चिली : रिपब्लिका दे चिली. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील अत्यंत चिंचोळ्या आकाराचे प्रजासत्ताक. दक्षिणोत्तर लांबी सु. ४,४८० किमी. आणि पूर्वपश्चिम सरासरी रुंदी १९२ किमी. व जास्तीत जास्त रुंदी ३५४ किमी. क्षेत्रफळ ७,५६,९४५ चौ. किमी. लोकसंख्या १,००,४४,९४० (१९७२). विस्तार मुख्यतः सु. १७° २५′ द. ते ५५° ५९′ द. व सु. ६७° ३०′ प. यांदरम्यान. चिली हे नाव ‘जमिनीचा शेवट’ अशा अर्थाच्या इंडियन शब्दापासून आले आहे, असा समज आहे. पूर्वेकडील अँडीजच्या उत्तुंग पर्वतराजींनी आणि उत्तरेकडील आटाकामा रणाने चिली दक्षिण अमेरिकेतील बाकीच्या देशांपासून व जगापासूनही एकाकी पडला आहे. न्यूयॉर्क बंदर व्हॅलपारेझो पासून ९,४४० किमी. वर, तर न्यूझीलंडमधील वेलिंग्टन ९,२८० किमी. वर आहे. या एकलेपणाचा परिणाम चिली लोकांच्या जीवनावर बराच झालेला दिसतो.
चिलीच्या उत्तेरस पेरू व बोलिव्हिया, पूर्वेस अर्जेंटिना व बोलिव्हिया, दक्षिणेस ड्रेक पॅसेज व पश्चिमेस पॅसिफिक महासागर असून आग्नेय टोकाचा काही भाग अटलांटिकच्या किनाऱ्यावर आहे. अर्जेंटिना-चिली सीमा सु. ३,२०० किमी. आहे.
पॅसिफिकमधील वान फेर्नांदेस, ईस्टर, सॅन अँब्रोझो, साम फेलीक्स, साला-इ-गोमेझ व इतर काही बेटांचा चिलीत समावेश आहे. यांपैकी वान फेर्नांदेस बेटाच्या गटातील मास आ तीएरा बेटावर अलेक्झांडर सेल्किर्क नावाचा खलाशी पाच वर्षे एकटाच राहिला होता व त्याच्या अनुभवांवरच रॉबिन्सन क्रूसो ही प्रसिद्ध कादंबरी रचली आहे. अंटार्क्टिका खंडाच्या ५३° प. व ९०° प. या दरम्यानच्या पामर द्वीपकल्प या भागावर चिली आपला हक्क सांगतो. सध्या हा भाग ब्रिटन व अर्जेंटिना यांच्या स्वाधीन आहे. सँटिआगो [लोकसंख्या १७,५९,०८७ (१९७२)] ही राजधानी आहे.
भूरचना : भूरचनेच्या दृष्टीने पूर्वेचा अतिउंच अँडीज पर्वत प्रदेश, पश्चिमेची किनाऱ्याला समांतर गेलेली पर्वतश्रेणी आणि या दोहोंमधील खोऱ्याचा प्रदेश असे चिलीचे तीन स्वाभाविक भाग पडतात. अँडीज पर्वतप्रदेश उत्तरेच्या पूना दे आटाकामा या सरासरी ४,५०० मी. उंचीच्या पठारी प्रदेशापासून मध्य चिलीतील अर्जेंटिना सीमेवरील मौंट ॲकन्काग्वा या ७,०३५ मी. उंचीच्या शिखरापर्यंत असून तेथून तो दक्षिणेस चिलीच्या सरोवर प्रदेशांपर्यंत उंचीने कमी कमी होत जातो. त्यात हिमाच्छादित ज्वालामुखीय खिंडी पुष्कळ आहेत. चिलीतील सर्वोच्य शिखर मौंट ओहोझ देल सालादो (६,८७० मी.) हे आहे. ३२° ३७′ द. येथे चिली-अर्जेंटिना सीमेलगत ॲकन्काग्वा हे ७,०३५ मी. उंचीचे अमेरिका खंडातले सर्वोच्च शिखर असून त्याच्या दक्षिणेस उस्पालाता (बेर्मेहो) ही ३,९३७ मी. उंचीवरील आंतरराष्ट्रीय महत्त्वाची खिंड आहे. तिच्या खालून ३,१९१ मी. उंचीवरून चिली-अर्जेटिना लोहमार्गाचा बोगदा जातो व खिंडीजवळच चिली-अर्जेंटिनामधील एक सीमावाद मिटल्याच्या स्मरणार्थ उभारलेला ख्रिस्ताचा भव्य पुतळा आहे. किनारी पर्वतश्रेणी ३०० ते २,१०० मी. पर्यंत उंच असून ती जवळजवळ समुद्रातूनच वर आलेली आहे. उत्तरेस ती अँडिजच्या फाट्यास मिळते. तेथे अनेक पठारे व त्यांच्या दरम्यान खोल निदऱ्या तयार झालेल्या दिसतात. दक्षिणेस ही पर्वतश्रेणी व दऱ्या समुद्रात शिरून द्वीपसमूह निर्माण झाले आहेत. ४२° द. जवळ या पर्वतात फ्योर्ड घुसलेले आहेत. मध्यवर्ती खोरे सु. १,००० किमी. लांब व जास्तीत जास्त सु. ७५ किमी. रुंद असून त्याची उंची उत्तरेस १,२०० मी. पर्यंत गेलेली आढळते. ते आटाकामा वाळवंटापासून सूरु होऊन ४२° द. जवळ समुद्रात शिरले आहे. यातील ॲकन्काग्वा व बीओ व्हिओ नद्यांदरम्यानचा भाग हा चिलीचा सर्वांत सुपीक, कृषिप्रधान व दाट लोकवस्तीचा भाग होय. द. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर उत्तम बंदरे फार थोडी आहेत आणि त्याला चिली अपवाद नाही. मध्यवर्ती खोरे हे खऱ्या अर्थाने खोरे नसून दोन पर्वतरांगांमधील खोलगट प्रदेश आहे. तो सर्वच सलग नसून त्यात मधून मधून पर्वताचे फाटे किंवा एकेकटे डोंगर आहेत. त्यामुळे त्यात कित्येक द्रोणी प्रदेश निर्माण झाले आहेत. त्यांना पँपास असे स्थानिक नाव आहे. दक्षिण चिलीत हिमनद्या, हिमोढ, यू-दऱ्या बर्फाने तासलेले डोंगरांचे सुळके इ. हिमानी क्रियेचे प्रकार विपुल आहेत.
चिलीच्या एका बाजूस उंच अँडीज आणि दुसऱ्या बाजूला खोल पॅसिफीक आहे. दोहोचा हा संबंध ज्वालामुखी क्रियेशी आहे. चिलीत वारंवार जोरदार भूकंप होत आले आहेत. १५७५ पासून १०० वर तीव्र भूकंपाची नोंद झालेली आहे. अलीकडील काळात १९०६, २८, २९ व ६० सालचे भूकंप अत्यंत विनाशकारी होते.
हवामान : हवामानाच्या दृष्टीने चिलीचे साधारणतः खालीलप्रमाणे पाच भाग पडतात.
(१)नॉर्ते ग्रांदे म्हणजे विशाल उत्तर. हा प्रदेश पेरू सीमेपासून कोप्यापो नदीपर्यंत असून यातच जगातील अत्यंत रूक्ष प्रदेशात गणना असलेले आटाकामा रण आहे. या उजाड भागात वस्ती व लागवड फार थोडी आहे आणि वर्षानुवर्षे पाऊस पडत नाही. ईकीक आणि आरीका येथे २० वर्षांत जेमतेम ०·१५ सेंमी. वार्षिक पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी पाटबंधाऱ्यांनी पाणी आणून थोडी वस्ती केली आहे. चिलीचे एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन नायट्रेट येथे सापडते. अँडीजच्या उतारावर एखादे वेळी पाऊस पडतो व मोठी हिमवृष्टी होते तेव्हा पुराबरोबर चिखल व दगड-माती येऊन नायट्रेट धंद्यांचे मोठे नुकसान होते.
(२)नॉर्ते चिको म्हणजे छोटी उत्तर. कोप्यापो नदीपासून व्हॅलपारेझोच्या उत्तरेस २० किमी. पर्यंत ॲकन्काग्वा नदीपर्यंतचा मुलूख. हा भाग आटाकामाइतका उष्ण वा वैराण नाही व त्यात क्वचित पाऊसही पडतो. खनिज उत्पादन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. परंतु काही भागात शेतीही केली जाते.
(३)ॲकन्काग्वा नदीपासून दक्षिणेस कन्सेप्शन शहराजवळ पॅसिफिकला मिळणाऱ्या बीओ व्हीओ नदीपर्यंतचा मध्य चिली भाग. यातील हवा समशीतोष्ण असून किमान २·५° से. ते कमाल २९° से. व ५० सेमी. ते १०० सेंमी. इतका समाधानकारक पर्जन्य असतो. पशुसंवर्धन, खनिज उत्पादन, अन्नधान्ये, द्राक्षमळे व बागायत हे यातील प्रमुख उद्योग असून चिलीमधील जास्तीत जास्त वस्ती येथे आहे.
(४)मध्य दक्षिण चिली. बीओ व्हीओ नदीपासून प्वेर्तो माँतपर्यंतचा प्रदेश. वर्षभर पडणारा भरपूर पर्जन्य व थंड हवा यांमुळे पशुसंवर्धन, गव्हाची शेती व इमारती लाकूड हे यातील मुख्य व्यवसाय आहेत. व्हॅल्डीव्हिया येथे २७० सेंमी पाऊस पडतो.
