कॅरेल, आलेक्सिस (२८ जून १८७३ — ५ नोव्हेंबर १९४४). फ्रेंच – अमेरिकन वैद्य, शस्त्रक्रियातंत्रज्ञ आणि जीववैज्ञानिक , नोबेल पारितोषिक विजेते. फ्रांन्समधील स्ते. फॉम-लीझ-लीआँ येथे त्यांचा जन्म झाला. लीआँ व दीझॉं विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. लीआँ विद्यापीठात ते प्रयोगनिर्देशक होते (१९०१–०२).१९०५ मध्ये ते कॅनडात व १९०६ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात गेले. शिकागो विद्यापीठाच्या शरीरक्रियावैद्यानिक प्रयोगशाळेत एक वर्ष काम केल्यानंतर रॉकफेलर   इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेत ते कार्यकर्ता (१९०६ – १२), सभासद( १९१२ — ३९) आणि सेवानिवृत्तीनतंर सन्मान्य सभासद होते. पहिल्या महायुद्धात फ्रेंच सैन्याच्या वैद्यकीय पथकात ते मेजर होते. दुसऱ्या महायुद्धात १९४० मध्ये फ्रान्सचा पाडाव झाल्यानंतर जर्मनव्याप्त फ्रान्समधील सरकाराने त्यांची फौंडेशन फॉर दी स्टडी ऑफ ह्यूमन रिलेशन्स या संस्थेचे संचालक म्हणून नेमणूक केली. १९४४ मध्ये फ्रान्स स्वतंत्र झाल्यावर त्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले व जर्मनांशी सहकार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.

शस्त्रक्रियेमध्ये छेदलेले भाग शिवण्याचे तंत्र त्यांनी शालेय जीवनातच आत्मसात केले होते. त्यांनी प्रायोगिक शस्त्रक्रियेसंबंधी महत्त्वाचे संशोधनपर कार्य केले. रक्तवाहिन्या शिवून जोडण्याचे आणि रोहिणी, नीला व इतर अवयवांचे प्रतिरोपण (निकामी झालेला अवयव काढून त्याऐवजी दुसरा घालणे) यासंबंधीच्या त्यांच्या कार्याबद्यल त्यांना १९१२चे वैद्यक व शरीरक्रियाविज्ञानातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी जिवंत ऊतकांच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांच्या) शरीरक्रियाविज्ञानाचा अभ्यास केला. कोंबडीच्या पिलाचे हृदय व इतर ऊतके शरीराबाहेर काढून ती जिवंत ठेवण्यात त्यांना यश आले. जखमांवर इलाज करण्यासाठी व कोथ (ऊतकांचा मृत्यू होऊन सडणे) होऊ नये यासाठी त्यांनी पहिल्या महायुद्धकाळात एच्‌.डी. डेकिन यांच्या सहकार्याने ‘कॅरेल-डेकिन विद्राव’ या नावाने ओळखण्यात येणारा विद्राव शोधून काढला. सी. ए. लिंडबर्ग यांच्या साहाय्याने कॅरेल यांनी यांत्रिक हृदय तयार केले.

युनायटेड स्टेट्‌स डिस्टिंगविश्‌ड सर्व्हिस पदक (१९२२), नॉर्डहॉफजंग कॅन्सर पुरस्कार (१९३१), न्यूमान फौंडेशन पारितोषिक (१९३७) इ. बहुमान त्यांना मिळाले. त्यांनी ट्रीटमेंट ऑफ इनफेक्टेड वुंड्‌स (१९१७), मॅन द अननोन (१९३५), द कल्चर ऑफ ऑर्गन (१९३८) इ. ग्रंथ तसेच शस्त्रक्रिया व जीववैज्ञानिक विषयांवर बरेच शास्त्रीय लेख लिहिले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.