ओराओं : बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा व मध्य प्रदेश या राज्यांत विखुरलेली एक जमात. १९६१च्या जनगणनेनुसार त्यांची या राज्यांतील लोकसंख्या अनुक्रमे ७ लक्ष ३५ हजार, २ लक्ष ९७ हजार, १ लक्ष २९ हजार  व २ लक्ष ८३ हजार अशी होती. ते स्वतःस कुरूख म्हणवितात. आर्यांनी त्यांना ओराओं नाव दिले असावे, असे एक मत आहे. ओराओं द्रविड-वंशी आहेत. काळा-तपकिरी रंग, राठ व कुरळे काळे केस पुढे आलेले दात व जबडा जाड ओठ, अरुंद कपाळ व रुंद नाकपुड्यांचे चपटे नाक ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये हर्बर्ट रिझ्लीने संगितलेली आहेत. ते कुरूख नावाची द्राविड बोली बोलतात. काही ओराओं शेजारच्या मुंडा लोकांची मुंडारी भाषाही शिकले आहेत.

मुंडा लोकांप्रमाणेच ओराओं शेती करतात. छोटा नागपूरच्या पठारावर नांगर-शेतीची सुरुवात ओराओंनीच केली असावी, असे काही शास्त्रज्ञ म्हणतात. ते इतर पिकांशिवाय कापसाचीही लागवड करतात.

ओराओंची समाजरचना कुळींवर आधारित आहे. या कुळींना गणचिन्हे असतात. कुजूर कुळींचा सभासद खजूर खात नाही किंवा त्या झाडाच्या सावलीत विसावत नाही. एका कुळीच्या सभासदांचे भाऊ-बहिणीचे नते असल्याने ते कुळीच्या बाहेर विवाह करतात.

शरच्चंद्र रॉय यांनी आपल्या ग्रंथात छोटा नागपूरच्या बहिर्विवाही कूळींची लांबलचक जंत्री दिलेली आहे. ओरिसातल्या ओराओंच्या कुळी पुढीलप्रमाणे आहेत: (१) तिरकी (उंदीर),  (२) लकडा (वाघ), (३) केरकेटा (चिमणी), (४) गिधी, गिघियार (गिधाड), (५) ढोप्पो (एक तर्‍हेचा मासा), (६) खाल्खो (एक तऱ्हेचा मासा) (७) मिनी (एक तऱ्‍हेचा मास), (८) कच्छू (कासव), (९) बकला (एक प्रकारचे गवत), (१०) बरला (वड), (११) खेस (भात), (१२) पन्न (लोखंड), (१३) किसपता (डुकराचे कातडे), (१४) बांदरा (वानर ) वगैरे.

ओराओंमध्ये महातो हा गावचा पाटील असतो. सर्व आर्थिक व्यवहार तो पहातो. पाहान उर्फ नेगा हा धर्मप्रमुख असतो. त्याच्या हाताखाली पुन्नर उर्फ पानथरा असतो. हे दोघे व इतर ज्येष्ठ पुरुष मिळून ग्रामपंचायत होते. ओराओंत ‘भगत’ नावाचा एक लहान वर्ग आहे. त्यांना दारू व अभक्ष्यभक्षण वर्ज्य असते. इतर ओराओंच्या  हातून ते अन्न घेत नाहीत. ते लक्ष्मी व शिव यांची नेमाने पूजा करतात.

ओराओंत युवागृहे आहेत. बिहारमध्ये यांना ‘ढुमकुरिया’ म्हणतात. ओरिसात मुलांच्या शयनगृहाला ‘जोनखेडपा’ व मुलींच्या शयनगृहाला  ‘फे-अडपा’ म्हणतात. ही युवागृहे केवळ झोपण्याच्या जागा नसतात. तिथे मुलांना त्यांच्या जमातीचे रीतिरिवाज, कथाकहाण्या, देवधर्म, नाच-गाणी व विविध व्यवसाय शिकवतात. परंतु आता ही पूर्वापार संस्था ओरिसात नामशेष झाली असून सरकारी विकासगटातर्फे चाललेल्या युवक संघटनेच्या शाखा मात्र अधूनमधून दिसतात.

