लोकसाहित्य : लोकमानसाचे विविध वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात. ‘फोकलोअर’ या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते.

पश्चिमेकडे ‘फोकलोअर’ची संकल्पना सर्वप्रथम समाजशास्त्र व मानवशास्त्र यांच्या अभ्यासातून निर्माण झाली. स्वाभाविकच फोकलोअरचा अभ्यास हा लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणून सांस्कृतिक मानवशास्त्र (कल्चरल अँथ्रपॉलॉजी) याच नावाने प्रारंभीच्या काळात झालेला आहे. फोकलोअरमध्ये लोकसंस्कृतीच्या जडणघ़डणीतील शाब्द साधने (वाच्यार्थाने वाङ्‌मय-लिटरेचर) व शब्देतर साधने (रूढी, चालीरीती, पारंपरिक कला, कारागिरी, क्रीडा, ज्योतिष, वैद्यक इ.) या सर्वांचाच समावेश झालेला आहे. तरीरी मानवशास्त्रज्ञांत याविषयी एकमत नाही. काहींच्या मते फोकलोअर म्हणजे संस्कृतीमधील केवळ पारंपरिक शाब्द साधनेच होत.

असे असले तरी, एकूणच समग्र संस्कृतीची जडणघडण होण्याच्या मुळाशी संस्कृतीमधील शाब्द साधने व शब्देतर साधने या सर्वांचाच मूलभूत व सर्वगामी सहभाग असल्याचे भान एकोणिसाव्या शतकातील अभ्यासकांना आले व या सर्व बाबींचा समावेश असलेली फोकलोअर ही स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून मान्यता पावली आहे. फोकलोअरमध्ये अभिप्रेत असलेली शाब्द साधने (लोकपरेपरेतील वाङ्‌मय) व शाब्देतर साधने(कृतिसंबद्ध व भावसंबद्ध साधने) हे सर्व साहित्य(साधने या अर्थाने) लोक-संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याने मराठीतील व एकूणच आधुनिक भारतीय अभ्यासकांनी साधनवाचक अर्थानेच ‘लोकसाहित्य’ हा शब्द वापरावयाला प्रारंभ केला व तो आता रुळला आहे. याच अर्थाने एक स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून प्रस्तुत लोकसाहित्य विचारात घेतले आहे.

या व्यापक अर्थाने लोकसाहित्य या संकल्पनेत अभिप्रेत असलेले सर्व घटक पुढे एका वृक्षाकृतीमध्ये (पृ. ७५८वर) दाखविले आहेत.

इ. स. सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंत जगाच्या पश्चिम भागात मध्ययुगाची समाप्ती होऊन यंत्रप्रधान आधुनिक युगाला प्रारंभ झाला. भारतात ही परिस्थिती एकोणिसाव्या शतकात आली. मुद्रणयंत्राच्या शोधामुळे लिखित साहित्याची निर्मिती आणि प्रसार यांची लाट आली आणि त्याचवेळी मुद्रणपूर्व मौखिक परंपरेतील साहित्य व संस्कृती यांचे संग्रहण व अध्ययन करण्याची गरज अभ्यासकांना वाटू लागली. या साहित्यासाठी ‘फोकलोअर’ ही इंग्रजी संज्ञा सर्वप्रथम विल्यम जोन्स टॉमस या इंग्लिश पुरातत्वज्ञाने १८४६ मध्ये वापरली आणि जगभर ती रुळली.

आज मराठीत लोकसाहित्य हा शब्द इंग्रजी फोकलोअर शब्दाचा पर्यायशब्द म्हणून रुळला असला, तरी त्यातील ‘साहित्य’ हा शब्द मराठीत आधीच वाङ्‌मय (लिटरेचर) या अर्थाने रूढ असल्याने जे शब्दबद्ध (शाब्द) असे कथा, गीतादी साहित्य म्हणजेच लोकसाहित्य असे समजले जाते. फार तर म्हणी,उखाणे, लोकोक्ती, कोडी या शाब्द साहित्याचाही त्यात समावेश केला जातो.

त्याचप्रमाणे लोकसाहित्य या शब्दातील ‘लोक’ या पूर्वपदाचा अर्थही अनेकदा ग्रामीण, अनक्षर, जुन्या परंपरेतले असा केला जातो, तोही योग्य नव्हे. लोकसाहित्य म्हणजे आदिम लोकांचे साहित्यही नव्हे. ‘लोकशाही’ या शब्दातील ‘लोक’ या पदाच्या जवळचा आशय लोकसाहित्यामधील ‘लोक’ पदात अंतर्भूत आहे. म्हणजे हे ‘लोक’ केवळ जुने वा केवळ नवे, केवळ ग्रामीण वा केवळ नागर, केवळ साक्षर वा केवळ अनक्षर नाहीत. सांस्कृतिक दृष्ट्या विशिष्ट मानसिक जडणघडण असलेल्या मानवसमूहाला ‘लोक’ म्हटले आहे. ‘लोक’ हा शब्द नेहमीच समूहवाचक असतो.

भारतात ‘लोक’ हा शब्द प्राचीन काळापासून विविध अर्थानी वापरला जातो. स्वर्ग, मृत्यू, पाताळ इ. त्रिभुवनांसाठी ‘लोक’हे उत्तरपद म्हणून वापरले जाते. उदा., स्वर्गलोक वगैरे. आपल्याखेरीज अन्य समूहांसाठी ‘लोक’शब्द वापरला जातो. हिंदी भाषेत जन, जनपद, ग्राम्य असे शब्द लोक(फोक) या अर्थाने रुळवण्याचा प्रयत्न झाला. डॉ. श्याम परमार यांनी ‘लोक’ शब्दाची नेमकी व्याप्ती विशद केली आहे. ते म्हणतात “लोक’ साधारण जनसमाज है, जिसमें भू-भागपर फैले हुए समस्त प्रकारके मानव सम्मिलित है। यह शब्द वर्गभेदरहित, व्यापक, एवं प्राचीन परम्पराओंकी श्रेष्ठ राशिसहित अर्वाचीन सभ्यता, संस्कृती के कल्याणमय विवेचन का द्योतक है। – प्राचीन काळी संस्कृतात वैदिकेतरांसाठी ‘लोक’ संज्ञा रूढ होती. परंतु नंतर वैदिक-वैदिकेतरांतील अंतर मिटत गेले आणि त्यातील ‘लोक’ शब्दाचा अर्थही व्यवहारातून गेला. इंग्रजीमध्ये ‘फोक’ हा शब्द ‘नागरी’ (सिव्हिलाइज्ड) या शब्दाच्या विरुद्ध छटेने आणि काहीसा हेटाळणीपूर्वक वापरला जातो. मात्र ‘फोकलोअर’ मधील ‘फोक’ मध्ये ही छटा नाही. मराठी ‘लोक’पदाच्या अर्थामध्ये तर ही छटा नाहीच.

पाश्चिमात्य अभ्यासकांनी फोकलोअर या शब्दाची व्याप्ती नेमकेपणाने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकाना, ब्रिटानिका, कोलंबिया यांसारख्या विविध पाश्चात्य ज्ञानकोशांतून एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्सेससारख्या विषयकोशांतून तसेच डिक्शनरी ऑफ फोकलोअर, मायथॉलॉजी, अँड लेजंड्स ह्या बृहत् व्याख्या-कोशातून फोकलोअरच्या  आशयाची व्याप्ती व स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार लोकसाहित्यात (फोकलोअर) लोकजीवनामध्ये समूहप्रतिभेच्या आणि समूहमानसाच्या अबोध प्रेरणेतून अनायासे, आपोआप निर्माण झालेले व अनायासे परंपरेने टिकत आलेले सर्व घटक समाविष्ट होतात. त्यात कथा, गीते, म्हणी, उखाणे, कोडी, कूटे, लोकप्रचलित मंत्र इ. सर्व शाब्द (शब्दबद्ध) साहित्याबरोबरच लोकप्रचलित धर्मविधी, श्रद्धा, देवदेवता, रूढी, चालीरीती, धारणा, व्रतवैकल्ये, उपासना, सर्व कला, कारागिरी, क्रीडा, वैद्यक, अन्नवस्त्रादी नित्योपयोगी वस्तू व त्यांच्या उपयोगाच्या रीती या सर्व शब्देतर साहित्याचा समावेश होतो. थोडक्यात म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या एकाच प्रकारची मानसिक जडणघडण  असलेल्या समूहाची जीवनप्रणाली लोकसाहित्यात आविष्कृत होत असते. यामागे समूहाच्या अबोध मनाची (कलेक्टिव्ह अन्‌कॉन्शस) प्रेरणा असते. त्यामुळे समूहजीवनातील सर्व साहित्य आपोआप सहज घडत असते. म्हणूनच लोकसाहित्याची निर्मिती ही आपोआप झालेली समूहाची निर्मिती असते. प्रत्यक्षात जरी एखादे गीत वा कथा व्यक्तिनिर्मित असली, तरी त्यामागची प्रेरणा समूहाची असते. त्यावर विशिष्ट व्यक्तीची नाममुद्रा नसते. व्यक्तीची मालकी नसते, तर समूहाची मालकी असते. समूहप्रेरणेने निर्माण झालेले साहित्य समूहस्वीकृत असेल तर समूहमन ते जतन करते. हे जतन परंपरेने होते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते आपोआप जाते. देशकालपरिस्थित्यनुसार त्यात बदलही होतो. पण तोही समूहप्रेरित व समूहस्वीकृत असतो. या अर्थाने लोकसाहित्य सदैव प्रवाही असते. ते जुने असूनही समूहमनात सदैव ताजे असते. समूहाच्या इच्छेनुसार व गरजेनुसार त्यात सतत घट-भर दोन्ही होत असते.

लोकसाहित्य व नागर साहित्य किंवा अभिजात साहित्य यांच्या संबंधांबद्दलही विविध मते आहेत. सर्व साहित्याचे मूळ लोकसाहित्यात आहे तर लोकसाहित्य हे अभिजात   साहित्याचे भ्रष्ट अनुकरण असते, असे दुसरे एक टोकाचे मत आहे. प्रत्यक्षात लोकसाहित्य व अभिजात साहित्य यांत सतत देवाणघेवाण व अभिसरण चालू असते. लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा परस्परपोषक राहिल्या, तरच दोन्हींचा निरामय विकास संभवतो.


लोकसाहित्य ही फोकलोअरसाठी पर्यायी मराठी संज्ञा प्रथम सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लोकसाहित्यविशारद दुर्गाबाई भागवत यांनी वापरली व पुढे ती रुळली. मराठीतील लोकसाहित्याचे आद्य चिकित्सक अभ्यासक वि. का. राजवाडे यांनी १९२५ मध्ये प्रथम ‘लोककथा’ व ‘लोकगीत’ हे शब्द वापरले. पुढे त्या पारिभाषिक संज्ञा म्हणून मान्यता पावल्या. फोकलोअर या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून दत्तो वामन पोतदार यांनी ‘लोकविद्या’ ही संज्ञा सुचविली होती परंतु ती रूढ होऊ शकली नाही.

भारतीय लोकसाहित्याचे गाढ व्यासंगी अभ्यासक डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी ‘लोकवार्ता’ ही संज्ञा हिंदीतून लेखन करताना सुचविली आणि ती हिंदीत रुळली आहे. ‘लोकसाहित्य’ ही संज्ञाही हिंदीत रुळली आहे. ‘ग्रामसाहित्य,‘लोकयान’ या संज्ञा मात्र हिंदीत रूढ होऊ शकल्या नाहीत.

पं. कृष्णदेव उपाध्याय यांनी फोकलोअरला सार्थ पर्याय म्हणून ‘लोकसंस्कृती’ ही  संज्ञा आग्रहाने सुचविली आहे. परंतु मराठीतील लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांच्या मते ‘लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृती नव्हे.’ त्यांच्या मते दोन्हींचे घटक समान असले तरी एक नव्हेत. लोकसाहित्य हे लोक-संस्कृतीच्या अभ्यासाचे साधन होऊ शकते.

मराठीत ज्यांनी अत्यंत सखोल आणि व्यापक भूमिकेतून लोकसाहित्याभ्यास केला, ते डॉ. रा. चिं. ढेरे मात्र पं. कृष्णदेव उपाध्याय यांच्याप्रमाणेच लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृती असे मानणारे आहेत. त्यांच्या सर्व संशोधनातून त्यांच्या या भूमिकेचा प्रत्यय येतो. ‘लोकसंस्कृतीचे शब्दरूप लोकवाङ्‌मयात (फोक लिटरेचर) असते तर लोकसंस्कृतीचे कृतिरूप हे लोकाचार, लोकरूढी, लोकभ्रम इत्यादींत असते.  लोकसंस्कृती हे लोकसाहित्याचे व्यक्त रूप असते.’ असा डॉ. ढेरे यांच्या प्रतिपादनाचा आशय होय.

डॉ. ढेरे, पं. कृष्णदेव उपाध्याय, डॉ. वासुदेवशरण अग्रवाल आणि पाश्चिमात्य अभ्यासक या सर्वांच्या मते संस्कृतीतील कथागीतादी सर्व शाब्द वाङ्‌मय व सर्व शब्देतर साहित्य या सर्वांचा सामग्र्याने केलेला अभ्यास म्हणजे लोकसाहित्याचा अभ्यास होय. स्वाभाविकच या अभ्यासाचा व्याप फार मोठा आहे. विशिष्ट समाजाच्या लोकसाहित्याचा (लोकसंस्कृतीचा) अभ्यास करण्यासाठी त्या समूहाचा इतिहास, त्यांच्या भूप्रदेशाचा भूगोल, समाजशास्त्र, मानवशास्त्र, पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, मानसशास्त्र, दैवतकथाशास्त्र आणि आज अर्थशास्त्र या सर्व शास्त्रांच्या अभ्यासाचे सहकार्य घेतल्याखेरीज या अभ्यासाला पूर्णता येणार नाही. म्हणूनच ही एक बहुस्पर्शी अथवा समन्वित अभ्यासपद्धती (मल्टिडिसिप्लिनरी स्टडी ॲप्रोच) आहे. एक स्वतंत्र अभ्यासशास्त्र म्हणून समन्वित पद्धतीने लोकसाहित्याभ्यास होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसाहित्याच्या अभ्यासासाठी आणखी एक अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे क्षेत्रीय  कार्य (फिल्ड वर्क) ही आहे. क्षेत्रीय कार्याखेरीज लोकसाहित्याचे समग्र आकलन होणे दुरापास्त असते.

