूड असून त्यांना फक्त २७ कशेरुका असतात. या विलक्षण माशांच्या सु. १२ जाती असून त्या उष्ण कटिबंधातील सर्व समुद्रांत पसरलेल्या आहेत. यांपैकी एकिनीज नॉक्रेटीज व रेमोरा रेमोरा या दोन जाती भारतालगतच्या समुद्रात सर्वत्र आढळतात.
मोठ्यात मोठा चूषमीन सु. एक मी. लांब असतो. चूषमीन दुसऱ्या माशांच्या किंवा प्राण्यांच्या शरीराला जरी चिकटत असले, तरी ते केव्हाही परजीवी नसतात. केवळ आधार आणि संरक्षण मिळविण्याकरिताच ते इतर प्राण्यांना चिकटतात. मासे हे त्यांचे भक्ष्य असल्यामुळे मधूनमधून ते सुटे होऊन भक्ष्य मिळवितात आणि पुन्हा एखाद्या प्राण्याला चिकटतात.
चूषमीन हे उत्कृष्ट खाद्यमत्स्य आहेत, पण त्यांना पकडणे फार कठीण आहे. केवळ योगायोगानेच ते पकडले जातात, असे म्हणावयास काही हरकत नाही.
यार्दी, ह. व्यं.
“