लघुनिबंध : निबंधवाङ्मयाचा एक प्रकार. माणसाला सुचणारा कोणताही विचार त्याला येणाऱ्या विविध अनुभवांवरून सुचतो. सुचलेल्या विचारांना मिळतीजुळती अशी अनेक उदाहरणे तो आपल्या तसेच इतरांच्या जीवनातून वा ग्रंथांतून शोधतो. आपले नंतर येणारे अनुभव त्या विचारांशी ताडून पाहतो. या आधारेच तो जीवनातील काही आडाखे, नियम बांधून जीवन सुकर, सुंदर, समृद्ध करतो. अशा रीतीने मनात आलेले विचार हे अनुभव, उदाहरणे, दृष्टांत, पुरावे देऊन मांडण्याची प्रवृत्ती तशी वाङ्मयात जुनी आहे. ती एकूण वैचारिक व ललित वाङ्मयात स्पष्ट-संदिग्ध, स्थूल-सूक्ष्म, प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रतीकस्वरूपात तसेच अनुभव, माहिती, वर्णन, शोध यांच्या स्वरूपात सर्वत्र दिसते. ललित वाङ्मयाच्या सर्व प्रकारांत ती तशी आहे, हे दाखविता येणे शक्य आहे. महानुभावांचे दृष्टांतपाठ, ज्ञानेश्वरीतील दृष्टांत ही त्या प्रवृत्तीचीच उदाहरणे मानता येतील.

निबंध ही एक त्या प्रवृत्तीची तर्कसंगतीच्या दिशेने व विचारांना महत्त्व देण्याच्या हेतूने विकसित झालेली अवस्था आहे. तर लघुनिबंध ही विचारांपेक्षा ते विचार ज्या अनुभवांच्या द्वारा सुचले, त्या अनुभवांनाच महत्त्व देऊन त्या दिशेने विकसित झालेली अवस्था आहे.

मराठीतील अगदी आरंभीचा लघुनिबंध हा साहित्यप्रकार स्वतंत्रपणे प्रस्फुरण पावत असताना दिसला, तरी इंग्रजीतील ‘पर्सनल एसे’च्या आधाराने तो विकसित झाला आहे. या पर्सनल एसेलाही इंग्रजीत इतिहास आहे. ‘एसे’ मधूनच पर्सनल एसे निर्माण झाला आहे. त्या संदर्भापुरता त्याचा इतिहास पाहणे जरूर आहे. ⇨माँतेन (१५३३-९२) या फ्रेंच लेखकाने १५८० मध्ये आपली दोन पुस्तके प्रसिद्ध करून ‘एसॅ’ (Essai) हा प्रकार फ्रेंच भाषेत रूढ केला. माँतेनचा हा एसॅ दिसायला लहान स्वरूपाचा व त्याचे लेखन थोडे मुक्तपणाचे आहे. किंबहुना त्यासाठीच हा लेखनप्रकार त्याने हताळला असावा. माँतेनला जे गंभीरपणे सांगावयाचे होते, ते त्याने अगोदरच इतरत्र सांगितले होते. या गंभीर सांगण्याच्या आसपास बाजूला पडून राहिलेले अनेक विचारयुक्त अनुभव त्याला सहजपणे एक जिवंत व्यक्ती म्हणून आले होते आणि जे व्यक्त व्हायला उत्सुक होते ते जणू सांगण्यासाठीच त्याला हा प्रकार हाताळावा, असे वाटलेले दिसते. स्वतःला स्वतःनेच रेखाटण्याचा या प्रकारात प्रयत्न आहे, असे त्यानेच सांगितले आहे. माँतेनच्या या एसॅमध्ये प्रसंगपरत्वे कमीअधिक प्रमाणात अनुभव आणि विचार यांना मुक्तपणे स्थान मिळाले आहे. हा प्रकार आज निबंधात किंवा लघुनिबंधात खऱ्या अर्थाने समाविष्ट होऊ शकणारा नाही. झुकला तर तो प्राथमिक स्वरूपाच्या लघुनिबंधाकडेच झुकतो, याचे कारण असे की, ते लेखन आजच्या आपल्या शुद्ध व विकसित स्वरूपाच्या सौंदर्यात्म जाणिवेने किंवा ललित वाङ्मयीन जाणिवेने झालेले नाही. त्या काळात ते होणेही शक्य नव्हते. ते अनुभव ओबडधोबड स्वरूपात व्यक्त झालेले आहेत. त्यांना नीट असा घाटही प्राप्त झाला नाही. अनेक वेळा ते विस्कळित वाटतात.