अमेरिका, जर्मनी, रशिया या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत असलेल्या राष्ट्रांतील विद्यापीठांमधून लोकसाहित्याभ्यासाच्या स्वतंत्र शाखा आहेत. या विषयावर मोठ्या प्रमाणात ग्रंथनिर्मिती होत आहे. आकाशात झेप घेतानाही माणसाची मातीची ओढ संपत नसावी, म्हणूनच मानवमात्राचे आद्य समूहमन त्याला पुन्हा पुन्हा आपल्या मुळाकडे खेचत असावे.

भारतातही अनेक विद्यापीठांतून लोकसाहित्याभ्यासाच्या स्वतंत्र शाखा सुरू झाल्या आहेत. अनेक मानव्यविद्याशाखांतील अभ्यासक एकत्रितपणे संशोधन करीत आहेत. म्हैसूर विद्यापीठात मानसगंगोत्री  

लोकसाहित्यांतर्गत घटकांची वृक्षाकृती   

 

येथे लोकसाहित्य-संग्रहालय उभे राहिले आहे. राजस्थानातही लोकसाहित्य-संग्रहालय आहे. लोककलांच्या अभ्यासासाठी आणि जतन-संवर्धनासाठी भारताचे सांस्कृतिक खाते सतत प्रयत्नशील आहे.

केरळमधील काही अभ्यासक फोकलोअर या नावाची एक लघुपत्रिका उत्स्फूर्तपणे प्रकाशित करतात. जागतिक पातळीवरील अभ्यासकांमध्ये संपर्क साधता यावा म्हणून दरवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चासत्रांचे आयोजन विविध राष्ट्रे करीत आहेत. दरवर्षी ‘फोकलोअर काँग्रेस’ नावाची एक परिषदही आयोजित केली जाते.

लोकसाहित्याभ्यास हा केवळ भूतकाळातील संस्कृतिघटकांचा अभ्यास नसून मानवी संस्कृतीच्या आरंभापासून माणसाने अबोधपणे जतन केलेल्या जिवंत सांस्कृतिक जीवनाचा तो शोध आहे. म्हणूनच मानवाचा वर्तमान हा भूतकाळाने घडविलेला असतो आणि त्याचे भविष्य हे भूत-वर्तमानाच्या आधाराने उभे राहिलेले असते, याची समृद्ध जाण लोकसाहित्याच्या चिकित्सक अभ्यासातून येऊ शकते.

वरील वृक्षाकृतीनुसार लोककथा, लोकगीते, म्हणी व उखाणे वगैरे शाब्द लोकसाहित्याचा विचार अनेकदा होतो. परंतु भारतभरच्या असंख्य जातिजमातींची त्यांच्या त्यांच्या बोलींमधून जातिपुराणे आहेत. अभिजात संस्कृत पुराणकथांची संवादी अशी लोकभाषेतील पुराणे आहेत. अनेकदा प्रचलित व सुप्रतिष्ठित पुराणातील संकल्पनांना व कथांना छेद देणाऱ्या कथा विविध जातिजमातींच्या पुराणांतून दिसतात. जातपंचायतीचे न्यायनिवाडे करणारे नियम त्या त्या जातिजमातीत परंपरेने चालत आलेले असतात. त्यांच्या मौखिक परंपरा असतात. एकापरीने ते त्या त्या समाजाचे, समाजशासनाचे नियम असलेल्या ‘स्मृति’ असतात. क्वचित त्यांची लिखित बाडे असतात. लोकसंस्कृतीच्याच नव्हे, तर एकूणच भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांचे या सर्व साधनांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. येथील संस्कृतीची  गुंतागुंत उलगडण्यासाठी ही अत्यंत महत्वाची साधने आहेत. औद्योगिकीकरणाच्या व शहरीकरणाच्या प्रक्रियेत ही साधनेही लुप्त होत चालली आहेत. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपल्या गावगाड्याबाहेर या पुस्तकाच्या शेवटी  मांग जमातीमधील ‘बसवपुराण’ नावाच्या एका जातिपुराणाची संहिता छापलेली आहे. त्यातून भारतीय समाजाच्या भौतिक विकासातील कोडी सोडवण्यासही मदत होईल. अशी अनेक अलक्षित पुराणे सर्वदूर आहेत.


इष्ट ते साध्य करण्याचे व त्याचबरोबर अनिष्ट-निवारणाचे, रोगराई दूर करण्याचे अनेक मंत्र लोकभाषेत देवऋषी, भगत यांच्या परंपरेत आहेत. सर्वसामान्यांच्या रूढीतही असे लोकमंत्र आजही प्रचलित आहेत. ते समाजातील उच्चस्तरीय समजल्या जाणाऱ्या पांढरपेशा समाजातही आहेत. बालकाची दृष्ट काढतांना बायका जे पुटपुटतात तो एक लोकमंत्रच आहे. झोपताना उच्चारला जाणारा ‘अस्तिक-स्मरण’ हा लोकमंत्रच आहे. मंगळागौर पुजताना नववधू पुटपुटते, तो लोकपरंपरेने आलेला मंत्रच आहे. इच्छित प्राप्तीसाठी उत्कटपणे ताललयबद्ध शब्दसंहतीचे पुन्हा पुन्हा निष्ठेने उच्चारण करणे हे मंत्रलक्षण वरील सर्व उदाहरणांत आढळते. यावरूनही लोकसाहित्य म्हणजे केवळ ग्रामीण, खेडवळ व जुन्या लोकांचे साहित्य नव्हे, हे लक्षात येईल.

प्रत्येक प्रगत संस्कृतीची मुळे लोकसंस्कृतीत असतात आणि लोकपरंपरेचे अनेक अवशेष प्रगत अवस्थेतही विद्यमान असतात, याचे भान लोकसाहित्याच्या चिकित्सक अभ्यासातून येते.

लोकसाहित्याच्या शब्देतर परंपरेतीलही लोकरूढी, चालीरीती, व्रताचार, विधिविधाने, तोडगे यांचा विचार केला जातो. त्या परंपरेची अनेक रूपे आधुनिक जीवनसरणीतही आढळतात.

लोककलांपैकी प्रयोगात्म लोककलांचा विचार अनेकदा होतो. मात्र हस्तकलांचा पद्धतशीर अभ्यास जितका व्हायला हवा तितका भारतीय अभ्यासकांनी अद्याप केलेला नाही. अलीकडे त्याचे भान येऊ लागले आहे. सर्व लोककलांचा उगम यातुधर्मातील श्रद्धेशी निगडित असल्याने सर्व भारतीय पारंपरिक कला धर्मश्रद्धेशी आजही बांधलेल्या आहेत.

मात्र लोकक्रीडी, लोकवैद्यक व लोकज्योतिष यांचा भारतीय संदर्भातील अभ्यास व संशोधन अजूनही अलक्षित व उपेक्षित आहे.

भवाळकर, तारा

भारतीय लोकसाहित्य: भारतीय लोकसाहित्याला प्राचीन व समृद्ध अशी वैविध्यपूर्ण परंपरा आहे. या लोकसाहित्याची मुळे प्राचीन वैदिक वाङ्‌मयात आढळतात. व्यक्तीच्या जन्मापासून अंत्यविधीपर्यंत जे प्रमुख धर्मविधी व संस्कार आहेत, त्या प्रसंगी गायिली जाणारी गाणी सर्व भाषांमध्ये आहेत. मृत्युप्रसंगी म्हणवयाची सूक्ते ऋग्वेदात आहेत. तशीच काही आदिवासी जमातींतही अंत्यविधि-गीते आहेत. गुप्तपूर्व काळातील काही भारतीय लोकगीते चिनी भाषांतराच्या रुपाने जतन करून ठेवली आहेत. ए. एल्. बाशम यांच्या द वंडर दॅट वॉज इंडिया मध्ये असे काही निर्देश आढळतात. रामायण, महाभारत, पुराणे यांतील कथांचे प्रादेशिक, स्थानिक वैशिष्ट्यांसह रुपभेदात्मक आविष्कार सर्वच भाषांत आढळतात. भारतातल्या निरनिराळ्या प्रदेशांतल्या लोकवाङ्‌मयात साधारण तीन प्रकारचे मूलबंधात्मक विषय पुनरावृत्त झालेले दिसून येतात : (१) हर-गौरी (शिव-पार्वती) विषय – या कथांतून शिव हा आदर्श पती व कुटुंबप्रमुख म्हणून वर्णिलेला असतो. भौतिक साधसंपत्तीविषयीचे पराकोटीचे दारिद्र्य व त्यावर केलेली मात, त्यात जपलेला स्वाभिमान, विवाहसंस्थेचे पावित्र्य व बंधन, कौटुंबिक प्रेमसंबंधातील प्रतिष्ठा, पत्नीचे निष्कलंक चारित्र्य अशा प्रकारचे आदर्श चित्रण निरनिराळ्या भाषांतल्या शिव-पार्वतीविषय लोककथांतून आढळते. (२) राधा-कृष्ण हा विषयही वेगवेगळ्या भारतीय भाषांमधल्या लोकसाहित्यात पुनरावृत्त झालेला दिसतो. सामाजिक बंधनांपलीकडचे आत्मिक, आध्यात्मिक प्रेमसौंदर्याचे अद्‌भुतरम्य चित्रण त्यात आढळते. (३) राम-सीता हा विषयही भारतीय लोकसाहित्यात समान मूलबंध म्हणून पुनरावृत्त झालेला दिसतो. पत्नीचे पतीवरील, भावाचे भावावरील, मुलाचे पित्यावरील, मित्राचे मित्रावरील आद्रर्श प्रेम आणि निष्ठा यांची चित्रणे अशा कथांतून आढळतात. आदर्शांचे गोडवे गायिलेले असतात. आदर्श राजाच्या ठायी असलेले शौर्य, वीरवृत्ती, त्याग, धोरोदात्तता, आत्मसंयम हे गुण व कर्तव्यभावना यांचा परमोत्कर्ष अशा लोकसाहित्यात आढळतो. नीतिमूल्ये व सदाचरण यांचे आदर्श चित्रण आढळते. रवींद्रनाथ टागोरांनी लोकसाहित्यावरील आपल्या एका लेखात हे तीन मूलबंधात्मक विषय व त्यांमगाच्या मूल्यसंकल्पना विशद केल्या आहेत. ह्या लोककथांतून व्यक्तिमनावर ठसवल्या जाणाऱ्या मूल्यकल्पना, बोधकथांमागचे बोधवादी तात्पर्य, म्हणी-वाक्‌प्रचारांतले व्यावाहारिक शहाणपण व चातुर्य, लोकगीत-संगीतातील लयतालबद्धता, लोकमानसाचा समूहाविष्कार आणि त्या आविष्कारातला सरळ-साधेपणा व सहजस्वाभाविक सौंदर्य हा लोकसाहित्याचा अमोल ठेवा आहे व ह्या गुणवैशिष्यांतच भारतीय लोकसाहित्यातल्या सर्व प्रादेशिक भाषाविष्कारांमधला समान व सामाईक दुवा शोधावा लागेल.

भारतातल्या प्रमुख भाषांमधल्या लोकसाहित्यात लोकसंस्कृतीचे काही समान घटक आढळतात. सर्व भाषांमधल्या लोकसाहित्यात व्यक्तिजीवनातल्या विविध टप्प्यांवरच्या विधी-संस्कारप्रसंगांची गीते, श्रमपरिहारार्थ गायिली जाणारी रंजनपर गीते, सण-उत्सवांशी निगडित विधिगीते व ऋतुगीते हे प्रकार विविध व विपुल प्रमाणात आढळतात, त्याचप्रमाणे लोककथांचे अनेकविध प्रकार आढळतात, तसेच सामाजिक संदर्भ असलेली लोकनाट्ये आढळतात. जनसामान्यांची कल्पकता  व चातुर्य ज्यांतून व्यक्त होते अशा म्हणी, उखाणे, कूटप्रश्न हाही लोकसाहित्याचाच एक आविष्कार आहे.

लोकगीते : आसामी भाषेतील बिहू गीते ही इतर प्रांतांतल्या नववर्षाच्या आगमनानिमित्त गायिल्या जाणाऱ्या गीतांशी साधर्म्य दर्शवितात. बंगाली तुसू गीते, हिंदी फाग (फाल्गुम) गीते, पंजाबी तिजा गीते, तमीळ तिरुविळअपात्तु ही वेगवेगळ्या प्रांतांतील प्रमुख सण-उत्सवपर गीते होत. धर्मविधीचा एक भाग म्हणून गायिली जाणारी लोकगीते हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे व त्यात प्रत्येक प्रदेशातल्या वैशिष्ट्यपू्र्ण लोकसंस्कृतीनुसार वेगळेपणा व वैविध्य आढळते. भारताच्या अनेक प्रदेशांत प्रचलित असलेल्या लोकधर्मामध्ये कालीपूजेला विशेष महत्त्व आहे. केरळ, बंगाल आणि आसाम राज्यांत हे विशेषेकरून आढळले. काली ही वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी लोकदेवता आहे. आई किंवा सितली  (आसाम), अम्मन किंवा मरीअम्मन (केरळ व तमिळनाडू), महारा‌‌‌‌‌‌‌ष्ट्रात आई, अंबाबाई, गौरी इत्यादी. ‘देवी’ ही एक साथीच्या रोगाशी संबंधित देवता आहे व ह्या रोगनिर्मूलनासाठी धार्मिक विधिगीते गायिली जातात. वेगवेगळ्या ऋतुमानांतील नैसर्गिक बदलांमुळे लोकमानसात जी परिवर्तने घडून येतात, त्यांची भावपूर्ण वर्णने करणारी ऋतुगीते सर्वत्र आहेत. पेरणी, कापणी अशा कृषिकर्मांच्या वेळी जो आनंद व उल्हास शेतकरीवर्गात असतो, तोच लोकगीतांचे रुप घेऊन प्रकट होतो. अशी कृषिगीते भारतातल्या सर्व भाषांत आढळतात. श्रमिक लोक काम करताना श्रम हलके व्हावेत म्हणून गाणी गातात. प्रत्येक प्रदेशात ती वैशिष्ट्यपूर्ण असतात व त्यांत विविधताही मोठ्या प्रमाणात आढळते. बंगालमध्ये मैसाल, तमिळमध्ये तोळिलपा्टटू, सिंधीमध्ये हमरको आणि वलारो यांचे उदाहरणादाखल उल्लेख करता येतील.


