औरंगजेब: (२४ ऑक्टोबर १६१८ — २०फेब्रुवारी १७०७). दिल्लीच्या मोगल घराण्यातील सहावा बादशहा. संपूर्ण नाव मुहियुद्दीन मुहंमद औरंगजेब ⇨ शाहजहान  व मुमताज यांचा तिसरा मुलगा. गुजरातमधील दोहद येथे जन्मला. शाहजहानच्या बंडामुळे वयाच्या सहाव्या वर्षी त्यास जहांगीरकडे ओलीस रहावे लागले. पुढे काही दिवस तो नूरजहानच्या कैदेत होता. १६२८ मध्ये शाहजहान दिल्लीच्या तख्तावर बसल्यावर त्याची नूरजहानच्या कैदेतून मुक्तता झाली आणि त्याच्या शिक्षणास प्रारंभ झाला. त्याने कुराण  व हदीस  यांचा अभ्यास केला तसेच अरबी, चघताई, फार्सी व तुर्की भाषा आत्मसात केल्या. लहानपणापासूनच त्यास चित्रकला, संगीत व इतर ललितकलांची नावड होती.

शाहजहानने १६३४ मध्ये दहा हजारांची मनसब देऊन औरंगजेबाला बुंदेल्यांचे बंड मोडण्यासाठी पाठविले होते. याच मोहिमेत त्याचे लष्करी कौशल्य दृष्टीस पडले. या स्वारीतील यशामुळेच शाहजहानने औरंगजेबाला दक्षिणेच्या सुभेदारीवर पाठविले. औरंगजेब १६३६ ते १६४४ दक्षिणेचा, १६४५ ते १६४८ गुजरातचा, १६४८ ते १६५२ मुलतानचा व शेवटी १६५२ ते १६५७ पुन्हा दक्षिणेचा सुभेदार होता. दक्षिणेत पहिल्यावेळी सुभेदार असताना, त्याने बागलाण जिंकले, शहाजीचा पराभव करून अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट केला. मोगलांविरुद्ध बंड करणाऱ्या खेलोजी भोसल्यास ठार मारले. ह्या कामगिरीबद्दल शाहजहानने त्यास पंधरा हजार जात व दहा हजार स्वार अशी मनसब दिली. गुजरातमध्ये असताना शाहजहानने त्यास बाल्ख व बदखशान जिंकण्यासाठी मध्य आशियात पाठविले. यात तो यशस्वी झाला नाही. मुलतानच्या सुभेदारीवर असता तो दोनदा कंदाहारच्या स्वारीवर गेला होता तथापि त्यास यश मिळाले नाही. म्हणून अखेरीस शाहजहानने त्यास दक्षिणेत पाठविले. दक्षिणेत १६५७ मध्ये औरंगजेबाने विजापूर व गोवळकोंडे या राज्यांवर स्वाऱ्या करून बीदर, कल्याणी व परांडा हे किल्ले जिंकले. दौलताबादपासून जवळच खडकी येथे त्याने औरंगाबाद शहर वसविले. या मुक्कामात त्याने दक्षिणेतील वसुली पद्धतीत व लष्करात अनेक सुधारणा केल्या.

शाहजहान १६५७ मध्ये आजारी पडला, तेव्हा त्याने दारा शुकोहला आपला वारस नेमले. त्याच वेळी औरंगजेबाचे भाऊ मुराद व शुजा यांनी अनुक्रमे अहमदाबाद व बंगाल येथे स्वत:ला बादशहा म्हणून जाहीर केले. या परिस्थितीत औरंगजेब फार धूर्तपणे वागला. त्याने मुरादशी तह करून त्या दोघांनी मिळून शाहजहानच्या सैन्याचा धरमत येथे व दारा शुकोहचा सामूगढ येथे पराभव केला. नंतर शाहजहान व मुराद यांना कैद करून औरंगजेब २१ जुलै १६५८ रोजी सिंहासनावर बसला. मुराद, दारा, शुजा, सुलैमान, शुकोह यांचा काटा दूर केल्यानंतर जून १६५९ मध्ये त्याचे राज्यारोहण झाले आणि आलमगीर ही पदवी त्याने धारण केली. स्वत:च्या वैभवाने परकीय सत्ताधीशांचे डोळे दिपविण्यासाठी औरंगजेबाने १६६१ — १६६७ या काळात मक्का, इराण, बाल्ख, बुखारा इ. ठिकाणाहून आलेल्या दूतांना भारी किंमतीचे नजराणे देऊन आपल्या वैभवाचे प्रदर्शन केले.

