शोकात्मिका : (ट्रॅजेडी). मानवी जीवनातील अटळ दु:खभोगांचे गंभीर व प्रगल्भ शैलीत चित्रण करणारा नाट्यप्रकार. प्रामुख्याने हा नाट्यप्रकार असला, तरी कादंबरीसारख्या इतर गद्य कथनप्रकारांतही शोकात्म जीवनानुभूतींचे चित्रण केले जात असल्याने शोकात्मिका संभवते. शोकात्मिका ह्या नाट्यप्रकाराचा उगम प्राचीन ग्रीकक विधिनाट्यातून झाला असावा. ‘ ट्रॅजेडी ’हा शब्द ‘ Tragoidia ’(इं. शी. गोटसाँग म. शी. अजगीत) ह्या ग्रीक शब्दावरून आला. मराठीमध्ये ‘ ट्रॅजेडी ’साठी शोकात्मिका, शोकांतिका, शोकनाट्य असे विविध पर्याय वापरले जातात.

ग्रीक शोकात्मिका : प्राचीन ग्रीक समाजात इ. स. पू. सातव्या-सहाव्या शतकांत ⇨ डायोनायसस ह्या ऋतुदेवाच्या उत्सवप्रसंगी अजबली देण्याची प्रथा होती. सुफलताविधीशी संबंधित असलेल्या डायोनायसस देवाच्या वेदीवर बळी दिलेल्या बोकडाभोवती म्हणावयाचे गाणे म्हणजे अजगीत. डायोनायससच्या पूजाविधिप्रसंगी ‘ डिथिरॅम ’नामक वृंदगीते गायिली जात, त्यांत उत्स्फूर्तपणे काही वक्तव्ये केली जात, त्यांतून शोकात्मिका हा प्रकार उत्क्रांत झाला असावा. शोकात्मिकेचे आद्य स्वरूप प्राय: वृंदगानात्मक (कोरस) होते. पुढे इ. स. पू. सहाव्या शतकात थेस्पिस ह्या ग्रीक नाटककाराने त्या कोरसमधूनच एक पात्र नट म्हणून पुढे आणून त्याला संभाषण करावयास दिले. त्यामुळे ह्या गानप्रकाराचे रूपांतर नाट्यप्रकारात झाले. म्हणून थेस्पिस हा ग्रीक नाटककार शोकात्मिका ह्या प्रकाराचा आद्य प्रणेता मानला जातो.

पुढे इ. स. पू. पाचव्या शतकात, ग्रीक संस्कृतीच्या उत्कर्षकाळात शोकात्मिका ह्या प्रकाराचे विकसित व समृद्घ रूप पाहावयास मिळते. त्या काळी डायोनायससच्या उत्सवप्रसंगी शोकात्मिकांच्या स्पर्धा घेतल्या जात, त्यांतून ह्या नाट्यप्रकारास चालना मिळाली. ⇨एस्किलस (इ. स. पू. ५२५-४५६), ⇨सॉफोक्लीझ (इ. स. पू. ४९६-४०६) आणि ⇨युरिपिडीझ (इ. स. पू. सु. ४८०-४०६) ह्या नाटककारांनी शोकात्मिका ह्या प्रकाराला विकसित व परिपूर्ण रूप देणाऱ्या नाट्यकृती निर्माण केल्या. एस्किलसने तत्कालीन रूढ नाट्यप्रकारात आणखी एका पात्राची भर घातली. त्यामुळे शोकात्मिकेतील पात्रांची संख्या एकावरून दोनावर गेली व त्यांच्यांत संवाद व संघर्ष आला. त्यामुळे एस्किलस हा ग्रीक नाटककार शोकात्मिकेचा खऱ्या अर्थाने जनक मानला जातो. त्याने ग्रीकक शोकात्मिकेला नेटके व कलात्मक रूप प्राप्त करून दिले. नेपथ्य व रंगभूषा ह्यांतही त्याने बदल घडवून आणले. गायकवृंदातील गायकांची संख्या कमी करून त्याने गाण्यापेक्षा संवादांना अधिक महत्त्व दिले. एस्किलसचे ओरेस्टेइआ (इ. स. पू. ४५८) हे त्रिनाट्य (ट्रिलॉजी) प्रसिद्घ असून, त्यात ॲगमेम्नॉन, केरोफे (इं. शी. लिबेशन बेअरर्स) व युमेनिडीझ ह्यातीन शोकात्मिकांचा समावेश होतो. सॉफोक्लीझ ह्या श्रेष्ठ ग्रीक नाटककाराच्या सात शोकात्मिका उपलब्ध आहेत. त्यांपैकी अँटिगॉन, ईडिपस टिरॅनस, इलेक्ट्रा, अजॅक्स, ईडिपस ॲट कलोनस इ. प्रसिद्घ असून ईडिपस टिरॅनस ही सर्वश्रेष्ठ शोकात्मिका मानली जाते. परिपूर्ण ग्रीक नाट्यकृती म्हणून ॲरिस्टॉटलने ती गौरविली. ग्रीक शोकात्मिकेत सॉफोक्लीझने तिसऱ्या नटाची भर घातली, त्यामुळे नाट्यरचना गुंतागुंतीची झाली. सॉफोक्लीझने प्रत्येक शोकात्मिकेत स्वतंत्र व परिपूर्ण कथानके मांडण्याची प्रथा रूढ केली. त्यापूर्वीच्या त्रिनाट्यात एकच कथानक तीन नाटकांतून क्रमश: मांडण्याची पद्घत होती, त्या पार्श्वभूमीवर हे वैशिष्ट्य ठळकपणे उठून दिसते. सॉफोक्लीझच्या नाट्यरचनेत तंत्राची सफाई व कलात्मकता विशेषत्वाने जाणवते. त्याने नेपथ्यातही विकास घडवून आणला. युरिपिडीझ ह्या नंतरच्या श्रेष्ठ शोकात्मिकाकाराने कथावस्तूत अधिक वैविध्य आणले. नाट्यरचना व भाषा यांतही महत्त्वाचे बदल घडवून आपल्या शोकात्मिकांद्वारा वास्तवाची नवी जाण त्याने ग्रीक रंगभूमीवर निर्माण केली.

