ओ. हेन्री : (११ सप्टेंबर १८६२—५ जून १९१०). अमेरिकन लघुकथाकार. मूळ नाव विल्यम सिडनी पोर्टर. जन्म नॉर्थ कॅरोलायना मधील ग्रीन्झबरो ह्या शहरी. टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे बँकेत नोकरी करीत असताना द रोलिंग स्टोन (१८९४–९५) हे विनोदाला वाहिलेले साप्ताहिक त्याने काढले. तो प्रयत्न अयशस्वी झाल्यावर एका नियतकालिकात स्तंभलेखन केले अधुनमधुन व्यंगचित्रेही काढली. पुढे बँकेतील पैशाच्या अफरातफरीचा आरोप आल्याने तो हाँडुरसला पळाला. तथापि आपल्या मरणोन्मुख पत्नीला भेटण्यासाठी तो ऑस्टिनला परतला असताना त्यास अटक होऊन कारावास भोगावा लागला. तुरुंगात त्याने ‘ओ. हेन्री ’ ह्या टोपणनावाने लिहिलेल्या कथांना चांगली लोकप्रियता मिळाली. तुरुंगातून सुटल्यावर तो न्यूयॉर्कला आला (१९०२). तेथे राहून त्याने विपुल कथालेखन केले. कॅबेजिस अँड किंग्ज (१९०४) ह्या त्याच्या पहिल्या कथासंग्रहातील कथा हाँडुरसच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या आहेत. त्यानंतर त्याचे द फोर मिल्यन (१९०६), हार्ट ऑफ द वेस्ट (१९०७) आदी अनेक कथा संग्रह प्रसिद्ध झाले. त्याच्या कथा आटोपशीर, घटनाप्रधान व किस्सेवजा आहेत. लघुकथालेखनाचे स्वतःचे असे एक तंत्र त्याने बसविले होते. कथेला शेवटी अगदी अनपेक्षित कलाटणी देऊन वाचकाला विस्मयाचा धक्का देणे, हे त्या तंत्राचे प्रमुख वैशिष्ट्य. ‘द गिफ्ट ऑफ द मेजाय’, ‘द कॉप अँड द अँथेम’ ह्यांसारख्या त्याच्या कथा त्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहेत. ‘द गिफ्ट ऑफ द मेजाय’ ह्या कथेचा मराठी अनुवाद प्रा. ना. सी. फडके ह्यांनी केलेला आहे. लघुकथा ह्या साहित्यप्रकारासंबंधीची ओ. हेन्रीची कल्पना फार संकुचित असली, तरी तिच्या मर्यादेत राहून त्याने अनेक दर्जेदार कथा लिहिल्या. १९३१–३२ च्या सुमारास मराठी कथाकारांना आणि समीक्षकांना आदर्शभूत झालेल्या पश्चिमी कथाकारांमध्ये ओ. हेन्रीला विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते. न्यूयॉर्क येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Doubleday and Co. Inc., The Complete works of O.Henry.New York, 1953.
2. Kramer, Dale, The Heart of O. Henry.New York, 1954.
3. Long, E. H. O. Henry : The Man and His Work, Philadelphia, 1949.
नाईक, म. कृ.
“