चरित्र : चरित्र ही एका व्यक्तीच्या संपूर्ण जीविताची वा त्यातील विशिष्ट कालखंडाची कहाणी असते. चरित्रलेखनात पहिली शर्त वस्तुनिष्ठेची. प्रत्यक्ष घडलेल्या घटना-प्रसंगांशी व प्रत्यंतर-पुराव्यांशी चरित्रकारास प्रामाणिक रहावे लागते. त्यामुळे चरित्र ही इतिहासाची शाखा मानली जाते. इतिहाससंशोधकाप्रमाणे येथेही चरित्रकारास गौणप्रधान सर्व प्रकारची साधने गोळा करावी लागतात व इतिहासकाराप्रमाणे त्यांतून नेमकी निवड आणि सुसंगत जुळणी करावी लागते. पण चरित्र म्हणजे इतिहास नव्हे. इतिहासात व्यक्ती हे साधन व कालपट हे साध्य असते, तर चरित्रात पार्श्वभूमीसारखा काळ हे साधन आणि व्यक्तिदर्शन हे साध्य असते. हे व्यक्तिदर्शन जिवंत होण्यासाठी चरित्रकारास एखाद्या कादंबरीकाराप्रमाणे अंतर्विश्वाचा ठाव घेणारी सहभावना व कल्पकता यांचीही गरज असते.

या साहित्यप्रकाराची प्रेरणा आदरणीय व्यक्तीची स्मृती जागवणे, त्याचप्रमाणे स्वतःच्या आदर्शाचे सातत्य टिकवणे अशा स्वरूपाची असते. त्यामागे आत्मीयतेची, कृतज्ञतेची व विभूतिपूजेची भावनाच बलवत्तर असते. धर्म, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, संशोधन इ. क्षेत्रांतील अलौकिक व्यक्तीच बहुधा चरित्रविषय बनतात. हळूहळू ही गोष्ट बदलत आहे. मानवी स्वभावाविषयीच्या निखळ कुतूहलातून सध्या चरित्रलेखन होऊ लागले आहे. त्यामुळे माहात्म्ये व स्तोत्रे यांच्या अंगाने जाणारे चरित्रलेखन मागे पडत आहे. मानवी स्वभाव व वर्तन यांविषयीची सुजाण वाचकाची जिज्ञासापूर्ती करणे, हे चरित्रवाङ्‌मयाचे उद्दिष्ट ठरू पाहत आहे. मात्र ही जिज्ञासा कथा- कादंबरीहून अर्थातच भिन्न असते. कथा-कादंबरीत कल्पित भावसत्याची, तर चरित्रात घटित भावसत्याची जिज्ञासा असते. सत्य जाणून घेण्याची कुतूहल हे येथे मूलभूतच असते.