ॲरिस्टॉटलचे विवेचन : ग्रीक तत्त्वज्ञ ⇨ ॲरिस्टॉटल ने (इ. स.पू. ३८४३२२) आपल्या पोएटिक्स ह्या गंथात शोकात्मिकेच्या स्वरूपासंबंधी मूलभूत तात्त्विक मीमांसा केली. ॲरिस्टॉटलला त्याकाळी उपलब्ध असणाऱ्या एस्किलस, सॉफोक्लीझ व युरिपिडीझ ह्या नाटककारांच्या शोकनाट्यांवर त्याचे विवेचन आधारलेले आहे. ॲरिस्टॉटलने केलेली शोकात्मिकेची व्याख्या अशी : ‘ शोकांतिका ही गंभीर, स्वयंपूर्ण व विशिष्ट आकारमान असलेल्या कर्माची अनुकृती असते तिची भाषा प्रत्येक जातीच्या कलात्मक भूषणाने सुशोभित असते आणि त्या निरनिराळ्या जाती नाटकाच्या वेगवेगळ्या भागांत सापडतात ती नाट्यरूप असते, निवेदनात्मक नसते आणि ती करूणा व भीती ह्यांच्या साहाय्याने त्या भावनांचे योग्य ते विरेचन घडवून आणते ’. ॲरिस्टॉटलने शोकांतिकेच्या विश्लेषणामध्ये बाह्य घटकांपेक्षा अंतर्गत घटकांना अधिक महत्त्व दिले आहे पण कथानक (मायथॉस), स्वभाव (इथॉस) व विचार (डायनॉइया) ह्या तीन अंतर्गत घटकांतही कथानक हाच आद्य घटक मानल्यामुळे पोएटिक्समध्ये त्याचीच चर्चा सांगोपांग केलेली आढळते. कथानक हा शोकांतिकेचा आत्मा आहे. स्वभावदर्शनावाचून शोकांतिका असू शकेल, पण कथानकावाचून तिचे अस्तित्वच अशक्य आहे, अशी ठाम विधाने करून ॲरिस्टॉटलने शोकांतिकेच्या रचनेतील कथानकाचे अनन्य महत्त्व अधोरेखित केले आहे. ॲरिस्टॉटलने शोकांतिकेच्या घाटाच्या संदर्भात वापरलेला कथानक हा शब्द प्रत्यक्ष जीवनाच्या संदर्भात वापरलेल्या कर्म (प्राक्सिस) या शब्दाशी समांतर आहे. कर्म ही संकल्पना खूपच व्यापक आहे. शोकांतिका ही व्यक्तीची अनुकृती नसून एका कर्माची व जीवनाची अनुकृती असते. ॲरिस्टॉटलने सर्जक अनुकृतिशीलता हे ललित कलांचे व्यवच्छेदक लक्षण मानले असल्याने शोकांतिकेतील कर्माची वा जीवनाची अनुकृती ही सर्जनशील असावी, हे त्याला अभिप्रेत आहे. ॲरिस्टॉटलने शोकात्मिकेच्या नायकाविषयीच्या आपल्या कल्पना पुढीलप्रमाणे मांडल्या आहेत : तो उत्कटत्वाने चांगला व न्यायी नसावा आणि तरीसुद्धा त्याच्यावर ओढवणारी विपत्ती त्याच्या दुर्गुणामुळे वा दुराचरणामुळे न ओढवता ती त्याच्या एखादया प्रमादामुळे वा स्खलनशीलतेमुळे ओढवलेली असावी. हा नायक अत्यंत प्रसिद्घ व वैभवसंपन्न अशी महनीय व्यक्ती असावी, असेही त्याने म्हटले आहे. ॲरिस्टॉटलने नायकाच्या शोकात्म वृत्तिविशेषांवर जास्त भर दिला आहे. करूणा व भीती ह्या भावना ज्याच्या संदर्भात तीव्रतेने जाणवू शकतील, तो नायकच आदर्श शोकात्म नायक ठरू शकतो. त्या दृष्टीने निव्वळ सत्पुरूष वा निखळ खलपुरूष हे दोघेही सारखेच त्याज्य ठरतात. नायकाचा शोकात्म प्रमाद आणि शोकात्मिकेच्या दर्शनाने करूणा व भीती या भावनांचे घडून येणारे विरेचन ह्या उपपत्ती ॲरिस्टॉटलच्या शोकात्मिका-मीमांसेत फार महत्त्वाच्या आहेत.


 शोकात्म प्रमाद : (‘ हॅमर्शिया ’, इं. शी. ट्रॅजिक एरर). शोकात्म नायकाचे स्वभाववैशिष्टय् सांगताना ॲरिस्टॉटलने ‘ हॅमर्शिया ’ही संज्ञा वापरली आहे. या ग्रीक संज्ञेच्या अनेक अर्थच्छटा त्याला अभिप्रेत आहेत: (१) परिस्थितीच्या अपुऱ्या ज्ञानामुळे घडणारी बौद्धिक चूक (२) अविचाराने, विकाराधीन होऊन चुकीचे निष्कर्ष काढल्यामुळे होणारी चूक (वास्तविक ही चूक टाळणे शक्य असते, अपर्याप्त विचारामुळे ती घडते) आणि (३) स्वभावांतर्गत नैतिक दोषांमुळे घडणारी चूक.

काही वेळा परिस्थितीच अशी बिकट असते, की परिस्थितीचे संपूर्ण ज्ञान करून घेणे माणसाला अशक्य असते आणि म्हणून हे अज्ञान अटळ असते. अशा अज्ञानातून घडलेली चूक नायकाच्या शोकान्ताला कारणीभूत ठरते. उदा., सॉफोक्लीझच्या ईडिपस टिरॅनस  [ईडिपस रेक्‌स आणि ईडिपस द किंग (इं. भा. १९२८) ही पर्यायी नावे ] ह्या श्रेष्ठ शोकात्मिकेत ईडिपसच्या हातून पितृहत्या घडते व तो अजाणता आपल्या मातेशी विवाह करतो, ही घटना. त्या अज्ञानाला नायक जबाबदार नसतो. मात्र ज्या क्षणी त्याला हे अभिज्ञान (रेकग्निशन) होते, तो शोकान्ताचा क्षण असतो.

काही नायक जाणूनबुजून प्रमाद करतात, पण त्यामागेही काही हेतू नसतात (उदा., किंग लिअर). स्वभावांतर्गत नैतिक दोषांमुळे घडणारी चूक, ती एखादया विशिष्ट प्रसंगापुरती नसते, तर अशा प्रकारचे सदोष वर्तन हा त्या नायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव असतो. शेक्सपिअरच्या शोकांतिकांमध्ये नायकांच्या स्वभावदोषांमुळे त्यांचा शोकान्त घडून आल्याची उदाहरणे आढळतात.

हॅमर्शियापासून मुक्त असलेल्या, निर्दोष व्यक्तिमत्त्वाच्या अँटिगनीचीही (अँटिगॉन) शोकांतिका होते, ह्या मुद्याकडे एस्. एच्. बुचरने लक्ष वेधले आहे. ‘अपरिपूर्ण विश्वात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची शोकांतिका ’, असे अँटिगनीचे वर्णन करावे लागेल.