जनसमुदायाच्या मनोरंजनार्थ काही लोकगीते व लोकनाट्ये रचली व सादर केली जातात. मलयाळम् कईकोट्टिकळ्ळी, आसामी गरखिया गीत, तमिळ कोलाट्टम्, ओडिया चिताकुटा गीत ही काही लक्षणीय उदाहरणे होत. नद्या, तलाव, समुद्र यांच्या सान्निध्यातील प्रदेशांत नौकागीते व कोळीगीते विपुल प्रमाणात आढळतात. आसामी नावखेलर गीत, मलयाळम् वंचिपाटटू, गुजराती अबवाणी वा भामणी हे उल्लेखनीय प्रकार होत. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत लग्नगीतेही विपुल व विविध प्रकारची आढळतात. ती विवाहाच्या वेगवेगळ्या विधींच्या प्रसंगी गायिली जातात. कित्येक गाणी केवळ मनोरंजनार्थ असतात. प्रत्येक भाषेत अशा लग्नगीतांची उदाहरणे आहेत. मलयाळम्‌मध्ये वातील तुर अप्पाट्‌टू, काश्मीरीमध्ये वनवुन, उर्दूमध्ये जलवा गीते, तेलुगूमध्ये विट्याळ वारी पाटलु, तमिळमध्ये कल्याण-अप्पाट्‌टू यांचे उदाहरणादाखल निर्देश करता येतील. आसामीमध्ये लग्नगीतांच्या ह्या वर्गाला ‘विया-नाम’ अशी संज्ञा आहे. काही ठिकाणी  लुटुपुटूची बेडकांची लग्ने लावून त्यांची लग्नगीतेही गायिली जातात. त्यामुळे पाऊस पडतो, अशी लोकश्रद्धा आहे. इतिहास-पुराणांत शौर्य गाजवणाऱ्या वीरपुरुषांच्या गाथा व पोवाडे सर्व भाषांत आढळतात. थंडीच्या दिवसांत शोकोटी पेटवून त्याभोवती समूहाने जमून गप्पागोष्टी करणे, गाणी म्हणणे ही प्रथा खेडोपाडी आढळते. अशा वेळी जी कथा सांगितली जाते, ती बहुधा गीतात्मक असते. काश्मीरी लोकगीतांमध्ये हा प्रकार विशेषत: आढळतो. धार्मिक आशयाच्या बंगाली बाऊल गीतांमध्ये व काश्मीरी वातसुन गीतांमध्ये सांगीतिक गुणवत्ता विशेष आढळते. लोकगीतांमधल्या लयतालाचा प्रभाव लिखित स्वरुपाच्या नागरकाव्यामध्ये पडलेला दिसून येतो.

लोककथा : भारतातील लोककथांचा वारसाही खूप समृद्ध आहे. भारतीय लोककथांच्या आधारेच गुणाड्याची यृहत्‌कथा (बड्डकहा),बोद्ध जातककथा, जैन धम्मकहा, सोमदेवाचा कथासारित्सागर, दंडीचे दशकुमारचरित, विष्णुशर्म्याचे पंचतंत्र व हितोपदेश इ. कथा-संकलने तयार झाली. शिवाय रामायण, महाभारत, पुराणे यांतही मौखिक परंपरेतून आलेल्या अनेकविध लोककथा अंतर्भूत आहेत. भारतातल्या आदिवासी जमातींतही वैशिष्ट्यपूर्ण लोककथा विपुल प्रमाणात आहेत. लोककथांना सांस्कृतिक महत्त्व असते. या कथा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात व सर्वदूर प्रसृत होतात. ‘लोककथा’ या व्यापक संज्ञेखाली लहान मुलांच्या परीकथा, अद्‌भुतरम्य कथा, बोधकथा, प्राणिकथा, मिथ्यकथा, आख्यायिका, धार्मिक कहाण्या व व्रतकथा आदींचा समावेश होतो. भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांतल्या लोकसाहित्यात ह्या सर्व प्रकारच्या कथा विपुल प्रमाणात आढळतात. प्रत्येक भाषेच्या लोकसाहित्यात सृष्टीच्या निर्मितीविषयीच्या मिथ्यकथा, तसेच प्राणी, वृक्ष, वेली, देवदेवता यांविषयीच्या मिथ्यकथाही मोठ्या प्रमाणात आढळतात. आख्यायिकांचे प्रमाणही विपुल आहे. बंगालमधील अकराव्या शतकातील राजपुत्र गोपीचंत्राची आख्यायिका प्रसिद्ध आहे. गोरखनाथ व मच्छिंद्रनाथ यांच्या आख्यायिका तर भारताच्या उत्तर प्रदेशाच्या सीमा ओलांडून नेपाळ व तिबेट येथेही पसरल्या आहेत.

व्रतकथा हा प्रकार भारतात खेडोपाडी सर्वत्र रुढ आहे. मूळ संस्कृत व्रतकथांवर या लोककथा आधारित असतात. उदा., सत्यनारायण व्रतकथा. व्रतकथा या देवदेवतांच्या उपासन, सणउत्सवांची व्रतवैकल्ये यांच्याशी संबंधित असतात. ह्या व्रतकथा ग्रामीण भागांतील स्त्रियांमध्ये विशेषेकरून प्रचलित आहेत. कुमारिका, नववधू व विवाहित स्त्रिया यांच्यासाठी निरनिराळी व्रतवैकल्ये व त्या व्रतांच्या पारंपारिक कथा आहेत. ह्या व्रतकथा जरी गद्यात असल्या तरी त्यांत अधूनमधून मंत्रश्लोकांची पद्यमय पारखण असते. त्यांचे पठण पारंपारिक पद्धतीने सूत्रबद्ध रीत्या केले जाते. कित्येकदा एका कथेत दुसरी उपकथा गुंफलेली असते व अशा रीतीने त्यांची साखळीच तयार होते. ह्या व्रतकथांतून नैतिक मूल्ये व शाश्वत सत्ये यांचे दर्शन घडते व त्यामुळे त्यांना सांस्कृतिक आशय लाभलेला असतो. सत्यनारायण कथा, व्रतकथा, शिवरात्री व्रतकथा अशा काही प्रकारांत त्या व्रताची महती वर्णिलेली असते. त्यात उपवास, नैतिक शुद्ध आचरण यांवर भर असतो. मैथिलीमध्ये वटसावित्री व्रताच्या दिवशी वारीसती कथापठणाचा प्रघात आहे. व्रत केल्याने पुण्यप्राप्ती होते, पापाचा विनाश होतो. दुष्टांचा संहार होतो. इष्ट मनोकामनांची प्राप्ती होते असे तात्पर्य सांगणाऱ्या कथा आहेत, तर व्रताचे पालन न झाल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, असा इशाराही दिलेला असतो, उदा., नागपंचमीची व्रतकथा जीतीय (जीमूतवाहन) व्रतकथा इत्यादी . पुराणे व उपनिषदे यांतूनही काही व्रतकथा उगम पावल्या आहेत. मैथिलीमध्ये ‘मधुश्रावणी व्रतकथा’ नावाची कथांची मालिका आहे. नवविवाहितेने मधुश्रवणी व्रताच्या पहिल्या पंधरा दिवसांत ह्या पंधरा कथांचे पठण करावयाचे असते. कार्तिक मासात व्रतकथेचे पठण कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी नांदावी म्हमून केले जाते. ह्या व्रतकथा म्हणजे एका परीने नीतिवादी बोधकथाच असतात. लोकांच्या इच्छाकांक्षांचे मूर्त रुपही या कथांत प्रतिबिंबित झालेले असते. कुमारिकांना चांगला पती मिळावा, पतिपत्नींना विवाहसौख्य लाभावे, चांगली संतती निर्माण व्हावी, सुखीसमाधानी दीर्घ कौटुंबिक जीवन लाभावे, अशा मनोकामना ह्या व्रतकथांतून व्यक्त झालेल्या दिसून येतात. कार्तिक महिन्यात हरिसन व्रतकथांचे पठण केले जाते. काही व्रतकथा काव्यात्म सौंदर्याने, वाङ्‌मयीन गुणांनी युक्त असतात. उदा., सपत-विपत (संपत्ती-विपत्ती) व्रतकथा ही नलदमयंतीच्या आख्यानावर आधारलेली असूनती चैत्र मासात पठण केली जाते.  दुसाध या दलित जमातीच्या साल्हेआ देवतेची व्रतकथाही अशाच स्वरुपाची आहे.

भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पारंपारिक कथाकथकांच्या व्यावसायिक जमाती आहेत. कथा सांगून जनसमुदायाचे मनोरंजन करीत गावोगाव भटकणे हा त्यांचा परांपरागत व्यवसायच आहे. पण आधुनिक जीवनसरणीमध्ये मनोरंजनाची आधुनिक तंत्रसाधने उपलब्ध झाल्याने आश्रयदात्यांच्या अभावी हा व्यवसाय नामशेष होत चालला आहे.

लोकनाट्य: लोकनाट्ये ही विविध ऋतूंतील विधी व उत्सवांतून निर्माण झाली. खेड्यातील देवालयांच्या मंडपात, रस्त्याकडेच्या मोकळ्या आवारात वा पटांगणात लोकनाट्यांचे खेळ केले जातात. लोकनाट्याला लिखित संहिता नसते. त्यातील संवाद व कृती ह्या बव्हंशी उत्स्फूर्त असतात. ते संवाद मौखिक परंपरेतून आलेले असतात व कल्पनेने आठवून म्हटले जातात. त्यांना कित्येकदा मौखिक परंपरेतील कंठसंगीताचाही जोड असते. बंगालमधील ‘कृष्णयात्रा’ ही प्राचीन लोकनाट्ये अद्यापही प्रचलित आहेत. ⇨ बंगाली जात्रा हे त्यांचे आधुनिक रुप होय. तमिळ तेरुक्कुटटू, कन्नड यक्षगान व वयलाट, आसामी अंकियानाट, आंध्रमधील कुरवंजी, पंजाबमधील रास व नकल, मलयाळम्‌धील काक्कारिशी, गुजरातमधील ⇨ भवाई, महाराष्ट्रातील ⇨तमाशा हे भारताच्या विविध प्रांतांतील लोकनाट्यांचे प्रमुख प्रकार होत. मध्य प्रदेशातील लोकनाट्य ‘माच’ म्हमून ओळखले जाते. प्रारंभीच्या लोकनाट्यांचे विषय महाकाव्ये, पुराणे यांतून घेतलेले असत व त्यांना धार्मिक आशय असे. ही लोकनाट्ये धार्मिक उत्सवांतून सादर केली जात. पण पुढेपुढे त्यांतील धार्मिकता लोप पावत जाऊन त्यांना लौकिक स्वरुप प्राप्त होत गेल्याचे दिसून येते. आधुनिक बंगाली जात्रांमधून विविध प्रकारचे विषय हाताळले जातात.


म्हणी व उखाणे : म्हणी व वाक्‌प्रचार, तसेच कोडी व उखाणे हा भारतीय लोकवाङ्‌मयाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणींमधून जनमानसाचे चातुर्य व शहाणपण मोजक्या सूत्रबद्ध वा काव्यमय पंक्तींतून व्यक्त होते. लोक आपल्या नेहमीच्या बोलण्यात सहजपणे म्हणी व वाक्‌प्रचार वापरतात. त्यांत जनजीवनातील सार्वत्रिक अनुभवांचे सारसत्त्व आळून आलेले असते. त्यांत मोजक्या शब्दांत मार्मिक सत्ये प्रकट केलेली असतात. असे अनुभव समान संस्कृतीच्या पातळीवर अनेक लोकांना आलेले असल्यामुळे जगभर निरनिराळ्या लोकसमूहांत एकाच अर्थाच्या म्हणी सापडू शकतात. भारतातही प्रांतोप्रांतींच्या समान म्हणींचा एकत्रित विचार केल्यास काही सामान्य अनुमाने काढता येतात. बऱ्याचशा म्हणी हवामानावर आधारलेल्या असतात. पावसाची नक्षत्रे व त्यावर आधारलेला शेतकऱ्याचा सामान्य अनुभव हा सर्वत्र समान असल्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या म्हणींमध्येही सारखेपणा आढळतो. उदा., उत्तरा नक्षत्राविषयी निरनिराळ्या प्रदेशांत निर्माण झालेल्या पुढील म्हणींत साधर्म्य आढळते: (१) वरस लगे ऊतरा, अन्न व खावै कूतरा (उ.प्र.), (२) जो वरसे ओत्रा, तो धान नही खाय कुत्रा (गुजरात), (३) पडतील उत्तरा, तर अन्न न खाय कुत्रा. ‘एका हाताने टाळी वाजत नाही’ या म्हणीचा उगम ‘न ह्येकेन हस्तेन तालिका सम्पद्यते’ या चाणक्याच्या उक्तीत असून ही म्हण बहुतेक भारतीय भाषांत आढळते. ‘सुनेच्या हातून भांडे फुटले तर ते सोन्याचे सासूच्या हातून फुटले तर मातीचे’ या म्हणीचे पर्याय कानडी, गुजराती, तेलुगू व हिंदी या भाषांत सापडतात. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या म्हणीचा गुजराती पर्याय असा –‘उपाडी जीभने लगाडी तालवे’. अशा रीतीने समान समाजसंस्कृतीतील म्हणींचे वेगवेगळ्या भिन्नभिन्न भाषिक प्रदेशांत समानार्थी प्रचलन आढळते.

