स्टेबिन्झ, जॉर्ज लेडयार्ड : (६ जानेवारी १९०६— १९ जानेवारी २०००). अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि आनुवंशिकीतज्ञ. वनस्पतींवर आधुनिक संश्लेषित क्रमविकासाच्या सिद्धांताचा वापर प्रथमतः करणारे शास्त्रज्ञ. त्यामुळे त्यांना क्रमविकास वनस्पतिविज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. ते कृत्रिम रीत्या वनस्पतींच्या प्रजाती ( जी नैसर्गिक परिस्थितीत वाढू शकते ) तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होत.

स्टेबिन्झ यांचा जन्म लॉरेन्स ( न्यूयॉर्क ) येथे झाला. त्यांचे शिक्षण हार्व्हर्ड विद्यापीठात झाले. १९३१ मध्ये त्यांनी जीवविज्ञान या विषयात पीएच्.डी. पदवी संपादन केली. कोलगेट विद्यापीठ, हॅमिल्टन ( न्यूयॉर्क ) येथे काही काळ त्यांनी अध्यापन केले. ते १९७३ पर्यंत कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे विद्याशाखा सदस्य होते. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डेव्हीस आवारात १९५० मध्ये त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी तेथे आनु-वंशिकीचा विभाग सुरू केला. त्या प्रदेशातील वनस्पतींच्या वर्गीकरणाचा त्यांनी सविस्तर अभ्यास केला.

उच्च जीवांत आधुनिक संश्लेषित क्रमविकासाचा सिद्धांत तयार करण्याचे व तो वापरण्याचे श्रेय स्टेबिन्झ यांना जाते. हा सिद्धांत जनुक उत्परिवर्तन व पुनःसंयोग, नैसर्गिक निवड, गुणसूत्रांच्या संख्येत व आकारात होणारे बदल आणि पुनरुत्पादक विलगीकरण यांबाबतच्या मूलभूत प्रक्रियांचे स्पष्टीकरण करतो. व्हेरिएशन अँड इव्होल्यूशन इन प्लँटस् (१९५०) या ग्रंथामुळे हा सिद्धांत वनस्पती क्रमविकासाला लावणारे स्टेबिन्झ हे पहिले जीवशास्त्रज्ञ ठरले. अर्नेस्ट बी. बॅबकॉक या सहकार्‍यासमवेत त्यांनी सपुष्प वनस्पतींचा अभ्यास केला. त्यात त्यांनी कृत्रिम रीत्या गुणसूत्रांची संख्या दुपटीने वा तिपटीने वाढवून त्यापासून नवीन बहुगुणित वनस्पतींच्या जाती तयार केल्या. अशाच प्रयोगांतून त्यांनी जंगली गवतापासून एर्‍हार्टा एरेक्टा ही नवीन जाती तयार करण्यात यश मिळविले. नंतर ही जाती त्यांनी नैसर्गिक वातावरणात वाढविली (१९४४). या यशाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. १९८० मध्ये नॅशनल मेडल ऑफ सायन्स हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

स्टेबिन्झ यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांत प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन (१९६६), इव्होल्यूशन (१९७०) आणि फ्लॉवरिंग प्लँटस् : इव्होल्यूशन अबाव्ह द स्पिशीज् लेव्हल (१९७४) हे ग्रंथ असून २५० पेक्षा जास्त लेख प्रकाशित आहेत.

स्टेबिन्झ यांचे डेव्हिस ( कॅलिफोर्निया ) येथे निधन झाले.

पाटील, चंद्रकांत प.