विरेचन : (कॅथर्सिस). शोकात्मिकेची व्याख्या करताना ॲरिस्टॉटलने शोकात्मिका ही करूणा व भीती यांच्या साहाय्याने त्या भावनांचे योग्य ते विरेचन घडवून आणते, असे म्हटले आहे. कॅथर्सिस ह्या शब्दाचा त्याला नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे, त्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. कॅथर्सिसचे धार्मिक, नैतिक, वैदयकीय, मानसशास्त्रीय, ज्ञानात्मक असे निरनिराळे अर्थ सुचविण्यात आले आहेत. शोकांतिकेचे नैतिक प्रयोजन व सामाजिक स्थान सिद्घ करण्यासाठीच ॲरिस्टॉटलने कॅथर्सिसचा सिद्धांत मुख्यत्वे मांडला, असे म्हटले जाते. बुचरने कॅथर्सिसचे भाषांतर ‘पर्गेशन’(संशुद्घी, विरेचन) असे केले, ते ॲरिस्टॉटलला मुख्यत्वे अभिप्रेत असावे. शोकात्मिका ही विश्वात्मकाची अनुकृती असल्याने, तिच्यातील कर्म अपरिहार्य व एकात्म असल्यामुळे, तिच्यातील पात्रे प्रातिनिधिक व जीवनदर्शन तत्त्वसूचक असल्यामुळे प्रेक्षक शोकात्मिकेच्या नायकाशी तादात्म्य पावतो. स्वार्थनिरपेक्ष अशा उत्कट व व्यापक भावविश्वात प्रवेश करतो आणि त्यामुळे करूणा व भीती यांतला दु:खद, भयप्रद भाग नाहीसा होऊन प्रेक्षकाला एक प्रकारचे उदात्त भावनात्मक समाधान लाभते. ⇨ गटे याने शोकात्मिकेच्या संदर्भातील कॅथर्सिसची संकल्पना प्रेक्षकांच्या भावनांशी निगडित न करता ती शोकात्मिकेच्या स्वरूपाशी आणि तिच्या अंतर्गत रचनेशी – घटना व पात्रे यांच्याशी – जोडली आहे. त्याच्या मते कॅथर्सिस हा शोकांतिकेचा अंतिम परिपाक नसतो, तर ती प्रक्रिया कथानकात सातत्याने घडत असते. [→ भावविरेचन].

ॲरिस्टॉटलने शोकांतिकेचे चार प्रकार मानले : (१) साधी शोकांतिका - निव्वळ दृश्यात्मक घटक असलेली (२) दु:खभोगात्मक शोकांतिका – जिथे विकार ही प्रेरक शक्ती असते (३) नैतिक शोकांतिका – जिथे हेतू हे नैतिक असतात आणि (४) संमिश्र शोकांतिका – घटनेची परावृत्ती व अभिज्ञान यांवर अवलंबून असलेली.

ॲरिस्टॉटलच्या शोकात्मिकेसंबंधीच्या विवेचनात ‘ परावृत्ती ’व ‘ अभिज्ञान ’ह्या संकल्पनाही महत्त्वाच्या आहेत. संमिश्र शोकांतिकेत घटनेची परावृत्ती व अभिज्ञान यांमुळे स्थित्यंतर घडून येते, तेव्हा ती संमिश्र कर्मे व त्यामुळे संमिश्र कथानके होत. ॲरिस्टॉटलच्या मते परावृत्ती व अभिज्ञान ह्या दोन्ही गोष्टी कथानकाच्या अंतर्गत रचनेतून उद्‌भवल्या पाहिजेत.

परावृत्ती : (‘ पेरिपेटिया ’ ‘ रिव्हर्सल ऑफ द सिच्युएशन ’). कथानकातील ज्या स्थित्यंतरामुळे संभाव्यतेच्या वा अपरिहार्यतेच्या नियमानुसार कर्माला विरूद्घ दिशेकडे कलाटणी मिळते, त्या स्थित्यंतराला घटनेची परावृत्ती म्हणतात. कथानकाच्या प्रवाहाची गती ज्यावेळी विरूद्घ दिशेला वळते, त्यावेळी घटनेची परावृत्ती घडून येते. उदा., सॉफोक्लीझच्या ईडिपस टिरॅनस या नाटकात ईडिपसला उत्साहित करण्यासाठी व आपल्या आईविषयीच्या आशंकेपासून त्याला मुक्त करण्यासाठी दूत प्रवेश करतो पण तो जी वस्तुस्थिती कथन करतो, त्यातून ईडिपस कोण आहे हे कळून नेमका उलटा परिणाम घडून येतो. ही कलाटणी म्हणजेच परावृत्ती होय. हे स्थित्यंतर कशाप्रकारे घडते, परावृत्ती म्हणजे नेमके काय, ह्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. ‘पेरिपेटिया ’ह्या ग्रीक संज्ञेचे एस्. एच्. बुचरने ‘ रिव्हर्सल ऑफ द सिच्युएशन ’असे भाषांतर केले, तर डेव्हिड सॅम्युएल मार्गोल्यूथने ‘ आयरनी ऑफ फेट ’असे म्हटले. नायकाच्या जीवनातील सुस्थितीपासून दु:स्थितीकडे घडणारे स्थित्यंतर हे अचानकपणे घडून आल्यास परावृत्ती निर्माण होते, असे बाय्‌वॉटर मानतो पण फालन व लॉक यांच्या मते कर्ता ज्या परिणामांची अपेक्षा करीत असतो त्याच्या नेमका विरूद्घ परिणाम घडून आल्यास त्या स्थित्यंतराला परावृत्ती समजावे.

अभिज्ञान : (ॲनॅग्नॉरिसिस ‘ रेकग्निशन’ – बुचर / ‘डिस्कव्हरी ’ बाय्-वॉटर). अभिज्ञान म्हणजे एखादया घटनेचा अचानक उलगडा होणे, त्यातील न कळलेल्या अर्थाचे एकदम ‘ ज्ञान ’होणे. म्हणजेच अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारे स्थित्यंतर. हे शोकपर्यवसायी असते. उदा., ईडिपसने ज्याची हत्या केली, तो लेअस हा त्याचा पिता आणि त्याने जिच्याशी लग्न केले ती जोकास्ता ही त्याची माता हे ईडिपसला होणारे अभिज्ञान त्याच्या दु:खभोगांना व विनाशाला कारणीभूत होते. अभिज्ञान परावृत्तीशी संयोगित झाल्यावर करूणा व भीती निर्माण करू शकेल, असे ॲरिस्टॉटल म्हणतो. घटनेची परावृत्ती व अभिज्ञान ही कथानकाची दोन अंगे विस्मयावर आधारलेली असतात, असे त्याचे म्हणणे आहे.

ॲरिस्टॉटलने शोकांतिकेची सहा अंगे सांगितली आहेत : कथानक, स्वभाव, शब्दयोजना, विचार, दृश्य आणि गीत. शोकात्मिका ही व्यक्तीची नव्हे, तर जीवनाची अनुकृती असल्याने त्याने कथानकाला अधिक महत्त्व देऊन स्वभावदर्शनाला दुय्यम स्थान दिले. ॲरिस्टॉटल संभवनीयतेवर (प्रॉबेबिलिटी) जास्त भर देतो. त्यामुळे अद्‌भुताला वा अपवादात्मक गोष्टींना तो विरोध करीत नाही. ‘ त्याची काव्यात्मक सत्याची कल्पना तर्कनिष्ठ संभवनीयतेहून अधिक व्यापक व काहीशी मानसशास्त्रीय संभवनीयतेकडे झुकणारी असावी ’, असे मत गो. वि. करंदीकरांनी ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (१९७८) या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे.

ॲरिस्टॉटलने शोकात्मिकेच्या भाषेचे लय (ऱ्हिदम), गीत (साँग) व सुसंवादित्व (हार्मनी) हे गुण वर्णिले आहेत. त्याच्या मते दृश्य, गीत व भाषा यांमुळे शोकात्मिकेस अनुरूप वातावरण निर्माण होते.