(५)दक्षिण चिली. प्वेर्तो माँतपासून केप हॉर्नपर्यंतचा प्रदेश हा थंड व बरसाती हवेचा, काही ठिकाणी ५०० सेंमी. पावसाचा असून मुख्यतः लहानमोठी बेटे, खाड्या व सामुद्रधुन्यांनी व्यापलेला आहे. यात वनसंपत्ती मुबलक असून मत्स्यव्यवसायास आणि पशुसंवर्धनास अनुकूल आहे. या १,६०० किमी. लांबीच्या प्रदेशात हजारो मेंढ्यांचे कळप आहेत व लोकर पैदाशीत याचा अग्रक्रम आहे. अगदी दक्षिण भागात जोरदार वादळी वारे वाहत असतात.
चिलीच्या किनाऱ्याजवळून दक्षिणोत्तर जाणाऱ्या हंबोल्ट या थंड प्रवाहामुळे हवामानावर होणारा परिणाम किनाऱ्यांवरील सर्व भागात जाणवतो.
चिलीच्या काही नद्यांचे उगम अँडीजमध्ये व काही किनाऱ्यावरील पर्वतामध्ये आहेत. यांतील काही नद्या पॅसिफिकपर्यंत न पोहोचता आटाकामामध्येच जिरून जातात. अँडीजमधील नद्यांच्या धबधब्यांनी व प्रपातांनी चिलीच्या जलविद्युत्शक्तीची संभाव्यता वाढली, परंतु नौकानयनाला मात्र त्या उपयोगी पडत नाहीत. त्यापेक्षा किनारी सागरी वाहतूकच जास्त सोयीची आहे. लोआ, बीओ व्हीओ, मायपो, ईटाटा, कोप्यापो, ॲकन्काग्वा या काही प्रमुख नद्या होत. दक्षिण-मध्य चिलीत बरीच सरोवरे असून त्यांपैकी यांकीवे व रांको ही मोठी आहेत.
वनस्पती : अँडीजच्या पायथ्याशी वाढणारी काही खुजी झुडपे सोडल्यास उत्तरेस रणामध्ये वनस्पती वाढत नाहीत. काही भागात टामारूगो नावाची झुडपे वाढवून त्यांवर मेंढ्या पाळण्याचा प्रयोग चालू आहे. कोप्यापो नदीच्या दक्षिणेस हवेत थोडा दमटपणा असल्याने टेकड्यांवर काही हिरवळ व खोऱ्यामध्ये झाडी आढळते. मध्य चिलीच्या काही भागात बीच लॉरेल, एक प्रकारचा सायप्रस, अनेक जातीचे कॅक्टस यांची तुरळक वने आहेत. बरीच वने तोडली गेली आहेत व मोकळ्या जमिनीतील शेतीखाली नसलेल्या भागात चराऊ राने व शुष्क हवेतील खुरटी झाडे वाढलेली आढळतात. चिलीचा खरा वनप्रदेश कन्सेप्शनपासून दक्षिणेकडे पसरला आहे व त्यात समशीतोष्ण पानझडी, सदाहरित व सूचिपर्णी वृक्षांची दाट अरण्ये आहेत. अगदी दक्षिणेकडे थंडी व वादळी वारे यांमुळे वनस्पती खुज्या व विरळ होत जातात. अटलांटिक चिलीत गवत चांगले होते.
प्राणी : भौगोलिक दृष्ट्या अलग पडल्याने लॅटिन अमेरिकेत इतरत्र आढळणारे प्राणी चिलीत सापडत नाहीत. मोठ्या प्राण्यांपैकी प्यूमा किंवा जॅगुअर, ग्वानाको, व्हायकूमा, हरिण, लांडगा हे आढळतात. अरण्यात पुडू हे खुजे हरिण सापडते. लहान पक्षी अनेक आहेत परंतु त्या खंडातील मोठे पक्षी या देशात नाहीत. गोडे मासे कमी आहेत परंतु चिलीच्या किनाऱ्यापासून हंबोल्ट हा थंड प्रवाह जात असल्याने सागरात विविध व अनंत मासे सापडतात. चिलीचे शेवंडे (लॉब्स्टर) जगभर प्रसिद्ध आहेत. देवमासे पुष्कळ असून या भागात सील माशाच्या सहा जाती सापडतात.
इतिहास : स्पॅनिश आक्रमक चिलीमध्ये सोळाव्या शतकाच्या मध्यास आले. त्यापूर्वीचा चिलीचा इतिहास अस्पष्ट आहे. अँडीजच्या भिंतीमुळे अलग व आटाकामा रणामुळे कष्टप्रद झालेला हा प्रदेश इंकासारख्या लढाऊ आक्रमकांनाही भीतिप्रदच वाटला. पेरूतील आपल्या समृद्ध साम्राज्यातून अँडीजचे घाट उतरून जे थोडे इंका या भागात आले. त्यांनी तुरळक शाद्वलवनांत वस्ती केली. काही थोडे दक्षिणेकडे गेले आणि आजही पॅटागोनियात त्यांचे वंशज आढळतात. स्पॅनिश आक्रमक पनामा व लीमातून जलमार्गाने आले पण त्यांची संख्याही भरीव नव्हती. अद्यापही चिलीत शुद्ध यूरोपीय अत्यल्प आहेत.
इंकांचे स्वामित्व उत्तर चिलीत काही प्रदेशावर होते. १५३५ मध्ये त्यांच्या नेत्यांनी-स्पॅनिशांनी-चिलीत प्रवेश केला. परंतु चिली जिंकण्याचा खरा प्रयत्न १५४१ मध्ये सुरु झाला. त्या शतकाच्या अखेरपर्यंत एतद्देशीयांनी आक्रमकांस प्रखर विरोध केला. स्पेनच्या साम्राज्यास चिली जोडणारा पेद्रो दे व्हालदीव्ह्या याचा त्यांनी पराभव व वध केला (१५५३). एक दंतकथा अशी आहे, की सर्व स्पॅनिश आक्रमकांप्रमाणे व्हालदीव्ह्यालाही प्रदेशापेक्षा सोने हवे होते. तेव्हा कैद केल्यावर वितळलेले सोनेच त्याच्या घशात ओतण्यात आले परंतु त्याचे काम गारथीआ ऊरतादो दे मेनदोथा याने १५५७ ते १५६१ पर्यंत लढा देऊन पुरे केले. या काळात स्पॅनिश आक्रमक मॅगेलन सामुद्रधुनीपर्यंत पोहोचले परंतु चिलीतील आराऊकानियन जमातीचा पाडाव करणे त्यांना जमले नाही. या शूर लोकांचा पुरा पाडाव कधीच झाला नाही. दक्षिणेकडे हटत हटत गेल्याने आज त्यांची वस्ती मुख्यतः बीओ व्हीओ नदीच्या दक्षिणेस असून त्या प्रदेशांत त्यांचा अग्रहक्क मान्य करण्यात आला आहे. या लोकांच्या पराक्रमाच्या कथा चिली वाङ्मयात अजरामर झाल्या असून त्यांचा लाउतारो हा शूर पुढारी इतिहासात वीरात्मा म्हणून चिरंजीव झाला आहे.
चिलीचा पादाक्रांत प्रदेश नेत्यांनी त्यावरील दुर्भागी स्थानिक लोकांसह आपसात वाटून घेऊन पुढील सामंतशाहीची बीजे पेरली. पेरूमधून तो जिंकल्याने प्रथम तो पेरूच्या शासनाचा एक भाग होता. नंतर १९०६ मध्ये सँटिआगो येथे पेरूआधीन राज्यपाल नेमण्यात आला. १७७८ मध्ये तिसऱ्या चार्ल्सने आपल्या वसाहती शासनाची पुनर्घटना केली आणि चिलीस कार्यकारी स्वायतत्ता मिळाली. तथापि स्पेनच्या आर्थिक, व्यापारी व राजकीय धोरणांमुळे वसाहत काळात चिलीचे जीवन बंदिस्त व कुंठितच राहिले.
इ.स. १८०८ मधील नेपोलियनच्या स्पेनवरील स्वारीमुळे अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींच्या स्वातंत्र्यलढ्यास उठाव मिळाला. चिलीमध्ये १८ सप्टेंबर १८१० रोजी स्पॅनिश राजाचे दास्यत्व संपेपर्यंत त्याच्या नावाने कारभार पाहणारे राजमंडळ स्थापन झाले. हा दिवस आता स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात येतो. तथापि या संधीचा फायदा घेऊन स्वातंत्र्य जाहीर करावे. अशा मताचा एक पक्ष होताच. त्याच्या प्रेरणेने ४ जुलै १८११ रोजी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन बोलावण्यात आले. याचे नेतृत्व बेरनार्दो ओईगीन्स आणि काररेरा यांजकडे होते. ओईगीन्सचे शिक्षण यूरोपात झाल्याने तेथील नव्या विचारांनी तो भारला होता. त्याचे व काररेराचे एकमत होईना, या दुहीचा फायदा उठवून पेरूतील राजनिष्ठांनी चिलीच्या देशभक्तांना देशत्याग करणे भाग पाडले. ओईगीन्सने आपल्या ३,००० अनुयायांसह अँडीजपलीकडील मेंदोसा शहरी आसरा घेतला. येथेच द. अमेरिकेचा स्वातंत्र्ययोद्धा सान मारतीन क्रांती सैन्याची उभारणी करीत होता. त्याच्या साहाय्याने ओईगीन्सने चिलीतील राजनिष्ठ सैन्याचा पराभव करून १२ फेब्रुवारी १८१८ रोजी चिलीचे स्वातंत्र्य जाहीर केले. स्पेनने हे स्वातंत्र्य १८४४ मध्ये मान्य केले.