माँतेनला समकालीन असलेल्या इंग्रजीतील ⇨फ्रान्सिस बेकनने (१५६१-१६२६ ) हा प्रकार पुढे सोळा-सतरा वर्षांनंतर इंग्रजीत आणला. पण हा  प्रकार इंग्रजीत आणताना त्याचे मूळ स्वरूपच बेकनने बदलून घेतले. विचार आणि अनुभव यांना सारखेच स्थान असलेला माँतेनचा एसॅ त्याने विचारनिष्ठ, गोळीबंद स्वरूपात इंग्रजीत ‘एसे’ या नावाने आणला. त्यामुळे तो गंभीर, विचारांच्या व मतांच्या दृष्टीने अधिक वस्तुनिष्ठ, थंड, काहीसा अलिप्त प्रकृतीचा झाला. वैयक्तिक अनुभव सांगण्यापेक्षा अनुभवातील वैचारिक परिपाक त्याने आपल्या निबंधातून मांडला. विचारांची ती संक्षिप्त टिपणे झाली. लोकांना व्यवहारात उपयोगी पडण्याच्या निमित्ताने त्याने ती लिहिली. त्यामुळे फ्रेंचमधून इंग्रजीत येतानाच हा निबंध काही वेगळे रूप धारण करून जन्मला. इंग्रजीत ही धारा सुरू झाली. पुढे १६६८ मध्ये ⇨अब्राहम काउली याने काही निबंध प्रसिद्ध केले. माँतेनचा एसॅ त्याने त्यातील व्यक्तित्वासह, व्यक्तिनिष्ठ प्रवृत्तींसह इंग्रजीत आणला. त्यामुळे तो बेकन पद्धतीच्या निबंधापेक्षा वेगळा होता. निबंधाची ही दुसरी धारा इंग्रजीत सुरू झाली. यांतून पुढे अनेक प्रकारची मिश्रणे येऊन, विषयांचे वर्गीकरण करून, भाषेच्या तऱ्हा निर्माण करून, विषयांच्या हाताळणीच्या तऱ्हा बदलून इंग्रजी निबंधाचा अनेक अंगांनी विकास झाला, असे असले तरी, बेकन पद्धतीची धारा विचारनिष्ठेच्या दिशेने प्रवासत गेली आणि काउली पद्धतीची धारा पर्सनल एसेच्या म्हणजे अनुभवांना प्राधान्य देण्याच्या दिशेने प्रवासत गेली. या दुसऱ्या प्रवासात अनेक टप्पे आहेत. अठराव्या शतकातील ⇨रिचर्ड स्टील (१६७२-१७२९) आणि जोसेफ ॲडिसन (१६७२-१७१९) यांचा ‘नियतकालिक निबंध’ (पिरिऑडिकल एसे) हा पहिला महत्त्वाचा टप्पा. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभाकाळातील (१८२०) ⇨चार्ल्‌ लँबचा (१७७५-१८३४) ललित वा लघुनिबंध (पर्सनल एसे) हा दुसरा महत्त्वाचा टप्पा. तेथूच पुढेच लघुनिबंध स्वतंत्रपणे साहित्याच्या क्षेत्रात विकास पावला. नंतर इंग्रजी साहित्यात या प्रकारचे स्टीव्हन्सन, चेस्टर्टन, ल्यूकस, बेलॉक, बीअरबोम, जे. बी. प्रीस्टली, गार्डनर इ. अनेक लघुनिबंधकार निर्माण झाले.


लँबचा लघुनिबंध इतक्या स्वतंत्रपणे विकसित झाला आहे, की त्याचे आणि प्रचलित निबंधाचे संबंध प्रस्थापित करणे व्यर्थ आहे. त्या दोहोंचे हेतूच बदलून गेले आहेत. एक वैचारिक वाङ्मयाचा भाग होऊन बसला, तर दुसरा ललित वाङ्मयात येऊन दाखल झाला. असे असूनही त्याला फक्त ‘एसे’ या वैचारिक वाङ्मयप्रकाराच्या नावाच्या अगोदर ‘पर्सनल’ हे एक विशेषण घालूनच ओळखले जाते. वास्तविक वेगळ्या नामाभिधानाची त्याला गरज होती. ते दिले गेले नाही. त्यामुळे गफलत व्हायला सकृत्‌दर्शनी तरी मदत झाली आहे.