पद्यात्मक ग्रीक शोकात्मिकेची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील : (१) प्रेक्षकांना पूर्वपरिचित अशा पुराणकथांमधून विषयाची निवड, (२) कोरस (वृंदगायक) बजावत असलेली निवेदनात्मक व भाष्यात्मक भूमिका : कोरस हे नगरातले वृद्घ पौरजन असल्याने ते सामुदायिक सदसद्‌विवेकाचे - समाजातील श्रद्धा, मूल्ये, नैतिकता यांचे  प्रतिनिधित्व करतात, (३) अत्यंत हिंस्र भयप्रद प्रसंग रंगमंचावर प्रत्यक्ष न दाखविण्याचा संकेत, (४) पात्रांची मर्यादित संख्या, (५) व्यक्तीचे अंतरंग व समाजजीवन ढवळून टाकणाऱ्या तीव्र आशयसूत्रांना प्राधान्य, (६) संपूर्ण मानवी जीवनव्यवहारांवर केलेले नैतिक भाष्य व उद्‌बोधन, पातकांना व नीच अधम कृत्यांना मिळणारी अपरिहार्य ईश्वरी शिक्षा (नेमिसिस). कथानकाच्या अंतर्गत रचनेतील परावृत्ती व अभिज्ञान आणि त्यामुळे करूणा व भीती ह्या परस्परविरोधी भावनांचे साधले जाणारे विरेचन त्यातून निर्माण होणारे भावनात्मक संतुलन. अशा वैशिष्ट्यांमुळे ग्रीक शोकात्मिका ह्या सखोल व अत्युच्च कोटीचा अनुभव देणाऱ्या श्रेष्ठ प्रतीच्या शोकात्मिका मानल्या जातात.


 रोमन शोकात्मिका : रोमन काळात ग्रीक शोकात्मिकांची रोमन रूपे सादर केली गेली. ⇨सेनिका (इ. स. पू. ४  इ. स. ६५) हा या काळातला प्रमुख रोमन नाटककार. त्याने लिहिलेल्या लॅटिन भाषेतील शोकात्मिकांमध्ये प्रक्षोभक हिंस्र घटना रंगभूमीवर प्रत्यक्ष दाखविल्या जात, तसेच आलंकारिक व आवेशपूर्ण भाषणे, हे त्याच्या नाटकांचे मुख्य गुणधर्म होत. ते एलिझाबेथकालीन शोकनाट्यांमध्येही काही प्रमाणात दृग्गोचर होतात.

मध्ययुगीन व प्रबोधनकालीन शोकात्मिका : मध्ययुगीन यूरोपीय नाटककारांत ⇨ जेफी चॉसर (सु. १३४०१४००), ⇨ टॉमस किड (१५५८९४), ⇨ किस्टोफर मार्लो (१५६४९३) प्रभृतींनी मुख्यत्वे शोकात्मिका लिहिल्या. प्राय: नैतिक उपदेशाचे साधन म्हणून मध्ययुगात शोकनाट्ये लिहिली गेली. उदा., चौदाव्या शतकातील ⇨ पीत्रार्क चे De viris illustribus  (१३३८-३९, विविध विख्यात व्यक्तींची चरित्रे) व ⇨ बोकाचीओ चे  De casibus virorum ellustrium (१३५५-७४, इं. शी. ऑन द फेट्स ऑफ फेमस मेन) ही नाटके, तसेच पंधराव्या शतकातील जॉन लिडगेटचे (१३७० ?१४५१ ?) द फॉल ऑफ प्रिन्सेस ही मध्ययुगीन नैतिक शोकात्मिकांची उल्लेखनीय उदाहरणे होत. चॉसरनेही आपल्या शोकात्मिकांतून, थोरामोठयांचे सुरूवातीचे वैभव नष्ट होऊन ती अखेर निष्कांचन दारिद्यावस्थेत कशी पोहोचतात, ह्याचे नैतिक उपदेशपर चित्रण केले. टॉमस किडने द स्पॅनिश ट्रॅजेडी (सु. १५८७-८८) सारख्या नाटकातून सेनिकाचे अनुकरण करून भडक, हिंस्र घटनांचे (उदा., खून, सूड, पिशाच्च-दर्शन, अनैतिक संबंध, अत्याचार इ.) अतिरंजित, शब्दबंबाळ भाषेत चित्रण केले. ह्या नाटकाने इंगजी नाटकांत सूडनाट्याचा अवतार घडवून आणला. किस्टोफर मार्लोने अ टँबरलेन (१५८७) व ट्रॅजिक हिस्टरी ऑफ डॉक्टर फॉस्टस (सु. १५८८) ह्या शोकात्मिकांमध्ये अतिमहत्त्वाकांक्षी, सामर्थ्यवान नायकांचे जे अध:पतन घडते त्यांतही त्यांची भव्यता उठून दिसते, अशा आशयाचे प्रभावी चित्रण केले. शेक्सपिअरच्या नाटकांवर मार्लोचा प्रभाव जाणवतो.

शेक्सपिअरच्या शोकात्मिका : ग्रीक शोकनाट्यानंतर शोकात्मिका या नाट्यप्रकाराचे अत्यंत विकसित व परिपूर्ण रूप शेक्सपिअरच्या नाटकांमध्ये दिसून येते. ह्या काळात शोकात्मिका या प्रकाराच्या स्वरूपात व रचनेत काही मूलगामी व क्रांतिकारक बदल घडून आले. ग्रीक शोकनाट्यात घटना-प्रधान कथानक-रचनेला सर्वाधिक प्राधान्य होते तसेच नायकांचा विनाश व शोकांत घडवून आणणारी सर्वांत प्रभावशाली, सामर्थ्यवान व निर्णायक शक्ती म्हणून दैववादाला वा नियतिवादाला मध्यवर्ती गाभ्याचे स्थान होते. त्याऐवजी शेक्सपिअरने प्रमुख पात्रांच्या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या स्वभाव-दोषांवर व स्वभावजन्य विसंगतींवर मुख्यत्वे भर दिला. नायकाची शोकांतिका घडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्यातले स्वभावदोष या स्वभावदोषांतून नायकाच्या हातून शोकात्म पमाद (हॅमर्शिया ट्रॅजिक एरर) घडतो व त्यातून त्याची शोकांतिका घडते, असे शेक्सपिअरने दाखविले. म्हणूनच ⇨ अँड्रू सिसिल बॅडली (१८५१-१९३५) याने शेक्सपिअरच्या शोकात्मिकांचे सूत्र ‘ कॅरॅक्टर इज डेस्टिनी’(व्यक्तिमत्त्व म्हणजेच दैव) असे सांगितले. शेक्सपिअरच्या शोकात्मिकांमध्ये तत्कालीन प्रचलित अशा नाट्यघटकांचे उत्कृष्ट संश्लेषण तर आढळतेच, पण त्यापलीकडे जाऊन खलत्वाची कल्पकतापूर्ण मर्मभेदी प्रचीतीही त्यांतून येते. किंग लीअर, हॅम्लेट, मॅक्‌बेथ, ऑथेल्ले ही त्याच्या शोकांतिकांची काही प्रसिद्घ उदाहरणे. मॅक्‌बेथची अतिमहत्त्वाकांक्षा, ऑथेल्लेचा संशयग्रस्त स्वभाव, हॅम्लेटचा अतिविचार करण्याचा स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांतील दोष त्यांची शोकांतिका घडवून आणतात. [→ शेक्सपिअर, विल्यम].