एखादी क्षुद्र घटनासुद्धा मानवी मनावर मोठा प्रकाश टाकू शकते, हे सत्य ध्यानात घेता, चरित्रविषयासंबंधी जे जे म्हणून उपलब्ध होण्यासारखे असेल ते ते साधनसामग्री म्हणून जमविणे, हे चरित्रकाराचे आद्य कर्तव्य ठरते. अशा साधनसामग्रीत पूर्वी लिहिलेली चरित्रे वा चरित्रलेखन, आत्मचरित्र, दैनंदिनी, पत्रव्यवहार, व्याख्यानादी कार्यक्रमांची प्रतिवृत्ते, आप्त-स्नेही तसेच समकालीन व्यक्ती यांच्या आठवणी, प्रतिस्पर्ध्यांच्या प्रतिक्रिया, चरित्रनायक स्वकालीन असल्यास स्वतःच्या प्रतिक्रिया, चरित्रनायकाच्या सर्जनशील अथवा अन्य कृती, संबंधित स्थळे, छायाचित्रे, वैयक्तिक शेषवस्तू इ. विविध स्वरूपाच्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. सुप्रसिद्ध चरित्रनायकांच्या बाबतीत ही साधनसामग्री विपुल प्रमाणात सहज उपलब्ध असते. तेथे एकूण फापटपसाऱ्यात आपले उद्दिष्ट हरवणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. साधनांची विपुलता हीच तेथे चिंतेची बाब. साहजिकच ग्राह्याग्राह्यतेच्या, निवडीच्या तत्त्वाला त्यांत महत्त्व येते. ऐकीव वा हस्ते-परहस्ते मिळालेल्या माहितीपेक्षा सरकारी वा निमसरकारी दप्तरखान्यातील माहितीवर व दस्तैवजी पुराव्यावर साधनांच्या बाबतीत भिस्त ठेवणे अधिक श्रेयस्कर असते. लेखकाला चरित्रनायकाचा प्रत्यक्ष सहवास ज्या प्रमाणात लाभलेला असेल, त्या मानाने त्याच्या लेखनाची प्रत्ययकारिता वाढत असते. ‘शूर मर्दाचा पोवाडा, शूर मर्दाने गावा’, या म्हणण्यात थोडेफार तथ्य आहे. लेखक नायकाचा समानधर्मी तरी असावा. तसे नसेल तर नायक ज्या कार्यक्षेत्रांतून मार्ग काढीत पुढे गेला, त्या कार्यक्षेत्रांचा, कल्पनेच्या पातळीवर तरी, माग काढण्याची कुवत त्याच्या ठायी असणे आवश्यक आहे. नायकाविषयी आधीच जे लेखन झालेले असते, ते स्वीकारताना जागरूक राहणे अगत्याचे ठरते. हे लेखन जिव्हाळा, कृतज्ञता वा विभूतिपूजा या भावनांतून वा प्रासंगिक गौरव करण्याच्या निमित्ताने पुष्कळदा झालेले असते. हे लेखनहेतू सत्य शबलित करतात. नायकाचे कर्तृत्व उठून दिसावे, म्हणून समकालीनांच्या वा प्रतिस्पर्ध्यांच्या कर्तृत्वाचे अवमूल्यन केलेले असते. दोष गुणरूपाने मांडलेले असतात. उणिवांची झाकपाक करुन आक्षेपार्ह वर्तनाला समर्थनाचा मुलामा दिलेला असतो. स्वतःची माहिती स्वतःइतकी इतरांना कोठून असणार, या समजुतीतून व्यक्तिगत साधनांकडे पाहण्याची प्रवृत्ती असते. यामुळे आत्मपर लेखन अव्वल दर्जाचे साधन समजून त्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. पण अशा लेखनावर डोळे मिळून विसंबणे धोक्याचे असते. एक तर पुष्कळसे आत्मपर लेखन आत्मसमर्थनाकडे झुकणारे असते. शिवाय अशा लेखनाची जननी जी स्मृती तीच स्खलनशील असते. तिची गतिशीलता इच्छापूर्तीच्या दिशेने नकळत नेत असते. आपण असे आहो, यापेक्षा आपण इतरांना कसे दिसू यावरच अशा लेखनात दृष्टी असण्याचा संभव असतो. सारांश, परगत आणि आत्मगत साधनांची योग्यायोग्यता ती अन्य अधिकृत वा निःपक्षपाती साधनांवर कितपत टिकतात, हे पाहून ठरवावी लागते.


