चित्तवृत्ति व स्वभावधर्म : (टेंपर अँड टेंपरामेंट). मानसशास्त्रीय संकल्पना. मानवी वर्तनाच्या उपपादनासाठी मॅक्डूगल, ई. क्रेच्मर, डब्ल्यू. एच्. शेल्डन इ. मानसशास्त्रवेत्त्यांनी चित्तवृत्ती व स्वभावधर्म या दोन महत्त्वपूर्ण संकल्पना वापरल्या.
चित्तवृत्ती : वर्तनवादी सिद्धांतानुसार व्यक्तीचा स्वभाव हा तिच्या निसर्गदत्त सहज प्रवृत्तींच्या संघातावर अवलंबून असतो. सर्वच सहज प्रवृत्ती समबल नसतात. प्रत्येकीचा जोमही सर्वच व्यक्तींमध्ये सारखा असत नाही. त्यातील नैसर्गिक भेदांनुसारच कोणी रागीट, तर कोणी कामुक, कोणी वत्सल, तर कोणी भित्रा असे व्यक्तिभेद पडतात. यांनुसारच प्रत्येकाची विशिष्ट अशी मानसिक प्रकृती वा चित्तप्रवृत्ती (डिस्पोझिशन) ठरत असते.
या मानसिक मूळ प्रकृतिभेदांव्यतिरिक्त व्यक्तिव्यक्तींमध्ये आणखी एक भेद दिसून येतो. हा भेद त्या सहज प्रवृत्तींची उद्दिष्टे साध्य करून घेण्याच्या विशिष्ट पद्धतीबाबतचा होय. मॅक्डूगलच्या मते सहज प्रवृत्तींच्या उद्दिष्टांन्वेषी पद्धतीत तीन प्रकार संभवतात. : (१) आवेगी वा उत्कट, (२) चिकाटीच्या किंवा सातत्यपूर्ण आणि (३) सुखासुख प्रभावनीय.
यांतील आवेगी किंवा उत्कट ह्या प्रकाराचे उदाहरण म्हणून शेक्सपिअरच्या ऑथेल्लो नाटकातील नायकनायिकांचा निर्देश करता येईल. डेस्डिमोनाच्या पतिनिष्ठेबाबत संशयाने ग्रासलेल्या ऑथेल्लोच्या मनातील क्रोधभावनेचा या संदर्भात उल्लेख करता येईल. आपल्या क्रोधाचा उद्रेक तात्काळ व स्फोटक रीतीने झाल्यावाचून त्याला चैन पडणे शक्य नव्हते. याउलट हॅम्लेटच्या भावनांना रौद्र व स्फोटक रूप कधीच प्राप्त झाले नाही. त्याच्या भावना हेलकावे खात होत्या पण त्या अदम्य नव्हत्या.
या दृष्टीने पाहता व्यक्तीच्या भावनांची एक उत्कटताश्रेणी मानता येईल व त्या उत्कटतेवरूनच त्या श्रेणीत त्या व्यक्तीचे स्थान निश्चित करणे शक्य होईल. याप्रकारे सातत्य-श्रेणी आणि सुखासुख प्रभावनश्रेणी ह्याही निश्चित करता येतील. सर्वच मुले काही प्रमाणात चौकस असतात पण काहींची कुतुहलबुद्धी अधिक चिकाटीयुक्त असते आणि सातत्याने पिच्छा पुरवून अशी मुले तिचे समाधान करून घेतात. काही व्यक्ती सुखलोलुप असतात. त्यांच्या वर्तनाची दिशा व सातत्य त्या वर्तनप्रकाराच्या सुखावहतेवरच अवलंबून असते. विरोध, निराशा, दुःख इ. प्रतिकूल गोष्टी त्या सहनच करू शकत नाहीत. उलट काही व्यक्ती अधिक संथ स्वभावाच्या असतात. सुखासुख विचाराने त्या मुळीच विचलित होत नाहीत. उलट संकटामुळे वा दुःखामुळे त्यांचा निश्चय अधिकाधिक दृढ होत जातो. यालाच सुखासुख प्रभावनीयता म्हणता येईल.