नव-अभिजाततावादी शोकात्मिका : इटालियन प्रबोधनकाळात (सोळावे शतक) ॲरिस्टॉटलच्या पोएटिक्स ची नवी भाषांतरे व त्यांवर नवी भाष्ये निर्माण झाली, त्यांतून शोकात्मिकेसंबंधी नव-अभिजाततावादी संकल्पना पुढे आली तथापि ॲरिस्टॉटलसंबंधीचे इटालियन प्रबोधनकालीन आकलन व भाषांतरे सदोष होती. ह्यांतील सर्वांत प्रभावी इटालियन भाष्यकार ज्यूलिअस सीझर स्कॅलिजर (१४८४-१५५८) असून, त्याने आपल्या Poetices libri Septem (१५६१, पोएटिक्स) ह्या गंथात शोकात्मिकेतील कृती ही आपल्या वास्तवासंबंधीच्या आकलनाशी मिळतीजुळती असली पाहिजे, अशी भूमिका मांडली. उदा., रंगमंचावर दोन तासांच्या कालावधीत ट्रोजन युद्घ दाखविता येणार नाही. तेव्हा शोकात्मिकेतील दृश्ये ही रंगमंचावरील काल-अवकाशाच्या मर्यादेतच वास्तववादी पद्धतीने दाखविता येतील अशी असावीत, असे प्रतिपादन त्याने केले. स्कॅलिजरच्या पावलावर पाऊल ठेवून लोदोव्हीको कास्तेलव्हेत्रो (१५०५-७१) ह्या इटालियन समीक्षकाने नव-अभिजाततावादी शोकात्मिकेच्या संदर्भात Poetica d’ Aristotele (१५७०) ह्या गंथात नाट्यांतर्गत स्थल-काल-कृति-ऐक्याची सुप्रसिद्घ संकल्पना मांडली. तिचा प्रभाव अठराव्या शतकातही टिकून होता.

सतराव्या शतकातील फ्रेच नव-अभिजाततावादी शोकात्मिका ही एलिझाबेथकालीन नाट्यपरंपरा अव्हेरून पुनश्च पुराणकथांचे विषय व स्थल-काल-कृति-ऐक्य नाटकातून साधण्याचे संकेत ह्यांतच गुरफटून पडली. ⇨ झां रासीन (१६३९-९९) व ⇨ प्येअर कोर्नेय (१६०६-८४) ह्या फेंच नाटककारांचा उल्लेख या संदर्भात करता येईल. रासीनपुढे युरिपिडीझ आणि सॉफोक्लीझ यांच्या ग्रीक शोकात्मिकांचा आदर्श होता. पुराणकालीन राजे-राण्यांच्या कथांना नाट्यरूपे देऊन त्या त्याने रंगभूमीवर आणल्या. मानवी जीवनाचे शोकात्म अंग त्याच्या शोकांतिकांनी अत्यंत प्रभावीपणे रंगभूमीवर उभे केले. अतिरेकीपणा, क्रौर्य, न-नैतिकता यांचे त्याने नाटकांतून घडविलेले दर्शन तत्कालीन अभिरूचीच्या दृष्टीने धक्कादायक होते. त्यामुळे अनझड वास्तववाद त्याकाळी टीकेला व रोषाला पात्र ठरला. त्याची इफिगेनी, फेद्र हा महत्त्वाची शोकात्म नाटके होत. ग्रीक पुरणाकथांतील देव-देवतांना रासीन व कार्नेय यांनी आपल्या शोकांत्मिकांतून सांकेतिक वाङ्‌मयीन रूपे दिली मात्र त्यांतून शोकात्म अनिवार्यतेचा प्रभावी प्रत्यय येत असल्याने, त्यांतील व्यक्तिरेखा दुःखभोगांच्या उंच कड्याच्या टोकावर उभ्या असल्या, तरी त्या मानवी प्रतीष्ठेची विलक्षण उंची गाठत असल्याचे दाखविले जाई.


ह्या काळात प्रभावी ठरलेली स्थल-काल-कृती-ऐक्याची संकल्पना ⇨ सॅम्युएल जॉन्सन (१७०९-८४) ह्याने द प्लेज ऑफ विल्यम शेक्सपिअर (१७६५) ह्या संकलनाला लिहिलेल्या प्रस्तावनेत धुडकावून लावली. कारण वास्तवदर्शनात ह्या संकल्पना संभ्रम निर्माण करतात, असे त्याचे मत होते. जर्मनीमध्ये ⇨ गोट्‌व्होल्ट लेसिंगने (१७२९-८१) हांबुर्गीश ऽ ड्रामाटुर्गी (१७६७-६८ इं. शी. ड्रमॅटिक नोट्‌स फ्रॉम हँबर्ग) मध्ये जॉन्सनच्या मताशी सहमती दर्शविली. शेक्सपिअरने आपल्या नाटकांतून फक्त कृती-ऐक्याची मर्यादा पाळली असल्याचे त्याने  दाखवून दिले. लेसिंगने स्वतः नैतिकतावादी जर्मन शोकांतिका लिहिल्या. त्यांत सद्‌गुणांचा गौरव व दुर्वर्तनाला शिक्षा हे सूत्र होते. मध्यमवर्गीय कौटुंबिक शोकनाट्ये (डोमेस्टिक ट्रॅजेडी) लिहिणारा लेसिंग हा प्रमुख नाटककार होता. ह्या काळापर्यंत राजे-रजवाडे, सरदार, अमीर-उमराव अशा मान्यवर प्रतिष्ठीत व्यक्तींना नायक कल्पून शोकांतिका लिहिल्या जात. ही प्रथा मोडीत काढून सामान्य व्यक्ती व त्यांची मध्यमवर्गीय दुःखे, यातनाभोग यांना प्राधान्य देऊन लेसिंगने शोकांतिका लिहिल्या.

एकोणिसाव्या शतकातील उपपत्ती :जॉर्ज व्हिल्हेल्म हेगेलने (१७७०-१८३१) आपल्या Vorlesungen uber die Aesthetik (१८३५-३८, इं. भा. लेक्चर्स ऑन एस्थेटिक्स) ह्या गंथातून अठराव्या शतकातील मध्यमवर्गीय नैतिकतावाद शोकांतिकावर प्रखर हल्ला चढविला. सॉफोक्लीझच्या अँटिगॉनचा दाखला देऊन त्याने शोकात्मिकेत दोन सापेक्ष नैतिक तत्त्वांमधला संघर्ष (अ कॉन्‌फ्लिक्ट ऑफ एथिकल सब्स्टन्स)असल्याचे विशद केले. सत्‌ विरूद्ध सत्‌ (गुड अगेन्स्ट गुड) असा दोन सापेक्ष नैतिक तत्त्वामधला संघर्ष शोकात्मिकेत रंगविलेला असतो, असे त्याने प्रतिपादन केले. शोकात्मिकेत ह्या विरोधी नैतिक तत्त्वांचे संश्लेषण साधलेले असते, त्यांपैकी कोणतेही एक तत्त्व अंतिम नव्हे. मानवेतिहासातील द्वंद्वात्मक विकासाचे प्रकटीकरण शोकात्मिकेतून होते, त्याचा आविष्कार वैश्विकतेत होतो, हे त्याच्या विवेचनाचे सार म्हणता येईल. ⇨फ्रीड्रिख नीत्शे (१८४४-१९००) ह्याचे शोकात्मिकेविषयीचे तात्त्विक चिंतन जास्त मूलभूत स्वरूपाचे व प्रभावी आहे. त्याचा Die Gubert der Tragodie (१८७२, इं. भा. द बर्थ ऑफ ट्रॅजेडी) हा प्रबंध फार महत्त्वाचा आहे. सुसंवादित्व, संयम व प्रमाणबद्धता यांवर भर देणारी ‘अपोलोनियन’ प्रवृत्ती आणि स्वैर, स्वच्छंद बेबंदपणा यांवर भर देणारी ‘डायोनायसियन’ प्रवृत्ती यांचे संश्लेषण शोकात्मिकेत साधलेले असते, असे नित्शेचे म्हणणे आहे. ह्या संदर्भात शोकात्मिकेचा मूळ उगम डायोनायसस ह्या दैवताच्या आदिम उत्सव-विधीतून झाला, ह्या गोष्टीकडे त्याने लक्ष वेधले आहे. निर्बंधांतून मुक्त होऊ पाहणारा, मानवाच्या अंतर्यामी खोलवर दडलेला ‘स्व’ व त्या मुक्तीच्या प्रयत्नांना कलेतून आकार शोधण्यासाठी त्याने चालविलेली धडपड, ह्यात त्याने शोकात्मिकेची बीजे शोधली आहेत.

