कॅरोब वृक्ष : (हिं. खरनूब इं. लोकस्ट बीन, सेंट जॉन्स ब्रेड ल. सेरॅटोनिया सिलीक्वा कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-सीसॅल्पिनि-ऑइडी). सु. १२ – १५ मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष मूळचा द. यूरोपातील व भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून फार पूर्वी भारतात आणला गेला व आता पंजाब व इतर प्रदेशांत सुस्थित झाला आहे. शोभा, सावली आणि खाद्य फळे यांकरिता याची लागवड केली जाते.
चांगली निचर्याची चुनखडीयुक्त किंवा खडकाळ जमीन याला मानवते. पाने संयुक्त पिसासारखी, एका-आड एक दले सहा ते आठ, चकचकीत फुलोरा पार्श्विक लाल मंजरी [→ पुष्पबंध] फुले बहुधा एकलिंगी व भिन्न झाडांवर क्वचित द्विलिंगी संदले पाच प्रदले नसतात केसरदले पाच किंजपुटाभोवती बिंब असते फूल इतर सामान्य लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात वर्णिल्याप्रमाणे. शिंबा (शेंग) लालबुंद, ७ – २० सेंमी. लांब, जाड आणि गोड मगजयुक्त (गरयुक्त) बिया पिंगट आणि चकचकीत. बियांतील विपुल प्रथिनयुक्त मगजामुळे त्या मधुमेहाच्या रोग्यांना फार उपयुक्त शिवाय त्यांतील पुष्कापासून (विकासावस्थेतील बीजाच्या पोषणास मदत करणार्या भागापासून) ‘ट्रॅगॅसोल’ किंवा ‘कॅरोब गम’ नावाचा डिंक काढतात. तो खाद्य असून कागद व रबर उद्योग, सौंदर्यप्रसाधने, खळ, तंबाखू, कुत्र्यांची बिस्किटे, कॅलिको छपाई इत्यादींत वापरतात. फळे व बियांपासून प्रथम साखर बनवितात व नंतर राहिलेल्या भागापासून एथिल अल्कोहॉल काढतात. बियांची पूड अमेरिकेत पावरोटीत घालतात कारण ती पौष्टिक व जीवनसत्त्वयुक्त (अ, ब, ड आणि इ) असते. गुरे व घोडे यांना फळे उत्तम खुराक म्हणून उपयुक्त आहेत पण माणसांनीही दुष्काळात त्यांचा भरपूर उपयोग केला आहे. फळे स्तंभक (आकुंचन करणारी) व कफनाशक असून बियांची टरफले रेचक व स्तंभक असतात. लाकूड जड व कठीण असल्याने कपाटे व पेट्यांकरिता वापरतात, तसेच त्यातील अल्गरॉबीन हे रंगद्रव्य कापडांना फिकट तपकिरी रंग देण्यास उपयुक्त ठरले आहे.
परांडेकर, शं. आ.
“