चित्रक : (चित्रमूळ हिं. चित्र गु. चितरो क. बिलेचित्र-मूळ सं. चित्रक, अग्निशिखा, वल्लरी, ज्योतिष्क, चित्रांग इं. सीलोन लेडवर्ट, व्हाइट-फ्लॉवर्ड लेडवर्ट लॅ. प्लंबॅगो झेलॅनिका कुल-प्लंबॅजिनेसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी भारतात सर्वत्र आढळते. पश्चिम द्वीपकल्प, बंगाल, मलाया, श्रीलंका येथे जंगली अवस्थेत सापडते. आशियातील व आफ्रिकेतील उष्ण भागांतही ती आढळते. बागेतून शोभेकरिता ही व इतर अनेक जाती लावतात. खोड आणि फांद्या पसरट लांब व रेषांकित असतात. पाने एकाआड एक, पातळ, साधी, अंडाकृती, लहान देठाची व संवेष्टी (खोडास तळाशी वेढणारी) असतात. प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) केशयुक्त आणि लांबट कणिशासारखा फुलोरा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येतो. फुले द्विलिंगी, अरसमात्र, अवकिंज व पांढरी असतात. संदले पाच, जुळलेली, सतत राहणारी व प्रपिंडीय प्रदले पाच व जुळलेली पुष्पमुकुट समईसारखा (वर पसरट पण खाली नळीसारखा) केसरदले पाच, पाकळ्यांसमोर व त्यांना चिकटलेली असून पाच किंजदले जुळून एक ऊर्ध्वस्थ किंजपुट बनलेला असतो. बीजक एकच असून शुष्क फळ लांबट, पातळ आवरणाचे आणि संवर्ताने वेढलेले असते [⟶ फूल]. बी सपुष्क (वाढणाऱ्या बीच्या गर्भाला अन्न पुरविणाऱ्या भागाने युक्त) असते. इतर सामान्य लक्षणे ⇨प्लंबॅजिनेसी अगर चित्रक कुलात वर्णिल्याप्रमाणे चित्रकाचे मूळ विषारी व मत्स्यविष असते. ते क्षुधावर्धक, पचनशक्ती वाढविणारे असते तसेच अग्निमांद्य, मूळव्याध, शोथ (दाहयुक्त सूज), कातडीचे रोग, अतिसार, कुष्ठ यांवर उपयुक्त असते. ही वनस्पती चर्मरक्तकर (त्वचा लाल करणारी), फोड आणणारी, स्वेदक (घाम आणणारी), गर्भपातक, गर्भाशय-संकोचक, स्तंभक (आतड्याचे आंकुचन करणारी) वगैरे गुणांनी युक्त असते. कुष्ठावर किंवा अन्य चर्मरोगांवर शिरका, दूध किंवा मीठ व पाणी यांबरोबर मुळाचा लेप करून बाहेरून लावल्यास गुणकारी असतो.
काळा चित्रक : (लॅ. प्लंबॅगो कॅपेन्सिस ). हे लहान क्षुप (झुडूप) चित्रकाप्रमाणे असून मूळचे द. आफ्रिकेतील (केप ऑफ गुड होप) आहे. भारतात शोभेकरिता बागेत लावलेले आढळते. याच्या खोडावर पाच चमसाकृती (चमच्यासारख्या) आयत (१·५–५ सेंमी. लांब) पानांची मंडले अनुक्रमाने येतात. उन्हाळ्यात व पावसाळ्यात निळसर फुले येतात. नवीन लागवड कलमांनी करतात.
लाल चित्रक : (हिं. लाल चित्रा, लालचिटा क. केंपु चित्रमुळा सं. रक्तचित्रक इं. फायर फ्लँट, लेडवर्ट, रोजी-कलर्ड लेडवर्ट लॅ. प्लंबॅगो रोजिया ). सु. ६०–९० सेंमी. उंचीचे हे क्षुप मूळचे सिक्कीम आणि खासी टेकड्या येथील असून भारतात बागेत शोभेसाठी सर्वत्र लावलेले आढळते. याची शारीरिक लक्षणे सामान्यपणे चित्रकाप्रमाणे आहेत. याला लालसर किंवा काहीशी शेंदरी फुले वर्षभर येतात. मुळे औषधी, विषारी आणि गुणधर्म साधारणपणे चित्रकात वर्णिल्याप्रमाणे असतात.
गाडगीळ, सी. ना.
“