एखाद्या व्यक्तीच्या या तीनही श्रेणींमधील स्थानाची निश्चिती करून व्यक्तिव्यक्तींमधील स्वभावभेदांची शास्त्रशुद्ध रीतीने मीमांसा करणे शक्य होईल, असे मॅक्डूगलचे प्रतिपादन आहे.
हरोलिकर, ल. ब.
स्वभावधर्म : व्यक्तिमत्त्वाच्या विवेचनात स्वभावधर्म ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. व्यक्तींचा स्वभाव हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अंग होय. जगाकडे व जीवनाकडे पाहण्याची व्यक्तीची दृष्टी तिच्या स्वभावधर्मावर बहुतांशी अवलंबून असते. व्यक्तीच्या बाबतीत इतरांच्या ज्या अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया होतात, त्यांनादेखील व्यक्तीचा स्वभाव पुष्कळसा कारणीभूत असतो. परिसराशी होणाऱ्या व्यक्तीच्या समायोजनाची गुणवत्तादेखील तिच्या स्वभावर अवलंबून असते. या सर्व कारणांस्तव व्यक्तीचा स्वभाव ही एक महत्त्वाची गोष्ट होय.
पूर्वीच्या अनेक विचारवंतांनी ‘स्वभाव’ ही संज्ञा ‘व्यक्तीच्या भावनिक प्रतिक्रियांची ढब’ या अर्थाने वापरलेली आहे. व्यक्तीच्या भावनांची नेहमीची पातळी किंवा उत्कटता व भावनांचे स्थायित्व किंवा वारंवारता यांवरून तिचा स्वभाव ठरविला जातो. भावनांची ही नेहमीची पातळी जन्मतःच ठरलेली असते, असे सामान्यतः मानण्यात आले आहे. कारण व्यक्तीच्या शरीरद्रव्यांचा, शरीरयष्टीचा, अंतःस्रावी ग्रंथींचा तिच्या स्वभावाशी संबंध असतो, असे निरीक्षणांती दिसून आले आहे.
हिपॉक्राटीझने (इ.स.पू. ४००) व गेलेनने (इ.स. १५०) जीवरासायनिक दृष्टिकोनातून (१) रक्तप्रधान (सॅंग्विन किंवा ब्लड), (२) पीतपित्तप्रधान (कॉलेरिक किंवा यलो बाइल), (३) कृष्णपित्तप्रधान (मेलांकोलिक किंवा ब्लॅक बाइल) व (४) कफप्रधान (फ्लेमॅटिक किंवा फ्लेम) असे व्यक्तींचे चार वर्ग केले होते. रक्तप्रधान व्यक्ती आनंदी, आशावादी आणि क्रियाशील स्वभावाच्या असतात पीतपित्तप्रधान व्यक्ती ऊर्मिशील व संतापी असतात कृष्णपित्तप्रधान व्यक्ती मलूल, खिन्न व निराशावादी असतात आणि कफप्रधान व्यक्ती स्वभावतः संथ व कृतिजड असतात, असे त्यांनी म्हटले होते.
ई. क्रेच्मर (१८८८–१९६४) व त्याच्यानंतर डब्ल्यू. एच्. शेल्डन यांना व्यक्तीची शरीरयष्टी व स्वभाव यांच्यात संबंध असल्याचे दिसून आले आहे. क्रेच्मरच्या मते मेदल वा तुंदिलकाय व्यक्ती आरामप्रिय, आनंदी, समाजप्रिय व कोणतीही गोष्ट मनाला विशेष लावून न घेणाऱ्या असतात. स्नायुप्रधान व्यक्ती उत्साही, आक्रमक व कृतिशील असतात आणि अस्थिप्रधान वा कृषकाय व्यक्ती असहिष्णू, आदर्शप्रिय व अंतर्मुख स्वभावाच्या असतात. शेल्डनच्या निष्कर्षानुसार आंत्रप्रचुर वा तंदुलोदर व्यक्ती स्वास्थ्यप्रेमी असतात स्नायू सौष्ठव असलेल्या वा मध्यम बांध्याच्या व्यक्ती उत्साही व कृतिप्रिय असतात आणि त्वचा व नसा यांचे प्राचुर्य असलेल्या व्यक्ती विचारप्रिय व संयमी असतात.
