चित्रांग भुंगेरा : कोलिऑप्टेरा गणाच्या कॉक्सिनिलिडी कुलात याचा समावेश होतो. यांच्या ३,००० पेक्षा जास्त जाती असून त्यांचा प्रसार विस्तृत आहे व जवळजवळ वर्षभर ते नेहमी पाहावयास मिळतात. ते अगदी लहान, वर्तुळाकार किंवा अंडाकार, अर्धगोलाकार, चमकदार व रंगाने काळे, पिवळे, तपकिरी, लाल व बहुधा ठिपकेदार असतात. मादी पानांवर पुंजक्या पुंजक्याने पिवळसर अंडी घालते. एक मादी सु. १४० अंडी घालते. ती उबून मऊ व निरनिराळ्या रंगांच्या अळ्या बाहेर पडतात. त्यांच्या शरीरावर निळे, काळे किंवा पिवळे ठिपके असतात. त्या मागील बाजूस निमुळत्या होत जातात. त्या सु. वीस दिवसांत चार वेळा कात टाकून पूर्ण वाढतात व झाडांच्या पानांवरच कोषावस्थेत जातात. कोष रंगीत असून पानांवर असतात.
हे भुंगेरे व त्यांच्या अळ्या परभक्षक (अन्य प्राण्यावर उपजीविका करणारे) असून त्या मावा, पिठ्या ढेकून, खवले कीटक इ. मृदुकाय कीटक व त्यांची अंडी आणि पिकांना उपद्रवकारक कीटक खातात. खाचवाल्या खवले कीटकाच्या (पेरिसेरिया परचँसी ) नियंत्रणासाठी रोडोलिया कार्डिनॅलिस ही परभक्षक जाती मुद्दाम भारतात आणली आहे. पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी क्रिप्टोलीमस मॉट्रोसीएरी ह्या परभक्षक जातीचा उपयोग करतात. अशा रीतीने हे भुंगेरे मानवाचे मित्र आहेत व त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त उत्पत्ती कशी होईल, याची काळजी घेतात. मात्र इपिलॅक्ना वंशातील जातींचा बटाटा, वांगे, भोपळा इ. पिकांना उपद्रव होतो.
पहा : कीटक नियंत्रण ठिपके भुंगेरा.
पोखरकर, रा. ना.
“