चित्रपटनिर्मितिगृह : छायाचित्रणाच्या प्रारंभकालात चित्रपटातील छायाचित्रण सर्वस्वी नैसर्गिक सूर्यप्रकाशावरच अवलंबून असे. सर्वसामान्य अभ्यासिकेत चलत्चित्रपट चित्रित करणे ही त्यानंतरची स्थिती. पॅरिसमध्ये ए ट्रिप टू मून हा छोटा चित्रपट एका अभ्यासिकेत पण नैसर्गिक उजेडात तयार करण्यात आला होता; परंतु जगातील पहिले चित्रपटगृह टॉमस एडिसन याने १ फेब्रुवारी १८९३ रोजी उभारले. त्याची लांबी-रुंदी सु. ९ × ८ मी. होती. छायाचित्रकार व दिग्दर्शक लॉरी डिकन यांनी कायनेटोग्राफिक थिएटर असे त्याला म्हटले; परंतु अमेरिकेतील न्यू जर्सीमधील वेस्ट ऑरेंज या ठिकाणी असलेले जगातले हे पहिले चित्रपटनिर्मितिगृह ‘ब्लॅक मारिआ’ याच नावाने प्रसिद्धीस आले. सूर्य असेपर्यंत त्याचे किरण आत येतील अशी त्याच्या छताची योजना केली होती. फ्रेड ऑट या एडिसनच्या एका सहकाऱ्याचे पहिले दृश्य या चित्रपटनिर्मितिगृहात घेण्यात आले व नंतर प्राण्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते. ॲन्ड्र्यूू. एम्. हॉलंड या कॅनेडियन गृहस्थाने १४ एप्रिल १८९४ रोजी कायनेटोस्कोप पार्लर न्यूयॉर्कमध्ये उभारले. त्याच्या छताचा मध्यभाग उघडता येई व हवा तेवढा सूर्यप्रकाश दालनात घेता येई.
चित्रपटांच्या प्रारंभावस्थेत रंगविलेल्या पडद्याच्या पार्श्वभूमीवरच चित्रण केले जाई; परंतु जसजशी चित्रपटनिर्मितीत वाढ होऊ लागली व चित्रपट कथात्मक बनू लागले तसतशी चित्रपटनिर्मितीसाठी खास दृश्यांच्या निर्मितीची व मांडणीची गरज जाणवू लागली. उत्तरोत्तर छायाचित्रणातही प्रगती होत होती. परिणामतः कमी प्रकाशात किंवा कृत्रिम प्रकाशातही छायाचित्रण करणे शक्य झाले. यूरोप, अमेरिका येथे नैसर्गिक प्रकाश वर्षातून काही काळच मिळणे शक्य असते; परंतु चित्रपटनिर्मिती हा स्वतंत्र व्यवसाय झाल्यावर चित्रपटांची निर्मिती सतत करणे क्रमप्राप्त ठरले. अशा वेळी बंदिस्त चित्रपटनिर्मितिगृहे उपयुक्त ठरली.
प्रारंभीच्या काळात उघड्यावर तसेच प्रत्यक्ष ठिकाणावर चित्रण करताना बघ्यांचा फार त्रास होत असे. तसेच कथानकाच्या वास्तवदर्शनासाठी रंगविलेले पडदे निरूपयोगी ठरून वास्तवाचा आभास निर्माण करणारी दृश्ये, देखावे मांडणे अगत्याचे झाले. या सर्वांचा परिपाक म्हणून बंदिस्त निर्मितिगृहे अस्तित्वात आली. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी देशांत अशी निर्मितिगृहे बांधण्यात आली व त्यात चित्रपटनिर्मिती वेगाने सुरू झाली. अशा निर्मितिगृहांमध्ये दृश्यांची मांडणीही सुलभ झाली. कृत्रिम प्रकाशयोजनेमुळे निसर्गांवर विसंबून राहण्याची गरज उरली नाही व चित्रपटनिर्मिती स्वयंपूर्ण होऊ लागली.