स्वातंत्र्यानंतरच्या काही कालखंडांना त्या त्या कालातील राज्यपद्धतीचा बोध होईल अशी नावे पडली आहेत. एकतंत्रीय गणतंत्र (रिपब्लिका ऑटोक्राटिका) १८३१ ते १८४१, उदार गणतंत्र (रिपब्लिका लिबेराल) १८६१ ते १८७१, लोकतंत्री गणतंत्र (रिपब्लिका देमोक्रातिया) १८९१ ते १९२०. ही नावे चिलीच्या लोकशाहीच्या प्रगतिमार्गावरील टप्पे दाखवतात, असे म्हणण्यास हरकत नाही.
स्वातंत्र्यानंतर ओईगीन्सला सर्वाधिकार देण्यात आले आणि त्याने यूरोपीय उदार विचारांनुसार शहरसुधारणा, शेती, व्यापार, यांस उत्तेजन, शाळा आणि ग्रंथालये यांची स्थापना इ. कार्ये हाती घेतली. चिलीचे नौदलही निर्माण केले. यामुळे सुबत्ता आली पण देशातील सामंतशाहीस आपल्या निरंकुशत्वास धोका वाटू लागला. त्यांच्या विरोधावर तोडगा म्हणून त्याने १८२४ मध्ये संविधान सभा आयोजित केली. या सभेने केलेली घटना अंमलात येऊ शकली नाही. १८२३ मध्ये ओईगीन्सला देशत्याग करावा लागला. १८२३ ते १८२६ पर्यंत रामॉन फ्रेइरे याने हुकुमशाही गाजवली पण देशातील मतभेद मिटले नाहीत व १८२९-३० मध्ये यादवी माजली, यात सामंतांचा विजय झाला. त्यांच्या विरूद्ध पक्ष साधारणतः शहरी व वाणिज्य लोकांचा होता आणि या पक्षाचे त्याचे धोरण धर्मातीत व फ्रेंच राज्यक्रांतीतील विचारांनी प्रेरित होते. परंतु तीन शतके स्पेनच्या एकतंत्री राज्यव्यवस्थेखाली दडपलेल्या सामान्य चिली लोकांमध्ये अशा विचारांना थारा देण्याचे सामर्थ्य नव्हते. एक शतकभर चिलीचे शासन थोड्याबहुत अपवादाने सामंतशाहीच्याच हाती राहिले. तथापि लॅटिन अमेरिकेत चिलीने एक अपवाद निर्माण केला. या शतकभर चिलीत शांतता नांदली आणि पुष्कळांच्या मते चिली आज लॅटिन अमेरिकेत सांस्कृतिक आघाडीवर आहे आणि तेथील समाज सुबुद्ध व समंजस मानला जातो. याचे श्रेय याच वर्गाच्या धोरणी हुकुमशाहीस आहे. चिलीच्या भवितव्याचा मार्ग आखून देणाऱ्यांत द्येगो पॉर्तालेस या हुकुमशहाचा (१८२३–३७) मोठा हात आहे. त्यानेच १८३३ ची घटना केली. या अन्वये २५ वर्षांवरील साक्षर व काही मत्ता असलेल्यांनाच मताधिकार होता. ही घटना १९२५ पर्यंत अबाधित राहिली. प्रबळ केंद्र व रोमन कॅथलिक पंथ हा राजधर्म हे या घटनेचे वैशिष्ट्य होय. त्यामुळे विस्तीर्ण मालमत्तेचे सामंत आणि कॅथलिक धर्मपीठ या शक्ती चिली शासनाच्या पाठिंब्यास राहिल्या .
पॉर्तालेस हा चिलीतील पहिल्याच राजकीय पक्षाचा, रूढिवाद्यांचा नेता होता. १८३७ मध्ये पेरू-बोलिव्हियाचे संयुक्त राज्य फोडण्यास मदत केल्याने त्याचा खून झाला, परंतु पुढील तीस वर्षे त्याने ठरविलेल्या धोरणानुसार चिलीचा राज्यकारभार चालला. यूरोपीय आप्रवाशांस उत्तेजन, दक्षिण प्रदेशात वसाहती व तांब्याच्या व्यापाराची तेजी ही या काळाची वैशिष्ट्ये होत. आप्रवाशांत जर्मनांचे आधिक्य होते. याच काळात बाष्पशक्तीचा शोध होऊन सागरी व्यापारास तेजी आली व शिक्षणपद्धती व प्रसार सुधारला.
१८६१ मध्ये उदारपक्ष प्रबळ होऊन त्यांचे उदार गणतंत्र १८९१ पर्यंत स्थिर राहिले. बडे सामंत व कॅथलिक धर्मपीठ यांच्या सवलतीवर बंधने व शिक्षण, वाहतूक व शासकीय कारभारात सुधारणा झाल्या. मताधिकाराकरिता मत्तेची अट सैल होऊन साक्षरांस हक्क मिळाले. राष्ट्राध्यक्षाच्या ताबडतोब पुनर्निवडीवर बंदी झाली व त्याचा रोधाधिकारही मर्यादित झाला. धर्मपीठावरील बंधनामुळे प्रखर वादळे माजली.
१८६६ मध्ये स्पेन-चिली युद्ध होऊन स्पेनच्या जहाजांनी व्हॅलपारेझोवर पाशवी भडीमार केला. याच सुमारास आराउकानी विरोधाचा उपशम करण्यात आला.
तथापि यातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे चिलीचे पेरू-बोलिव्हियाशी युद्ध होय. उत्तर चिली, दक्षिण पेरू आणि बोलिव्हियाची किनारपट्टी यांतील नायट्रेट बहुतांश चिली कंपन्याच काढीत असत. १८६० मध्ये त्यास विलक्षण तेजी चढली. त्यावर करपट्टी आणि इतर अधिकार बजावण्याचा कटकटीवरून हे युद्ध झाले. हे पॅसिफिक युद्ध (१८७९–८३) चिलीने जिंकून लीमाचा तीन वर्षे ताबा घेतला व बोलिव्हियाची किनारपट्टी आणि पेरूचे तारापाका, ताक्ना व आरीका जिल्हे घेतले. यांतील तारापाका कायम व इतर दोन दहा वर्षांकरिता चिलीस द्यावे लागले. त्यानंतर त्यात सार्वत्रिक मतदान व्हावयाचे होते ते कधीच झाले नाही. अखेर १९२९ मध्ये अ.सं.सं. च्या लवादाने आरीका चिलीस आणि ताक्ना पेरूस देऊन हा वाद मिटविला. या रुक्ष जिल्ह्यातील खनिजामुळे चिलीच्या आर्थिक सुबत्तेत महत्त्वाची भर पडली.
या काळात राष्ट्राध्यक्ष नाममात्र राहून सत्ता संसदेच्या हाती राहिली. राष्ट्राध्यक्ष बाल्मासेदा (१८४२–९१) याने नव्या सुबत्तेचा उपयोग सामान्यांचे जीवनमान सुधारण्याकडे करण्याचे योजले परंतु सामंतांच्या हातातील संसदेने त्यास विरोध केला व पदच्युत केले. यावरून यादवी माजून १०,००८ लोक त्या लढ्यात मारले गेले आणि पराभवामुळे बाल्मासेदाने आत्महत्या केली. संसदेच्या हाती आलेली सत्ता १९२० पर्यंत टिकली.
१८९१ ते १९२० हा कालखंड संसदीय लोकशाहीचा समजला जातो, पण शासनात लोकशाही नसून सामंतशाहीच होती. तथापि नागरिक स्वातंत्र्य अबाधित राहिल्याने अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले. सुबत्तेचा फायदा छोटे शेतमालक व इतर श्रमिक यांना झाला नाही. शहरे व लघुउद्योग वाढले, त्याचबरोबर कामगारवर्ग वाढून त्यांच्या असमाधानास धार चढली. पहिल्या महायुद्धानंतर तांबे व नायट्रेट यांचे भाव घसरल्याने उद्भवलेल्या कठीण अवस्थेत याचा स्फोट झाला.
त्यातच यूरोपीय नवविचारांची, विशेषतः रशियन क्रांतीमुळे भर पडली. १९२० मध्ये गरिबांचा कैवारी समजला जाणारा आरतूरो आलेसांद्री राष्ट्राध्यक्ष झाला. संसदेच्या हाती सत्ता असल्याने त्याच्या उदार योजना त्यांनी हाणून पाडल्या व १९२४ साली लष्करी उठाव करून त्यास पदच्युत केले. परंतु चिलीची घडी इतकी विस्कटली होती, की १९२५ मध्येच त्याला इटलीतील निर्वासनातून बोलावून घ्यावे लागले. येताच त्याने नवे संविधान मान्य करून घेतले व संसदीय राज्यपद्धती बदलून राष्ट्रपतीच्या हाती सत्ता केंद्रित केली. धर्म व शासन यांची फारकत, सक्तीचे, प्राथमिक शिक्षण, खासगी मालकी, लोकहितार्थ मर्यादित मंत्रिमंडळ, संसदेऐवजी राष्ट्राध्यक्षास जबाबदार ही या संविधानाची वैशिष्ट्ये होत. राष्ट्राध्यक्षाची मुदत चारऐवजी सहा वर्षांची करण्यात आली. परंतु या सुधारणाही विरोधकांवर मात करू शकल्या नाहीत व ऑक्टोबर १९२५ मध्ये आलेसांद्री पुन्हा इटलीत निर्वासित झाला. चिलीच्या आर्थिक जीवनाच्या नाड्या अ.सं.सं. च्या हाती असल्याने जेव्हा जेव्हा चिलीतील शासन समतावादाकडे झुकण्याचा संभव दिसला, तेव्हा तेव्हा अ.सं.सं. व चिलीची सामंतशाही एकत्र येऊन त्यास खंड पडला. आलेसांद्रीची कथा याहून वेगळी नाही.
