औद्योगिक आकृतिबंध : घड्याळे, विजेच्या इस्तऱ्या, रेडिओ, स्वयंचलित यंत्रे यांसारख्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावरील यांत्रिक पद्धतीने उत्पादन करण्याच्या उद्देशाने त्यांची संरचना दर्शविणारे नमुने तयार करावे लागतात, त्यांस औद्योगिक आकृतिबंध म्हणतात. चित्रशिल्पादी ललित कलांतील ⇨ आकुतिबंधाची उद्दिष्टे अर्थातच भिन्न असतात. व्यपारी जाहिराती व गृहशोभन यांसाठी तयार केलेल्या आकृतिबंधांमागे व्यापारी हेतू असतात. औद्योगिक आकृतिबंधाप्रमाणे एकाच नमुन्याच्या हजारो वस्तू निर्माण होतात व त्या सर्व बाबतींत एकसारख्या असतात.

उद्योगधंद्यातील यंत्रोपकरणांचा उपयोग ⇨ औद्योगिक क्रांतीनंतर वाढला. उत्पादित वस्तूंची उपयुक्तता व कलात्मकता यांचा मेळ  घालण्यासाठी आणि व्यापारी स्पर्धेत यश मिळण्यासाठी औद्योगिक आकृतिबंधाच्या कल्पनेस चालना मिळाली. मायकेल थोने याने बनविलेल्या खुर्चीपासून (१८५६) औद्योगिक आकृतिबंधाची सुरुवात मानली जाते. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आधुनिक काळातील अनेक नव्या संप्रदायांचा उदय होऊ लागला. त्यांपैकी द स्टिल (डॅनिश de Stijl, १९१७) या संप्रदायाने नेटक्या भौमितिक आकारांना प्राधान्य  दिले. याचा परिणाम औद्योगिक आकृतिबंधाच्या कल्पनेवर झाला. ⇨ वॉल्टर ग्रोपिअसच्या नेतृत्वाखालील ⇨ बोहाउस ही संस्था औद्योगिक आकृतिबंधाचे विशिष्ट दृष्टीने शिक्षण  देणारी पहिली संस्था होय. या संस्थेने प्रसृत केलेल्या आकृतिबंधांप्रमाणे यांत्रिक वस्तूंची निर्मिती होऊ लागली. त्यांत भौमितिक आकारांना महत्त्व होते. हल्ली आढळणाऱ्या पोकळ सळ्यांच्या खुर्चीचा आकृतिबंध या संस्थेचाच होता. कोणत्याही वस्तूच्या नुसत्या नीटस यांत्रिकी आकाराऐवजी तो आकार जास्तीत जास्त सुंदर व कार्योपयोगी असला पाहिजे, हा नवीन दृष्टीकोन या संस्थेने दिला. त्याचा प्रभाव आजच्या यंत्रोत्पादनात दिसून येतो. काचपात्रे, फर्निचर इ. वस्तूंच्या निर्मितीत औद्योगिक आकृतिबंधकार व्यक्तिशः कार्य करू शकतो. टंकलेखनयंत्रे, मोटारी, रेडिओ अशा यांत्रकी व विद्युत् उपकरणांच्या साहाय्याने काम करणाऱ्‍या वस्तूंबाबत तो अनेक तज्ञांच्या मदतीने कार्य करतो तसेच तत्संबंधीच्या अद्ययावत संशोधनाच्या आधारे त्या त्या वस्तूचे बाह्य स्वरूप ठरवितो. अर्थात ग्राहकांच्या आवडी, गरजा, निर्मितीच्या सोयी  यांचा  विचारही त्यास करावा लागतो. विशेषतः यांत्रिक सुविधा व मर्यादा लक्षात घेऊन मूळ आकृतिबंधात फक्त सुधारणा व बदल करावा लागतो. औद्योगिक  आकृतिबंधकाराला संकल्पित उत्पादनवस्तूच्या मूळ घडणीचे पूर्ण ज्ञान पाहिजे. यांत्रिकी सामर्थ्य आणि तंत्रविषयक ज्ञान असल्याशिवाय वस्तूचा नमुना त्याला घडविता येणार नाही. अनुभवांतून येणारी स्पष्ट दृष्टी व तंत्रविषयक  प्रगतीचा अभ्यास हा त्याच्या कलाकार्याचा  एक भागच असतो. औद्योगिक आकृतिबंधात महत्त्वाची भर घालणारे हान्स व्हेग्‍नर, जीओ पोंती, रेमंड लोई, सिगवर्द बरनादोत्ते, मार्चेल्लो निझोली, वॉल्टर टिगू, टापीओ विरक्काल, पिनिन फारीना, डॉनल्ड डेस्की, काज फ्रांक, रसेल राइट हे प्रमुख कलावंत  होत.

भारतात औद्योगिक आकृतिबंध कलावंत व्यक्तिशःच निर्माण करत होते. खास शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले कलावंत या क्षेत्रात आज तरी नाहीत. अगदी अलीकडे भारत सरकारच्या वतीने मुंबई येथील पवई या ठिकाणी औद्योगिक आकृतिबंधासंबंधी शिक्षण देण्याची सोय झाली आहे.

आरवाडे, शांतिनाथ