इंग्रजीत आलेल्या या निबंधाच्या विविध रूपांमुळे व टप्प्याटप्प्यांवर त्याच्या बदललेल्या रूपांमुळे, तशातच माँतेनचा मूळचा एसॅ वेगळा असल्यामुळे व टीकाकार या सर्वच रूपांना निबंध मानत असल्यामुळे, तसेच त्या सर्वाचा एकत्र विचार करण्याची परंपरा व प्रथा असल्यामुळे निबंध म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधताना, त्याचे स्वरूप नक्की करताना, त्याची वैशिष्ट्ये, व्याख्या सांगताना टीकाकारांची तारांबळ उडून गेलेली दिसते.

त्यामुळे अनेक इंग्रजी टीकाकारांनी निबंधाची वरवरची लक्षणे सांगितली आहेत. काहींनी सर्व प्रकारच्या निबंधरूपांचा समावेश करील अशी, तर काहींनी बेकन पद्धतीच्या निबंधाला सामोरे ठेवून, काहींनी काउलीला सामोरे ठेवून, तर काहींनी चार्ल्‌स लँबला मनात धरून त्या बाजूंनी झुकतील अशी लक्षणे सांगितली आहेत. यांशिवाय टप्पाटप्प्यांवरची विविध निबंधरूपे जन्माला येण्याच्या अगोदर व आल्यावर निबंधाच्या ज्या ज्या व्याख्या निर्माण झाल्या, त्यांनी जो गोंधळ निर्माण केला आहे तो वेगळाच. इंग्रजीतील अशा विविध व्याख्या विविध निबंधरूपांना समोर ठेवून केलेल्या असल्यामुळे आणि सकृत्‌दर्शनी आपण निबंधाचीच व्याख्या करीत आहोत, असे भासविल्यामुळे कोणतीही व्याख्या निबंध म्हणून पूर्णांशाने व अलिप्तपणे स्वीकारणे कठीण जाते किंवा कोणतीही व्याख्या स्वीकारून खास आपले असे निबंधविषयक मत सिद्ध करता येते. यामुळेच की काय, इंग्रजीत अनेक टीकाकारानी निबंध प्रकारचे स्वरूप निश्चित नाही, त्यात नियमितपणा नाही, असे सांगितले आहे.

ललित वा लघुनिबंधाच्या व्याख्याही अनेकांनी स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. पण शास्त्रीय अर्थाने त्यांना व्याख्या म्हणता येणे कठीण आहे. त्याच्या स्वरूपाचे मार्मिक वर्णन करणारी, एखाद्या विशेषावर विशेष भर देणारी ती विधाने असतात. त्यांना तर्कशास्त्रातील व्याख्येचे काटेकोर स्वरूप बव्हंशी प्राप्त झालेले दिसून येत नाही.

या दोन्ही प्रकारांतील अगदी वरवरचे साम्य दाखविता येण्यासारखे आहे. पण तसे प्रत्येक साहित्यप्रकाराचे दुसऱ्याशी साम्य दाखविता येणे शक्य आहे. दोन्ही प्रकारांत अनुभव, उदाहरणे येतातच. पण त्यांचे स्वरूप भिन्नभिन्न असते. निबंधात विचारांना महत्त्व असल्याने ते विचार म्हणून वस्तुनिष्ठ कसे होतील, तर्कसंगत कसे राहतील, ते व्यक्त करताना त्यांत तटस्थता, अलिप्तता कशी येईल, याची विशेष दक्षता घेतली जाते. विचारांनाच महत्त्व असल्याने त्यांतील अनुभव व उदाहरणे निबंधात साधनीभूत रहातात. त्यांना गौण स्थान प्राप्त झालेले असते. विचारांना पुरावा म्हणून उपयोगी पडतील एवढ्याच मर्यादित हेतूने ती योजलेली असतात. त्यामुळे ती उदाहरणे व अनुभव केवळ पुराव्याला आवश्यक तेवढ्याच वैचारिक अंशाला प्रमुख धरून, बाकीच्या घटकांना-विशेषतः अनुभवाच्या चैतन्यांगाना-अंशतः किंवा पूर्णपणे काटूनछाटून, स्थूलपणे, संक्षिप्तपणे, गोळाबेरीज स्वरूपात मांडले जातात. त्यामुळे निबंधात निबंधकार- ‘मी’चे फक्त वैचारिक व्यक्तिमत्त्वच महत्त्व पावले जाते.