औरंगजेब

औरंगजेबाच्या कारकीर्दीचे दोन भाग पडतात : १६५८ ते १६८१ पर्यंतची वर्षे उत्तर हिंदुस्थानात व १६८१ ते १७०७ पर्यंतची वर्षे दक्षिणेत, प्रामुख्याने मराठ्यांविरुद्ध लढण्यात गेली. उत्तरेत असताना साम्राज्यविस्तारासाठी औरंगजेबाने पूर्व व वायव्य सरहद्दींवर चढाईचे धोरण स्वीकारले. १६५७ मध्ये कुचबिहारचा राजा प्रेम नारायण याने मोगल प्रदेशात चढाई केली. म्हणून १६६० मध्ये औरंगजेबाने मीरजुम्‌ला यास बंगालचा सुभेदार नेमले. मीरजुम्‌ला व दिलेरखान यांनी आसामवर स्वारी केली. या स्वारीत मीरजुम्‌ला मरण पावला. आहोमांनी गेलेला प्रदेश हस्तगत केला. १६६१ ते १६६५ पर्यंत मोगलांना या आघाडीवर यश आले नाही. आहोमांनी स्वारी केल्यानंतर औरंगजेबाने शायिस्तेखानाला बंगालचा सुभेदार नेमले. त्याने बिहार, चितगाँग, सोनदीप इ. प्रदेश जिंकून तेथील पोर्तुगीज व ब्रह्मदेशच्या चाच्यांचा बंदोबस्त केला तरी आहोम मोगलांना त्रास देत राहिले. १६७० ते १६८१ या काळातील आहोम राजे असमर्थ होते त्यामुळे मोगलांनी त्या प्रदेशात राज्यविस्तार केला.

वायव्य सरहद्दीवर युसुफझइ (१६६७) तसेच अकमल खानाच्या नेतृत्वाखालील अफ्रिडी (१६७२) आणि अफगाण यांनी केलेले उठाव औरंगजेबाने मोडून काढले. या लढायांत तो स्वत: त्या आघाडीवर गेला होता. त्याचे आर्थिक व राजकीय नुकसान झाले कारण दक्षिणेतील कुशल अधिकारी या आघाडीवर गुंतविल्यामुळे दक्षिणेत शिवाजी राजांना राज्यविस्तार करण्यास वाव मिळाला.

