ओरान : अल्जीरियाचे भूमध्य समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३,२५,००० (१९६७). हे ओरान आखातावर असून पश्चिमेकडील तँजिअर व पूर्वेकडील अल्जिअर्स यांच्यामध्ये आहे. ह्या शहरावर आतापर्यंत अरब, स्पॅनिश, तुर्क व फ्रेंच यांचा अंमल होऊन गेल्याने ओरानमध्ये मिश्र संस्कृतीचा मिलाप झालेला दिसतो. समुद्र-किनारा, टेकडी  आणि दोहोंमधील घळ ह्यांमुळे ओरानचे तीन भाग पडतात. टेकडीवर जुने शहर व किल्ला असून, ओरानजवळील मेर्स-एल्-काबीर हा उत्तम नाविक तळ आहे. उत्तर आफ्रिकेतील महत्त्वाच्या शहरांशी ओरान जोडलेले असून शहरात जहाजबांधणी, अवजड उद्योग, कृषिअवजारे, काचसामान, मद्ये, पादत्राणे, कापड, सतरंज्या, सिगारेट, डबाबंद फळे, अन्नपदार्थ इत्यादींचे कारखाने आहेत. अपील न्यायालयाची एक शाखा येथे असून १९६७ पासून विद्यापीठ सुरू झाले आहे.

शाह, र. रू.