उलट लघुनिबंध हा वाढत, विकास पावत गेल्याने त्यातील विचारांना गौण स्थान प्राप्त झाले. किंबहुना ते विचार अनुभवातील चिंतनाच्या पातळीवरच राहिले. तसे ते राहिल्याने अनुभवाचा एक भाग म्हणूनच त्यांचे अस्तित्व राहते. फलिताच्या स्वरूपात ते येत नाहीत. विचार हे अनुभवांचे फलित असते, तर  चिंतन ही अनुभवातीलच प्रक्रिया असते. ते विचार ज्या अनुभवांच्या द्वारा सुचत गेले, त्यांना सौंदर्यानुभव म्हणून महत्त्व आले आणि साहित्यात अनुभवांना जे अनन्यसाधारणत्व असते, ते जोपासण्यासाठी त्या अनुभवांकडे ज्या दृष्टीने पहावे लागते व त्या दृष्टीमुळे त्या अनुभवांना जी वैशिष्ट्ये प्राप्त होतात, ती लघुनिबंधातील अनुभवांना प्राप्त झाली. एकूण अनुभवाची भावावस्था, त्यातील काव्य, नाट्य, कल्पना, संवेदना, प्रतिमा, त्या अनुभवाच्या विविध कळा, त्यातील चिंतन इ. एकूण अनुभवाच्या चैतन्यांगांना महत्त्व आले. त्यामुळे हा साहित्यप्रकार एका व्यक्तित्वाचा (इंडिव्हिड्युॲलिटी)- ‘मी’ चा आविष्कार म्हणून लक्षणीय झाला. यातूनच लघुनिबंधाची वैशिष्ट्ये निर्माण झालेली आहेत.

आज साहित्यप्रकारांची नव्याने व्यवस्था व मांडणी केली जात आहे. या नव्या व्यवस्थेत ‘मी’त्वाच्या आविष्कारावर आधारित ललित गद्य हा एक प्रकार कल्पून त्याचे लघुनिबंध, प्रवासलेख, आठवणी, व्यक्तिचित्रे, ललितलेख असे सर्वसाधारण पाच उपप्रकार कल्पिता येतात. तसे ते कल्पिणे आवश्यक आहे. ललित गद्य हे एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील या स्वतंत्र घटकांचे चेहरे-मोहरे सारखे असले, त्यांत काही साम्ये असली, ललितनिबंध किंवा ललितलेख ही नावे आपण अधूनमधून त्यांतील कोणत्याही प्रकारासाठी वापरीत असलो, तरी एक म्हणजे दुसरा नव्हे, हे लक्षात ठेवले पाहिजे. कुटुंबातील दोन सारखे दिसणारे भाऊ मूलतः वेगळे असतात, याचे भान ठेवले पाहिजे. ललितगद्यात ‘मी’ चे अनुभव केंद्रवर्ती असतात. एखाद्या विषयसूत्राच्या निमित्ताने ते व्यक्त होत असतात. काहीशा आस्वादशील वृत्तीने ते व्यक्त होत असल्याने स्वैर-मुक्त आणि काव्यात्मही वाटतात. प्रवासलेखात ते स्थळ व कालगती यांच्याशी निगडित असतात, आठवणीत ते आत्मचरित्रातील वास्तवाशी बांधील असतात, व्यक्तिचित्रात ते एखाद्या व्यक्तीला प्रधान मानून व्यक्त होतात, तर ललितलेखात एखाद्या व्यक्तिव्यतिरिक्त विषयाला प्राधान्य देऊन, त्याकडे झुकून व्यक्त होतात तर लघुनिबंधात विषय निमित्तमात्र मानून ते अधिक मुक्तपणे आविष्कृत होतात.

लघुनिबंधात असे ‘मी’चे अनुभव अधिक मुक्तपणे व्यक्त होत असल्याने लघुनिबंधाचा विषय अंतिमतः ‘मी’ ही व्यक्तीच होते. ‘मी’ला आलेले प्रत्यक्षातील अनुभव इथे सौंदर्यानुभवांचे रूप घेत असल्याने लघुनिबंधात खऱ्या अर्थाने वास्तव आत्मचरित्र (की जे फक्त घडलेल्या वास्तवाशी प्रामाणिक असावे, अशी अपेक्षा असते) अवतरू शकत नाही. तसे अवतरल्याचा आभास मात्र होत असतो. तसा आभास निर्माण होण्याचे कारण ‘मी’च्या वास्तव अनुभवातूनच लघुनिबंधातील सौंदर्यानुभव आकाराला आलेला असतो. शिवाय तो लेखक-‘मी’च्या नावेच व्यक्तही झालेला असतो.