आधुनिक शोकात्मिका : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर यूरोपमध्ये शोकात्मिकेचा एक नवाच प्रकार उदयास आला. पूर्वकालीन शोकांतिकाचे वाङ्‌मयीन संकेत ह्या नाटकांनी धुडकावून लावले. ⇨ हेन्रिक इब्सेन (१८२८-१९०६), ⇨ अंतॉन चेकॉव्ह (१८६०-१९०४) व ⇨आउगुस्ट स्ट्रिन्‌बॅर्य (१८४९-१९१२) ह्या नाटककारांनी शोकात्मिकेचे हे नवे रूप प्रामुख्याने घडविले. पूर्वीच्या नाटकांतील आलंकारिक, साचेबद्ध व सांकेतिक भाषेला पूर्ण फाटा देऊन त्यांनी नाटकाची नवी समर्थ शैली घडविली, तसेच समकालीन जीवनातील दुःखमय, यातनाप्रद घटनांना नाट्यरूपे दिली. इब्सेनने व्यक्तिजीवनातील व समाजजीवनातील समस्यांचे, भ्रमनिरसाचे व वैफल्याचे शोकात्म चित्रण केले. स्ट्रिन्‌बॅर्यने मानव-जीवनावर वर्चस्व गाजविणाऱ्या अनिवार्य पण विध्वंसकारी लैंगिकतेचे शोकपूर्ण चित्रण केले, तर चेकॉव्हने ऱ्हासशील समाजस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिजीवनाचा पोकळपणा, वैयर्थ्य व कंटाळवाणेपणा यांचे शोकात्म चित्रण केले.

आधुनिक काळातील ही नवी शोकात्मिका वास्तववादी किंवा स्वाभाविकतावादी स्वरूपाची आहे. तिच्यात सामाजिक वातावरण किंवा नैसर्गिक परिस्थिती अंतिम विश्वशक्तीचे रूप घेते आणि आत्यंतिक ध्येयवादी किंवा प्रखर आत्मनिष्ठ व्यक्ती शोकात्म नायक बनतात. या नाटकांत संघर्ष विश्वात्म बनेल आणि शेवट शोकात्म होईल, अशी घटनांतर्गत अपरिहार्यताही आहे. त्यात निसर्ग वा परिस्थिती मानवी मूल्ये उद्‌ध्वस्त करतात म्हणून त्यास शत्रू कल्पिले आहे. साहजिकच त्यातील शोकात्म नायक श्रद्धा हा भ्रम, तर सत्य ही अमानुषता, असा निराशाजनक प्रत्यय येतो.

विसाव्या शतकातील नाट्यवाङ्‌मयात शोकात्मिका हा प्रकार त्याच्या सर्वांगपरिपूर्ण स्वरूपात व सम्यक परिमाणांनिशी व्यक्त होताना दिसत नाही म्हणून शोकात्मिका ऱ्हासाला लागली आहे, असे काही समीक्षकांचे मत आहे. तथापि आधुनिक अमेरिकन नाटककार ⇨यूजीन ओनील (१८८८-१९५३) याने काही समर्थ प्रभावी शोकात्मिका लिहिल्या. उदा., स्ट्रेंज इंटरल्यूड (१९२८) मोर्निंग बिकम्स इलेक्ट्रा (१९६१) ही नाट्यत्रयी लाँग डेज जर्नी इन्टू नाइट (१९५६) इत्यादी. ⇨ आर्थर मिलर (१९१५-२००५) ह्या अमेरिकन नाटककारानेही डेथ ऑफ ए सेल्समन (१९४९), ए व्ह्यू फ्रॉम द ब्रिज (१९५५) यांसारख्या प्रभावी शोकात्मिका लिहिल्या.

दुसऱ्या महायुद्धानंतर काळात एकंदर विश्वाचे वैयर्थ्य चित्रित करणारे असंगत नाट्य वा ⇨मृषानाट्य (थिएटर ऑफ द ॲब्सर्ड) निर्माण झाले व विलक्षण प्रभावी ठरले. विश्वाची असंबद्धता व विरूपता यांचे कधी तिरकस औपरोधिक शैलीने विदूषकी थाटात, तर कधी केविलवाण्या करूण सुरात दर्शन घडविणारा हा नाट्यप्रकार एका अर्थाने शोकात्मिकेला जवळ जाणारा आहे. शोकात्मिकेपेक्षा तो मूलतः व स्वरूपतः भिन्न असला, तरी तो प्रेक्षकाला  शोकात्मिकेप्रमाणेच अस्वस्थ व अंतर्मुख करणारा आहे.

नाटकाप्रमाणेच अन्य गद्य कथनप्रकारांतही मानवी जीवनातील शोकात्म अनुभूतींचे प्रभावी चित्रण लेखकांनी केल्याचे आधुनिक काळात दिसून येते. विशेषतः कादंबरी ह्या प्रकारात ⇨फ्यॉडर डॉस्टोव्हस्की (१८२१-८१), ⇨ टॉमस हार्डी (१८४०-१९२८), ⇨जोसेफ कॉनरॅड (१८५७-१९२४), ⇨विल्यम्‌ फॉक्‌नर (१८९७-१९६२) प्रभृती कादंबरीकारांनी शोकात्म नाट्यपरंपरेचे स्मरण करून देणाऱ्या काही उत्कृष्ट शोकात्म कादंबऱ्या लिहिल्या. श्रेष्ठ शोकात्मिकेची सर्व गुणवैशिष्ट्ये ह्या कांदबऱ्यांतूनही प्रत्ययास येतात.

विसाव्या शतकात शोकात्मिका हा प्रकार अस्तंगत होत चालला असल्याचा अभिप्राय अनेक समीक्षकांनी नोंदविला असून, त्यासंबंधी चिकित्सा करणारे तात्त्विक समीक्षात्मक लिखाणही विपुल प्रमाणात केले आहे.


