चुंगकिंग : (अधिकृत बाशीएन). पश्चिम चीनमधील सेचवान प्रांताच्या आग्नेय भागातील शहर. लोकसंख्या ३५,००,००० (१९७० अंदाज). हे औलिंग व यांगत्सी नद्यांच्या संगमावर, त्यांच्या दुबेळक्यातील एका उंच खडकावर वसले आहे. सेचवान प्रांताचे पश्चिम चीनशी आणि पूर्व तिबेटशी दळणवळण व व्यापार चुंगकिंगवरून वरील दोन नद्यांच्या मार्गाने होतो. याच्या परिसरात कोळशाच्या व लोखंडाच्या पुष्कळ मोठ्या खाणी असल्याने औद्योगिक शहर म्हणून त्याचा विकास झाला. येथे सुती व रेशमी कापडाच्या गिरण्या आणि सिमेंट, रसायने, पोलाद यांचे लहानमोठे कारखाने आहेत.
चीनच्या या इतिहासप्रसिद्ध शहराने ख्रि. पू. बाराव्या शतकापासून अनेक क्रांतिकारक घडामोडी पाहिल्या आहेत. ख्रि. पू. चौथ्या शतकात येथे पा राज्याची राजधानी होती. त्यानंतर अनेक उलथापालथी होऊन शेवटी हे चिंग वंशाकडून चिनी साम्राज्यात सामील झाले. १८९१ मध्ये पाश्चिमात्य व्यापाऱ्यांनी येथे अनेक सवलती मिळविल्या. तेव्हापासून याच्या आधुनिक इतिहासास सुरुवात होते. १९३८ ते ४६ राजधानीच येथे असल्याने अलीकडील चिनी इतिहासात व राजकारणात चुंगकिंग खूपच गाजलेले आहे. युद्धकाळात जपानी बॉम्बहल्ल्यामुळे शहराचा बराच भाग उद्ध्वस्त झाला परंतु त्यामुळे शहराचे आधुनिकीकरण सुलभ झाले. अलीकडील कम्युनिस्ट राजवटीत चुंगकिंगला जोडणारे नवे लोहमार्ग सुरू झाल्याने येथील व्यापारात आणि उद्योगधंद्यांत खूपच वाढ झाली आहे.
ओक, द. ह.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..