त्याच्यानंतर इबान्येथ या सैन्याधिकाऱ्याने हुकमत गाजवली आणि अं.सं.सं. च्या पाठबळामुळे चिलीस सुबत्ता आली. काळाकडे लक्ष देऊन कामगारवर्गाच्या सुखसोयींचा थोडा विचार होऊ लागला व काही राष्ट्रीय उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु १९३० च्या जागतिक मंदीत त्यांचा बळी पडला. इबान्येथला पदत्याग करावा लागला व एक शतकभर थोडी-बहुत शांतता होती ती भंगून वर्षभर दंगे, संप व गटबाजीचे राज्य सुरू झाले. अखेर डिसेंबर १९३२ मध्ये आलेसांद्री पुन्हा अधिकारावर आला. आपल्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने शांतता राखली व आर्थिक गर्तेतून देशास वर काढले. परंतु फॅसिस्ट इटलीतील वास्तव्याचा परिणाम म्हणून असो, त्याकरता जुलमी उपाय योजण्यास त्याने मागेपुढे पाहिले नाही. यामुळे उदार व डाव्यांनी जनता आघाडी उघडून साम्यवाद्यांच्या साहाय्याने १९३८ ची निवडणूक जेमतेम जिंकली व पेट्रो आगीर्रे सेर्दा राष्ट्राध्यक्ष झाला. त्याने रूझवेल्टच्या नव्या घडीच्या धर्तीवर कार्यक्रम आखला. परंतु ऑगस्ट १९३९ मध्ये स्टालिन-हिटलर करार होताच जनता आघाडीतील साम्यवाद्यांनी तेथील नाझी-फॅसिस्टांशी संगनमत करून तिचा भंग केला. सामंत व धर्मपीठे विरूद्ध होतीच. त्यातच ५०,००० वर प्राणहानी करणाऱ्या भूकंपाची भर पडून ओइथेच्या योजनांचा बोजवारा उडाला. तथापि शेतकी, उद्योग खाणी आणि मच्छीमारी इ. विकासाकरिता उभारलेली यंत्रणा कार्यान्वित राहिली. १९४१ मध्ये हा मरण पावला आणि मार्च १९४२ मध्ये व्हान आनतोन्यो रीओस राष्ट्राध्यक्ष झाला. दुसऱ्या महायुद्धामुळे रीओसला विशिष्ट अडचणीस तोंड द्यावे लागले, कारण चिलीमध्ये जर्मन संख्या बरीच होती व नाझी हेर, प्रचारक व गु्प्त ध्वनिक्षेपणे यांचा सुळसुळाट झाला होता. अ.सं.सं. ने चिलीची खनिजे विशिष्ट दराने घेण्याचे कबूल करून आणि इतर प्रलोभने देऊन त्यास एतद्देशीयांस तोंड देण्यास साहाय्य केले व रीओसने हळूहळू चिलीचे लोकमत दोस्त राष्ट्रांस अनुकूल केले.
महायुद्धानंतर मात्र बेसुमार चलनवाढीने अर्थव्यवस्था कोलमडून साम्यवाद्यांच्या कारवायांस वाव मिळाला व दंगे, संप यांनी देशाचे जीवन विस्कटून गेले. यातच १९४६ मध्ये रीओस मरण पावला व गाब्रिएल गॉनथालेथ व्हिदेला राष्ट्राध्यक्ष झाला. यास साम्यवाद्यांचा पाठिंबा होता व आपल्या मंत्रिमंडळात त्याने तीन साम्यवादी घेतले होते. परंतु त्या काळात जागतिक साम्यवादी धोरण लोकशाह्यांना बदनाम करण्याचे असल्याने त्या पक्षाने चिलीत यादवी, संप, इतर पक्षीय सहकाऱ्यांची बदनामी सुरूच ठेवली व गॉनथालेथला तिन्ही मंत्र्यांस पदच्युत करणे भाग पडले. याचा परिणाम अधिक दंग्यात झाला व चिलीच्या साम्यवाद्यांच्या कृत्यात हात असल्याच्या संशयावरून त्याने रशिया, चेकोस्लोव्हाकिया व यूगोस्लाव्हियाशी संबंध तोडले. संसदेतील साम्यवादी प्रतिनिधी काढून टाकण्यात आले व तो पक्ष बेकायदेशीर ठरविण्यात आला (१९४८). त्याबरोबर १९५८ मध्ये पक्ष वैध होईपर्यंत त्याचे अनुयायी भूमिगत झाले. उद्योग खाणीतील मजूर आणि काही बुद्धिवादी वर्ग यांचा या पक्षास पाठिंबा आहे.
गॉनथालेथच्या मध्यमार्गी धोरणाने त्याला डावे व उजवे दोघांचाही विरोध राहिला परंतु कोरिया युद्धाने हात दिल्याने खनिजांची किंमत वाढून पुन्हा सुबत्ता आल्याने त्याला आपली कारकीर्द संपविता आली. १९५२ च्या निवडणूकीत सर्वांचे अंदाज फोल करून १९३१ मध्ये पदच्युत झालेला व १९३८ व १९४८ मध्ये लष्करी उठावाने सत्ता काबीज करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा, बहात्तर वर्षांचा जनरल इबान्येथ निवडून आला. मात्र संसदेत एकाचेच मताधिक्य असल्याने त्यास हुकूमशहा होणे अशक्य झाले आणि पक्षोपक्षांचे संयुक्त मंत्रिमंडळ करावे लागल्याने त्यात वारंवार फेरबदल करावे लागले. जीवनमान वाढत होतेच. त्यामुळे संपाचे सत्र सुरू होते आणि १९५८ मध्ये त्याला उपरोधावस्था जाहीर करावी लागली.
इबान्येथनंतर आर्तुरो आलेसांद्रीचा मुलगा हॉर्हे आलेसांद्री हा १९५८–६४ करता राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. याला मुख्यतः चलनवाढीस व लाचलुचपतीस आळा घालणे यांवर लक्ष द्यावे लागले. यात त्यास फारसे यश लाभले नाही. १९६० साली चिलीत पुन्हा भयंकर भूकंप होऊन प्रचंड नुकसान झाले, व त्याच्या अडचणी वाढल्या. चिलीतील अल्पसंख्य सामंत व सुखवस्तू आणि बहुसंख्य ‘नाहिरे’ यांच्या जीवनमानातील अंतर अद्याप इतके भयंकर आहे, की १९६४ च्या निवडणुकीत साम्यवादी उमेदवार निवडून येण्याची शक्यता दिसू लागली होती परंतु कॅथलिक धर्मपीठे, बहुसंख्य स्त्रीमतदार व सामंत यांच्या बळावर एद्वार्दो फ्रेई मोंताल्व्हा हा १९६४ साली राष्ट्राध्यक्ष झाला.
१९६५ च्या निवडणुकीत संसदेत ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाला चांगले मताधिक्य मिळून मोंताल्व्हाला भक्कम पाठिंबा मिळाला. त्याने शेती-विषयक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला परंतु पंचवीस वर्षांपूर्वीपेक्षाही निरक्षरता वाढली. कृषिप्रधान भागात ७% श्रीमंत शेतकरी ९०% भूमीवर नियंत्रण ठेवीत होते. ग्रामीण आणि नागरी कामगारवर्गाची कुचंबणाच होत राहिली. चलनफुगवटाही वाढला आणि १९७० च्या खुल्या अध्यक्षीय निवडणुकीत साल्वादोर आयंदे हा त्याचा मार्क्सवादी प्रतिस्पर्धी थोड्याच मताधिक्याने निवडून आला. आयंदेने कम्युनिस्टांसह पाच डाव्या पक्षांचा पाठिंबा मिळविला होता. त्याने बँका, नायट्रेट व तांबे उद्योग यांचे राष्ट्रीयीकरण, छोट्या शेतकऱ्यांना जमिनी देणे, परदेशीय मालावर कडक नियंत्रण असे धोरण ठेवले. त्याने कामगारांचे वेतन वाढवून दिले व त्यासाठी अधिक नोटा छापल्याने चलनफुगवटा निर्माण झाला. महागाई आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंची दुर्मिळता वाढली व १९७२ मध्ये मोठा संप झाला. हा संप बहुतांशी मध्यमवर्गीयांचा होता. मार्च १९७३ च्या संसद निवडणुकीत सरकारपक्षाला बहुमत मिळाले नाही. काळ्या बाजारात देशाच्या चलनाची भयंकर घसरगुंडी झाली. परदेशी प्रवाशांना डॉलर किंवा तत्सम चलन घेऊन येणे आणि दररोज निदान १० डॉलर सरकारी दराने खर्च करणे आवश्यक केले गेले. तांब्याच्या खाणीतील संपाने शासनाचे पाठीराखे व विरोधक यांच्यात चकमकी होऊ लागल्या. आयंदेने यादवी युद्ध टाळण्यासाठी विरोधकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनमालकांचा संप, अस्थिरता आणि अत्याचार यांतून शेवटी सरकार उलथून पाडण्याचा लष्करप्रमुखांचा कट ११ सप्टेंबर १९७३ रोजी यशस्वी झाला. डॉ. आयंदे कैद व ठार झाला. काहींच्या मते त्याने आत्महत्या केली. जनरल ऑगस्टो पिनोचेत हा राष्ट्राध्यक्ष बनला. नव्या शासनाने संसद बरखास्त केली. राजकीय चळवळींवर बंदी घातली व नियंत्रणे कडक केली. तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण चालूच राहील असे ठरविले. मात्र आयंदे राजवटीत ४० एकरांपेक्षा कमी असलेल्या जमिनी काढून घेऊन भूमिहीनांना दिल्या होत्या, त्या मूळ मालकास परत दिल्या. परदेशांशी अधिक मित्रत्वाचे संबंध वाढविले आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न चालविला.