यापुढची समस्या म्हणजे या विविध प्रकारच्या मृत साधनांच्या चबुतऱ्यावर चरित्रनायकाची हाडामांसाची जिवंत मूर्ती साकार करणे. विशुद्ध संशोधनदृष्टी, निवडीचे तारतम्य व कल्पक सहभावना यांचा समन्वय साधून यथार्थ व्यक्तिदर्शन घडविणे, ही चरित्रलेखनातील केंद्रवर्ती गोष्ट होय. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये नायकाचे व्यक्तिमत्त्व कसे परिणत होत गेले, याचे शक्य तितके प्रत्ययकारी चित्र रेखाटण्यावर चरित्रलेखनाचे यशापयश अवलंबून असते. विभूतिपूजक जिव्हाळा हा आंधळा, बोधवादी आणि प्रायः बहिर्मुख असतो. असा जिव्हाळा असणारा चरित्रकार परिश्रमपूर्वक साधने जमवितो, त्याच्या निवेदनशैलीला एक प्रकारचा भावुक गोडवाही लाभतो पण एकंदरीत तो चरित्रनायकाकडे निःपक्षपातीपणे पाहू शकत नाही. तो त्याला सद्‌गुणांचा पुतळा बनवतो. माणूस सद्‌गुणांचा किंवा दुर्गुणांचा पुतळा नसतो. नायकाचे देवीकरण वा दानवीकरण न करता त्याला ‘मानवी’ ठेवण्याची दृष्टी चरित्रलेखकात हवी. सार्वजनिक जीवनात खूप यशस्वी झालेला माणूस खाजगी जीवनात अपयशी ठरलेला असू शकतो, त्याच्या कृती-उक्तीत सदैव मेळ बसतोच असे नाही, तो सदैव तर्काला धरुन वागतोच, असे नाही. शिवाय देशकालपरिस्थित्यनुसार त्याच्यामध्ये विलक्षण परिवर्तने घडून येणे शक्य असते. मानवी स्वभाव अतार्किक व व्यामिश्र आहे. जागृत मनामागे अर्धजागृत आणि सुप्त मन असते, मुखवट्यामागे खरा चेहरा असतो, या मानसशास्त्रीय तथ्यांचे भान चरित्रकाराला असले पाहिजे. शब्दांहून कृत्ये व महत्कृत्यांहून क्षुल्लक प्रसंगही कधी कधी अधिक बोलके ठरत असतात. व्यक्तिदर्शन करताना आनुवंशिक संस्कार, परिस्थिती, कौटुंबिक जीवन, विशेषतः कामजीवनातील साफल्य अथवा वैफल्य यांचा विचार टाळू नये. एकंदरीत संथ कालखंडापेक्षा संघर्षमय कालखंडावर, बाह्य घटनांपेक्षा त्यामागील मनःस्थितीवर व बहिरंगापेक्षा अंतरंगावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न चरित्रामध्ये झाला पाहिजे. सर्व परस्परविरोधी क्रियाप्रतिक्रियांतून नायकाच्या जीवनसंगीताची सम नेमकी पकडता येणे, ही महत्त्वाची गोष्ट असते. ही सम सापडल्यास सर्व लेखनाला आपोआप एकपिंडत्व व कलात्मक सौष्ठव प्राप्त होते. आंद्रे मोर्वा व लिटन स्ट्रेची या पाश्चात्त्य चरित्रलेखकांना ही किमया साधलेली दिसून येते. त्यांच्या लेखनामुळे चरित्रवाङ्‌मयातील कलामूल्याची जाण प्रकर्षाने झाली. तथापि त्यांच्या अनुकरणाने थोर व्यक्तिंचे मूर्तिभंजन व अवमूल्यन करण्याची अनिष्ट प्रथाही सुरु झाली. नायकाची पांढरी व काळी बाजू समतोलपणे पाहून यथार्थ व्यक्तिदर्शन घडविणारा चरित्रकारच आदर्श होय. प्रायः चरित्रे कालानुक्रमाने लिहिली जातात. तसेच पूर्वदृश्यचित्रणाची (फ्लॅश बॅक) आधुनिक पद्धतीही चरित्राची कलात्मकता वाढवू शकते. चरित्र म्हणजे केवळ कालानुक्रमाने दिलेली घटनांची जंत्री नव्हे तर निश्चित उद्दिष्ट, निखळ संशोधन, निवडीचे तारतम्य, कल्पक संरचना, जिवंत व्यक्तिदर्शन, आकर्षक शैली यांनी मंडित अशी ती एक एकसंघ कलाकृती असते.

मालशे, स. गं.

जागतिक चरित्रवाङ्‌मयाचा स्थूल आढावा : जगातील बहुतेक संस्कृतींमध्ये नैतिक दृष्टिकोनातून वा आदर्शीकरणाच्या प्रेरणेतून लिहिल्या गेलेल्या आठवणी, ऐतिहासिक बखरी आणि व्यक्तिचित्रात्मक छोटेखानी चरित्रे यांच्यापासून चरित्रलेखनाला प्रारंभ झालेला आढळतो. ख्रिस्त, बुद्ध इ. धर्म संस्थापकांबद्दलच्या त्यांच्या शिष्यांच्या आठवणी, स्सु-मा चि’ एन (इ.स.पू.सु. १४५—८५) याने लिहिलेला शी-ची  (इं. शी. हिस्टॉरिकल रेकॉर्ड्‌स) व पान कू. (इ. स. ३२–९२) याने लिहिलेला हान शू (इं. शी. हिस्टरी ऑफ द फॉर्मर हान डिनॅस्टी) ह्या ग्रंथांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.