ललितगद्य हा ‘मी’त्वावर निष्ठा ठेवून अवतरणारा साहित्यप्रकार आहे. हा ‘मी’ सौंदर्यात्म पातळीवर सरळ सरळ अवतरू पाहणार लेखक-‘मी’ असतो. तसा तो असावा, अशी अपेक्षा असते. म्हणून लघुनिबंधकार तरुण असेल तर तो म्हाताऱ्या ‘मी’ची भूमिका किंवा पुरुष असेल तर स्त्री ‘मी’ ची भूमिका कथा-कादंबरीतल्याप्रमाणे वठवू शकत नाही. तशी त्याने वठवू नये अशी अपेक्षा असते. त्या प्रकाराचे हे गुहीतकृत्य आहे. म्हणून लघुनिबंध आत्मचरित्राशी घनिष्ठपणे संवादी असला, तरी आत्मचरित्र मात्र नव्हे, हे लक्षात ठेवले पाहिजे. या संदर्भात लघुनिबंध या प्रकाराला एका बाजूने सापेक्ष अस्तित्व आहे. म्हणजे असे की, प्रथम त्याला लेखकाची मान्यता मिळावी लागते. उदा., लेखकाने एखादे लेखन लघुनिबंध म्हणून प्रसिद्ध केले, तर त्यातील ‘मी’ हा आत्मचरित्राशी अंशतः तरी संबंधित मानावा लागतो. त्याने तेच लेखन कथा म्हणून प्रसिद्ध केले (तसे ते करता येणे शक्य आहे असे गृहीत धरून) तर त्यातील ‘मी’ ठामपणे आत्मचरित्राशी संबंधित असेलच, असे मानता येत नाही. कारण कथा या साहित्यप्रकारातील ‘मी’कडून (आपण लघुनिबंधातील ‘मी’कडून जी अपेक्षा करतो) ती अपेक्षा करता येत नाही.


लघुनिबंधात व्यक्त झालेले प्रसंग हे कालक्रमनिरपेक्षतेने व्यक्त झालेले असतात. त्यात त्यांचा कालक्रम महत्त्वाचा नसतो. कालक्रम असेल तर तो आनुषंगिक असतो. एखाद्या विषयाच्या निमित्ताने ‘मी’ला आलेले विविध अनुभव म्हणूनच केवळ त्या प्रसंगांना महत्त्व असते. त्यात एक श्रेणी कल्पून लेखक ते एकानंतर दुसरा असे मांडत असला, तरी तात्त्विक दृष्ट्या ते गुच्छरूप, एखाद्या आकृतिबंधातील मध्यवर्ती केंद्राच्या भोवतीने असलेल्या लहान लहान वर्तुळाप्रमाणे, किंवा फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे विषय-केंद्राभोवती जमलेले असतात. त्यामुळे लघुनिबंधाची गती केंद्राभोवती फिरणारी असते. कित्येक वेळा ‘मी’चा एखादाच अनुभव आविष्कृत होतानाही लघुनिबंधात दिसतो.

एखाद्या विषयाच्या कक्षेत लेखक ‘मी’ ला आलेल्या अनुभवांचा कालक्रमनिरपेक्षतेने ‘मी’त्वाला तेवढ्यापुरते केंद्रस्थानी कल्पून झालेला सौंदर्यात्म पातळीवरचा ललित गद्यातील आविष्कार म्हणजे लघुनिबंध होय, असे म्हणता येईल.