औरंगजेब एक कर्मठ सुन्नी व परधर्मद्वेष्टा असल्याने त्याने अनेक तऱ्हेचे कर लादून हिंदूंचा छळ केला. १६६९ मध्ये मथुरेच्या फौजदाराने तेथील केशव देवाचे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. अशा तऱ्हेच्या गोष्टी वरचेवर होऊ लागल्या. १६६९, १६७०, १६८१ मध्ये जाटांनी बंडे केली. ही बंडे औरंगजेबाने मोडून काढली. अशाच तऱ्हेने छत्रसाल बुंदेला (१६७१) व सतनामी (१६७२) यांनी औरंगजेबाच्या हिंदूविरोधी धोरणाविरुद्ध उठाव केला. सामर्थ्याच्या जोरावर औरंगजेबाने ती बंडे मोडून काढली. शिखांचा गुरू तेगबहादुर यानेही बादशहाच्या धोरणास विरोध केल्यामुळे त्यास ठार करण्यात आले म्हणून शिखांनी १६७५ मध्ये औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारले. काहीना काही कारण काढून औरंगजेबाने जोधपूरचे राज्य खालसा करण्यासाठी अजितसिंग व त्याच्या राण्यांना कैद केले. राजपुतांना हा अपमान सहन झाला नाही. सर्व राजपूत एकत्र होऊन त्यांनी औरंगजेबाविरुद्ध युद्ध चालू केले. ते १६७८ ते १६८१ पर्यंत चालू होते. याच सुमारास औरंगजेबाचा धाकटा मुलगा सुलतान अकबर याने बापाविरुद्ध बंड करून स्वत:ला बादशाह म्हणून जाहीर केले. तो राजपुतांना मिळाला. शेवटी दुर्गादास राठोड मोगलांचा पाठलाग चुकविण्यासाठी अकबराला घेऊन दक्षिणेत संभाजीकडे आश्रयास गेला हे कळताच औरंगजेबाने राजपूतांशी तह केला. दक्षिणेत औरंगजेब येईपर्यंत त्याच्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने अनेक किरकोळ बंडे मोडली, वायव्य सरहद्दीचा बंदोबस्त केला, आसाम, आराकान ह्यांसारख्या दूरच्या प्रदेशांवर सैन्य धाडले आणि राजपुतांशी युध्दे केली. राजपुतांशी केलेल्या युध्दांतून दक्षिणेकडे युद्ध उपस्थित होण्यास एक कारण झाले. अकबर व संभाजी यांच्या पारिपत्यासाठी तो १६८१ च्या अखेरीस दक्षिणेत गेला. त्यामुळे सबंध राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. अकबराच्या बंडामुळे औरंगजेबाला मराठ्यांचा नाश करण्याची आयती संधी मिळाली.


औरंगजेब व ⇨ शिवाजी  यांचे १६५७ पासूनच संबंध बिघडलेले होते. शिवाजीच्या वाढत्या सत्तेस आळा घालण्यासाठी औरंगजेबाने त्याच्याविरुद्ध शायिस्तेखान, मुअज्जम, जयसिंग, दिलेरखान, महाबतखान असे मातबर सरदार दक्षिणेत धाडले. जयंसिंग व दिलेरखान यांनी घातलेल्या १६६५ च्या पुरंदरवेढ्यात शिवाजीला माघार घ्यावी लागली. झालेल्या तहात दोन तृतीयांश प्रदेश मोगलांना द्यावा लागला. मोगली मनसबदार शिवाजी व संभाजी यांना आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस जावे लागले. तेथे त्यांचा अपमान झाला. औरंगजेबाने शिवाजीला कैद केले. मोठ्या चातुर्याने पितापुत्र तेथून निसटले. महाराष्ट्रात परतल्यावर शिवाजीने राज्यविस्ताराचे काम पुन्हा चालू केले. औरंगजेबाला मराठ्यांच्या वाढत्या सत्तेला शिवाजीच्या हयातीत आळा घालता आला नाही.

औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली त्याच्या अकबराखेरीज सर्व मुलांनी, नातवांनी व सरदारांनी दक्षिणेत मुख्यत: मराठी राज्यावर १६८२ मध्ये आक्रमण सुरू केले. संभाजीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांना शक्य तेवढा विरोध करून मराठी राज्याचे रक्षण केले. मराठ्यांविरुद्ध चार वर्षे लढून यश येईना, तेव्हा औरंगजेबाने शिया पंथाचा पुरस्कार करणाऱ्या व संभाजीस साह्य करणाऱ्या विजापूर व गोवळकोंडे येथील शाही सत्ता नष्ट करण्यासाठी १६८५ — ८७ मध्ये त्यांच्याविरुद्ध आक्रमणे सुरू केली. १६८६ मध्ये विजापूरच्या सिकंदर आदिलशाहाचा व १६८७ मध्ये गोवळकोंड्याच्या कुत्बशाहाचा पराभव केला व ती राज्ये खालसा करून आपल्या राज्यास जोडली. त्यानंतर त्याने मराठ्याविरुद्ध पुन्हा लढा सुरू केला. मराठी राज्याचा नाश करण्याचा एक उपाय म्हणून त्याने संभाजीला पकडण्यासाठी मुकर्रबखानाला रवाना केले. त्याने संभाजी संगमेश्वरास असताना एकाएकी छापा घालून त्यास कैद केले. दहशत बसावी म्हणून औरंगजेबाने संभाजीची धिंड काढून त्याचे हाल हाल करून त्यास ११ मार्च १६८९ रोजी ठार केले. नंतर तो राजारामाच्या मागे लागला. त्या प्रयत्‍नांत त्याच वर्षी मराठ्यांची राजधानी रायगड जिंकून संभाजीची सावत्र आई, बायको व इतर मुले यांना त्याने कैद केले. राजाराम निसटून जिंजीला पळाला. तेव्हा औरंगजेबाने जिंजीला वेढा घातला. आठ वर्षे मराठ्यांनी मोगलांविरुद्ध टक्कर दिल्यानंतर, १६९८ मध्ये राजाराम महाराष्ट्रात आल्यावर तिकडे मोगलांनी जिंजी जिंकली आणि तंजावर व त्रिचनापल्लीच्या राजांकडून खंडणी घेतली. इकडे महाराष्ट्रात औरंगजेब मराठ्यांचे किल्ले व प्रदेश जिंकण्याचा सतत प्रयत्‍न करीत होता. १६९० मध्ये औरंगजेब सत्तेच्या शिखरावर पोहोचला होता. त्याचे राज्य काश्मीरपासून कावेरीपर्यंत व काबूलपासून चितगाँगपर्यत पसरले होते. परंतु याच सुमारास त्याच्या सत्तेचा ऱ्हास सुरू झाला. १६९९ ते १७०५ पर्यंत औरंगजेब मराठ्यांचे गड घेण्यात गुंतला होता. परंतु राजारामाच्या कारकीर्दीत संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत, शंकराजीपंत, परशुरामपंत, कान्होजी आंग्रे इ. सरदारांनी मोगलांनी घेतलेले गड परत जिंकून घेतले. राजारामाच्या नंतर ताराबाईने तितक्याच धैर्याने मोगलांविरुद्ध टक्कर दिली. मराठ्यांविरुद्ध २५ वर्षे लढून औरंगजेब हैराण झाला. त्याचे दक्षिणेतील मराठ्यांविरुद्धचे युद्ध त्याच्या नाशास कारणीभूत झाले. या दीर्घ लढाईच्या काळातच तो आजारी पडला. १६७८ ते १७०७ पर्यंत मराठे, राजपूत, जाट, बुंदेले, शीख यांच्याशी लढून तो वयाच्या एकोणनव्वदाच्या वर्षी अहमदनगरजवळ भिंगार येथे मरण पावला.

इस्लाम धर्माधिष्ठित साम्राज्यविस्ताराच्या धोरणामुळे त्याचे राज्यकारभाराकडे दुर्लक्ष झाले. तो संशयी होता, त्यामुळे त्याला नातेवाईकांचे किंवा अधिकाऱ्यांचे प्रेम मिळू शकले नाही. कारभाराच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे तो जातीने लक्ष घालीत असे. त्यामुळे अधिकाऱ्यांतील कर्तृत्व खच्ची झाले. लाचलुचपतीला प्रतिबंध होता, पण प्रत्यक्ष औरंगजेब पैसे घेऊन पदव्या देत असे. त्याच्या काळात जमीन महसुलाच्या बाबतीत तीन तऱ्हेचे कर आकारले जात होते. शेती व उद्योगांच्या अवनतीमुळे राज्यातील गोंधळ अधिकच वाढला. औरंगजेबाच्या कादकीर्दीत जहागीरदारांची सत्ता वाढली होती. तो जहागिरीच्या व मनसबीच्या आमिषाने शत्रुपक्षाच्या गटातील लोकांना फोडून आपल्या पक्षात घेत असे. सिंहासनावर बसल्यावर त्याने राहदारी, पांडरी, धान्यावरील कर व इतर जवळजवळ ८० प्रकारचे कर कमी केले. १६७९ मध्ये जझिया व इतर अनेक कर त्याने हिंदूंवर लादले.