राजकीय स्थिती : सध्याची राज्यघटना १९२५ साली मान्य करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे चिलीचे शासन कार्यकारी, विधायी व न्यायिक असे विभागलेले आहे. शासन धर्मातीत असून नागरिकांस धार्मिक स्वातंत्र्य आहे. समाजकल्याण हे शासनाचे प्रमुख कार्य घोषित केले आहे.
राष्ट्राध्यक्षाच्या हाती सर्व सत्ता केंद्रित झालेली असून त्याची निवड ६ वर्षांकरिता सार्वत्रिक मतदानाने होते. त्यास ताबडतोब पुनर्निवडणुकीस उभे राहता येत नाही. निवडणुकीत कोणाही उमेदवारास अर्ध्याहून अधिक मते मिळाली नाहीत, तर सर्वांत अधिक मते मिळालेल्या दोनांतून एकास राष्ट्राध्यक्ष करण्याचा अधिकार संसदेस आहे. अशी निवड १९२०, १९५२, व १९५८ मध्ये करावी लागली. उपराष्ट्रपती नसल्याने राष्ट्रपतीचा मृत्यू झाल्यास १० दिवसांच्या आत नवी निवडणूक करावी लागते.
मंत्रिमंडळ, मंत्रालयातील उच्च अधिकारी, राजदूत, राज्यपाल, वरिष्ठ न्यायाधीश आणि सैन्याधिकारी राष्ट्राध्यक्ष आपल्या पसंतीनुसार नेमतो. मंत्र्यास संसदेत हजर राहण्याचा अधिकार आहे पण मत देण्याचा नाही.
प्रांतीय राज्यपालास सल्ला देण्याकरिता प्रांत संसद आहे. प्रत्येक प्रांताचे शासकीय सोयीकरिता विभाग व जिल्हे केलेले असून त्यावरील अधिकारीही राष्ट्राध्यक्षाचे नामित असतात.
राष्ट्रसंसद द्विसदनी आहे. प्रत्येकी ३०,००० चे वस्तीत एक प्रतिनिधी असे प्रतिनिधी मंडळ आहे व त्याची मुदत चार वर्षांची आहे. राष्ट्राध्यक्ष व काही उच्च अधिकऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचा अधिकार फक्त याच मंडळास आहे.
राज्यमंडळ दहा प्रांतीय गटांतून प्रत्येक पाच सदस्य असे पन्नास सदस्यांचे निवडले जाते. याची मुदत आठ वर्षांची आहे. तथापि यातील जवळजवळ निम्म्या सदस्यांची निवडणूक दर चार वर्षांनी येते. अठरा वर्षे व त्यावरील वयाच्या सर्व नागरिकांस मताधिकार आहे. १९४९ पासून स्त्रियांसही मताधिकार मिळाला आहे.
दोन्ही मंडळांच्या एकत्र बैठकीत दोनतृतीयांश मत झाले, तर राष्ट्राध्यक्षांचे रोधमत रद्द होते.
सर्वोच्च न्यायालयाचे तेरा न्यायाधीश असून त्यांच्या अधिकारात खालच्या श्रेणींची न्यायालये आहेत. यांचे न्यायाधिकारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या यादीमधून राष्ट्रपती निवडतो. राजधानीत उच्च न्यायालय व देशाला १० अपील न्यायालये आहेत.
संरक्षण : चिलीने ९ एप्रिल १९५२ रोजी अमेरिकेशी लष्करी मदतीचा करार केला. त्या अन्वये अमेरिकेस चिलीतून कच्चा माल उपलब्ध होतो व पश्चिम गोलार्धाच्या संरक्षणासाठी लष्करी बळ उपलब्ध होते.
२० ते ४५ वर्षांमधील प्रत्येक नागरिकांस संरक्षण दलात किमान एक वर्ष सेवा करावी लागते. त्यानंतर पुढील बारा वर्षे तो राखीव दलात राहतो. चिलीचे खडे दल ३२,००० असून राखीव २,००,००० आहे. चिलीच्या सैन्यात १० मोटार पथकांसह १६ पायदळ-पथके, ५ इंजिनियर, २ चिलखती धरून ६ घोडेस्वार-पथके आहेत. नौदलात १९७३ मध्ये १,३०० अधिकारी आणि १८,५०० सैनिक, २,२०० सागरी व किनारी तोफखाना सैनिक आहेत. वायुदलात २०० विमाने व ८,५०० सैनिक आहेत. १९६९ मध्ये पोलिस दल अधिकाऱ्यांसह २३,००० चे होते.
आर्थिक स्थिती : नैसर्गिक संपत्तीच्या दृष्टीने चिली आपल्या भोवतीच्या देशांहून भाग्यवान आहे. सुस्थिर सुबत्तेस आवश्यक अशा सर्व गोष्टी, खनिजे, शक्तीची साधने, सुपीक मृदा, पाणीपुरवठा, वनसंपत्ती या देशात भरपूर आहे. उत्तर व दक्षिण टोकांस पराकोटीचे अतिउष्ण व अतिथंड हवामान आहे, परंतु ४० टक्के भागात सुखावह आहे. तथापि नैसर्गिक साधनसंपत्तीचा पूर्णपणे उपयोग केला जात आहे, असे म्हणता येत नाही.
मृदा विविध प्रकारची आहे. मध्य चिलीत ती अत्यंत सुपीक असून गहू, बार्ली व ओट ही पिके तिथे निघतात. शिवाय भात, मका, कडधान्ये, मटार, बटाटे, कांदे, लसूण व फळे निघतात. सफरचंद, टरबूज व द्राक्षे अमेरिकेला निर्यात होतात. चिलीची मद्ये प्रसिद्ध असून त्यांना यूरोपातही मागणी आहे. देशाच्या गरजेच्या एक- तृतीयांश कापूस चिलीत पिकतो. १९५५ मध्ये प्रत्येकी सु. ४,७१० हे. ची. ३०० मोठी शेते होती व ५ लक्ष शेतकरी प्रत्येक कुटुंबास १·६ हे. जमीन याप्रमाणे कसत होते. १९७२ च्या शेती सुधारणा कायद्याने ३,६०१ शेतांच्या ७०,६८,७८० हे. जमिनीवर ४३,२४५ शेतकरी कुटुंबे वसविली गेली. शेती व वनविभाग यांत देशांतील १/३ लोक काम करतात परंतु उत्पादन मात्र १/९ च होते. १९६८ मध्ये एकूण ५·२४ कोटी हे. उपयुक्त जमिनीपैकी १४·९% शेतीसाठी, २६·७% चराऊ राने, २८·८% अरण्ये व २९·६% मरुभूमी होती. चिलीला दरवर्षी त्याच्या गरजेच्या २/३ अन्नपदार्थ आयात करावे लागतात व हा एकूण आयातीचा चौथा हिस्सा होतो.
चिलीचा १,५६,००० चौ. किमी. प्रदेश वनाच्छादित आहे व तो बहुतेक दक्षिणेत आहे. दळणवळणाची गैरसोय व बेफिकीर जंगलतोड यामुळे संपत्तीचा व्हावा तसा उपयोग होत नाही. पाइन, युकॅलिप्टस व पॉप्लर वृक्ष मुद्दाम संवर्धिले असून ३२,५५० चौ. किमी. मूळचे अरण्य आहे. तेथील मऊ लाकडापासून १९७१ मध्ये २·२ लक्ष वेष्टन कागद तयार झाला.
चिलीच्या सागरात अनेक मासे आहेत, पण त्यांचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग अलीकडेच होऊ लागला आहे. चिलीच्या शेवंड्यांस जगात तोड नाही. १९७२ मध्ये ७,९१,१७९ मे. टन मासे पकडण्यात आले.
चिलीच्या नागरिकांपैकी आर्थिक दृष्ट्या कार्यकारी ३१,३७,००० लोकांची १९७१ मध्ये शेती २३·९%, उद्योग १९·२%, बांधकाम ६·२%, वाहतूक ५·८०%, खाणकाम ३·२%, आणि नोकरी व व्यापार इ. ४१·५% अशी वाटणी होती.