शोकात्मिका : स्वरूपमीमांसा : शोकात्मिकेचे स्वरूप, आस्वादयता व परिणाम, श्रेष्ठत्वाची गमके, आधुनिक काळातील ऱ्हासाची मीमांसा, तसेच प्राचीन ग्रीक शोकात्मिका व ॲरिस्टॉटलच्या सैद्धांतिक उपपत्ती अशा विविध अंगोपांगांनी शोकात्मिकेची चर्चा आधुनिक काळात अनेक नाटककार, तत्त्वज्ञ, विचारवंत यांनी केलेली आहे.

माणसाचे मूलत: दु:खमय जीवन, त्याच्या वाट्याला येणारे अटळ दु:खभोग, त्याच्या सबंध आयुष्यावर पसरलेले शोकात्म जाणिवेचे अशुभ सावट अशा प्रकारच्या धारणांतून जगभरातील थोर प्रतिभावंतांनी वेळोवेळी शोकात्मिका लिहिल्या आहेत व मानवी दु:खजाणिवांचा सखोल वेध घेण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शोकात्मिका ही सुसंस्कृत मानवाची उच्च्तम कलाभिव्यक्ती मानली जाते.

शोकात्मिका वा शोकांतिका या प्रकाराचे ठळक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा दु:खपूर्ण, शोकपर्यवसायी शेवट. हा शेवट नाटकातील प्रमुख पात्राच्या भीषण मृत्यूत किंवा दारूण दु:खस्थितीत होतो पण केवळ दु:खपर्यवसायी नाटक म्हणजे शोकात्मिका नव्हे. इथे करूण व शोकात्म ह्यांतील सूक्ष्म भेद लक्षात घ्यावा लागेल. उदा., एखादया व्यक्तीचा अपघाती मृत्यू ही घटना करूण आहे, तर आपल्याहून सामर्थ्यशाली शक्तीशी झुंज देत असताना व्यक्तीच्या वाट्याला येणारा अटळ विनाश ही घटना ‘ शोकात्म ’आहे. शोकात्मिकेत दु:खपूर्ण शेवटापेक्षाही ते दु:ख भोगत असताना ती व्यक्ती अधिक महान, धीरोदात्त झाल्याचा जो प्रत्यय येतो, त्याला अधिक महत्त्व प्राप्त होते. शोकात्म अनुभवाची प्रकृती मूलत: भिन्न असून त्या अनुभूतीचे स्वरूप व्यापक आहे. ज्ञात विश्वापलीकडील एक अतर्क्य व अज्ञात शक्ती मानवी जीवनावर नियंत्रण करते, ही धारणा शोकात्म जाणिवेचे मूलकारण आहे. ह्यातून मानवाच्या अस्तित्वाचा अर्थ काय? विश्वातील अंतिम शक्तीचे स्वरूप कोणते? यांसारखे मूलभूत प्रश्न उपस्थित होतात, ते शोकात्मिकेच्या आशयाच्या गाभ्याशी असतात. शोकात्मिकेतून मानवाचे विश्वाशी असलेले नाते चित्रित होते, त्या नात्यावर प्रकाश टाकला जातो. मानव जगन्नियंत्या अंतिम शक्तीसमोर पराधीन व अगतिक असला, तरी त्या शक्तीचे गूढ जाणण्याची दुर्दम्य इच्छा त्याला असते. त्यामुळे तो तिला सामोरा जातो किंवा तिचे आव्हान स्वीकारतो आणि त्यातून मानव विरूद्घ सर्वशक्तिमान अंतिम शक्ती, असा संघर्ष निर्माण होतो. या संगामात मानवाचा पराभव अटळ असला, तरी तो पराभव अगम्य विश्वाच्या अंतर्व्यवस्थेतून जन्माला येणाऱ्या दु:खाच्या अटळतेवर नवा प्रकाश टाकतो. हे नवे आकलन म्हणजे पराभवातही मानवाचा होणारा आत्मिक विजय होय. त्यामुळे साधणारा भव्योदात्त परिणाम हा शोकात्मिकेचा सर्वांत महत्त्वाचा विशेष होय.

विविध मते : आधुनिक काळातील श्रेष्ठ फेंच नाटककार व तत्त्वचिंतक ⇨आल्बेअर काम्यू (१९१३-६०) ह्याला सॉफोक्लीझची प्राचीन ग्रीक नाटके आदर्श शोकनाट्ये वाटतात. त्याची कारणमीमांसा अशी, की दैवी किंवा सामाजिक रूपातील दैवी संगतीच्या (ऑर्डर) विरूद्घ व्यक्ती जेव्हा अहंकाराच्या आहारी जाऊन दंड ठोकते, तेव्हा शोकांतिका घडते. या दोन्ही शक्ती आपापल्या परीने बरोबर, न्याय्य असतात व त्यांच्यांतील तोल सांभाळून जोपर्यंत लेखक नाटक निर्माण करत असतो, तोपर्यंतच शोकांतिका निर्माण होऊ शकते. तेव्हा दोन तुल्यबळ शक्तींमधील संघर्ष हा सॉफोक्लीझच्या ईडिपस टिरॅनस सारख्या नाटकांना श्रेष्ठ शोकांतिकेचा दर्जा प्राप्त करून देतो.

डॅनिश तत्त्वज्ञ ⇨ सरेन किर्केगॉर च्या (१८१३-५५) मते प्राचीन व आधुनिक शोकनाट्याचे मूलज्ञापक (मोटिफ) एकच आहे. प्राचीन शोकात्मिकेत घटना व्यक्तिरेखेत उगम पावत नसे आणि नाटकातील घटनाक्रमाचा व्यक्तिनिष्ठ चिंतनाशी संबंध नसे. घटनांतच यातनांचे सापेक्ष मिश्रण असे. त्यांना महाकाव्याची लय असे. याउलट आधुनिक शोकनाट्यात नायकाची कृत्ये हीच शोकात्म असतात, त्याचा विनाश नव्हे. विनाशापेक्षा प्रसंग व व्यक्तिरेखा जास्त महत्त्वाच्या असतात. नायकाची उन्नती आणि विनाश केवळ त्याच्या कृत्यांमुळेच घडून येतो. या फरकामुळे शोकात्म अपराधभावाचे (ट्रॅजिक गिल्ट) स्वरूप दोहोंत पालटते. प्राचीन ग्रीकशोकनाट्याच्या तुलनेत आधुनिक शोकनाटयंत आत्मचिंतनाला जेवढा जास्त वाव मिळतो, तेवढा त्यातील अपराधभाव जास्त नैतिक होतो. प्राचीन ग्रीक शोकांतिकेत दु:ख खोल असे, पण वेदना (पेन्स) कमी असत. उलट आधुनिक शोकनाट्यात वेदना, मनस्ताप जास्त आणि परिणामी त्याचे नैतिक अंग जास्त प्रभावी होते. खऱ्या शोकात्म दु:खाला अपराधभाव आवश्यक असतो. हा किर्केगॉरच्या मताचा सारांश आहे.