औरंगजेबाला हिंदुस्थानात इस्लाम धर्माचा प्रचार व प्रसार करावयाचा होता. त्याने धर्मांधतेपायी हिंदूंची देवालये, शाळा, धार्मिक व्यवहार व शिकवण मोडून काढण्याचा अधिकाऱ्यांना हुकूम दिला. मथुरा येथील केशवदेवाचे देवालय, बनारस येथील विश्वनाथाचे व बिंदुमाधवाचे मंदिर, गुजरातमधील सोमनाथचे मंदिर, यांशिवाय अनेक ठिकाणची असंख्य मंदिरे त्याने उद्ध्वस्त केली आणि त्या जागी मशिदी बांधल्या. दरबारात रूढ असलेल्या हिंदूंच्या चालीरीती त्याने बंद केल्या. शासकीय कार्यालयातून हिंदूंना कमी केले. हिंदूंना मुसलमान धर्म स्वीकारण्याची बळजबरी केली. त्याच्या अशा धोरणामुळे त्याच्या हयातीतच मोगल साम्राज्य लयास जाण्याची प्रक्रिया सुरू झाली.

औरंगजेबाची कारकीर्द अकबराच्या कारकीर्दीएवढी मोठी झाली परंतु अकबराने जेवढ्या काळात मोगल साम्राज्यास भव्य स्वरूप आणले तेवढ्याच काळात औरंगजेबाने मोगल साम्राज्याच्या विनाशाची पूर्वतयारी करून ठेवली. शौर्य आणि कर्तृत्व ह्या गुणांत को अकबराहून कमी नव्हता. गादीवर येण्यापूर्वीच त्याने अनेक जबाबदारीची कामे पार पाडली होती. दीघौद्योगात तर तो सर्वश्रेष्ठ ठरेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो उद्योगात निमग्न असे. इस्लामी धर्मातील सुन्नी पंथाचे नेमधर्म तो कसोशीने आचरणात आणी. रमजानसारखे दीर्घकाळचे उपवास तो निष्ठेने करी. कुराण  त्यास तोंडपाठ होते. त्याच्या अनेक हस्तलिखित प्रती करून त्याने विकल्या. पैगंबराने प्रत्येक मुसलमानास काही तरी धंदा करावा असे सांगितले आहे, त्यास अनुसरून तो टोप्या तयार करून विकीत असे. मरतेसमयी वरील गोष्टींतून येणारे उत्पन्न आपल्या और्ध्वदैहिक कार्यास लावावे, असे त्याने लिहून ठेवले. त्याची राहणी साधी होती. दारूस तो स्पर्श करीत नसे. तथापि औरंगजेबाची धर्मनिष्ठा व साधेपणा त्याच्या खासगी आचरणापुरता मर्यादित राहिला नाही. सबंध हयातीत इस्लाम धर्माचा प्रसार व्हावा म्हणून त्याने अविश्रांत खटपट केली आणि त्याकरिता बहुविध पण जुलमी मार्गांचा अवलंब केला. त्याच्या कारकीर्दीत उत्पन्न झालेले धर्माचे राजकारणावरील वर्चस्व हे सर्व अनर्थाचे मूळ म्हणावे लागेल. काफिर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे तो मानी. अशा राजनीतीचा कित्ता पुढे ठेवून औरंगजेबाने बहुसंख्य हिंदूंवर तर जुलूम केलाच परंतु त्यामुळे मुसमानांतही दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला. धंदा वा नोकरीऐवजी फकीर होणे अधिक मानाचे असे मुसलमान समजू लागले. त्यांच्यात चैन व कर्तृत्वशून्यता निर्माण झाली. औरंगजेबात काही चांगले गुण वास करीत होते, तरीसुध्दा दूरदृष्टीचा अभाव, कूटनीती आणि धर्मांधता ह्यांमुळे मोगलसत्ता पोखरली गेली व त्याच्या मृत्यूनंतर अल्पावधीतच ती संपुष्टात आली.

संदर्भ : 1. Edwardes, S. M. Garrett, H. L. O. Mughal Rule in India, New Delhi, 1962.

     2. Lane – poole, Stanley, Aurangzeb, Oxford, 1908.

     3. Sarkar, J. N. History of Aurangzeb5 Vols., Calcutta, 1912 – 1924.

     4. Srivastava, A. L. Mughal Empire (1526 — 1803), Agra, 1966.

खोडवे, अच्युत