पशुसंवर्धन चिलीच्या आर्थिक जीवनाचे महत्त्वाचे अंग असून मोठ्या जमिनदाऱ्या त्यामुळेच तगून आहेत. चिलीतील पशुसंख्या १९६५ मध्ये १,१०,६०,००० शेतीवर असून यातील अर्ध्याहून अधिक मध्य चिलीत व बाकीची दक्षिण भागात होती. या भागात आता दुग्धशाळांची संख्या वाढते आहे. १९७३ मध्ये गुरांची संख्या ३१,५०,००० होती. उत्तर व मध्य चिलीत ३०,००,००० वर मेंढ्या आहेत आणि दक्षिणेतील आयसेन व मागायानेस जिल्ह्यांत तितक्याच मेंढ्यांची जोपासना होते. यांचे मांस व लोकर उच्च दर्जाची आहेत. देशातील ७०% लोकर म्हणजे सु. १४,००० मे. टन कापडधंद्यात वापरली जाते. १९७१ मध्ये २,७१० मे. टन रेयॉन धाग्याचे उत्पादन झाले.
पहिल्या महायुद्धानंतर चिलीत यंत्रयुग सुरू झाले व औद्योगिकीकरण झपाट्याने होऊ लागले आणि १९५० पर्यंत द. अमेरिकन देशांत चिली औद्योगिक आघाडीवर आला. याचे बरेचसे श्रेय उत्पादन निगमाकडे (कार्पोरेसिऑन दे फोमेंतो दे ला प्राडुक्सिऑन) जाते. यास थोडक्यात फोमेंतो म्हणून संबोधतात. फोमेंतोने शक्तीउत्पादन व पोलाद उद्योगे यांकरिता सल्ला व भांडवल देऊन मोठे कार्य केले आहे. चिलीचे उद्योग विविध असून एकावलंबित्वाचा धोका टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अन्नसामग्री, साखर, पादत्राणे, तंबाखू, कापड, कपडे, रसायने, औषधे, सिमेंट, रबर, रेडिओ, विद्युत् उपकरणे, कागद, फर्निचर, धातूचे जिन्नस, पोलाद, लोखंड, डीझेल, खनिज तेल, टायर, सिगारेट, काच, काड्यापेट्या, इ. उद्योग यात येतात. कन्सेप्शनजवळ वाचीपाटो येथे राष्ट्रीय मालकीचा पोलाद कारखाना असून १९७१ मध्ये येथे ४,९९,८४५ मे. टन उत्पादन झाले.
खाणकामात ५ टक्क्यांहून कमी लोक असूनही देशाच्या निर्यातीच्या किंमतीचा ८५ टक्के भाग खनिजांचा आहे. चिलीची खनिजसंपत्ती हेवा वाटण्यासारखी आहे. उत्तरेस आटाकामा रणात सोडियम नायट्रेटचे प्रचंड साठे ७२० किमी. वर पसरले आहेत. या खनिजांचे उत्कृष्ट खत होते आणि अर्धशतकापूर्वी चिली या खनिजांचा पुरवठा जगाला करणारे एकमेव राष्ट्र होते. पहिल्या महायुद्धात जर्मनीस याचा पुरवठा करणे अशक्य होऊन त्या देशाने कृत्रिम नायट्रेट तयार केले. परिणामतः नैसर्गिक नायट्रेटच्या किंमती उतरल्या. त्यामुळे या खनिजांचे निरनिराळे उपयोग करण्याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष पुरवले व जी द्रव्ये शोधली, त्यांतील आयोडिन हे एक होय. जगातील आयोडिनपैकी ¾ आयोडिन एकट्या चिलीमध्ये निर्माण होते. १९७१ मध्ये ७,८२,५०० मे. टन नायट्रेटचे उत्पादन झाले व आयोडिनचे २,२१२ मे. टन झाले. पोटॅशियमची लवणे हे आणखी एक उत्पादन होऊ लागले आहे.
चिलीतील तांब्याच्या खाणी अनेक शतके ज्ञात असून त्या मुख्यतः उत्तर चिलीच्या पर्वतात आहेत. हे साठे प्रचंड असून ज्ञात तांब्याच्या जागतिक साठ्याचा ⅓ चिलीमध्ये आहे. त्या देशाच्या निर्यातीत किंमतीच्या दृष्टीने तांब्याचा वाटा सु. ८०% असतो. १९७० साली चिलीमध्ये ७,०७,५०० मीटर टन तांबे निघाले. चूकीकामाता येथील २,७०० मी. पेक्षा अधिक उंचीवरील तांबेखाण सर्वांत मोठी आहे. १९७१ मध्ये तांबेखाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
सोने, चांदी, मँगॅनीज, मॉलिब्डिनम, गंधक, मीठ, शिसे, जस्त, लोखंड, टाकणखार, ही खनिजेही उल्लेखनीय आहेत. १९७१ मध्ये १,९९६ किग्रॅ. सोने, ८४,८९७ किग्रॅ चांदी, ६,३२१ टन मॉलिब्डिनम, १,९८२ टन जस्त, ९९·१२ टन मँगॅनीज, ८८१ टन शिसे व ४,२५,५९३ टन मीठ असे उत्पादन झाले. कोकींबो प्रांतांत लोहधातुक अत्यंत शुद्ध स्वरूपात सापडते. याचे उत्पादन १९७१ मध्ये ११२·२ कोटी मीटर टन झाले. जगातील टाकणखार उत्पादनाचे अर्धे उत्पादन चिलीमध्ये होते. आणि उत्तर चिलीतील अँडीजमध्ये श्रेष्ठ प्रतीच्या गंधकाचे मोठे साठे आहेत. १९७१ मध्ये १,०९,१९७ टन गंधकाचे उत्पादन झाले.
इंधन व शक्ती पुरवठ्यामध्ये चिली समृद्ध आहे. कारण द. अमेरिकेत या दोहोंचीही कमतरता फार आहे. जे थोडे साठे आहेत ते चिलीमध्ये आहेत. कोळशाचे साठे मुख्यतः आरौको आखाताजवळ आहेत पण ते विस्तीर्ण नाहीत. उत्पादन दर साल २०,००,००० टनाचे आसपास आहे. हा कोळसा उत्तम जातीचा म्हणून प्रसिद्ध आहे. १९७१ मध्ये १५·२ लक्ष टन कोळसा उत्पादन झाले. टिएरा डेल फ्यूगोमध्ये १९४५ मध्ये तेलखाणी सापडल्या असून १९५७ मध्ये त्याचे उत्पादन दरसाल ५,००,००० बॅरलपर्यंत गेले होते. या भागात विस्तीर्ण तेलसाठे असावेत असा अंदाज आहे. १९७१ मध्ये २०·५ लक्ष घ.मी. तेल व ६१,७४० कोटी घ.मी. वायूचे उत्पादन झाले.
जलविद्युत् शक्तीची संभाव्यता फार मोठी आहे पण सध्या याचा अल्पांशच उपयोगात आहे. १९७१ मध्ये ८४५ कोटी किवॉ. ता. उत्पादन झाले. यापैकी ३६% उत्पादन खाणींच्या मालकीचे होते.
चिलीच्या आर्थिक समस्यांत सर्वांत बिकट समस्या शेती विषयक आहेत. तेथील १,५०,००० शेतमालकांपैकी ३००० कुटुंबांकडे ६०% जमिनीची मालकी आहे. एका अमेरिकन तज्ञाच्या मते ५% लोकांच्या हाती ७५% सुपीक जमीन आहे. अशा एकहाती विस्तीर्ण शेतीमुळे सर्व जमिनीचा उपयोग करण्याकडे दुर्लक्ष होते आणि आज वस्तुस्थिती अशी आहे, की जलसिंचनाखाली असलेल्या जमिनीपैकी सुद्धा २१% जमीन पडित आहे. याचा परिणाम अप्रगत शेती एवढाच नसून अनिर्बंध सामंतशाही हाही आहे. या प्रबळ वर्गावर बंधने घालू पाहणारे पुढारी फार थोडा काळ अधिकारावर टिकू शकतात.
बँका व चलन : चिलीचे चलन एस्कुदो हे आहे. १ एस्कुदो = १,००० पेसो. १ सेंटेसिमो = १० पेसो व १ मिलेसिमो = १ पेसो असतात. १, २, ५ व १० पेसोची नाणी आणि त्यांवर नोटा असतात. दुसऱ्या महायुद्धानंतर चिलीत बेसुमार चलनवाढ झाली आणि अंदाजपत्रके तुटीची होत राहिली. उदा. १९५९ मध्ये उत्पन्न ५८ कोटी पेसो तर खर्च ६४ कोटी पेसोवर होता. १९५८ मध्ये आलेसांद्रीने चलनवाढीस आळा घालण्याचे प्रयत्न केले व एस्कुदो हे १,००० पेसोचे नाणे पाडले व पूर्वीचा गुंतागुंतीचा विनिमय दर रद्द करून डॉलर व पौंडाशी एक दर कायम केला. १९६२ मध्ये हा निर्बंध थोडा सैल करून खुल्या बाजारात चलन विनिमय करण्याची परवानगी देण्यात आली.
केंद्रीय बँकेची स्थापना १९२६ मध्ये झाली व तिला मुद्रानियंत्रण व इतर बँकांवर देखरेख हे अधिकार देण्यात आले. याशिवाय स्टेट बँक, खाणींकरिता खास पतपेढी व विकास निगम यांच्या द्वारा चिलीचे आर्थिक जीवन काहीसे नियंत्रित आहे. १९७१ अखेर केंद्रीय बँकेजवळ सोने व परदेशी चलन १७ कोटी अमेरिकी डॉलर इतके होते. व्यापारी बँकांत १,३१५·७ कोटी एस्कुदोच्या, स्टेट बँकेत १,२५१·५ कोटी एस्कुदोच्या आणि केंद्रीय बँकेत १,०८१·३ कोटी एस्कुदोच्या ठेवी होत्या. अनेक स्थानिक व परदेशी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. चलनफुगवटा इतका आहे, की जीवनमान निर्देशांक १९७२ च्या सुरुवातीस २२·१% होता, तो १९७२ च्या सप्टेंबरच्या सुरुवातीस ९९·८% झाला.