लघुनिबंधाला ज्या प्रकारचे व्यक्तित्व (‘मी’ त्व ) लाभेल, त्यावर अनुभवांच्या सौंदर्यात्म पातळीवरच्या आविष्काराचे स्वरूप अवलंबून असते. त्या अनुषंगानेच त्या अनुभवातील वास्तवता, काव्यात्मता, नाट्य, संवेदनशीलता, आस्वादशीलता, चिंतनशीलता, प्रतीकात्मता, कल्पनारम्यता, विहारवृत्ती, भाववृत्ती कमीअधिक प्रमाणात व्यक्त होत राहतील. कुणी यातील एखाद-दुसऱ्या विशेषांवर भर देतील. त्यानुसार त्या त्या लेखकांच्या लघुनिबंधांचे स्वरूप बदलत राहील एकमेकांपासून वेगळे होत राहील. पण वर निर्दिष्ट केलेल्या अनुभवांच्या गुणांपैकी काही वा गुण एकत्र आल्याने लघुनिबंधाचे व्यवच्छेदक लक्षण मात्र सिद्ध होऊ शकणार नाही. हे गुण लेखकाच्या आविष्कृत होणाऱ्या सौंदर्यानुभवाचे आहेत लघुनिबंध या साहित्यप्रकाराचे नव्हेत. ते लेखकाच्या व्यक्तित्वाद्वारा लघुनिबंधात येऊन दाखल होतात. लघुनिबंध व कथा हे दोन्ही प्रकार हाताळणाऱ्या एखाद्या लेखकाच्या दोन्ही प्रकारांतही ते कमीअधिक प्रमाणात दिसतील.

अर्थात ते ते साहित्यप्रकार त्या त्या लेखकाच्या आविष्कृत होणाऱ्या सौंदर्यानुभवावर आपले प्राकारिक नियंत्रण ठेवतच असतात. एखाद्या साहित्यप्रकारात एखाद्या गुणाला विशेष वाव मिळणे शक्य असते व एखाद्या गुणावर विशेष नियंत्रण येणेही शक्य असते. उदा., एकाच लेखकाचा नाट्यगुण नाटकात ज्या प्रमाणात व्यक्त होईल, तेवढ्याच प्रमाणात तो लघुनिबंधात व्यक्त होऊ शकणार नाही. किंवा एखाद्या लेखकाची काव्यात्म वृत्ती कवितेत जेवढ्या प्रमाणात व्यक्त होऊ शकेल, तेवढ्याच प्रमाणात व तशा प्रकारे लघुनिबंधात व्यक्त होऊ शकणार नाही. म्हणून वर उद्‌धृत केलेले गुण लघुनिबंधाच्या व्यवच्छेदक लक्षणात येऊ शकत नाहीत. इंग्रजीत अनेकांनी तसे ते घालून गफलत निर्माण केली आहे. मराठीत तर ना. सी. फडके यांनी लघुनिंबधाचा विचार अतिशय प्राथमिक पातळीवर केलेला आहे.


लघुनिबंधात ‘मी’ त्वाचा आविष्कार असतो, असे वरती म्हटले आहे. त्याच्या अनुषंगाने आणखी काही वैशिष्ट्ये लघुनिबंधाला लाभली आहेत. तो आत्मसंवादाला आणि आत्मशोधाला अधिक अनुकूल असा प्रकार झाला आहे. त्यामुळे ‘मी’ ची (किंवा ‘मी’च्या मनाची) काव्यात्म आणि चिंतनात्म स्पंदने तो विशेष स्वरूपात आविष्कृत करू शकतो. तसेच त्यात ‘मी’ च्याच स्पंदनांना वाव असल्याने व ती उत्कटतेने व मनःपूर्वकतेने टिपणे आवश्यक असल्याने आणि ती एका वेळी एकाच विषयाच्या संदर्भकक्षेत टिपावयाची असल्याने त्याचे लेखन दीर्घ होऊ शकत नाही. दीर्घ झाले तरी एकसुरी, पाल्हाळीक व त्यामुळे कंटाळवाणे होण्याची बरीच शक्यता असते. यातूनच लघुनिबंधाच्या लांबीवर एक स्वयंनिर्मित मर्यादा पडली आहे. जशी त्याच्या लांबीवर मर्यादा पडली आहे, तशी ती (‘मी’ त्वाचाच फक्त आविष्कार असल्याने) त्याच्या कुवतीवरही पडली आहे. अनुभवातील इतर स्पंदनेही त्यात टिपता येतात नाही असे नाही. तशी ती अनेकांनी टिपलेली आहेतही. पण ती स्पंदने साहित्याच्या इतर प्रकारांत विशेष स्वरूपात टिपता येणे शक्य असल्याने लघुनिबंधाकडे गद्यातील काव्यात्मतेचा आणि चिंतनशीलतेचा विशेष अधिकार आलेला दिसतो.

पहा : निबंध.

यादव, आनंद