पाश्चात्त्य जगामध्ये एक वाङ्‌मयप्रकार म्हणून चरित्रलेखनाला प्रारंभ प्लूटार्कपासून (इ.स.सु. ४६–सु. १२०) झाला, असे मानले जाते. प्रतिष्ठित ग्रीक व रोमन व्यक्तींच्या चरित्रांचा तौलनिक अभ्यास करून नैतिक निष्कर्ष काढण्यावर त्याचा भर होता. या दृष्टीने त्याचा लाइव्ह्‌ज ऑफ द नोबल ग्रीशन्स अँड रोमन्स  हा चरित्रसंग्रह उल्लेखनीय आहे. अस्सल आणि शंकास्पद चरित्रसाधनांमध्ये भेद करणे, घटनाप्रसंगाची कौशल्यपूर्ण निवड करणे व किरकोळ तपशिलांतून सूक्ष्म स्वभाववैशिष्ट्ये व्यक्त करणे, हे त्याच्या लेखनाचे विशेष. त्याचाच समकालीन गेयस स्विटोनियस ट्रॅंक्विलस यांच्या लेखनात चरित्रलेखकाला आवश्यक असे मानवी स्वभावविषयक निखळ कुतूहल आढळते. त्याने लिहिलेल्या लाइव्ह्‌ज ऑफ द ट्‌वेल्व्ह सीझर्स  या ग्रंथात व्यक्तिचित्रात्मक चरित्राचे उत्कृष्ट नमुने आढळतात. दहाव्या शतकानंतर इस्लामी संस्कृतीत लिहिली गेलेली संतांची आणि विद्वानांची चरित्रे प्रबोधनकाळात व्हाझारीने (१५११–७४) लिहिलेली द लाइव्ह्‌ज ऑफ मोस्ट एमिनेंट इटालियन पेंटर्स, स्कल्प्टर्स अँड आर्किटेक्ट्‌स (१५५०) या ग्रंथातील चरित्रे अठराव्या शतकात डॉ. जॉन्सनने लिहिलेले द लाइव्ह्‌ज ऑफ द इंग्लिश पोएट्‌स (१७७९–८१) व लिटन स्ट्रेची (१८८०–१९३२) याचे एमिनेंट व्हिक्टोरियन्स (१९१८) ही चरित्रे यांच्यामागे प्रामुख्याने व्यक्तिचित्रणाचीच प्रेरणा होती.

व्यक्तिगत भावसंबंधांचा आधार असलेली चरित्रे उत्कृष्ट उतरतात, असा अनुभव साधारणतः सर्वच चरित्रवाङ्‌मयातून येतो. विल्यम रोपरचे लाइफ ऑफ टॉमस मोर (१५३५), जेम्स बॉस्वेलकृत द लाइफ ऑफ सॅम्युएल जॉन्सन (१७९१), जॉन लॉक्‌हार्टचे लाइफ ऑफ सर वॉल्टर स्कॉट (१८३६–३८) व अर्नेस्ट जोन्सचे द लाइफ अँड वर्क ऑफ सिग्मंड फ्रॉइड (१९५३–५७) ही अशा प्रकारची काही उल्लेखनीय चरित्रे होत. त्यांपैकी बॉस्वेल (१७४०–९५) व लॉक्‌हार्ट (१७९४–१८५४) यांनी लिहिलेली चरित्रे जागतिक चरित्रवाङ्‌मयातील उत्तुंग शिखरे मानली जातात. टिपणे, विश्लेषण व संश्लेषण यांचा सुरेख मेळ साधल्यामुळे बॉस्वेलच्या चरित्रातून गती व जिवंतपणा यांचा प्रत्यय येतो, तर आत्मजाणिवेचा अभाव नाट्यात्मता, ही लॉक्‌हार्टची वैशिष्ट्ये होत.