अर्थसंकल्प : १९७१ व १९७२ च्या अर्थसंकल्पात वसूल अनुक्रमे ३,०९३ कोटी व ४,३२७ कोटी एस्कुदो आणि खर्च अनुक्रमे ३,७४७ कोटी व ४,०६९ कोटी एस्कुदो दाखविलेला होता. १९७१ च्या अर्थसंकल्पात १०५·४ कोटी कृषीसाठी, ३९२·३ कोटी संरक्षणासाठी, ३८७ कोटी शिक्षणासाठी, २८८·३ कोटी सार्वजनिक कामासाठी, ९९·४ कोटी गृहरचनेसाठी, १०६·३ कोटी सार्वजनिक आरोग्यासाठी अशी संकल्पात तरतूद होती. कॉर्फोचा अर्थसंकल्प ३१९·३ कोटी स्थानिक चलनाचा व १७.१ कोटी परकीय चलनाचा होता. एकूण परदेशी कर्जे जून १९७१ मध्ये २३४·७ कोटी अमेरिकन डॉलरची होती.
परदेशी व्यापार : निर्यात नेहमीच आयातीपेक्षा जास्त असते. १९६८, ६९ व ७० मध्ये आयात अनुक्रमे अमेरिकन डॉलरात ६६·१ कोटी, ९०·२ कोटी व ९३ कोटी डॉलर होती. तर निर्यात अनुक्रमे ८९·३ कोटी, १०७·५ कोटी व १२५·३ कोटी डॉलरची होती.
१९७० च्या आयातीत मुख्यतः अमेरिकेकडून ३४·३ कोटीची, प. जर्मनी १४·५ कोटी, अर्जेंटिना ९·३ कोटी, ब्रिटन ५·८ कोटी, फ्रान्स ३·१ कोटी, जपान, २·८ कोटी, ब्राझील २·५ कोटी, इटली २·५ कोटी व स्पेन २·१ कोटी अशी वर्गवारी होती. निर्यातीत ती मुख्यतः नेदर्लंड्सकडे १८·८ कोटी, अमेरिका १७·७ कोटी, ब्रिटन १५·४ कोटी, जपान १५ कोटी, पं. जर्मनी १३·५ कोटी, इटली ९·२ कोटी आणि अर्जेंटिनाकडे ७·८ कोटी डॉलर होती.
१९६९ च्या आयातीत मुख्यत्वे यंत्रे व विद्युत् उपकरणे २४·८ कोटी डॉलर, प्राणी व अन्नपदार्थ १५·५ कोटी, रेल्वे आणि वाहतूक साधने ११·८ कोटी होती. १९६७ च्या निर्यातीत तांबे ६९·४ कोटी, लोहधातुक १२ कोटी, रासायनिक पदार्थ २·९ कोटी, कागद व लगदा २·९ कोटी असे आकडे होते.
वाहतूक व दळणवळण : चिलीचा आकार दळणवळणास अनुकूल नाही परंतु बरीच वस्ती मध्य चिलीत केंद्रीत झाल्याने ही अडचण सह्य झाली आहे. चिलीचा लोहमार्ग द. अमेरिकेत उत्कृष्ट समजला जातो. बहुतेक शहरे, बंदरे आणि उद्योग केंद्रे त्याने जोडलेली आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी, विशेषतः दक्षिणेस विमानांनी वा बोटींनीच जावे लागते. चिलीच्या लांबलचक किनाऱ्यामुळे जलवाहतुकीची साधने वाढवावी लागली आहेत. महत्त्वाचे रेलमार्ग राष्ट्रीय आहेत. आंतोफागास्ता-साल्टा व लॉस अँडीज-मेंदोसा हे अर्जेंटिनात जाणारे आरीका–लां पास हा बोलिव्हियात जाणारा आणि आरीका –ताक्ना हा पेरूत जाणारा असे आंतरराष्ट्रीय लोहमार्ग आहेत. चिलीतील सर्व लोहमार्ग सु. ९,७५७ किमी. आहेत. यांपैकी १,३३५ किमी. खासगी मुख्यतः ब्रिटीश मालकीचे, आहेत.
चिलीतील रस्तेही लोहमार्गांप्रमाणे दक्षिणोत्तर असून त्यांची लांबी १९६६ मध्ये ६३,४३३ किमी. होती. यांपैकी ६,२८० उत्तम प्रतीचे, २३,२९० किमी. दुय्यम व ३३,८६३ किमी. कच्चे होते. १९७० मध्ये चिलीत १,७६,१०० मोटारी, १,३३,८०० मालवाहू गाड्या आणि १६,००० बसगाड्या होत्या. १९७१ मध्ये ५ कंपन्यांची ५७ जहाजे होती. व्हॅलपारेझो हे मुख्य बंदर आहे. दक्षिणेस पूंता आरेनास, चीलोए आयसेन ही खुली बंदरे आहेत. पूंता आरेनास हे मॅगेलन सामुद्रधुनीवरील बंदर जगातील, द. अमेरिकेतील व चिलीतील सर्वांत दक्षिणेचे शहर आहे. ईकीक व आंतोफागास्ता ही उत्तर चिलीची नायट्रेट निर्यातीची बंदरे आहेत. कोकींबो हे लासेरेनाचे व टाल्कावानो हे कन्सेप्शनचे बंदर आहे. तथापि व्हॅलपारेझो हे सर्वांत महत्त्वाचे बंदर आहे. नद्यांतून २,१८५ किमी. वाहतूक होते. चिलीत १७ व्यापारी हवाई वाहतूक कंपन्या आहेत. त्यांपैकी दोन चिलीच्या आहेत. १९७२ मध्ये ५ कस्टम विमानतळ, ११ सैनिकी विमानतळ व ३६ नागरी विमानतळ होते. ५ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
चिलीत १,४८६ डाकघरे आणि एजन्सी आहेत. १९७१ मध्ये १२,८७० किमी. तारायंत्रे होती. १९७२ मध्ये ३,८७,३६७ दूरध्वनींपैकी २,५६,८१८ एकट्या सँटिआगोत होते. २,५०० शासकीय दूरध्वनीनी होते. १९७१ अखेर सु. १०० व्यापारी प्रक्षेपणकेंद्रे होती.
एक राष्ट्रीय व तीन विद्यापीठीय दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. १९६८ मध्ये अमेरिका व यूरोप येथील कार्यक्रमांसाठी लाँगोव्हिलो येथे उपग्रह प्रक्षेपण केंद्र स्थापन झाले.
लोक व समाजजीवन : पूर्वेकडे अँडीजची उत्तुंग पर्वतराजी, पश्चिमेकडे अफाट पॅसिफिक, उत्तरेकडे आटाकामा रण व दक्षिणेकडे ध्रुवीय हिमप्रदेश या नैसर्गिक रचनेमुळे चिली देश अनादी कालापासून एकाकी राहिला आहे आणि तेथील रहिवाशांची संस्कृती, विचार व राहणी इ. इतरांहून निराळी झाली आहे. स्पॅनिश आक्रमणापूर्वीही चिलीतील इंडियन जमाती तुरळक वसाहतीत राहत असून संख्येने कमी होत्या. पेरूतून येऊन चिली जिंकण्याचा इंकांचा प्रयत्न उत्तर व मध्य चिलीमध्येच थांबला. यामुळे या प्रदेशांतील इंडियन जमाती आणि त्यांच्या संपर्कातून दूर राहिलेल्या दक्षिणेकडील वनातील जमाती यांच्या संस्कृतींत बराच फरक पडला.
इंका साम्राज्याचा नाश केल्यावर स्पॅनिश आक्रमकांनी चिलीमध्ये प्रवेश केला. उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकताना त्यांना आराउकानीयन जमातींनी प्रखर विरोध केला व आता दक्षिण चिलीमध्ये त्यांचीच मुख्य वस्ती आहे. बीओ व्हीओ व तोल्तेन या नद्यांच्या दुआबात हे लोक असून त्यांची संख्या एक लाखावर आहे. चिलीमध्ये जे शुद्ध इंडियन शिल्लक आहेत, त्यामध्ये यांचे प्रमाण ९५ टक्के आहे.
चिलीच्या भौगोलिक अलिप्ततेमुळे स्पॅनिश लोक मोठ्या प्रमाणात आले नाहीत व त्याच कारणाने त्यातील बहुतेकांनी एतद्देशीय स्त्रियांशी विवाह केले. त्यांचेच मेस्तिसो वंशज आज चिलीमध्ये बहुसंख्य आहेत व आराउकानीयन चेहरेपट्टीचा वारसा त्यांच्यात स्पष्ट दिसतो.
यूरोपीय आप्रवाशांचा ओघ चिलीकडे गेल्या शतकात सुरू झाला. यात जर्मन, ब्रिटिश, फ्रेंच, स्विस, इटालियन आणि यूगोल्साव्ह यांचा भरणा होता. यातही जर्मन अधिकांश होते. अल्पसंख्य असूनही यूरोपीय आधुनिकतेमुळे यांचा प्रभाव चिलीच्या जीवनावर विशेष झाला आहे. आता चिलीच्या जीवनात पुढील वर्ग आढळतात : (१) बहुतेक दक्षिणेस राहणारे एतद्देशीय इंडियन. (२) शुद्ध रक्ताचे स्पॅनिश सरंजामी अभिजात. (३) बहुसंख्य (६८%) असलेले मिश्रवंशीय मेस्तिसो व (४) अल्पसंख्य परंतु मध्यम-वर्गाचा कणा झालेले यूरोपीय आप्रवासी. तीस हजार जर्मन व त्यांचे वंशज व्हॅल्डीव्हिया व प्वेर्तो माँत यांदरम्यान राहतात.
