ओल : (होस्टेज). एक अथवा अनेक व्यक्तींना जामीन ठेवण्याची पद्धत. युद्धातील तहांच्या अटी पाळल्या जाव्यात म्हणून जित देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना ओलीस ठेवण्याची पद्धत इतिहासकाळात दिसून येते. काही करारांसाठी अथवा मागण्यांच्या पूर्ततेसाठीही ही प्रथा अंमलात आणल्याची उदाहरणे आहेत. ओल म्हणून ठेवण्यात आलेल्या व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी असा संकेत आहे तथापि करार पाळला न गेल्यास या व्यक्तींना ठार करण्याची रूढी आहे. ब्रिटिशांचा भारतातील गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिस याने टिपू सुलतानाची दोन मुले ओलीस ठेवून घेतली होती. जर्मनांनीही दुसऱ्या महायुद्धात या पद्धतीचा अवलंब केल्याची उदाहरणे आढळतात. १९४९च्या जिनीव्हा युद्धसंकेतान्वये युद्धकैद्यांना ओलीस ठेवणे अवैध असून त्यांना युद्धकैदी म्हणूनच वागणूक मिळाली पाहिजे, असा दंडक घालण्यात आला. हा दंडक मोडल्याबद्दल न्यूरेंबर्ग खटल्यात अनेक जर्मनांना दोषी ठरविण्यात आले.
चाफेकर, शं. गं.