ओणम् : केरळमधील एक महत्त्वाचा सण. शारदीय उत्सव म्हणून तो साजरा केला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे हस्त नक्षत्रापासून हा उत्सव सुरू होतो आणि श्रवण नक्षत्र लागेपर्यंत म्हणजे दहा दिवस तो चालतो. श्रवण नक्षत्रास केरळमध्ये ‘ओणम्’ म्हणतात. ह्या उत्सवाचा हा महत्त्वाचा दिवस होय. सध्याचे तमिळनाडू, कर्नाटक व केरळ ह्या प्रदेशांतही हा उत्सव पूर्वी साजरा होत असे. आळवारांच्या भक्तिगीतांतूनही त्याचे उल्लेख आढळतात. प्राचीन काळापासून आजतागायत केरळमध्ये ओणम्ला विशेष महत्त्व असून, आपल्याकडील दिवाळीप्रमाणे तो तेथे साजरा करतात. आपापली घरे सुशोभित करून मृण्मय वामनमूर्तीचे, सुंदर पुष्पसजावटीसह या दिवशी पूजन करण्याची प्रथा आहे. विष्णूचे सर्व अवतार ओणम्च्याच दिवशी झाले, अशी तेथे समजूत आहे. ⇨बळीराजाचे दक्षिण भारतात, विशेषतः केरळात अत्यंत महत्त्व आहे. वर्षातून एकदा आश्विन महिन्यात तो आपल्या प्रजेला भेटावयास पृथ्वीवर येतो, त्याप्रीत्यर्थ हा आनंदोत्सव आहे, अशी तेथे समजूत आहे. मलयाळम् भाषेत ओणम्वर काही सुंदर काव्येही लिहिलेली आहेत. परगावी असलेली माणसे व माहेरी गेलेल्या सुना ओणम्साठी आपापल्या घरी येतात. केरळमधील सामाजिक व कौटुंबिक जीवनात ओणम्ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक बैठे व मर्दानी खेळ, नृत्य, लुटुपुटूची लढाई तसेच वाद्यवादन, मल्लयुद्ध, तिरंदाजी, नौकानयन इत्यादींच्या स्पर्धा त्यानिमित्ताने होतात. नौकानयनस्पर्धांना तेथे ‘वंचिकळी’ असे नाव असून त्या प्रेक्षणीय असतात.
जोशी, रंगनाथशास्त्री
“