भारतात लोकोक्ती वाङ्‌मय फार प्राचीन असून ते आशयाने परिपूर्ण व साहित्यगुणांनी नटलेले आहे. त्यात भारतीय प्रज्ञेचे प्रगल्भ रुपदिसते. ‘सूक्तिवाङ्‌मयाने वा सुभाषितांनी भारताने अद्वितीय आदर्श निर्माण करून जागतिक वाङ्‌‌मयाला कायमचे ऋणी करून ठेवले आहे’,असे विंटरनिट्झ यांचे मत दुर्गा  भागवतांनी नोंदवून ठेवले आहे. ऋग्वेदातही वाक्यप्रचारांचा वा सूक्तींचा आढळ होतो. ‘चक्षुर्वैसत्यम्’ हा वाक्‌प्रचार बृहदारण्यकात आला आहे व तो भारतात सर्वत्र रुढ आहे. रामायण, महाभारत या ग्रंथांतही अनेक लोकोक्ती-सूक्ते व सुभाषिते-आढळतात. ‘तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले’ –  हा वाक्‌प्रचार कथासरित्सागरातल्या एका कथेवरून आला आहे. कोडी वा कूटप्रश्न आणि उखाणे यांना पारंपारिक भारतीय समाजजीवनात विधिविधानात्मक मोलही आहे. विवाहप्रसंगी वधू-वरपक्ष एकमेकांना कोडी व उखाणे घालतात. छोटा नागपूरमधील ओराओं जमात, बाउरीसारख्या अनुसूचित जमाती व बंगालमधील हिंदू यांच्यात अजूनही ही प्रथा आहे. ह्याखेरीज मृत्युविषयक कूटप्रश्नही आहेत. महाराष्ट्रात तसेच भारताच्या इतर भागांतही त्यांचे प्रचलन आहे. गूढ व आध्यात्मिक कूटप्रश्नांचा उगम प्राचीन वैदक वाङ्‌मयात आढळतो. मब्ययुगीन भारतीय वाङ्‌मयातही गूढ व आध्यात्मिक कूटप्रश्न आढळतात. धर्मामधल्या गूढ कल्पनांची अभिव्यक्ती ही कित्येकदा कूटप्रश्नांद्वारा केली जाते. त्यामुळे त्या विचारातली गूढात्म अनुभूती जतन केली जाते. महाभारतात यक्षाने धर्मराजाला अनेक अवघड कूटप्रश्न विचारले व धर्माने त्यांची समर्पक उत्तरे दिली, असा उल्लेख आहे. महायान बौद्ध संप्रदायातील कूटप्रश्न, तसेच बंगालमधील प्राचीन व मध्ययुगीन काळातील नाथ संप्रदायाचे कूटप्रश्न हे रुपकात्मक भाषेत धर्मत्तत्वांचा प्रसार करण्यासाठी रचले गेले.

भारतीय लोकसाहित्यात पारंपारिक समाजजीवनाचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. स्त्रियांची विविध रुपे त्यातून आविष्कृत झालेली दिसून येतात. नववधू, सासू, सून, आई, बहीण, नणंद, भावजय, जाऊ अशी स्त्रीची विविध रुपे पारंपरिक लोकसाहित्यात आढळतात. सासूसून, नणंद-भावजय ही नाती सामान्यत: विरोधात्मक असतात. आई, बहीण यांचे चित्रण उदात्त व प्रेमळ असे असते. लोकसाहित्यात इतिहासाचे कणही विखुरलेले असतात. ‘पन्हाळ दुर्गी राजा भोज’ अशी एका मराठी लोककथेची सुरुवात आहे. मोगल सत्तेच्या जुलमी व अन्यायी राजवटीचे चित्रणही काही लोकगीतांतून आढळते. उदा., मोगलांच्या हिंदू स्त्रियांवरील अत्याचारांचे चित्रण कुसुमावतीच्या एका गीतात आढळते. राजस्थान, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल इ. प्रदेशांतील अनेक वीरगाथा ऐतिहासिक सामग्री उपलब्ध करून देतात. मराठी ओवीवाङ्‌मयात इंग्रजी सत्तेखालील राज्यातल्या विपरीत परिस्थीतीची प्रभावी चित्रणे आढळतात. भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांतल्या भौगोलिक स्थितीची निदर्शक अशी भूवर्णनेही लोकवाङ्‌मयात येतात. गंगा, यमुना, शरयू, शोण इ. नद्या काशी, प्रयाग, अयोध्या, जनकपूर इ. स्थळे ह्यांचे निर्देश आढळतात. वेगवेगळ्या प्रदेशांतील पारंपारिक पोषाख व वेशभूषा यांचेही दर्शन त्या त्या भाषांतल्या लोकवाङ्‌मयात घडते. रंगांचे वैविध्य व वैचित्र्य आढळून येते. उदा., भोजपुरी लोकगीतांमध्ये लाल व कुसुंबी हे रंग विशेषत्वाने येतात. पंजाबी स्त्रीला आसमानी रंगाचा घागरा विशेष आवडतो, असे लोकगीतांतल्या वर्णनांवरून जाणवते. लोकसाहित्यातील वृक्ष, वेली, फळे, फुले यांचे निर्देश भारतीय प्रकृती-संस्कृतीला साजेसे, अनुरुप असतात. आंबा, डाळिंब, महुआ, लिंब हे वृक्ष लोकजीवनाचे सहचर होत. लोकसाहित्यात जनमानसाच्या धार्मिक भावनाही प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. गंगा व तुळस या भारतीय स्त्रीच्या आदर्श देवता होत. त्यांचे उल्लेख सर्वत्र आढळतात. मराठी लोकसाहित्यात पंढरपूर व विठोबा यांविषयीची श्रद्धा प्रकर्षाने प्रकटलेली दिसून येते.लोकसाहित्यातून सामान्यत: नैतिकता, श्रद्धा, सदाचरण आणि जनकल्याणाची, विश्वमंगलाची कामना यांचे चित्रण आढळते.

भारतातील वेगवेगळ्या भाषांमधल्या लोकसाहित्यात काही भिन्नत्वदर्शक वैशिष्ट्येही आढळतात. उदा., सर्व भारतीय भाषांमधल्या लोकसाहित्यात प्रेम हा समान विषय आहे. फक्त मराठीतच त्याचा काहीसा अपवाद आढळतो. हे वैशिष्ट्य दुर्गा भागवतांनी निदर्शनास आणून दिले आहे. आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी यांसारख्या इंडो-आर्यन भाषांमध्ये राधा-कृष्ण हा विषय प्रकर्षाने आढळतो पण दक्षिण भारतीय भाषांमधल्या लोकसाहित्यात त्याचे फारसे प्रचलन नाही. केरळमध्ये ख्रिस्ती व ज्यू उगमापासून निर्माण झालेले लोकसाहित्य विपुल आढळते इतर प्रांतांत मात्र ते फारसे आढळत नाही. मुस्लिम प्रभाव बंगाली, मलयाळम् व उर्दू लोकसाहित्यात आढळतो.

इनामदार, श्री. दे.


मराठी लोकसाहित्य : मराठी शाब्द लोकसाहित्याचे म्हणजे लोकवाङ्‌मयाचे ⇨ कहाण्या, लोककथा, ⇨म्हणी व वाक्‌प्रचार, ⇨ उखाणे व कोडी इ. प्रकार गद्य विभागामध्ये येतात. ओव्या, गीते, खेळांची गाणी  यांची आवड प्रमुख्याने स्त्रियांमध्ये आढळते. विविध प्रसंगी, उदा., जात्यावर बसून दळण दळत असताना, तसेच झोपाळ्यावर बसून झोके घेत असताना स्त्रिया ज्या ओव्या गातात त्यांतून त्यांच्या समजुती, चालीरीती, वैयक्तिक सुखदुःखे आणि एकूणच स्त्रीजीवनातील अनेक बारकावे यांचे प्रभआवी दर्शन होते. ओव्यांचा फार मोठा भाग कौटुंबिक ओव्यांनी सजलेला असून त्यांतून सासर-माहेर यांबद्दलचा जिव्हाळा व्यक्त झाला आहे.  उदा.,

पिवळा पितांबर मला पुशितो सारा गाव  

पिता दौलत राजस म्या ग लुटीला बाजीराव 

माडीवर ग माडी सये सासर मामाजीची 

उभी राहून पहाते मी लंका तिथून म्हायाराची 

काळी चंद्रकळा निरी पडली शंभर 

लेक कुणाची तालीवार 

अशा हौसेमौजेच्या गोष्टी करणाऱ्या ओव्यांबरोबरच मातृप्रेम, बंधुप्रेम, जातकुळीचा अभिमान, देवावरील भक्ती इ. भावनांचा आविष्कारही ओव्यांतून प्रभावीपणे प्रकट झाला आहे. जात्याच्या साथीवर महाराष्ट्रातील खेड्यांमधून अद्यापही ओव्या म्हटल्या जातात. तसेच चैत्रगौरी, नागपंचमी, गर्भाधान, डोहाळे यांच्या निमित्ताने झोपाळ्यावरील गाणी म्हणण्याची प्रथा अजूनही महाराष्ट्रामध्ये आढळते. केवळ पुरुषांनी जोपासलेला असा एक ओव्यांचा प्रकार म्हणजे धनगरी ओव्या. त्यांचे दोन प्रकार आहेत. धनगर आपल्या शेळ्या रात्री शेतात बसवतात त्यावेळी ज्यो ओव्या म्हणतात, तो एक प्रकार. मल्हारी-मार्तंड, मंगाई अशा दक्षिण महाराष्ट्रातल्या पूज्य दैवतांसंबंधीच्या ह्या ओव्या आहेत. दुसऱ्या प्रकारच्या ओव्या ह्या काही जत्रांच्या वेळी म्हटल्या जातात. उदा., पदुबाईची जत्रा आणि तुळजापुरची जत्रा. त्या त्या जत्रेशी संबंधित असलेल्या दैवतांना जागृत करण्यासाठी ह्या ओव्या म्हटल्या जातात.

नाच ग घुमा । कशी मी नाचू ।।

– हे सूप नाचवीत म्हटले जाणारे स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचे गीतही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

या गावच्या त्या गावच्या । सोनार नाही आला ।। 

माझ्या बाळाला। वाळा नाही दिला।। 

कशी मी नाचू

– ह्या गीतात सोनाराप्रमाणेच इतरही व्यावसायिकांचे उल्लेख येतात. हा विविध व्यवसायांची माहिती सांगणारा त्यातील भाग बारा वैत्यांची (बलुत्यांची) कल्पना देऊ शकेल असा आहे. प्रत्येक व्यवसायातील माणूस कारागीर म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात कसा येत गेला त्याचे सुंदर चित्रण या गीतातून झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतमळ्यांतून कामे करताना विहिरीच्या मोटेवरील अनेक समुदायिक गीते रचली. देवाबद्दलचा भक्तिभाव व सांस्कृतिक मनोभाव व्यक्त करणारी गाणी मोठ्या प्रमाणात आहेत. श्रीकृष्णाची गाणी लोकगीतांच्या खजिन्यात पुष्कळ आढळतात. याशिवाय नाविक गीते, कोळ्या-माळ्यांची गाणी इ. रचनाही आढळते. लोकगीतांमध्ये मानवी  मनाचे ऋणानुबंध जिव्हाळ्याने गुंफलेले आढळतात. 

बाबर, सरोजिनी

मराठी लोकसाहित्यात जन्म, विवाह, मृत्यू ह्यांसंबंधीची गीते आहेत. जन्मसंबंधीची गीते डोहाळ्यांपासून अंगाई गीतांपर्यंतच्या अनेक अवस्थांतरांचे चित्रण करतात. स्त्रीगीतांत स्त्री-वेदनेचा उद्‌गार असलेली गीते विशेष लक्षणीय आहेत. स्त्रीच्या वेदनेची कळ किती खोल आहे आणि तिचा परिसर किती व्यापक आहे, ह्याची कल्पना अशा गीतांतून येते. गर्भार सीतेचा त्याग करून तिला वनात सोडणाऱ्या रामाबद्दल कोण्या साध्याभोळ्या, अनक्षर, ग्रामीण स्त्रीने एका ओवीत काढलेले उद्‌गार उदाहरणादाखल देता येतील :

राम म्हणून राम नाही सीताच्या तोलाचा । 

हिरकनी सीताबाई राम हालक्या दिलाचा ।। 

पुरुषाच्या जातीला विंद्रावणाची उपमा देण्यात आली आहे. विंद्रावण किंवा इंद्रावण म्हणजे एक जंगली कडू फळ असते. पण ते दिसायला गोंडस असते. ह्या फसव्या जीव लावल्यामुळे

जीवाला जीव देऊन पाहिला । 

पाण्यातला गोटा अंगी कोरडा राहिला ।। 

– अशी स्त्रीची अवस्था होते.

कावळ्यानं कोटं केल. बाभूळवनामंदी । 

पुरुषाला माया थोडी, नारी उमज मनामंदी ।। 

सवतीवर मुलगी देणाऱ्या बापाला तीव्रपणे निषेध केलेला आहे :

लेकीचा जल्म जशी तांदुळाची गोणी । 

बाप विकून झाले वाणी ।। 

पत्नीला निष्कारण पीडा देणाऱ्या पतीचाही स्त्रिया निषेध करतात :

माऊलीच्या पोटी लेक जन्मला तरवड । 

लोकाच्या लेकराची त्यानं मांडली परवड ।। 

आई आणि बहिण ह्यांचा निषेध मात्र आढळत नाही. सासर आणि त्यातल्या त्यात सासू हे निषेधाचे मोठे लक्ष्य आहे.