निष्कर्ष काढण्याचा मोह टाळून जास्तीत जास्त माहिती देण्यावर काही चरित्रकारांचा कटाक्ष असतो. अशा काही उल्लेखनीय चरित्रांमध्ये आइन्‌हार्टने लिहिलेले लाइफ ऑफ शार्लमेन (नववे शतक), टॉमस मूरलिखित द लाइफ ऑफ बायरन (१८३०), डेव्हिड मॅसनकृत लाइफ ऑफ मिल्टन : नॅरेटेड इन कनेक्शन विथ द पोलिटिकल, इक्लीझिॲस्टिकल अँड लिटररी हिस्टरी ऑफ हिज टाइम (७ खंड, १८५९–९४), जॉन निकोले व जॉन हे या जोडीचे अब्राहम लिंकन : अ हिस्टरी (१० खंड, १८९०), एडवर्ड नेललिखित डी. एच्‌. लॉरेन्स : अ काँपोझिट बायॉग्रफी (३ खंड, १९५७–५९) व डेव्हिड विल्सनचे कार्लाइलचरित्र (६ खंड, १९२३–२९) यांचा समावेश होतो.


ब्रिटीश चरित्रलेखनाचा मुख्य प्रवाह म्हणजे प्रमाणभूत चरित्रांचे लेखन. प्रमाणभूत चरित्र व्यक्तिगत आणि वस्तुगत सत्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करते. जॉर्ज कॅव्हेंडिशलिखित लाइफ ऑफ कार्डिनल वुल्झी (१५५७), रॉजर नॉर्थ (१६५३–१७३४) याने लिहिलेली आपल्या तीन भावांची चरित्रे, तसेच आधुनिक काळातील लॉर्ड डेव्हिड सेसिलकृत द यंग मेलबर्न (१९३९) व मेलबर्न (१९५४), गॅरेट मॅटिंग्लीकृत कॅथरिन ऑफ ॲरगॉन, अँड्रू टर्न्‌बुलकृत स्कॉट फिट्‌सजेरल्ड  व लीअन एडेलकृत हेन्‍री जेम्स  ही प्रमाणभूत चरित्रांची काही प्रसिद्ध उदाहरणे होत.

मूल्यमापनात्मक चरित्रे हाही चरित्रलेखनातील एक प्रमुख प्रवाह आहे. या प्रकारातील काही नावाजलेली उदाहरणे म्हणजे लेस्ली मार्शांकृत बायरन (१९५७), ड्युमामालोनकृत जेफर्सन अँड हिज टाइम (४ खंड, १९४८–७०), चर्चिललिखित मार्लबरो (१९३३–३८), डग्लस फ्रीमनकृत जॉर्ज वॉशिंग्टन (१९४८–५७), रिचर्ड एल्‌मानलिखित जेम्स जॉइस (१९५९) व एड्‌गर जॉन्सनलिखित चार्ल्स डिकन्स (१९५२) ही होत.

अनेक चरित्रकार चरित्रविषयाच्या जीवनातून स्वतःला जाणवलेले भावसत्य व्यक्त करीत असतात. अशा चरित्रांतून व्यक्त होणारे चरित्र विषयाचे व्यक्तिमत्त्व प्रमाणभूत असतेच असे नाही. अशा चरित्रलेखकांत कॅथरिन बोएन, फ्रँक हॅरिस, हेस्केथ पीअर्सन इत्यादींचा समावेश होतो. कॅथरिन बोएन नाट्यात्म दृश्यांची योजना करुन आपल्या कच्च्या सामग्रीचे चित्रमय निवेदनात रुपांतर करते पण तिच्या प्रत्येक दृश्याला, प्रत्येक तपशिलाला कच्च्या सामग्रीत आधार असतो. उदा., चरित्र विषयाची पत्रे, दैनंदिन्या यांच्यातील नोंदींच्या आधारे ती संवाद लिहिते. तिने लिहिलेले बिलव्हेड फ्रेंड (१९३७), यांकी फ्रॉम ऑलिंपस (१९४४) व द लायन अँड द थ्रोन (१९५७) हे चरित्रग्रंथ प्रसिद्ध आहेत. फ्रॅंक हॅरिसने ऑस्कर वाइल्डचे चरित्र लिहिले (१९१६) तर हेस्केथ पीअर्सनने टॉम पेन, फ्रेंड ऑफ मनकाइंड (१९३७) व बीअर्‌बोम ट्री (१९५६) ही दोन चरित्रे लिहिली.

