चित्रळ : चित्राल चित्रार काश्कर. पाकिस्तानच्या उत्तर सीमेवरील एक शहर व पूर्वीच्या चित्रळ संस्थानची राजधानी. हे हिंदुकुश पर्वताच्या दक्षिण उतारावर, समुद्र सपाटीपासून १,५२४ मी. उंचीवर, चित्रळ नदीकाठी, पेशावरच्या २०५ किमी. उत्तरेस वसले आहे. धातूवरील नक्षीकाम, हातमागाचे कापड, भरतकाम, जंबिये, तलवारी, लाकूडकाम यांसाठी चित्रळ पूर्वीपासूनच प्रसिद्ध असून आसमंतातील धान्य व फळफळावळ ह्यांची मोठी बाजारपेठ येथे आहे. १९६९ पासून हे मलकंद विभागातील चित्रळ जिल्ह्याचे ठाणे बनले असून रशिया, अफगाणिस्तान, चीन आणि भारत यांच्या सरहद्दीजवळ असल्याने लष्करी दृष्ट्या ते महत्त्वाचे समजले जाते.
शाह, र. रू.