भारतातल्या अन्य पारंपारिक स्त्रियांप्रमाणेच मराठी स्त्रियांनाही आपले मन मोकळे करता येईल, अशा जागा जवळजवळ नाहीतच. माहेरचे कौतुक सासरी केलेले रुचत नाही आणि सासरचा त्रास माहेरी सांगणे हा मर्यादाभंग ठरतो. अशी स्त्री मग जाते, उखळ, मुसळ, पाणवठा अशा आपल्या श्रमाशी अभिन्न असलेल्या निर्जीव वस्तूंनाच आपले सखे-सवंगडी बनवून त्यांच्यापाशी मन मोकळे करते.

काही गीतांमध्ये जगण्या-मरण्याबद्दलचा तात्त्विक विचार अगदी सहजपणे येऊन जातो :

शेजारणीबाई नको म्हणूस माझं माझं । 

नदीच्या पलीकडे जागा साडेतीन गज ।।

एकूणच भारतीय समाज प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. अशा समाजातील जीवन कुटुंबकेंद्री असते. ह्या व्यवस्थेतील श्रद्धांची आणि संकेतांची अनेक रुपे मराठी स्त्रीगीतांतून दिसतात. ह्या व्यवस्थेत कष्टांचा गौरव केला जातो. काम करणारी स्त्री सद्‌गुणी ठरते. त्यात तिला धन्यताही वाटते. इथल्या सर्वसामान्य माणसाचे ग्रामजीवन फारसे संपन्न नाही. पण ‘सोन्याचा करंडा बाई मोत्यानं गुंफिला’ असे स्वप्नरंजन खूप आहे.

दळण-कांडण, सडा-सारवण, शेताशिवारातली कामे, बाळाला जोजवणे ही मातृकर्तव्ये, कधी झिम्मा-फुगडीसारख्या निमित्ताने क्रीडागीते, फेराची गाणी, व्रतवैकल्यांशी संबंधित गीते असा स्त्रीगीतांचा पसारा बराच आहे. स्त्रीगीतांचा बराचसा भाग जात्यावरच्या ओव्यांनी व्यापलेला आहे. कृतिसंबद्धता हे लोकगीतांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य जात्यावरच्या ओव्यांतून विशेषत्वाने प्रत्यायाला येते. उदा.,

जात्या तू ईसवरा नको मला जड जाऊ । 

वयाच्या दुधाचा सया पहातात आनुभावु ।।

जात्याला ईश्वर म्हणताना आईच्या दुधामुळे बळ आल्याचा सार्थ अभिमान आढळतो. हे गाणे जात्यावर दळणाच्या कामाशीच बांधलेले आहे.


जात्यावरच्या ओव्यांची चाल बहुधा शांत, संथ असते. गाणारीचा आवाजही फारसा चढा नसतो. कारण दळताना छातीवर ताण पडतो. दळण भरडा असले, तर उंच पट्टी आणि गतिमान चाल येते. हे सर्व जात्याच्या पाळ्याच्या गतीवर अवलंबून असते. दळता-कांडतानाची गाणी ही स्त्रीमनाच्या भआवभावनांची आत्मगत रुपे असतात. एखाद्या मंत्रासारखी ती एकाग्रतेने म्हटली जातात.

पारंपारिक व्यवस्थेत स्त्रीचे सारे आयुष्यच सासर – माहेराशी बांधलेले असते. तेव्हा तिथल्या माणसांभोवती भिरभिरणारे मनच गीतरुप घेते. माहेरची माणसे अधिक जवळची. आई, वडील, बहीण, भाऊ त्यांत अग्रक्रमाने येतात. स्त्रीमनात असलेला आईविषयीचा आदर तसेच कन्याजन्माचे कौतुकही स्त्रीगीतांतून आढळते. ‘लेकापरीस लेक कशानं झाली उणी ?’ असा प्रश्नही विचारलेला दिसतो. आई आणि बहीण ह्यांच्याबद्दल चुकूनही निषेध नाही. आदिम स्त्रीप्रधान संस्कृती आणि आर्यपूर्व मातृप्रधान समाजव्यवस्था ह्यांचे हे अवशेष असावेत, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

स्त्रियांनी रचिलेली काही लोकपुराणेही मराठीत आहेत. सीतेच्या जीवनावरचे अंकुशपुराण हे ह्याचे एक उल्लेखनीय उदाहरण. दक्षयज्ञात उडी घेणारी उमा-पार्वती, त्याचप्रमाणे द्रौपदी, सावित्री ह्यांच्याही पुराणकथा स्त्रियांनी रचिलेल्या आहेत.

भवाळकर, तारा

लग्नसमारंभ, हळदीकुंकू इ. समारंभांच्या निमित्ताने स्त्रिया पतीचे नाव उखाण्यांमधून घेतात. पतीपत्नींनी  एकमेकांचे नाव रोखठोक घेतले, तर त्यांचे आयुष्य कमी होते, ही ह्या उखाण्यांमागची भआवना आहे. ह्या उखाण्यांचे विविध प्रकार आढळतात. पतीचे नाव उखाण्यामधून घेताना, त्यामध्ये सुखी संसाराचे वर्णन कलात्मकतेने केलेले आढळते. खेड्यातील स्त्रियांचा उखाण अनेकदा लांबलचक असतो. त्यातून सुखी संसाराचे चित्र मोठ्या खुबीने गोवलेले आढळते. सुशिक्षित किंवा शहरी स्त्रियांचा उखाणा लहान असतो. उदा.,

कमळाच्या फुलावर बसले पक्षी … रावांच नांव घेते चंद्र-सूर्य आहेत साक्षी.

स्त्रियांच्या उखाण्यांखेरीज पुरुषांचेही उखाणे आढळतात. उदा., ‘मी होतो मळ्यात, सपान पडलं खळ्यात न् नवरत्नांचा हार कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात– हा उखाणा घालून एखादा शेतकरी बायकोच्या नावाचा उल्लेखही न करता ती सध्या कोल्हापूरला गेली आहे, हे सांगून टाकतो. फुगडी खेळताना उखाणे घालण्याची प्रथा आहे. एकमेंकींना प्रश्नोत्तरेही केली जातात. उदा.,

अरंड्यावर करंडा, करंड्यावर मोर 

माझ्यासंग फुगडी खेळती चंद्राची कोर

पहिली : केळं बाई केळं. राजेरी केळं 

            एवढी मोठी झालीस तरी, लग्न नाही केलं ? 

दुसरी : कोरा कागद, काळी शाई 

           माझ्या लग्नाची तुला ग काय घाई ?

 

“पांढरं वावर काळं बी, चतुर म्हणतो पेरीन मी ” अशी कोडी टाकून त्याचे उत्तर ‘लेखक’ असे देऊन शिक्षणाबरोबर लेखनाचेही महत्त्व पटवून दिले आहे.

मराठी लोककथांतून राजा-राण्यांच्या कथा अतिशय लोकप्रिय झाल्या. राजाच्या दोन राण्यांमधील आवडते-नावडतेपणा आणि नावडतीच्या लेकाने गाजविलेले धाडसी जीवन मराठी लोककथांमध्ये बहारीने रंगविलेले आहे. कर्तबगारीतून येणारे मोठेपण अत्यावश्यक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या कथांतून आढळतो. ‘कावळ्याचे घर शेणाचे, चिमणीचे घर मेणाचे’ ही कथा महाराष्ट्रात महानुभव कालापासून रुढ असून अद्यापही तिची लोकप्रियता टिकून आहे. निरनिराळ्या चांगल्या कल्पना कथेच्या निमित्ताने लोकांच्या कानावर घालून लोककथांच्या द्वारा पूर्वी सामाजिक नीतिशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात अआसे. मराठी लोककथेतील आवडीचा विषय म्हणजे गरीब व कर्तबगार मंडळींना आकस्मिक भेटणारा देव आणि त्याने घडविलेले अद्‌भुतरम्य दर्शन. संकटात सापडलेल्या माणसाची देवाने येऊन सुटका करावयाची, हे कथांत हमखास आढळते.

लोककथांची जोपासना ही प्रामुख्याने खेड्यातील शेतकरी कुटुंबांमध्ये होत असल्याने जनावरांच्या जीवनातील अद्‌भुत‌ चमत्कार, धनी व जनावरे यांचे परस्परांवरील प्रेम, पशुपक्ष्यांची मानवाशी झालेली मैत्री, त्यांची विलोभनीय कर्तबगारी इ. विषयांनी अनेक लोककथा रंगलेल्या दिसतात. राक्षसाच्या जीवनावरही काही लोककथा आढळून येतात. या कथांची भाषा ओघवती, साधी आणि घरगुती आहे. तिच्यात जिव्हाळा आहे केव्हा केव्हा ती  ओबडधोबड व रांगडी वाटली, तरी तिचे अंतरंग प्रेमळ आहे. सुटसुटीत लहान वाक्ये, वेचक व शेलके शब्द आणि चित्ताकर्षक वर्णनशैली हा मराठी लोककथेचा विशेष आहे. लोककथेचाच दुसरा प्रकार म्हणजे कहाण्या, काहाण्यांमध्ये गोष्टीरुपाने एखादे व्रत सांगून त्याचे माहात्म्य व तात्कालिक फलनिष्पत्ती सांगितलेली असते.

मराठी लोकसाहित्याच्या या सर्वच प्रकारांमधून समाजाचे अंतरंग, समाजाची भावना, लोकांच्या समजुती व चालीरीती, लोकांची  संस्कृती वगैरे गोष्टी निश्चित करता येतात. सहजस्फूर्तीने निर्माण झालेले हे लोकसाहित्य जीवनस्पर्शी असून जनमनाचा कानोसा घेणारे आहे. शब्दांनी साकारलेली दुनिया वाचकांच्या नजरेसमोर उभी करण्याचे सामर्थ्य ह्या साहित्यामध्ये असून, महाराष्ट्राची लौकिक परंपरा मराठी लोकसाहित्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मराठी भाषेतून व्यक्त झाल्याचे आढळते. दु:ख सांगतानादेखील त्यावर सौंदर्याचा मुलामा चढविणारे हे साहित्य आहे. अन्वर्थक उपमा-दृष्टांतांची त्यात खैरात आढळते.

महाराष्ट्रातील विविध भागांतील आदिवासींचेही लोकसाहित्य बरेच आहे. नाचाची गाणी, सणाची गाणी, लग्नाची गाणी अशी आदिवासींची अनेक गीते आहेत. जात्यावरच्या गाण्यांना ते ‘घरटीली’ म्हणतात. पावसाळ्यात पायाला घुंगरू बांधून पुरुष जो नाच करतात, त्याच्या गाण्यांपैकी एक असे :

पानी पड रामाचा रे । 

कुनब्याच्या कामाचा रे । 

पानी पड सिताचा रे । 

कुनब्याच्या हिताचा रे ।

आदिवासींच्या लोकगीतांमध्ये निसर्गाचे रसिकतेने केलेले निरीक्षण आढळते. लाक्षणिक शैलीने नटलेल्या ह्या गीतांत त्याच शब्दांची पुनरावृत्ती करून प्रासानुप्रासांचे संगीत निर्माण केलेले दिसते. उदा.,

तुझी किनार पिवळी दिसं 

हारू या जोड जोड या जोड  

आडवा धरुं व जोड या जोड 

   आडवा धरूं व येळ या वा जोड 

     आडवा धरुं व सर वा जोड . . . . 

आदिवासींना फुलांची फार आवड. कानांवर फुलांचे झुबके ठेवण्याची हौस पुरुषांना विशेष असते. कोणत्या रानात फुले मिळतील कुठे मिळणार नाहीत, हे सांगणारी गीते आहेत :

गाढवीच्या रानाला र फुलं नाही मिळ काना र 

मन देहेरच्या रानाला र मन फुलाचा झुबकल काना र

शिमग्याच्या सणात डांगी स्त्री-पुरुष रंग खेळतात त्याचे एक गाणे असे :

काळी निळी चोळी त्याला मोत्याला उंजल । मोत्याला उंजल । 

नको हरी रंग टाकू हाक भीजशी र ऽ 

नको हरी रंग टाकू तोडा भीजशी र ऽ 

नको हरी रंग टाकू नख भीजशी र ऽ 

सोनकोळ्यांचे मल्लारी देवाचे गीत प्रसिद्ध आहे :

हेऽऽपावलाय् रे देव मल्लारी । पावलाय् रे देव मल्लारी । 

रे पाव माज्या देवा मना मल्लारी ।। १ ।। 

देवा तुझी निगाली सवारी मल्लारी  ।। २ ।।.   इत्यादी. 

महादेव कोळ्यांच्या लग्नगीतांत खालील गीतासारखी अनेक गीते गातात :

तळ्यातल्या ग कापूरवेळी       तुह्या तोडील्या तारा 

गावदेवाला बोलावण करा       लग्न लावायाला चला 

लग्न लावती सुदळ होती         बामण मंगळ बोलती 

                                                                                                तळ्यातल्या ग कापूरवेळी        तुह्या तोडील्या तारा 

           मारवतीला बोलवण करा      लग्न लावायला चला . . . . 

निसर्ग आणि जीवन ह्यांतील त्यांना जाणवऱ्या समस्या त्यांच्या कथांतून प्रतिबिंबित होतात. तसेच आदिवासींच्या कथांमध्ये त्यांच्यातील देवताचार व लोकाचार यांसंबंधी माहिती मिळते. शिकार, ती करताना उद्‌भवलेली संकटे, रोजच्या जीवनातील सुखदु:खांचे प्रसंग, धार्मिक निष्ठा इ. गोष्टी सांगताना या कथांमधून चमत्कार नाट्यमय शैलीने सांगितलेले आढळतात. एखाद्या मध्यवर्ती घटनेभोवती साधीशीच कथा ते गुंफतात. जमातीच्या चालीराती, वेष, अंलकार, जादूटोणा इ. असंख्य विषयांवरील कथांप्रमाणेच मृत्युनंतर प्रेताचे दहन वा दफन कसे करावे, अशा प्रकारचे संस्कारविधी दर्शविणाऱ्या कथाही आढळतात.

