चिल्याबिन्स्क : रशियन प्रजासत्ताकाच्या चिल्याबिन्स्क ओब्लास्टची राजधानी. लोकसंख्या ८,९१,००० (१९७१). उरल औद्योगिक विभागातील दुसऱ्या क्रमांकाचे हे शहर मॉस्कोपासून १,५०० किमी. पूर्वेस मीआस नदीवर वसलेले आहे. रशियाच्या सरहद्दीवर मोक्याचे ठिकाण म्हणून १६५८ मध्ये वसलेले हे शहर पुढे कोळसा आणि धान्य व्यापाराचे व शेतमाल प्रक्रियेचे केंद्र म्हणून भरभराटले. ट्रान्स-सायबीरियन रेल्वेमुळे त्याचे महत्त्व वाढले. सपाट प्रदेश, लिग्नाइट कोळशाच्या शक्तीचा भरपूर पुरवठा, पाणीपुरवठा, आजूबाजूच्या प्रदेशातील खनिजसमृद्धी व वाहतुकीच्या सोयी यांमुळे विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते वेगाने विकास पावले. अवजड उद्योगाचे केंद्र, लोखंड व पोलाद यांचे कारखाने, पोलादी नळीचा काराखाना, जस्तशुद्धीकारखाना, ट्रॅक्टर, हरतऱ्हेची यंत्रसामग्री, काटेकोर कामाची यंत्रे व त्यांची हत्यारे, रसायने इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे तांत्रिक, वैद्यकीय, शिक्षक प्रशिक्षण व कृषी महाविद्यालये आणि इतर शिक्षणसंस्था आहेत.
लिमये, दि. ह.