चीनची अजस्त्र भिंत

चीनची भिंत : संरक्षणार्थ बांधलेली वास्तुशास्त्रदृष्ट्या जगातील सर्वांत लांब भिंत. हिची सुरुवात पिवळ्या समुद्रातील सामुद्रधुनीपासून होते व ती मध्य आशियापर्यंत जाऊन भिडते. इ. स. पू. ३०० पूर्वी सीमारक्षणासाठी भिंती बांधण्याची पद्धत चीनमध्ये रूढ झाली. कारण या वेळी तुर्की व मंगोल टोळ्यांचे अकस्मात हल्ले चीनवर होत. च्यीन या राजवंशाच्या ⇨शिर ह्‌वांग टी  या राजाने ही भिंत इ. स. पू. २१४ मध्ये बांधली. यापूर्वी ठिकठिकाणी बुरूज उभारण्यात आले होते. ही लष्करी ठाणी होती, या राजाने हे बुरूज जोडणारी कायमची भिंत बांधविली. तिचा उद्देश उत्तरेकडील रानटी टोळ्यांपासून राज्याचा बचाव व्हावा हा होता. सु. २,२५३ किमी. लांबीची ही भिंत बाहेर विटा अथवा ग्रॅनाईट दगड व आत माती या पद्धतीने बांधली असून तिची उंची सु. ६–९ मी. आहे. प्रत्येकी सु. ३१ मी. अंतरावर टेहेळणी करता एक स्वतंत्र बुरूज असून भिंतीवर ४·६० मी. रुंदीचा रस्ता आहे. ही भिंत जगातील एक आश्चर्य मानली जाते.

देव, शां. भा.