बाबर सरोजिनी


लोकसाहित्याचा अभ्यास : परंपरा, नव्या दिशा, नवे संशोधन-लोकसाहित्य ही अभ्यासक व वाङ्‌मयेतिहासकार या दोघांकडूनही दीर्घकाळ उपेक्षित राहिलेली साहित्यशाखा आहे. शिवाय लोकसाहित्याची पू्र्ण व्याप्ती लक्षात न घेता केवळ वाङ्‌मयवाचक शाब्द रुपांवरच अधिक भर दिल्याने घोटाळे झाले आहेत. लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणवणाऱ्यांनीही लोकसाहित्याची व्याप्ती पूर्णपणे ध्यानात न घेतल्याने केवळ पारंपारिक कथा, गीते, फार तर म्हणी, उखाणे यांच्या संकलनपुतीच लोकसाहित्याची व्याप्ती गृहीत धरली जाते. फार तर स्त्रीगीतांचे प्रशंसापर, आस्वाद्य रुपच वर्णिले जाते. यापेक्षा अधिक चिकित्सा होत नाही.

भारतीय लोकसाहित्याच्या अभ्यासाचा पाया : भारतीय लोकसाहित्याचे वर्गीकरण व व्यासंगपूर्ण निर्देश प्राचीन काळापासून आढळतात. तोल्काप्पियनररचित ⇨तोल्काप्पियम् (इ.स.पू.सु. तिसरे शतक) या प्राचीन तमिळ व्याकरण व साहित्यशास्त्राविष्यक ग्रंथांत लोकसाहित्यांसंबंधीचे सर्वांत आद्य निर्देश आढळतात. त्यात लोकसाहित्याचे काही घटक व वर्गीकरण यांसंबंधी विवेचन करण्याचा प्रयत्न आढळतो. म्हणी, उखाणे, दैवतकथा, लोकगीते आदींच्या व्याख्या त्यात दिल्या आहेत.

भारतीय अभ्यासकांनी लोकसाहित्याचा अभ्यास पद्धतशीरपणे व जाणतेपणाने विसाव्या शतकात सुरु केला असला, तरी भारतविद्येचा अभ्यास जगाच्या पाठीवर आधीच सुरु झाला होता. भारतात इंग्रजी अंमस सुरु झाल्यावर ⇨ सर विल्यम जोन्स (१९४६-९४) यांनी संस्कृत भाषाध्ययनाच्या रुपाने तौलनिक भाषाशास्त्राच्या निमित्ताने भारतीय साहित्य व संस्कृती यांविषयी जागतिक अभियासकांमध्ये कुतूहल निर्माण केले. पाठोपाठ तौलनिक दैवतशास्त्र आणि तौलनिक आचारशास्त्र, इतिहास इ. विषयांकडे अभ्यासक आकर्षित झाले.

भारतीय संस्कृती, आचार, रुढी, दैवतकथा, भाषा यांच्या अभ्यासाला प्रारंभ यूरोपीय अभ्यासकांनी केला. त्यातून कलकत्ता येथे १७८४ मध्ये ⇨ एशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना झाली. विल्यम जोन्स हे १७८२ मध्ये कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून गेले होते. त्यांनी संस्थेचे मुखपत्रही सुरु केले होते व ते त्यातून आशियातील पुरातन कला, परंपरा, आचार विज्ञान, वाङ्‌मय यांवरील संशोधनपर लेखन प्रकाशित करीत असत. १८०४ मध्ये याच हेतूने मुंबईत ‘लिटररी सोसायटी’ ची स्थापना झाली. कर्नल जेम्स टॉड यांनी ॲनल्स अँटिक्विटीज ऑफ राजस्थान (२ खंड, १८२९-३२) हा ग्रंथ लिहून या क्षेत्रात पायाभूत कार्य केले.

रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना मुंबईतही झाली. संस्थेच्या इंडियन अँटिक्वरी या मुखपत्रातून लोकसाहित्यांतर्गत अनेक बाबींवर संशोधनपर लेखन प्रसिद्ध होत असे. प्रारंभी हे लेखन मानवशास्त्र व पुरावशेष (अँथ्रपॉलॉजी अँड अँटिक्विटीज) या विषयांखाली होत असे. भारतीय लोकजीवनाची व पुरातन मौखिक व लिखित साहित्याची अनेकांगांनी तपासणी करणारे हे लेखन होते. त्यात कथा-गाथांबरोबरच जादूटोणा, चेटूक, भुतेखेते, अंगात येणे, नरबलीप्रथा, प्राणी व वनस्पती यांच्या दैवतकथा, प्रर्वत, नद्या, सरोवरे यांच्या पूजा, जन्म-विवाह व मृत्युविषयक विधी, शपथा, प्रायश्चित्त अशा अनेक विषयांचा धांडोळा घेतला आहे. इंडियन अँटिक्वरी हे नियतकालिक १८७२ ते १९३३ या काळात चालू होते. या नियकालिकाने भारतीय लोकसाहित्याची बैठक पक्की केली. ते बंद पडल्यावर पुढे १९३८ पासून डॉ. प. कृ. गोडे यांच्या संपादकत्वाखाली न्यू इंडियन अँटिक्वरी नावाचे नियतकालिक पुणे येथून प्रकाशित होऊ लागले. पण तेही अल्पजीवीच ठरले.

यांखेरीज ‘बाँबे अँथ्रपॉलॉजिकल सोसायटी’ च्या (स्थापना १८८६) नियतकालिकानेही लोकसाहित्याभ्यासाला पोषक अशी कामगिरी बजावली. भारतीय लोकजीवनाच्या विविध अंगांचा मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे हा या संस्थेचा उद्देश होता.

अनेक आय्. सी. एस्. ब्रिटिश अधिकारी स्वत: या विषयात रस घेत. भारतातल्या वेगवेगळ्या जातिजमातींच्या चालीरीतींचे निरीक्षण करून भारतीय लोकसंस्कृतीचा मागोवा घेण्याचे कार्य त्यांनी केले. विविध  जातिजमातींविषयी माहितीपर पुस्तके त्यांनी लिहवून घेतली. सर रिचर्ड टेंपल, क्रुक, ए. एम्. टी. जॅक्सन, एन्थोवेन या आधिकाऱ्यांना भारतीय लोकजीवन व संस्कृती यांत विशेष रस होता. त्यांनी स्वत: लोकसाहित्याचा सूक्ष्म शोध घेतलेला दिसतो विशेषत: सर रिचर्ड टेंपल यांचे लेजंड्स ऑफ पंजाब (१८८३) हे पुस्तक महत्त्वाचे आहे. त्यांनीच लोककथांच्या संग्राहाची शास्त्रीय वर्गीकरणानुसार छाननी करण्याचे पहिले कार्य केले. हे वर्गीकरण आजही मार्गदर्शक ठरण्याजोगे आहे. भारतीय लोकसाहित्याच्या अभ्यासाला चालना देण्याच्या संदर्भात ⇨ सर जॉर्ज ग्रीअर्सन यांनीही मौलिक कामगिरी बजावली. भारताच्या सर्व प्रदेशांतील भाषिक सर्वेक्षणाच्या (अ लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया ही ग्रंथमाला) अनुषंगाने त्यांनी भारतीय लोकसाहित्याच्या विविध घटकांवर उद्‌बोधक प्रकाश टाकला. यांखेरीज फोकलोअर फ्रॉम ईस्टर्न गोरखपूर (१८८३), सम बिहारी फोकसाँग्ज (१८८४), सम भोजपुरी फोकसाँग्ज (१८८६) इ. लोकसाहित्यविषयक ग्रंथांचे संकलन-संपादनही त्यांनी केले.

मराठी लोकसाहित्यावर इंग्रजी लिखाण करणाऱ्यांमध्ये मेरी फ्रीअर हिचा आरंभीच उल्लेख करावा लागेल. भारतावरील ब्रिटिश सत्तेच्या काळात मुंबईचे काही काळ गव्हर्नर असलेले सर बार्टल फ्रीअर ह्यांची मेरी ही कन्या. तिची दाई ॲना लिबर्टा डिसूझा हिचे घराणे मूळचे कालिकतचे. तिने मेरीला काही मराठी लोककथा सांगितल्या आणि मेरीने त्या ओल्ड डेक्कन डेज (१८६८) ह्या नावाने प्रसिद्ध केल्या. इंग्रजीत आणलेल्या ह्या मराठी लोककथांना यूरोपमधअये फार मोठी लोकप्रियता मिळाली. जर्मन, हंगेरियन, डॅनिश अशा यूरोपीय भाषांत मेरीचे हे पुस्तक अनुवादिले गेले आणि अशा प्रकारे मराठी लोककथा ह्या युरोपीय भाषांत निवेदिल्या गेल्या. हिंदी आणि गुजारातीतही ह्या लोककथांची भाषांतरे झाली. सशस्त्र क्रांतिकारकांच्या गोळीला बळी पडलेले नाशिकचे जिल्हाधिकारी ए. एम्.टी. जॅक्सन ह्यांनीही मराठी व गुजराती लोकसाहित्याचा अभ्यास चालविला होता. फोकलोअर ऑफ द कोंकण हा त्यांचा ग्रंथ १९१५ साली प्रसिद्ध झाला. ह्यात सणवार, व्रतवैकल्ये इ. विषयांचा परामर्श घेतला असून त्यांच्याशी संबंधित अशा दंतकथाही अंतर्भूत केलेल्या आहेत. फोकलोअर ऑफ बॉम्बे (१९२४) हे आर्. इ. एन्थोवेन ह्यांचे पुस्तक म्हणजे जॅक्सन ह्यांच्या पुस्तकाची सुधारुन वाढविलेली आवृत्ती आहे, म्हटले तरी चालेल. लौकिक दंतकथा ह्या नावाने गो. म. कालेलकर ह्यांनी केलेला ह्या पुस्तकाचा अनुवाद १९३४ मध्ये प्रसिध्द झाला. किंकेड ह्यांच्या डेक्कन नर्सरी टेल्स (१९२४) मध्ये  मराठी कहाण्या इंग्रजीत अनुवादिल्या आहेत.


शरच्चंद्र रॉय यांच्या संपादकत्वाखाली आणि वरील पाश्चिमात्य अभ्यासकांच्या मदतीने १९२१ मध्ये मॅन इन इंडिया हे मानवशास्त्रविषयक नियतकालिक सुरु झाले. पण त्यांनी केवळ अनुवादच केले. प्रांतीय लोकसाहित्य-संकलनाला मात्र त्यामुळे उत्तेजन मिळाले.

मानवशास्त्रांतर्गत संस्कृती व लोकसाहित्य या दृष्टीने पाश्चिमात्य संशोधकांना भारत ही नेहमीच समृद्ध भूमी वाटत आली आहे. त्यांचे प्रयत्न सैद्धांतिक विश्लेषणाचे आहेत. भारतीय अभ्यासक मात्र अजूनही बरेचसे संकलन-संग्रहाच्या भूमिकेतच गुंतलेले आहेत. फार तर काहीशी आत्मगौरवपर, भाबडी, रसग्रहणात्मक भूमिका काहींनी घेतली आहे. लोकसाहित्याच्या पाश्चिमात्य अभ्यासकांचे विविध संप्रदाय आहेत. समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र इ. विविध अभ्यास-संप्रदायाच्या दृष्टिकोणांतून हे अभ्यासक काम करताना दिसतात.

भारतीय लोकसाहित्याभ्यासकांनी मात्र स्वत:ला कोणत्याच संप्रदायाशी बांधून घेतलेले नाही. त्यांचे क्षेत्र मुक्त आहे. कोणतीच सैद्धांतिक भूमिका नसल्याने, भारतीय अभ्यासकांमध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा आहे. परंतु ते पूर्वग्रहांपासून अलिप्त आहेत. तरीही आता भारतीय अभ्यासकांनी सैद्धांतिक विश्लेषण करणे आवश्यक आहे. गेल्या शंभर-दीडशे वर्षात भारतभर लोककथा, लोकगीत,. म्हणी व वाक्‌प्रचार व अन्य लोकसाहित्यविषयक संकलने मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. उदा., बंगालमध्ये १८३२ मध्ये म्हणी व  वाक्‌प्रचार यांच्या संकलन – प्रकाशनास प्रारंभ झाला. रेव्ह्. डब्ल्यू. मार्टनने बेंगॉली प्रॉव्हर्ब्ज दोन खंडांत (१८३२, १८३५) प्रकाशित केले. रेव्ह्. जेम्सचे बेंगॉली प्रॉव्हर्ब्ज (दोन खंडांत – १८६८,१८७२) प्रकाशित झाले. कनाईलाल घोष यांनी १८९१ मध्ये आपले म्हणी व वाक्‌प्रचार ह्याचे संकलन प्रकाशित  केले. १८९६ मध्ये सम आसामीज प्रॉव्हर्ब्ज हे संकलन गूरदॉने प्रसिद्ध केले. त्यानंतर जमशेटजी पेटिट यांनी गुजराती म्हणींचा संग्रह प्रसिद्ध केला. नटेशशास्त्री यांनी फेमिलिअर तमिळ प्रॉव्हर्ब्ज प्रकाशित केल्या. १८६८ मध्ये रविपती गुरुवायुरु यांनी अ कलेक्शन ऑफ तेलुगू प्रॉव्हर्ब्ज प्रसिद्ध केले. १८४५ मध्ये जी. रोचीराय यांनी हँडबुक ऑफ सिंधी प्रॉव्हर्ब्ज प्रसिद्ध केले. बंगाली लोकसाहित्याच्या अभ्यासास चालना देऊन त्यात लोकरुची निर्माण करण्यात रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य प्रेरणादायक ठरले. कलकत्ता विद्यापीठ व ‘वंगीय साहित्य परिषद’, कलकत्ता या संस्थांनीही मोलाचे कार्य केले आहे.  डॉ. दिनेशचंद्र सेन यांनीही लोकसाहित्याच्या व्यासंगात अभ्यासकांना रूची निर्माण व्हावी, म्हणून पायाभूत कार्य केले.  डॉ. कालिदास नाग यांच्या अध्यक्षतेखाली ‘वंगीय लोकसंसस्कृती परिषदे’ स्थापना १९५० मध्ये झाली. बंगालमध्ये १९६२ मध्ये ‘रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ फोक कल्चर’ या लोकसाहित्य-संशोधन केंद्राची स्थापना झाली. या संस्थेने विपुल लोकगीतांचे संकलन केले व एन्‌सायक्लोपीडिया ऑफ बेंगॉली फोकसाँग्ज हा कोश चार खंडांत प्रकाशित केला. याखेरीज इंग्रजी अंमलापासूनच जिल्हा गॅझेटीअरांमधून त्या त्या जिल्ह्याची सांस्कृतिक माहिती देण्याची प्रथा सुरु झाल्याने लोकसाहित्याची जिल्हावार थोडीफार माहिती त्यातून मिळू शकते. राजस्थान, म्हैसूर या ठिकाणी लोकसाहित्याभ्यासाची स्वतंत्र केंद्रे स्थापन झाली आहेत.