चिलीच्या लोकांपैकी ९० टक्के मध्य चिलीत लासेरेना व व्हॅल्डीव्हिया यांमधील समशीतोष्ण सुपीक प्रदेशांत राहतात. उत्तर व दक्षिणेकडे वस्ती तुरळक होत जाते. ही वस्तीही नायट्रेट आणि तांबे वगैरेंच्या खाणी व उत्तरेकडील रणातील शाद्वलवनात आढळते. सु. ६८·२% लोक नागरी वस्तीत आहेत. सु. ५०% वीस वर्षे वयाखालील असून ३२·४% लोक आर्थिक दृष्ट्या कार्यकारी आहेत. लोकसंख्या वाढीचा १९६४ पेक्षा वेग १९६८ मध्ये कमी आढळला.
१९२५ पर्यंत कॅथलिक धर्म हा राज्यधर्म होता. त्यानंतर धर्म व शासन यांची फारकत करण्यात आली. तथापि कॅथलिक बहुसंख्य असल्याने त्या पंथाचे सण, उत्सव सर्वत्र साजरे होतात. यामध्ये अर्थातच आराउकानीयन लोकांच्या प्राचीन उत्सव पद्धतीचे मिश्रण झालेले आहे. शहरी लोक नेहमीचा यूरोपीय पोषाख करतात. मात्र सणवार, जत्रा, उत्सवात रंगीबेरंगी स्पॅनिश पोषाख वापरतात. आराउकानीयन बायका भडक रंगाच्या शाली व चांदीचे दागीने वापरतात. चिलींच्या गुराख्यास (काउबॉइज) वासोस म्हणतात. डोक्यावर सपाट आकाराची काळी हॅट, खांद्याभोवती ‘मांतास’ म्हणजे आखूड झूल, गळपट्टा, पायबंद आणि गुडघ्यापर्यंत येणारे भरीव टाचेचे बूट असा यांचा भडक पोषाख असतो. अलीकडे चिलीत, विशेषतः शहरी भागांत, घरांची टंचाई तीव्रतेने जाणवू लागली आहे. अमेरिकेच्या कृषिविभागाने केलेल्या पाहणीप्रमाणे चिली लोकांचा आहार समाधानकारक असतो. अमेरिकी माणूस दररोज ३,१४० कॅलरीचा आहार घेतो, तर चिली माणूस सु. २,६८० कॅलरींचा आहार घेतो. त्याना दरडोई दररोज मिळणारी ७८·९ ग्रॅम प्रथिने किमान गरजेपेक्षा अधिक आहेत. १९६० ते ६५ या काळात फक्त ६% ग्रामीण लोकांस पिण्याचे चांगले पाणी मिळत असे, तर ७८% नागरी लोकांस चांगले पाणी मिळत होते.
१९४९ मध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला व चिलीच्या जीवनात त्यांनी महत्त्वाचे स्थान पटकाविले. सार्वजनिक कार्यात व निवडणुकीत स्त्रियांची मते व पाठींबा महत्त्वाचा ठरतो कारण इतर लॅटिन अमेरिकी स्त्रियांपेक्षा चिलीच्या स्त्रिया पुढारलेल्या आहेत आणि आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून कित्येक कार्यकर्त्या स्त्रिया लग्नानंतरही माहेरचेच नाव कायम ठेवतात.
चिलीच्या लोकांत क्षय, न्यूमोनिया आणि पोटाचे विकार अधिक आहेत आणि पाणी व वसाहती स्वच्छ ठेवून, मोफत उपचार देऊन शासन त्यांस आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉक्टरांचे प्रमाण दर १०,००० लोकांस ७·३ असे १९६० – ६५ मध्ये होते. राष्ट्रीय आरोग्य योजनेचा लाभ १५ लक्ष कामगारांना मिळत आहेत. आणखी १५ लक्ष कामगारांना मिळणार आहे. चिलीमध्ये १९२४ मध्ये आजार, वार्धक्य व दुर्बलता यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना सुरू झाली. पुढे ती अधिक व्यापक करण्यात आली.
भाषा व साहित्य : चिलीची भाषा स्पॅनिश असून त्यातील अजरामर महाकाव्य ला आराउकाना हे १५५५ – १५६२ मध्ये इंडियन मोहिमेवर असता आलान्सो दे एर्सिला इ सुनिगा या सैनिकाने लिहिले. त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत चिलीत उल्लेखनीय लेखन झाले नाही. त्यानंतरच्या साहित्यिकांत साल्वादोर सान्फुएन्तेस (१८१७ – ६०) आणि बेंजामिन व्हिकून्या माकेना (१८३१ – ८६) उल्लेखनीय आहेत. आधुनिकांत गाब्रिएला मिसत्राल (१८८९ – १९५७) या कवियित्रीला १९४५ चे नोबेल पारितोषिक मिळाले आहे व पाब्लो नेरूदा (१९०४ – ) हा मार्क्सवादी जगातील आघाडीच्या कवीपैंकी एक आहे. चिलीत ३०० हून अधिक वृत्तपत्रे असून त्यांतील एल् मक्यूरिओ हे स्पॅनिश मधील सर्वप्रथम वृत्तप्रथम वृत्तपत्र होय. सँटिआगोतील ग्रंथालये आणि संग्रहालये प्रसिद्ध आहेत. १९७२ मध्ये चिलीतील एकूण २३० चित्रपटगृहांपैकी ७४ सँटिआगोमध्ये होती.
शिक्षण : एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर चिलीत शिक्षणव्यवस्था करण्यात आली पण त्या वेळी ती फक्त मध्यम व उच्च वर्गापुरतीच होती. सार्वत्रिक शिक्षण पहिल्या महायुद्धानंतर सुरू झाले व शहरात सहा वर्षे व इतरत्र चार वर्षे प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यात आली. १९२८ पासून ७ ते १५ वर्षांच्या मुलास ते सक्तीचे व मोफत झाले. या देशातील शिक्षणव्यवस्था जर्मन तज्ञांच्या सल्ल्याने आखण्यात आली असून १९३६ पासून धंदेशिक्षणावर भर देण्यात आला आहे. सध्या ६ ते १४ वर्षे प्राथमिक, १५ ते १८ माध्यमिक, व १९ ते २३ वर्षे विद्यापीठीय अशा शिक्षणाच्या तीन पायऱ्या आहेत. १९७० मध्ये शालापूर्व शिक्षणासाठी ६०,३६० मुले, प्राथमिक शाळांत २०,४३,०३२ मुले, माध्यमिक शाळांत ३,०२,०६४ मुले होती.
सँटिआगो, व्हॅलपारेझो, कन्सेप्शन, आंतोफागास्ता, व्हॅल्डीव्हिया मिळून आठ विद्यापीठे असून त्यांतील दोन धर्मसंस्थांनी चालविलेली आहेत. त्यांत सर्व मिळून ९६,००० विद्यार्थी १९७० मध्ये होते. चिलीतील साक्षरता ८०% आहे.
कला व क्रीडा : चिलीयन लोक संगीत–नृत्यप्रिय आहेत आणि गिटार हे त्यांचे आवडते वाद्य आहे. चिलीतील क्वेका हा नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे. चिली नागरिक कलाउदयो आरराऊ (१९०३ – ) ही जगीतील श्रेष्ठ पियानो वादकांपैकी एक आहे.
सर्व लॅटिन अमेरिकनांचा ‘सॉकर’ हा चेंडूखेळ लोकप्रिय आहे. त्यास चिली अपवाद नाही. याकरिता शहरांतून सोयीस्कर क्रीडागृहे आहेत. या खालोखाल स्किइंग, मोठ्या माशांची शिकार, घोडदौड, टेनिस वगैरे खेळ लोकप्रिय आहेत.
महत्त्वाची स्थळे : राजधानी सँटिआगोखेरीज कन्सेप्शन आणि व्हॅलपारेझो ही चिलीतील मुख्य शहरे आहेत. त्याशिवाय कोकींबो, व्हॅल्डीव्हिया, प्वेर्तो माँत, पूंता आरेनास, ईकीक, आंतोफागास्ता इ. चिलीतील प्रमुख ठिकाणे आहेत. अँडीजमधील मध्य चिलीतील रम्य सरोवरे व व्हिन्या देल मार या व्हॅलपारेझोच्या उपनगरातील पुलीने व द्यूतगृहे, ईस्टर बेटातील प्रचंड व अगम्य पुतळे आणि अर्जेंटिना व चिलीतील एक सीमावाद मिटल्याचे स्मारक म्हणून अँडीजमध्ये उभारलेला ख्रिस्ताचा महाप्रचंड पुतळा ही चिलीची प्रमुख आकर्षणे आहेत. १९६८ मध्ये २,६१,२१४ परदेशी प्रवासी चिलीत आले होते. परदेशी चलन मिळविण्यासाठी पर्यटन व्यवसाय वाढविण्याचा देशाचा प्रयत्न आहे.
शहाणे, मो. ज्ञा. कुमठेकर, ज. ब.
ॉ
“