राजा हरिश्चंद्र या भारतातील पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईस सध्याच्या दादासाहेब फाळके पथावरील मथुराभुवन या इमारतीत झाले. भारतात पूर्वी बंदिस्त असे चित्रपटनिर्मितिगृह नव्हतेच. नैसर्गिक ठिकाणी किंवा एखाद्या इमारतीच्या आवारातच चित्रीकरण केले जाई; तथापि फाळके फिल्म्सने नासिकमध्ये उभारलेले निर्मितिगृह हेच भारतातील पहिले चित्रपटनिर्मितिगृह मानता येईल. १९२० सालापर्यंत भारतात कृत्रिम प्रकाशाचा उपयोग केला जात नसे.
प्रारंभीची चित्रपटनिर्मितिगृहे बंदिस्त असली, तरी ध्वनिरोधक नव्हती. चित्रपट बोलके झाल्यावर अशा निर्मितिगृहांची निकड भासू लागली. ध्वनिमुद्रणाचा विचार करून तशी निर्मितिगृहे उभारणे भाग पडले. त्यासाठी खास वास्तुरचनाविषयक तंत्राचा उपयोग करण्यात आला. आवाज परिवर्तित होऊ नये, त्याचा प्रतिध्वनी येऊ नये म्हणून आधुनिक निर्मितिगृहात खास योजना असतात. चित्रपट बोलके झाल्यावरही केवळ प्रकाशासाठी निर्मितिगृहाची एक बाजू उघडी ठेवणे भाग होते; पण विजेच्या दिव्यांवर चित्रीकरण सुरू झाल्यानंतर मात्र ही अडचण दूर झाली. भारतातही प्रभात फिल्म कंपनीने आपले आरंभीचे चित्रपट उघड्यावर केले होते (१९३१ ते १९३३). उघड्या निर्मितिगृहामुळे ध्वनिमुद्रणाचे काम अत्यंत जिकिरीचे होत असे. बाहेरील अनावश्यक ध्वनिंमुळे वारंवार अडथळे निर्माण होऊन छायाचित्रण पुनःपुन्हा करावे लागे. १९३४ साली मात्र प्रभात फिल्म कंपनीने पुण्याला अद्ययावत यंत्रसामग्रीने सुसज्ज असे भारतातील पहिले ध्वनिरोधक चित्रपटनिर्मितिगृह उभारले. या निर्मितिगृहात छायाचित्रण-ध्वनिमुद्रण अतिशय सुकर होऊन चित्रपटाचा तांत्रिक दर्जा एकदम सुधारला.
बंदिस्त निर्मितिगृहे साधारणतः लंबचौकोनी असतात. सु. १५ ते २४ मी. रुंद व सु. ३० ते ४६ मी. लांब असा त्यांचा विस्तार असतो. त्यांची उंची सु. ६ ते १२ मीटरपर्यंत असते. प्रभात फिल्म कंपनीचे निर्मितिगृह सर्वांत भव्य समजले जाते. आशिया खंडात एवढे भव्य चित्रपटनिर्मितिगृह नाही. हे सु. ४६ मी. रूंद, ६१ मी. लांब व ३६ मी उंच आहे. प्रभात फिल्म कंपनीच्या आवारात (सध्या जेथे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे) अशी एकूण लहान मोठी ४ चित्रपटनिर्मितिगृहे आहेत. भारतात सर्वांत अधिक म्हणजे १२ चित्रपटनिर्मितिगृहे आता मद्रास येथील वाहिनी स्टुडिओत आहेत. ध्वनी परिवर्तित होणार नाही अशी निर्मितिगृहांच्या छपराची रचना अलीकडे करतात. नेहमीच्या पद्धतीचे छप्पर असल्यास त्यात कापडी पडद्यांचा छतासारखा उपयोग केलेला असतो आणि चारही बाजूंना सज्जा ठेवलेला असतो. प्रकाशयोजनेसाठी छपरावर दिवे टांगण्यासाठी व्यवस्था असते.