महाराष्ट्रातही स्वातंत्र्योत्तर काळात ‘लोकसाहित्य समिती’ स्थापन झाली (१९५६). चिं. ग. कर्वे हे तिचे पहिले अध्यक्ष होते. या समितीने महाराष्ट्रातील लोकसाहित्यसंकलनाचे व्यापक प्रयत्न केले आहेत. मात्र ही संकलने मोठ्या प्रमाणावर कथा-गीतांचीच संकलने आहेत. महाराष्ट्रातील सण-उत्सवांची माहिती संगृहीत करण्याचा एक प्रयत्न अलीकडे झाला आहे. परंतु लोकसाहित्याच्या सैद्धांतिक अभ्यासाचे प्रयत्न या समितीने अद्याप केलेले नाहीत. लोकसाहित्य-संकलनाची पंचविसांपेक्षा अधिक लहानमोठी पुस्तके समितीने प्रकाशित करून पुढील अभ्यासकांसाठी भरपूर सामुग्रीचे संकलन करून ठेवले आहे. १९७९-८० मध्ये काही नवीन अभ्यासकांनी डॉ. प्रभाकर मांडे यांच्या पुढाकाराने एकत्र येऊन ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ या संस्थेचा प्रारंभ केला. आधीपासूनच लोकसाहित्यामध्ये चिकित्सक अभ्यास व संशोधन करणारे डॉ. मांडे, डॉ. रा. चिं. ढेरे, दुर्गा भागवत, प्रा. नरहर कुरुंदकर यांनी या मंडळांची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून दर वर्षी लोकसाहित्य संशोधन मंडळ महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी अभ्यासकांची एक परिषद घेते. औपचारिक-अनौपचारिक पद्धतीने अभ्यास करणारे लोकसाहित्याचे अभ्यासक तेथे एकत्र येतात आणि शोधनिबंध सादर करतात.

गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतून मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर स्तरावर लोकसाहित्य हा विषय अभ्यासक्रमात नेमला गेला असल्यानेही अभ्यासकांचे लक्ष या विषयाकडे विशेषत्वाने वेधले आहे.

मराठी लोकसाहित्यविषयक अभ्यास : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे  यांनी लोकसंस्कृतिविषयक अभ्यासाचा पाया घातला. राजवाडे यांच्या अभ्यासक्षेत्रात संस्कृतिविषयक अभ्यासाचा भाग खूप व्यापक आहे. त्यांच्या बुद्धिनिष्ठ प्रणालीनुसार लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातील विषयांसंबंधी त्यांचे मत अत्यंत प्रतिकूल असले, तरी सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टीने त्यांचे महत्त्वही त्यांना मान्य होते. जीवनाच्या चिकित्सक अभ्यासकाच्या दृष्टीने अनभ्यसनीय कोणतेच क्षेत्र नसते, असे ते मानीत. लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातील बाबी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अभ्यासाची भ्रांत साधने होत. कारण ही साधने विकारमय आहेत, असे त्यांचे मत होते. तरीही मंत्रतंत्र, जादू-तोडगे, पिशाच-भूत-प्रेतादीविषयी समज, अंगात येणे, तांत्रिक चित्रकला यांचबरोबर मंत्रभाषा, मंत्रगान, तोडग्यांची सरळ व वक्ररेषाकृती, यंत्रे, स्वस्तिके डौर व कुडबुडे यांसारखी वाद्ये, कळसूत्र, लोकदेवतांचे पूजोपचार, पूजासाधने अशा अनेक बाबींचा चिकित्सक विचार त्यांनी मराठीच प्रथमच साक्षेपाने केलेला आहे. साधारणपणे १९२५ ते ३८ या काळात त्यांनी लेखनाद्वारा हे विचार मांडले. आदिधर्म, लोकधर्म आणि त्यातून उत्क्रांत झालेला उच्च धर्म यांचा अनुबंध राजवाडे यांनीच प्रथम स्पष्ट केला. त्यांच्या याच भूमिकेचा साधार विस्तार डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या चिकित्सक संशोधनामध्ये झालेला दिसतो, उच्च संस्कृतीच्या प्रामाणिक विश्लेषकांना लोकधर्माचा विवेचक अभ्यास व विचार केल्याखेरीज पुढे जाता येणार नाही, याचे भान राजवाडे यांनी प्रथम आणून दिले.

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सामाजिक दृष्टीतून केलेले समाजाचे, इतिहासाचे विश्लेषणही लोकसांस्कृतिक भूमिकेचा पाठपुरावा करणारे आहे. येथील विविध मानवसमूह, त्यांच्या भाषा त्यांचे आचार, भारतीय कला, स्त्रीजीवन, विविध मानवसमूहांचे श्रद्धाविश्व यांचा विचार डॉ. केतकर यांनी समाजशास्त्रीय भूमिकेतून केला आहे.


याच परंपरेचा वारसा पुढे ना. गो. चापेकर व चि. ग. कर्वे यांनी समृद्ध केलेला दिसतो. ना. गो. चापेकर यांचे १९३३ मधले आमचा गांव (बदलापूर) … हे पुस्तक एका गावाच्या लोकतत्त्वीय अभ्यासाचा उत्कृष्ट नमुना असून सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोणातून एखाद्या भूप्रदेशाचा लोकतत्त्वीय अभ्यास किती समृद्ध करता येतो, याचा आदर्श आहे. तसेच चित्पावन (१९३८) हा ग्रंथ एका जातीचा अभ्यास लोकतत्त्वीय पार्श्वभूमीवर किती व्यापकपणे करता येतो, याचा नमुना आहे. कोशकार शं.ग. दाते आणि चि.ग, कर्वे यांनी विविध कोशांना लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना म्हणजे लोकतत्त्वीय भूमिकेतून केलेल्या भाषिक अभ्यासाचे नमुनादर्श आहेत.

याच काळात लोकसंस्कृतिविषयक आस्थेने भारलेली राष्ट्रभक्तांची एक पिढी लोकसंस्कृतीकडे वळलेली दिसते. साने गुरुजी हे त्यांचे प्रतिनिधी होत. पारंपारिक मौखिक कथा-गीतांच्या संकलनाची एक लाट या काळात उसळलेली दिसते. लोकसंस्कृतीच्या चिकित्सेचा मात्र या परंपरेत अभाव आहे. परंपरेच्या आणि लोकजीवनाच्या भाबड्या प्रेमातून यांपैकी अनेक संकलने झालेली आहेत. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांतील स्त्रियाही ओवीगीतांच्या व स्त्रीगीतांच्या संकलनात आघाडीवर होत्या.

डॉ. ना.गो. नांदापूरकर यांनी याच भूमिकेतून मराठवाड्यात स्त्रीगीतांच्या संकलनाचे काम मिशनरी वृत्तीने केलेले दिसते. ओवीरचनेची चिकित्सा ऐतिहासिक भूमिकेतून त्यांनी केलेली आहे. केवळ रामसीताविषयक ओव्यांचे त्यांचे संकलनही प्रचंड आहे. त्या ओव्यांचे संपादन डॉ. उषा जोशी यांनी मऱ्हाटी स्त्रीरचित रामकथा (१९९०) या शीर्षकाने ग्रंथरुपात प्रसिद्ध केले आहे. त्याला प्रदीर्घ विवेचन प्रस्तावनाही त्यांनी लिहिली आहे.

लोकसाहित्याच्या संकलकांमध्ये आणखी काही उल्लेख आवश्यक आहेत. काका कालेलकर, दत्तो वामन पोतदार, वामनराव व कमलाबाई चोरघडे हे पतीपत्नी, आनंदीबाई शिर्के, मालतीबाई दांडेकर, यमुनाबाई शेवडे, अनुसूयाबाई भागवत, न.शं. पोहनेरकर, दा. गो. बोरसे, सरोजिनी बाबर, ना. रा. शेंडे, नरेश कवडी, विमला थत्ते, कमलाबाई देशपांडे सुलोचनाबाई सप्तर्षी, इरावती कर्वे, डॉ. सविता जाजोदिया ही मराठी लोकसाहित्यसंकलकांची काही प्रमुख नावे होत.

डॉ. सरोजिनी बाबर ह्यांनी लोकसाहित्याच्या संकलनाला आपले आयुष्य वाहिले. मराठी लोककथा (१९५७), लोकसंगीत (१९६२), लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति (१९६३), जनलोकाचा सामवेद (१९६५), फोक लिटरेचर ऑफ महाराष्ट्र (१९६८), भोंडला भुलाबाई (१९७७), मराठी फोकलोअर ही त्यांनी लिहिलेली-संपादिलेली काही विशेष उल्लेखनीय पुस्तके होत. मराठीत दुर्गाबाई भागवत यांनी लोकसाहित्याच्या सैद्धांतिक अभ्यासाचा पाया घातला. त्यांचा लोकसाहित्याची रुपरेखा (१९५६, आवृ. दुसरी-१९७७) ही सैद्धांतिक विवेचन करणारा मराठीतील लोकसाहित्यविषयक पहिला ग्रंथ होय. त्यांचे धर्म आणि लोकसाहित्य (१९७५) हे पुस्तकही या संदर्भात महत्त्वाचे आहे. तसेच समग्र सिद्धार्थजातकाचे त्यांनी भाषांतर केले आहे, त्याची विवेचन प्रस्तावना व तळटीपा त्यांच्या लोकसांस्कृतिक सखोल व व्यापक अभ्यासाची जाण आणून देणारी आहे. भारतातील काश्मीर, पंजाब, दख्खन (महाराष्ट्र), बंगाल, आसाम, गुजरात, संथाळ, उ. प्रदेश, तमिळनाडू, मध्यप्रदेश अशा अनेक प्रदेशांतील लोककथांची भाषांतरे त्यांनी केली, तसेच त्यांना चिकित्सक प्रस्तावना लिहिल्या. अलीकडचे अस्वल हे त्यांचे पुस्तक एका प्राण्याच्या लोकसांस्कृतिक अभ्यासाचा नमुनादर्श आहे. मराठीतील लोकसाहित्यविषयक प्रकाशित साहित्याची १९६७ प्रयंतची त्यांची साहित्यसूचीही प्रसिद्ध झाली आहे.

दुर्गाबाई भागवतांनंतर सैद्धांतिक मांडणी करणारे मराठीतील लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणजे डॉ. प्रभाकर मांडे होत. लोकसाहित्याचे अंत:प्रवाह (१९७५), लोकसाहित्याचे स्वरुप (१९७८, आवृ. दुसरी-१९८९) हे त्यांचे सैद्धांतिक मांडणी करणारे सुप्रसिद्ध ग्रंथ आहेत. ॲस्पेक्ट्स ऑफ फोक कल्चर (१९८४) हा त्यांचा इंग्रजी ग्रंथही अभ्यासपूर्ण आहे. त्यानंतर त्यांचे गावगाड्याबाहेर (१९८३) हे भटक्या-विमुक्त जमातींविषयीचे अभ्यासपूर्ण पुस्तक प्रसिद्ध झाले. सांकेतिक आणि गुप्त भाषा : परंपरा व स्वरुप (१९८५) हे याच जमातींच्या गुप्त भाषांचे स्वरुप स्पष्ट करणारे पुस्तक असून अशा प्रकारचे ते मराठीतले पहिले आणि एकमेव पुस्तक आहे. यांखेरीज लोकरंगकला आणि नागर रंगभूमी, गिरिवनातील रंगधारा, मांग आणि त्यांचे मागते ही त्यांची १९९०-९१ मध्ये प्रसिद्ध झालेली पुस्तके आहेत. डॉ. प्रभाकर मांडे यांच्यापुढे पाश्चिमात्य अभ्यासकांच्या सैद्धांतिक मांडणीचा नमुनादर्श असून त्यानुसार त्यांचे लेखन झाले आहे.