पुराव्यांची पर्वा न करता कल्पनेचा आश्रय घेतला, की चरित्राचे रूपांतर कादंबरीत होते. दुय्यम सामग्रीवर भर, वरवरचे संशोधन व कल्पनाशक्तीला मुक्त वाव, ही या वाङ्‌मयप्रकाराची वैशिष्ट्ये. अर्व्हिंग स्टोनलिखित लस्ट फॉर लाइफ  आणि द ॲगनी अँड द एक्स्टसी  या दोन गाजलेल्या कादंबऱ्या याच्या प्रकारातील आहेत.

परांजपे, प्र. ना.

मराठी चरित्रे : भारतीय जीवनदृष्टी एकंदरीत एतिह्य नाही. तिच्यावर पौरणिकतेचा पगडा अधिक. मानवी कर्तृत्वापेक्षा दैवी चमत्कारांचे स्तोम तीत विशेष. मध्ययुगीन भारतीय भाषांतील साहित्य संस्कृतानुसारी होते. संस्कृतात ऐतिहासिक दृष्टीतून चरित्रलेखनाची परंपरा नाही. हर्षचरित्र, राजतरंगिणी, महावंश  यांसारखे ग्रंथ अपवादभूतच त्यांतील राजवंशांच्या उलाढालीचे वर्णनही पौराणिक पठडीतले व अतिरंजनाकडे झुकणारेच आहे.

मात्र प्रारंभीच्या महानुभाव वाङ्‌मयातच याला सन्मान्य अपवाद आढळतात. ऐतिहासिक दृष्टिकोनातून नसले, तरी स्मरणभक्तीच्या पोटी त्यात मुळाशी इमान राखलेले आढळते. महानुभवीय आद्य चरित्रकार महिंद्रभट्ट याने चक्रधर व गोविंद प्रभू या पंथ संस्थापकांच्या ‘लीला’ किंवा आठवणी अनुक्रमे लीळाचरित्र (सु. १२७६) आणि गोविंद प्रभु चरित्र (१२८८) या ग्रंथांत संग्रहीत केल्या आहेत. या ग्रंथांमधून या पंथाचार्यांच्या लौकिक व अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ दर्शन घडते व त्याबरोबरच यादवकालीन मराठी गद्यशैलीच्या स्वाभाविक गोडव्याचाही प्रत्यय येतो. नागदेवाचार्यादी अन्य पंथाचार्यांच्या स्मृती सांगणारा स्मृतिस्थळ  हा नरेंद्र व परशुराम यांचा ग्रंथही याच धर्तीचा आहे.


प्राचीन मराठी संतापैकी ज्ञानदेव व रामदास यांच्यासंबंधी चरित्रपर लेखन मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून येते. विशेषतः संत नामदेवकृत ‘आदी’, ‘समाधी’ व ‘तीर्थावळी’ ही ज्ञानेशांचे अभंगात्मक चरित्र सांगणारी प्रकरणे विशेष लोकप्रिय आहेत. महीपतीबुवा ताहराबादकरांनी उत्तर पेशवाईत मराठी चरित्रवाङ्‌मयाला भरघोस हातभार लावला. त्यांच्यापूर्वी नाभाजी, उद्धवचिद्‌घन, दासोदिगंबर असे काही चरित्रकार होऊन गेले. महीपतींनी १७६२ ते १७८८ या काळात भक्तविजय, संतलीलामृत, भक्तलीलामृत  व संतविजय  (अपूर्ण) हे ओवीबद्ध व विस्तृत चरित्रपर ग्रंथ लिहिले. एकनाथ-तुकारामादी संतांची चरित्रे गाताना महीपतींची दृष्टी भाविकाची होती. भीमास्वामीकृत भक्तलीलामृत (१७९८) व राजारामप्रासादीकृत भक्तमंजरी (१८३४) हे ग्रंथ याच पठडीतले आहेत. रामदासांच्या चरित्रात गिरिधरकृत समर्थप्रताप, उद्धवसुतकृत रामदासचरित्र, आत्मारामकृत दासविश्रामधाम  व हनुमंतस्वामीची बखर  हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. जुन्या काळच्या बखरीत एका अर्थाने चरित्रगुण अधिक आढळतात. कृ. अ. सभासदकृत सभासदी बखर (१६९७), चित्रगुप्ताची बखर व मल्हार रामराव चिटणीस यांच्या शिवाजी, संभाजी व राजाराम यांच्या बखरी (१८१०–१२) या दृष्टीने खास उल्लेखनीय ठरतात. त्यात पौराणिक दृष्टी संपूर्णतया लुप्त नसली, तरी एकंदरीत चरित्रनायकांच्या कार्यकर्तृत्वाचे दर्शन घडविण्याकडे विशेष कल दिसून येतो.