बोलपटांनंतर दिव्यांच्या वापरामुळे निर्मितिगृहांना छपरे आली. दिवस-रात्रीच्या प्रकाशाचा फरक स्पष्ट करण्यासही विजेचे दिवे अत्यंत उपयुक्त ठरले. हे दिवे पूर्वी स्टँडवर लावलेले असत. तेथून ते हवे तसे खाली-वर केले जात. १९२९ साली वंदलाल जसवंतलाल दिग्दर्शित इंपीरिअल फिल्म कंपनीच्या इंदिरा एम्. ए. या चित्रपटाच्या वेळी प्रख्यात छायाचित्रकार पांडुरंग नाईक यांनी दृश्यमंचाच्या माथ्यावर दिवे लावून त्याचा परिणाम पाहिला व हा प्रयोग प्रकाशयोजनेला उपकारक ठरला. तेव्हापासून दृश्यमंचाच्या माथ्यावर फळ्या बांधून तेथून हवी तशी प्रकाशयोजना करण्याची प्रथा अमलात आली. काही निर्मितिगृहांत पाण्याचा तलाव दाखवण्यासाठी, जिना ठेवण्यासाठी, निर्मितिगृहाच्या मध्यभागी एक टाकी असते. तीत पाणीही भरता येते, तसेच आत जिना सोडून खालच्या मजल्याचा परिणामही साधता येतो. देखाव्याच्या अवजड सामानाची ने-आण करण्यासाठी निर्मितिगृहाच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे दरवाजे ठेवावे लागतात तथापि प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी ते दरवाजे बंद केलेले असतात. वायुवीजनासाठी खास व्यवस्था असते. काही निर्मितिगृहांची जमीन लाकडी, सिमेंटची किंवा डामरी असते. शक्य तो कुठेही बारीकसारीक खळगे पडू नयेत म्हणून व पडल्यास ते बुजविण्याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे कॅमेऱ्याची ढकलगाडी धक्क्याशिवाय चालू शकते; परंतु धक्का बसल्यास त्याचा परिणाम पडद्यावर जाणवत नाही.
छायाचित्रण, ध्वनिमुद्रण आदी यंत्रसामग्री चालविण्यासाठी विद्युतप्रवाहाची गरज असते. तो सुलभपणे मिळण्याची सोय निर्मितिगृहात केलेली असते. चित्रपटनिर्मितिगृहाला जोडून रंगपट, कपडेपट, वेशभूषापट, शृंगारकक्ष, कलाकारकक्ष, छायाचित्रण-प्रक्रियाकक्ष हे तर असतातच; पण यांशिवाय काही निर्मितिगृहांना जोडूनच रसायनशाळा, संकलन विभाग इ. विभागही असतात. चित्रपटनिर्मितिगृहात आग वगैरे लागण्याचे भय असल्याने अग्निशामक उपकरणे बसविलेली असतात तसेच तेथे धूम्रपानास बंदी असते.
जर्मनीतील उफा, इंग्लंडमधील पाइनवुड व अमेरिकेतील हॉलिवुड येथील चित्रपटनिर्मितिगृहे जगप्रसिद्ध आहेत. भारतात मुंबईचे राजकमल कलामंदिर, आर्. के. फिल्म स्टुडिओज्, कलकत्त्याचे न्यू थिएटर्स स्टुडिओज, इंद्रपुरी स्टुडिओज ली., श्री. भारतलक्ष्मी फिल्म स्टुडिओ, दक्षिणेतील ए. व्ही. एम्. स्टुडिओज, जेमिनी स्टुडिओज, वाहिनी स्टुडिओज, म्हैसूरचा प्रिमियर स्टुडिओज ही काही महत्त्वाची चित्रपटनिर्मितिगृहे होत.
चित्रपटनिर्मितीत निर्मितिगृहांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दक्षिणेत १९३४ पर्यंत चित्रपटनिर्मितिगृह नसल्याने परप्रांतात त्यांना चित्रपट तयार करावा लागे. ओडिया चित्रपटांना कलकत्त्याच्या चित्रपटनिर्मितिगृहावर अवलंबून रहावे लागते. भारतात सध्या ७२ निर्मितिगृहे आहेत आणि त्यांत ३० कोटी रुपयांचे भांडवल गुंतले आहे. या चित्रपटनिर्मितिगृहांपैकी मुंबई २९, मद्रास २५, कलकत्ता ६, कर्नाटक ६, आंध्र २, केरळ ३ व आसाम १ अशी चित्रपटनिर्मितिगृहांची संख्या आहे. चित्रपटनिर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या देशांपैकी अमेरिकेत २६, ब्रिटनमध्ये २८, रशियात ३५, स्पेनमध्ये ११ आणि जपानमध्ये ४५ चित्रपटनिर्मितिगृहे आहेत.
वाटवे, बापू