मुलाचे नाव सहाव्या दिवशी ठेवतात. आता आधुनिक नावे ठेवण्याची पद्धत रूढ होत आहे. ओराओंची लग्‍ने चैत्र-वैशाखात होतात. यावेळी घरात धान्याचा साठा भरपूर असतो व लग्‍नाचा खर्च त्यामुळे पेलता येतो. लग्‍न बहुतेक दोन्हीकडची वडील मंडळीच ठरवतात. मुलीचे देज द्यावे लागते. ते साधारण चारपासून बारा रुपयांपर्यंत असते. लग्‍न मुलीच्या गावात लागते. लग्‍नात नवरानवरीला तेल व हळद लावतात. एका पाट्यावर सुकलेले गवत व नांगराचे जू ठेवतात व त्याच्यावर वधूवरांना उभे करतात. वधूच्या मागे वर उभा राहतो व आपल्या उजव्या पायाच्या बोटांनी तिची डावी टाच दाबतो  मग त्या जोडप्यावर एक कापड टाकून त्यांना झाकून टाकतात आणि उपाध्याय मंत्र म्हणतो. कुमारिका त्यांच्यावर पाणी  ओतून त्यांना स्‍नान घालतात. मग त्या दोघांना कोरी वस्त्रे नेसण्यास देतात. लग्‍नाचा मुख्य विधी म्हण्जे वधूवर एकमेकांना कुंकुमतिलक लावतात. त्यानंतर नृत्ये होतात आणि पाहुण्यांना भोजन व दारू देण्यात येते. त्यावेळी नाच-गाणे व खाणे-पिणे यांची एकच झुंबड उडते. ओराओंचा मुख्य देव सूर्य हा आहे. महादेवाचीही पूजा ते करतात. चंडा ही त्यांची वनातली पारध-देवता असून हिंदूंचे सर्व सण ते पाळतात. त्यांच्या पूजा नेगा करतो.

त्यांचा मुख्य सण सरहूल उर्फ फाग हा होय. चैत्र-वैशाखात ते शिकार करतात. उन्हाळ्यात पारध केलीच पाहिजे असा नियम आहे. ज्येष्ठ-जत्रा हा उत्सव ज्येष्ठात, जितुआ हा सण भाद्रपदात व कर्मा हा सण आश्विनात ते साजरा करतात. या सर्व उत्सवांत नाच-गाणे आवश्यक असते. ओराओंत बरेच लोक ख्रिती झाले आहेत. रोमन कॅथलिक, जेझुइट मिशन व जर्मन इव्हँजेलिकल मिशन या संस्थांमार्फत शिक्षण, वैद्यकीय मदत व आर्थिक साहाय्य यांच्या जोरावर हजारो ओराओंना खिस्ती करून घेण्यात आले.

पूर्वी ओराओं घरीच कापड विणीत. पुरुष पंचा गुंडाळतात व स्त्रिया साडी नेसतात. आता तरुण मुले विजार, सदरा तर मुली परकर, साडी, पोलके वगैरे घालू लागल्या आहेत. 

ओराओंना गोंदण्याचा षोक फार होता. पुरुषही कपाळावर व हातांवर गोंदून घेत पण आता शिक्षित ओराओंना गोंदलेले आवडत नाही. अद्यापही शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. अनेक ओराओंना सुतारकाम, विटा व कौले करण्याचे काम, दोऱ्या वळण्याचे काम वगैरेंत कौशल्य प्राप्त झालेले आहे. स्त्रिया अद्यापही चटया विणतात. शिक्षित ओराओं कचेऱ्या, शाळा व कारखान्यांत नोकऱ्या करतात. शेतीचे मुख्य पीक भाताचे असते. जोंधळा, मका व कडधान्ये ही पिकेही ते काढतात. त्याशिवाय शिकार, मासेमारी व जंगली पदार्थ गोळा करणे हे उद्योगही ते करतात.

त्यांचा मुख्य आहार भाताचा आहे. शिजविताना भातात मीठ घालतात व नंतर तो वेळून टाकून पुन्हा शिजवून तो ते खातात. डुकराचे मांस, साप वगैरेही ओराओं खातात. परंतु आता हिंदूंच्या संपर्कामुळे हा आहार बंद होत चालला आहे. 

तांदळाची दारू व तंबाखू हे त्यांचे दोन चैनीचे पदार्थ आहेत. तांदळाची दारू ते घरीच तयार करतात. मोहाची दारूदेखील त्यांना आवडते व ती घरीच तयार करतात. अलीकडे चहाचाही प्रसार झाला आहे. 

ओराओंची खेडी फारशी नीटस नसतात. घरेही वाटेल तशी बांधतात. बरीचशी घरे मातीच्या भिंतींची बांधलेली असतात. त्यांच्या घरांना खिडक्या नसतात व दार एकच असते. घराला ओवरी मात्र असते. गुरे व डुकरे यांच्यासाठी वेगळ्या जागा घराबाहेर तयार केलेल्या असतात. 

गावात नृत्यासाठी आखरा मात्र असतो. आखरा म्हणजे मोठे अंगण. ओराओंच्या घरात चारपाई म्हणजे सुंभाच्या खाटा बहुतेक ठिकाणी असतात. खजूरीच्या पात्यांच्या चटयाही असतात. घरातली भांडी ऐपतीप्रमाणे मातीची, पितळेची, ॲल्युमिनियमची असतात. तुंबेही त्यांच्या घरात पूर्वी सर्रास असत. अद्यापही ते पूर्णपणे गेलेले नाहीत. भाताची पेज व दारू नेण्यासाठी ते उपयोगी पडतात. 

मृताचे दहन करतात  मुलांना मात्र पुरतात. अस्थिविसर्जन मात्र वर्षातून एकदाच ठराविक वेळी करण्याची त्यांच्यात चाल आहे. 

संदर्भ : Roy, S. C. The Oraons of Chhotanagpur, Ranchi, 1915.

भागवत, दुर्गा.