गोपसाहित्य : (पास्टोरल लिटरेचर). पश्चिमी साहित्यात ‘पास्टोरल’ म्हणजे मेंढपाळी जीवनाशी संबंधित अशा काव्याची व साहित्याची जुनी परंपरा दर्शविली जाते. इ. स. पू. तिसऱ्या शतकात थिऑक्रिटस या ग्रीक कवीने सिसिलीतील मेंढपाळांसंबंधी काव्यरचना केली. त्याने एका सुखद, स्वप्नाळू मेंढपाळी जगाचे व जीवनाचे चित्रण करण्याचा जो आद्य नमुना निर्माण केला, त्याचे अनुकरण पुढे व्हर्जिलसारख्या लॅटिन कवींनीही केले. पास्टोरल या संज्ञेला उत्तरोत्तर व्यापक अर्थ प्राप्त होत गेला. पश्चिमी प्रबोधनकाळात गोपसाहित्याचे दीर्घकथा व नाटक असेही गद्य प्रकार पुढे आले. भावगीते, विलापिका, कथाकाव्ये यांतूनही गोपजीवनाचे घटक प्रकट झालेले दिसतात. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत स्वच्छंदतावादाच्या प्रभावामुळे समग्र ग्रामजीवनाबद्दलच नवे कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे ग्रामजीवनाविषयी नवी व व्यापक वाङ्‌मयीन दृष्टी उदयास आली. परिणामतः गोपसाहित्याची पारंपरिक पृथगात्मता कमी होत गेली. आधुनिक काळात जुन्या गोपसाहित्याच्या व्यवच्छेदक अशा विशेषांची तात्त्विक चिकित्सा करण्याचा प्रयत्न होत आहे. या दृष्टीने विल्यम एम्पसन याचे सम व्हर्शन्स ऑफ पास्टोरल (१९३५) हे पुस्तक उल्लेखनीय आहे. स्पेन्सरचे शेफर्ड्‌स कॅलेंडर (१५७९) हे काव्य व जॉन फ्लेचरचे फेथफुल शेफर्डेस (१६०३) हे नाटक ही गोपसाहित्याची काही ठळक उदाहरणे मानली जातात. 

संदर्भ : Marinelli, Peter V. Pastoral, London, 1971. 

जाधव, रा. ग.