हिपॉक्राटीझ व गेलेनचे प्रतिपादन सध्या मागे पडले आहे. क्रेच्मर व शेल्डनचे मतही काहीसे विवाद्य मानले गेले आहे. मात्र शरीरयष्टी व अंतःस्रावी ग्रंथी यांचा संबंध असतो तसेच अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावांची पातळी व स्वभावधर्म यांचाही संबंध असतो, हे मान्य झालेले आहे.
डब्ल्यू. बी. कॅनन, बर्मान, नॉर्मन कॅमरन यांना असे आढळून आले आहे, की अवटू ग्रंथीचा स्राव अधिक असणाऱ्या व्यक्ती महत्त्वाकांक्षी, वर्चस्वप्रिय व काहीशा अस्थिर स्वभावाच्या असतात. या ग्रंथीचा स्राव कमी असलेल्या व्यक्तींचा स्वभाव आळशी असतो. पोषग्रंथींचा विशेष प्रभाव असल्यास व्यक्ती आनंदी, धिम्या वा संथ, इतरांची कदर करणाऱ्या, गरीब (नरम) स्वभावाच्या, आत्मविश्वासाचा जरासा अभाव असणाऱ्या व शारीरिक व मानसिक दुःख सहन करणाऱ्या असतात. परावटू ग्रंथींचा स्राव विशेष प्रमाणात असलेल्या व्यक्ती स्वभावाने आक्रमक व चटकन भडकणाऱ्या असतात.
कार्ल युंग (१८७५–१९६१) याने अंतर्मुखताप्रधान व बहिर्मुखताप्रधान स्वभाव असे तरतम भावानुसार स्वभावाचे द्विविध वर्गीकरण केले आहे. अंतर्मुखतेची युंगने सांगितलेली लक्षणे म्हणजे : वर्तनावर विचारांचा अंकुश, संयम, शांतपणा, मन मोकळे न करणे, एकांतप्रियता, समाजभीरुता, मितभाषिता, हळवेपणा, आत्मपरीक्षणमग्नता, दिवास्वप्नाळुपणा, आदर्शप्रियता वगैरे. याउलट वस्तुस्थितीनुसार वर्तन, मनमोकळेपणा, समाजधीटपणा, ऊर्मिशीलता, कृतिप्रियता, भावनांची मोकळी अभिव्यक्ती, व्यवहारी वृत्तीने वास्तवाशी मिळते घेणे वगैरे बहिर्मुखतेची लक्षणे होत.
या वर्गीकरणास मनोविकृतींच्या संदर्भात काहीसे महत्व आहे. ते असे, की अंतर्मुखवृत्तीच्या व्यक्तींना ⇨ मज्जाविकृती जडण्याचा संभव अधिक असतो तसेच त्यांना जडलेल्या मज्जाविकृतीचे प्रकारही बहिर्मुखी व्यक्तींना जडू शकणाऱ्या विकृतीहून निराळ्या स्वरूपाचे असतात. दुसरी गोष्ट म्हणजे, अंतर्मुखवृत्तीच्या व्यक्तीस जर ⇨ चित्तविकृती जडलीच, तर ती ⇨छिन्नमानस प्रकारची विकृती असण्याचा संभव असतो. याउलट, बहिर्मुखी व्यक्तींची चित्तविकृती ही ⇨उद्दीपन-अवसाद चित्तविकृती असण्याचा संभव असतो.
संदर्भ : 1. Sheldon, W.H. Dupertuias, C. W. McDemott, E. Atlas of Men, New York, 1954.
2. Sheldon, W. H. Stevens, S. S. Varieties of Temperament, New York, 1942.
अकोलकर, व. वि.