मराठीतील बरेच गद्य साहित्यप्रकार इंग्रजी वाङ्‌मयाशी परिचय झाल्यानंतर सुरू झाले असले, तरी चरित्राबाबत ही गोष्ट तितकीशी खरी नाही, हे वरील संतचरित्रांवरुन आणि बखरींवरुन सिद्ध होण्यासारखे आहे. मात्र इंग्रजपूर्वकालीन चरित्रविषय काहीसे अलौकिक होते इंग्रजकाळापासून चरित्रविषय लौकिक स्वरूपाचे झाले. अव्वल इंग्रजीतील चरित्रवाङ्‌मय अनुवादित स्वरूपाचे व दक्षिणा प्राइज कमिटीने लावलेल्या पारितोषिकार्थ लिहिले गेलेले होते. परकीय थोर व्यक्तिही चरित्रविषय झालेले दिसून येतात. जनार्दन रामचंद्रजीकृत कविचरित्र (१८६०) व आजरेकरकृत श्री विष्णुबाबा ब्रम्हचारी  (१८७२) हे या काळातील स्वतंत्र चरित्रलेखनाचे उल्लेखनीय प्रयत्न होत.

दरम्यान विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी जॉनसन (१८७६) हे प्रदीर्घ निबंधवजा चरित्र लिहून चरित्रलेखनाचा एक वेगळा नमुना लोकांसमोर ठेवला आणि ‘इतिहास’ या आपल्या निबंधाने स्वकीय ऐतिहासिक थोर पुरुषांच्या चरित्रलेखनाची प्रेरणा दिली. त्यानंतर इतिहासाभिमानी वृत्तीतून वासुदेवशास्त्री खरेकृत नाना फडणीस  (१८९२), पारसनीसकृत झांशीची राणी (१८९४) व ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर (१९०१), वि. कों. ओककृत बालबोधातील स्फुट चरित्रे व धनुर्धारीकृत छोटेखानी, चटकदार, ऐतिहासिक चरित्रमाला यांसारखी चरित्रवाङ्‌मयात बरीच भर पडली.

संतपंतांच्या चरित्रांची पूर्वपरंपरा बा. म. हंस यांनी तुकाराम (१८८०), मोरोपंत (१८८२) व वामनपंडित (१८८४) ही चरित्रे रचून पुनरुज्जीवित केली. ज. र. आजगावकरांनी महाराष्ट्र कविचरित्र माला  (९ भाग, १९०७ – २५) सुरू करुन तसेच पांगारकरांनी मोरोपंत (१९०८), एकनाथ (१९१०), ज्ञानेश्वर (१९१२), तुकाराम (१९२०), मुक्तेश्वर (१९२२) ही चरित्रे लिहून ही परंपरा चांगलीच परिपुष्ट केली. या उभयतांच्या चरित्रकृतींत नवे संशोधन व अध्ययन आढळले, तरी त्यांची दृष्टी भाविकच होती. कवीच्या चरित्रविषयक साधनांच्या अभावी, त्याच्या काव्यरचनेवरुन मनोरचनेचा वेध घेण्याचा मोरोपंत : चरित्र आणि काव्यविवेचन  या ग्रंथातील पांगारकरांचा प्रयत्न मात्र खचितच अभिनव म्हणता येईल. पुढील काळातील बा. अ. भिडे आणि न. र. फाटक यांची कविचरित्रे पांगारकर व आजगावकर यांच्या चरित्रांपेक्षा अधिक चिकित्सक उतरलेली आहेत. फाटकांच्या ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास या संतांच्या चरित्रांपैकी एकनाथ : वाङ्‌मय आणि कार्य (१९५०) हा ग्रंथ खास उल्लेखनीय आहे.


एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्राची अस्मिता जागृत झाली आणि पाश्चात्त्य साहित्याशी सुशिक्षितांचा विशेष परिचय झाला. परिणामी चरित्रवाङ्‌मयाची वाढ विशेष झालेली दिसून येते. ऐतिहासिक थोर व्यक्ती, राजकीय नेते, समाजसुधारक, ग्रंथकार, नट यांची चरित्रे अधिक साधार रीतीने लिहिली जाऊ लागली. बा. ना. देव व श्री. ना. कर्नाटकी यांनी अनेक सुधारकाग्रणींची छोटीमोठी चरित्रे लिहिली तर भावे, मुजुमदार, जोशी यांनी विष्णुदास भावे, भाऊराव कोल्हटकर, अण्णा किर्लोस्कर, गणपतराव जोशी या नटमंडळींची चरित्रे लिहिली. शास्त्र व कला या उभय दृष्टींचा मेळ घालणारे ल. कृ. चिपळूणकरकृत विष्णूशास्त्री चिपळूणकर (१८९४) हे त्या काळचे सर्वांत उजवे ठरणारे चरित्र आहे. विषयदृष्ट्या महत्त्वाची अशी चरित्रे म्हणजे केळुसकरकृत शिवाजी महाराज (१९०७), काशीबाई कानिटकरकृत डॉ. आनंदीबाई जोशी (१९१२), वि. ल. भावेकृत चक्रवर्ति नेपोलियनचे चरित्र (१९१२), अवंतिकाबाई गोखलेकृत म. गांधी (१९१९), न. चिं. केळकर यांचे त्रिखंडात्मक टिळक चरित्र (१९२३–२८), न. र. फाटककृत न्या. रानडे  यांचे चरित्र (१९२४) व शि. ल. करंदीकरकृत सावरकर चरित्र (१९४३) ही तिन्ही चरित्रे माहिती, चिकित्सकपणा व सिद्धहस्त लेखनशैली या दृष्टींनी श्रेष्ठ प्रतीची मानली जातात. गं.ग. जांभेकरकृत बाळशास्त्री जांभेकर (१९५०) हा त्रिखंडात्मक ग्रंथ आणि अ. का. प्रियोळकरकृत दादोबा पांडुरंग (१९४७) ही चरित्रे संशोधनदृष्टीसाठी उल्लेखनीय आहेत. रोजनिशीवर आधारलेले दादासाहेब खापर्ड्यांचे चरित्र, पु.बा. कुलकर्णीकृत नाना शंकरशेट, मामा परमानंद व जावजी दादाजी यांची चरित्रे तसेच सावरकर, फुले, आंबेडकर, टिळक यांच्या धनंजय कीरकृत इंग्रजी चरित्रांची भाषांतरे ही चरित्रवाङ्‌मयात अलीकडे पडलेली मोलाची भर होय. गं. दे. खानोलकर यांची माधव जूलियन (१९५१) आणि साहित्यसिंहश्री. कृ. कोल्हटकर (१९७२) ही सारस्वतांची चरित्रे अधिकृत माहिती व कलात्मक मांडणीचा प्रयत्न यासाठी खास उल्लेखनीय आहेत. संशोधन, प्रमाणबद्धता व व्यक्तिचित्रण या तिन्ही दृष्टींनी मराठी चरित्रवाङ्‌मयात उठून दिसणारे अलीकडचे चरित्र म्हणजे द. न. गोखले लिखित डॉ. केतकर (१९५९). एकंदरीत मराठी चरित्रलेखनाने विषयांची विविधता, साधनांची अधिकृतता व माहितीची विपुलता या बाबतीत बरीच प्रगती केली असली तरी जिवंत व्यक्तिदर्शनाच्या व कलात्मक मांडणीच्या दृष्टीने त्याला बरीच मजल मारायची आहे, असाच निष्कर्ष निघेल.

पहा : आत्मचरित्र.

मालशे, स. गं.

संदर्भ : 1. Garraty, John A. The Nature of Biography, New York, 1957.

           2. Johnson, Edgar, One Mighty Torrent : The Drama of Biography, New York, 1955.

           3. Lee, Sidney, The Perspective of Biography, London, 1918.

           4. Maurois, Andre, Aspects of Biography, Cambridge, 1929.

           5. Nicolson, Harold, The Development of English Biography, London 1928.

          ६. जोशी, अ. म. चरित्र, आत्मचरित्र : तंत्र आणि इतिहास, नागपूर, १९५६.