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे हे मराठी लोकसांस्कृतिक अभ्यासक्षेत्रात लोकविलक्षण दृष्टीने विपुल लेखन करणारे एक प्रतिभावंत संशोधक आहेत. गेल्या चाळीस वर्षात त्यांनी व्रतस्थ निष्ठेने संशोधनपर लेखन केले असून, त्यांच्या ग्रंथांची संख्या जवळपास शंभर भरेल. इंग्रजी वाङ्‌मयाची सैद्धांतिक बैठक असूनही संपूर्ण देशी भान व देशी सामुग्री यांवर त्यांचे संशोधन उभे आहे. भरभक्कम सैद्धांतिक आधारावर उभे असलेले त्यांचे लोकसांस्कृतिक संशोधनपर लेखन हे उपयोजित सैद्धांतिक लेखनाचा अनोखा नमुना आहे. लोकसंस्कृतीक पूर्णपणे काहीच नष्ट होत नाही. संस्कृतीच्या अगदी आदिम अवस्थेपासूनचे अवशेष या ना त्या स्वरुपात प्रगत अवस्थेतही टिकून असतात, या सिद्धांतानुसार महाराष्ट्रातील लोकसंस्कृती, इतिहास, प्राचीन वाङ्‌मय, संतसाहित्य यांची चिकित्सा त्यांनी केली आहे. धर्म व लोकश्रद्धा आणि तदंतर्गत देवतोपसना हा संस्कृतीच्या अध्यनातील अपरिहार्य भाग आहे. त्यांचा शोध हा मानवी मनाच्या तद्‌विषयक धारणांचा शोध असतो आणि त्या धारणांचा शोध साहित्य, आचारधर्म, उपासनाविधी इत्यादींच्या आधारे घेता येतो. या सैद्धांतिक भूमिकेतून त्यांनी लेखन केले. खंडोबा (१९६१), मराठी लोकसंस्कृतीचे उपासक (१९६४), संत आणि समाज (१९६४), लोकसंस्कृतीची क्षितिजे (१९७१), चक्रपाणि (१९७७), लज्जागौरी (१९७८), संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध (१९७८), श्रीविठ्ठल : एक महासमन्वय (१९८४), लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा (१९९०), प्राचीन मराठी वाङ्‌मय : शोध आणि संहिता (१९९१) ही त्यांची पुस्तके म्हणजे लोकसांस्कृतिक अभ्यासाचे मानदंड आहेत. चिकित्सा आणि रसाळपणा यांमुळे डॉ. ढेरे यांचे लेखन व संशोधन मराठीत वेगळेपणाने उठून दिसते.

वरील तज्ञ व व्यासंगी व्यक्तींच्या तसेच ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ या संस्थेच्या प्रेरणेमुळे व मार्गदर्शनामुळे लोकसाहित्याच्या नवीन अभ्यासकांना नवनव्या दिशा लाभल्या व त्यांचे कार्य जोमाने पुढे चालू राहिले. डॉ. गंगाधर मोरजे यांचे लोकसाहित्य : एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र हे पुस्तक महत्त्वाचे आहे. तसेच विदर्भातील आदिवासी जीवनाचा अभ्यास करणारे डॉ. मधुकर वाकोडे यांनी विविध स्फुट लेखांतून लोकसंस्कृतिक संशोधन प्रसिद्ध केले आहे. मराठवाड्यातील डॉ. तारा परांजपे यांचे सीमाप्रदेशांतील भावगंगा हे तेलंगण-महाराष्ट्र सीमाप्रदेशातील लोकसाहित्याची वेध घेणारे पुस्तक व अलीकडेच आंध्र-महाराष्ट्र : सांस्कृतिक अनुबंध (१९९१) हे आंध्र-महाराष्ट्राचा सांस्कृतिक संबंध स्पष्ट करणारे पुस्तक महत्त्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्रात डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसाहित्य, लोककला यांविषयी सैद्धांतिक उपयोजित दोन्ही प्रकारचे विपुल लेखन ग्रंथरुपाने व स्फुट स्वरुपात केले आहे. महाराष्ट्रातील पौराणिक नाटकांच्या संदर्भात एकूणच नाट्योदयाची एक सैद्धांतिक भूमिका मांडणारे मिथक आणि नाटक (१९८८) हे पुस्तक, कर्नाटकातील यक्षगान व मराठी नाट्यपरंपरा (१९७९, आवृ. दुसरी-१९९०)  हे  यक्षगान व मराठी नाट्यपरंपरा  यांचा अनुबंध स्पष्ट करणारे छोटे पुस्तक, १९२० नंतरचा लोकरंगभूमी व नागररंगभूमी यांचा अनुबंध स्पष्ट करणारे लोकनागर रंगभूमी (१९८९), दक्षिणेतील कला व साहित्य यांच्या आधारे त्यांतील महामातृत्वाचा सांस्कृतिक शोध घेणारा महामाया (१९८८) हा डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या सहयोगाने सिद्ध झालेला ग्रंथ, लोकसंचित (१९८९) हा लोकसांस्कृतिक विविध विषयांवरील लेखांचा संग्रह, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा (१९८६) हा आधुनिक स्त्रीवादी समीक्षादृष्टीतून पारंपारिक स्त्रीसाहित्याची समीक्षा करण्याचा या क्षेत्रातला पहिला प्रयोग असलेले पुस्तक अशी विविध पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.


औरंगाबादचे शरद व्यवहारे यांची लोकसाहित्य : उद्‌गम आणि विकास (१९८७), लोकसाहित्य : रंग आणि रेखा (१९९०), मराठी लोकगीत : स्वरुपविशेष (१९९०), लोकधर्मी नाट्याची जडणघडण (१९९०), लोकवाङ्‌मय : रुपस्वरुप (१९९१), मराठी स्त्रीगीते  (१९९१) ही पुस्तके महत्त्वाची आहेत. रा. वि. मराठे संपादित गावगाडा शब्दकोश (१९९०) हा लोकसाहित्यविषयक महत्त्वाचा कोश आहे. द. ग. गोडसे यांच्या ग्रंथांमध्ये कला आणि लोकसंस्कृती यांच्या अनुबंधांतून लोकधाटीचा शोध घेण्याचा प्रयत्न जाणवतो. पोत (१९६३), ऊर्जायन (१९६५), शक्तिसौष्ठव (१९७२), गतिमानी (१९७६), लोकघाटी (१९७९), मातावळ (१९८१) हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत.

मराठीतील लोकसांस्कृतिक संशोधनविषयाचा हा अगदी धावता व त्रोटक आढावा आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासाविषयी सामप्रयाने अद्याप लेखन झालेले नाही. लोकसाहित्याच्या स्वरुपाविषयी व व्याप्तीविषयीही मराठी साहित्याभ्यासक अद्याप उदासीनच आहेत. हल्ली त्यात थोडा बदल दिसतो. आहे. केवळ संकलनाच्या व भाबड्या आस्वादाच्या कक्षेबाहेर लोकसाहित्याचे अभ्यासक येत आहेत. संस्कृती, इतिहास, समाज, प्राचीन साहित्य, संतसाहित्य, समाजमानस इत्यादींचा शोध घेण्यासाठी लोकसांस्कृतिक समग्र दृष्टिकोण हा महत्त्वाचा व अपरिहार्य आहे, याचे भान अभ्यासकांना हळूहळू येत आहे.

लोकसाहित्य व लोकसंस्कृती यांमध्ये सर्वच बावी गौरवयोग्य व स्पृहणीय नसतात. त्यामुळे त्याविषयीच्या भाबड्या गौरवाच्या भावनेतून बाहेर येऊन चिकित्सक दृष्टिकोण स्वीकारण्याचा इशारा दुर्गाबाई भागवतांनी अभ्यासकांना दिलेला आहेच. त्यामुळे लोकसाहित्यविषयक भूमिका अधिक व्यापक होत आहे.

साहित्यसमीक्षाक्षेत्रातील आदिबंधात्मक समीक्षा हा प्रवाह लोकसांस्कृतिक व लोकमानसशास्त्रीय भूमिकेवर उभा असून तो समीक्षाक्षेत्रात नव्याने रुढ होत आहे. मराठीत प्रा.गंगाधर पाटील (समीक्षेची नवी रुपे), डॉ. म. सु. पाटील (आदिबंधात्म समीक्षा), डॉ. अरुणा ढेरे (काळोखाचे कवडसे, नागमंडल) हे अभ्यासक आदिबंधात्मक समीक्षेचा मार्ग प्रशस्त करीत आहेत. लोकसाहित्याच्या कथा-गीते इ. शाब्द आविष्कारांसंबंधी, फार तर प्रयोगात्म लोककलांसंबंधीच आतापर्यंत लिहिले गेले आहे. त्यापलीकडे जाण्याचे काही प्रयत्नही तुरळक प्रमाणात का होईना, होत आहेत. त्यांचा उल्लेखही आवश्यक आहे. पुणे विद्यापीठातील डॉ. थिटे यांचे लोकवैद्यकाची चिकित्सा करणारे लेखन प्रसिद्ध आहे. डॉ. अशोक दा. रानडे यांचे लोकसंगीतविषयक चिंतन-लेखन, तसेच डॉ. ग. ह. तारळेकर यांचे लोकवाद्ये या विषयावरील लेखन (भारतीय वाद्यांचा इतिहास) महत्त्वपूर्ण आहे. मुंबईच्या ‘इंडियन नॅशनल थिएटर’ च्या लोककला विभागाने दशावतार, जागरण, वासुदेव, गोंधळ या विषयांवर संशोधनपर पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. शिवाय या कलाविष्कारांचे प्रयोगही सादर केले आहेत. गोवा कला अकादमी दर वर्षी लोकनृत्य व लोककला महोत्सव आयोजित करते व तत्संबंधित पुस्तिका प्रकाशित करते. पश्चिम महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या वतीनेही लोककलांच्या महोत्सवांचे आयोजन केले जाते.

एकूण कलाक्षेत्रात लोकपरंपरांतून चैतन्यस्वीकाराची प्रक्रिया वारंवार पुनरावृत्त होताना दिसून येते. १९७० नंतर एकूणच भारतीय कलाजीवनात आलेली स्थितिशीलता आणि मरगळ झटकून टाकण्यासाठी कलावंत पुन्हा पारंपारिक लोककलांचा नव्याने शोध घेऊ लागले आहेत. विविध प्रकारच्या हस्तकला, संगीतक्षेत्रात अभिजात लोकसंगीताचे प्रयत्न (उदा., कुमार गंधर्व), चित्रकलेत लोकचित्रकलेचा आविष्कार (उदा., हेब्बर), लोकवैद्यकाचा आयुर्वेदाच्या आधारे शोध घेण्याची प्रवृत्ती, लोकनृत्यांविषयीचे वाढते आकर्षण, नाट्याविष्कारामध्ये विविध लोकशैलींचे उपयोजन ही सर्व चिन्हे लोकसंस्कृतीविषयी नवे भान जागृत झाल्याची निर्दशक आहेत. लोकसंस्कृतीमधील अनौपचारिकता, लवचिकता, भावात्मकता यांचे आकर्षण औद्योगिक विकासात भौतिक सुखांच्या राशीवर लोळत असूनही एकाकी झालेल्या माणसाला वाटते आहे की काय ? असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. एकूणच जीवनाचा विचार सुटासुटा न करता सामग्र्याने व्हावा, असे वाटणारा एक वर्ग आहे. तो लोकसाहित्याच्या अभ्यासाकडे अधिककरून वळतो आहे.

स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात परवलीचे शब्द आहेत. पश्चिमेकडे स्त्रीवादी समीक्षादृष्टीची सध्या लाट आली आहे. ते सिद्धांत जसेच्या तसे भारतीय जीवनाला लागू पडतात, की ओढूनताणून चिकटवावे लागतात ? स्त्रीविषयक पाश्चिमात्य भूमिकेपेक्षा आपली भूमिका वेगळी, तरीही परंपरेपेक्षा भिन्न कशी असावी ? या प्रश्नांचा भारतीय लोकसाहित्य व लोकसंस्कृती यांच्या संदर्भात डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा या पुस्तकातून प्रथमच शोध घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्त्रीवादी विचार करणारी मंडळी या वेगळ्या लोकसंस्कृतिक स्त्रीभूमिकेकडे वळत आहेत. लोकसाहित्य हे जुन्या ग्रामीण जीवनाशीच संबंधित आहे, हा समज वरील सर्व कारणांनी बाजूला पडला असून प्रगत नागरी जीवनाची चिकित्सा करण्यासाठी त्याचा अभ्यास उपयुक्त असल्याचे भान आले आहे.

भवाळकर, तारा

पहा : लोककथा लोककला लोकगीते लोकनाट्य लोकनृत्यलोकवाद्ये लोकसंगीत.

संदर्भ : 1. Danieis, C. L. Stevans, C. M. Ed. Encyclopedia of Superstitions, Folklore, and the Occult Sciences of the World, London, 1971.

          2. Dorson, Richard, Ed. Folklore : Selected Essays, Bloomington, 1972.

          3. Leach, Maria, Ed. Dictionary of Folklore, Mythology qnd  Legend, New York, 1949.

          4. Reaver, J. Russell Boswell, George W. The Fundamentals of  Folk Literature, London, 1962.

          5. Thompson, Stith, Motif-Index of Folk- Literature Bloomington,  1955-58.

           ६. अग्रवाल, वासुदेवशरण, प्राचीन भारतीय लोकधर्म, अहमदाबाद, १९६४.  

           ७. गोडसे, द. ग. लोकघाटी, मुंबई, १९७९.  

           ८. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. राजवाडे लेखसंग्रह, दिल्ली, १९५८.  

           ९. ठाकुर, रवींद्रनाथ, अनु. व संपा. भागवत, दुर्गा, लोकसाहित्य, मुंबई, १९६७.  

         १०. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीची क्षितिजे, पुणे, १९७१.  

         ११. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.  

         १२. ढेरे, रा. चि. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा, पुणे १९९०. 

         १३. ढेरे, रा. चि. संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध, पुणे, १९७८.  

         १४. दाते, शं. ग. लोककथा, भाग १ व २, पुणे १९२९.  

         १५. परांजपे, तारा, आंध्रमहाराष्ट्र : सांस्कृतिक अनुबंध, औरंगाबाद, १९९१.  

         १६. बाबर, सरोजिनी, संपा. लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति, पुणे, १९६३.  

         १७. भवाळकर, तारा, लोकनागर रंगभूमी, पुणे १९८९.  

         १८. भवाळकर, तारा, लोकसंचित, पुणे १९९०.  

         १९. भवाळकर, तारा, लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, पुणे, १९८६.  

         २०. भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रुपरेखा, पुणे, १९७७.  

         २१. मराठे, रा. वि. संपा. गावगाडा शब्दकोश, मुंबई, १९९०.  

         २२. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, पुणे, १९७५.  

         २३. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे स्वरुप, औरंगाबाद, १९८९. 

         २४. मोरजे, गंगाधर, लोकसाहित्य : एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र, पुणे, १९८५.  

         २५. व्यवहारे, शरद, लोकसाहित्य : उद्‌गम आणि विकास, नागपूर, १९८७.