ओड : पश्चिमी भावकवितेचा एक प्रकार. ‘गाणे’ अशा अर्थाच्या aeidein ह्या मूळ ग्रीक शब्दावरून ‘ओड’ हा शब्द आला. ओड हे कोणत्यातरी विषयाला उद्देशून रचिले जाते. मराठीत ओडला ‘उद्देशिका’ असा शब्द रूढ आहे. ओडचे आजचे स्वरूप द्विविध आहे : व्यक्तिगत भावनाविष्कार आणि तत्त्वचिंतन हे एक (उदा., विल्यम कॉलिंझचे ‘ओड टू ईव्हनिंग’) आणि विशिष्ट प्रसंगाला अनुलक्षून केलेली रचना हे दुसरे (उदा., टेनिसनचे ‘ओड ऑन द डेथ ऑफ द ड्यूक ऑफ वेलिंग्टन’). भावविचारांची उदात्तता आणि दीर्घ रचना ही ओडची सर्वसाधारण वैशिष्ट्ये होत. भारदस्त भावनेस पेलू शकणारी आणि तिला अपेक्षित उंचीप्रत नेणारी शब्दकळा आणि कल्पनावैभव ओडच्या संदर्भात आवश्यक ठरते. सर एडमंड गॉसने ‘निश्चित उद्दिष्ट व उदात्त विषय असलेले भावकाव्य म्हणजे ओड’, अशी ओडची व्याख्या केली आहे.

प्राचीन ग्रीक नाट्यकाव्यात ओडचा उपयोग समूहगीतासारखा केला जाई आणि त्याला नृत्यसंगीताची साथ असे. आधुनिक काव्यात तीन प्रकारची ओड्स आहेत : (१) पिंडरिक किंवा नियमित, (२) होरेशन किंवा होमोस्ट्रॉफिक, (३) अनियमित ओड.

पिंडरिक ओड हे मूळचे ग्रीकमधील, प्राचीन ग्रीक भावकवी पिंडर ह्याच्या ओडरचनेवरून हे नाव आले. ह्या ओडमध्ये स्ट्रॉफी, अँटिस्ट्रॉफी आणि एपोड अशा तीन भागांची आवर्तने असतात. स्ट्रॉफी, अँटिस्ट्रॉफी हे दोन विभाग रचनादृष्ट्या सारखे असतात. एपोडची रचना मात्र त्यांहून भिन्न प्रकारची असते. विल्यम कॉलिंझचे ‘ओड टू लिबर्टी’ आणि टॉमस ग्रेचे ‘द बार्ड’ ही पिंडरिक ओडची इंग्रजीतील उदाहरणे.

होरेशन पद्धतीचे ओड हॉरिस ह्या रोमन कवीने प्रचलित केले. त्यातील सर्व कडवी रचनादृष्ट्या एकाच प्रकारची असतात आणि भावना प्रायः व्यक्तिगतच असते. कोलरिजचे ‘ओड टू फ्रान्स’ आणि विल्यम कॉलिंझचे ‘ओड टू ईव्हनिंग’ ही होरेशन पद्धतीची ओड्स आहेत.

अनियमित ओडमध्ये कवीची भाववृत्ती आणि त्याच्या भावनांची तीव्रता यांनाच अधिक महत्त्व असते. यमक, वृत्त, काव्यपंक्तींची संख्या, उच्चारघटकांची (सिलॅबल्सची) संख्या इ. बंधने त्यात काटेकोरपणे पाळली जात नाहीत. ‘ओड ऑन द इंटिमेशन्स ऑफ इम्मॉर्‌टॅलिटी’ हे वर्ड्‍‍‌स्वर्थचे ओड ह्या प्रकारात मोडते.

आधुनिक काव्यात या गंभीर व भावपूर्ण काव्यप्रकाराचा उपयोग उपरोधासाठीही केला जातो. उदा., ॲलन टेट ह्या कवीचे ‘ओड ऑन द कॉन्फिडरेट डेड’ हे ओड.

प्रबोधनकाळात ओड ह्या पांरपरिक काव्यप्रकाराचे पुनरूज्‍जीवन झाले. ह्या काळात पिंडरिक ओड विशेष लोकप्रिय होते. इंग्रजी साहित्यातील ऑगस्टन कालखंडात (अठरावे शतक, पूर्वार्ध) होरेशन ओडचे अधिक अनुकरण झाले. त्यानंतर एकोणिसाव्या शतकातील वर्ड्‍‍‌स्वर्थ, कोलरिज, शेली, कीट्स इ. स्वच्छंदतावादी कवींनी पिंडरिक वा होरेशन पद्धतीच्या ओडरचनेच्या नियामांनी स्वतःला बांधून न घेता अनियमित ओड्स लिहिली व नियमबद्धतेच्या चाकोरीत जखडलेल्या ओड ह्या काव्यप्रकारास नवजीवन प्राप्त करून दिले.

कुलकर्णी, अ. र.