प्राचीन ग्रीक काळात शोकात्मिकेसंबंधीचा तात्त्विक विचार फक्त नाटकापुरताच मर्यादित होता. आधुनिक काळात मात्र शोकात्म आशय असलेल्या कथा-कादंबऱ्यांची लक्षणीय प्रमाणात वाढ झाली. ह्या बदलाच्या पार्श्वभूमीवर केवळ शोकनाट्यापेक्षा शोकात्म भावाचा, शोकात्म जाणिवेचा विचार आधुनिक काळात जास्त प्रस्तुत ठरला.

जर्मन तत्त्वज्ञ ⇨ आर्थर शोपेनहौअर ने (१७८८-१८६०) मानवी जीवनाचे अविभाज्य अंग म्हणून शोकात्मिकेचा व्यापक व सखोल विचार केला आहे. आजार, वार्धक्य आणि मृत्यू यांनी गासलेले मानवी जीवन मुळातच दु:खमय आहे व तृष्णा हे सर्व दु:खांचे मूळ आहे. बुद्घिमत्ता व स्वाभिमान ज्या प्रमाणात अधिक त्या प्रमाणात मनुष्याला दु:ख अधिक मानवी जीवनातील हे नैराश्य व फोलपणा शोकात्मिका दाखवून देतात. शोपेनहौअरच्या मते शोकात्मिका मायावी पडदा दूर सारून विश्वाचे सत्यस्वरूप उघड करते आणि त्यामुळे माणसाचा अहंभाव व जीवनेच्छा नाहीशी होऊन त्याला शांती व संन्यस्तवृत्ती लाभते.


स्पॅनिश तत्त्वज्ञ ⇨ मीगेल दे ऊनामुनोई हूगो (१९१३) याला सर्वधर्मांचा व तत्त्वज्ञानाचा प्रारंभ जीवनाच्या शोकात्म जाणिवेत आहे, असे वाटते. मूल्यांचा विध्वंस हे होलरच्या मते शोकात्मकतेचे व्यवच्छेदक लक्षण होय. विध्वंस म्हणजे केवळ मृत्यू वा प्राणहानी नव्हे तर व्यक्तीचे असे काही – मग ते योजना, इच्छाशक्ती, श्रद्धा इ. काहीही असो – ते नष्ट झाले पाहिजे. सिडनी हूकने शोकात्मता ही नैतिक घटना मानली आहे. ज्या ठिकाणी माणसाच्या आशा-आकांक्षा धुळीला मिळतात, त्या ठिकाणी त्याला शोकात्मिका दिसते. शोकात्म भाव व फलप्रामाण्यवाद (प्रॅग्मॅटिझम) यांचे परस्परसंबंधही त्याने तपासले आहेत. अस्तित्ववादी जर्मन तत्त्वज्ञ ⇨कार्ल यास्पर्स ने (१८८३-१९६९) शोकात्म घडावयाचे असेल, तर माणसाने कृती केलीच पाहिजे फक्त कृतीतूनच त्याला नष्ट करणाऱ्या शोकात्म गुंतवणुकीत माणूस ओढला जातो, असे प्रतिपादन केले आहे. प्राचीन ग्रीक शोकात्मिकांना प्राचीन धर्मविधींचाच (रिच्युअल) घाट लाभत असे कारण ही नाटके त्या धर्मविधींचाच एक भाग होती. हा घाट ‘ Enniautos Daimon ’ (सिझनल गॉड – डायोनायसस हा ऋतुदेव) या प्राचीन धर्मविधीचा असल्याचे फान्सिस फर्ग्युसनने म्हटले आहे. शोकांतिकेतील या धर्मविधियुक्त घाटाच्या शोकात्म लयीचे सूक्ष्म व मार्मिक विवेचन फर्ग्युसनने आपल्या ‘ ईडिपस रेक्स : द ट्रॅजिक ऱ्हिदम ऑफ ॲक्शन ’या लेखात केले आहे. समाजाच्या सद-सद्विविवेकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोरसचे शोकात्मिकेतील महत्त्वपूर्ण स्थान फर्ग्युसनने विशद केले आहे. कोरसचे घटनांवरचे भाष्य हे नाटकाला सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक आशय प्राप्त करून देते व कोरसची काव्यात्म लयबद्घ भाषा व सादरीकरणाची नृत्यगानयुक्त शैली नाटकाचा शोकात्म परिणाम जास्त गहिरा करतात, हे फर्ग्युसनचे भाष्य आहे. नीत्शेनेही ग्रीक शोकनाट्याचा गाभा त्याच्या कोरसमध्ये असल्याचे म्हटले आहे. कोरसच्या ‘ सॅटिरिक ’प्रभावामुळे शोकनाट्याचे वास्तव धार्मिक होते. नीत्शेला शोकांतिकेमध्ये सौंदर्यनिष्ठ व्यक्तिवादी प्रज्ञा व अस्तित्वनिष्ठ आदिम प्रेरणा यांच्या परस्परपूरक सहभावातून इच्छाशक्तीचे अमरत्व साकार झालेले आढळते. आधुनिक फेंच नाटककार ⇨ झां आनुईय (१९१० –  ) याच्या मते शोकात्मिकेत संदेह आणि आशा या दोहोंनाही स्थान नसते. कसलाही संदेह नाही, प्रत्येकाची नियती ठरलेली (ज्ञात) असते व ह्यामुळेच तिचा परिणाम प्रशांत असतो. जिथे आकाशच कोसळते तिथे मरणाऱ्याइतकाच मारणाराही निरपराधी असतो. जोसेफ वुड कूच (१८९३-१९७०) या अमेरिकन समीक्षकाने द मॉडर्न टेंपर (१९२९) या पुस्तकात धर्माप्रमाणेच शोकात्मिकाही विवेक, अर्थपूर्णता व वैश्विकता यांचे समर्थन करते, ती नैराश्याची अभिव्यक्ती नसून उलट त्यापासून (महायुगांनी) स्वतःचा बचाव करण्याचे ते एक प्रभावी साधन बनते. तथापि आधुनिक जगात देवावरची व मानवावरची एकूणच श्रद्धा लोप पावली असल्याने त्याचा परिणाम म्हणून पूर्वीच्या शोकात्मिकांप्रमाणे शोकात्म अनुभव निर्माण करण्याची क्षमताही नष्ट झाली आहे. तथाकथित आधुनिक शोकात्मिका ही उच्च कोटीच्या आत्मिक शक्तीचा अभाव असलेल्या सामान्य माणसाची दु:खे रेखाटते व त्याच्यावर ओढवणारी संकटेही त्याला नैराश्याने खचविणारी असतात, असे कूचने म्हटले आहे. जॉर्ज स्टायनरनेही द डेथ ऑफ ट्रॅजेडी (१९६१) या पुस्तकात आधुनिक शोकात्मिकेच्या ऱ्हासाची मीमांसा केली आहे. त्याचे प्रतिपादन असे, की शोकात्मिका ही जीवनातील विवेक, सुव्यवस्था व न्याय यांना असलेल्या महान मर्यादा व त्या ओलांडण्याच्या बाबतीत भौतिक प्रगतीची असलेली असमर्थता यांचे दर्शन घडवीत असतानाच बौद्घिक स्पष्टीकरणे निरूपयोगी ठरविते आणि मानवातील चैतन्यतत्त्वाचे पुनरूत्थान घडविते. आधुनिक शोकात्मिकांतून मात्र असा प्रत्यय येत नाही. एकात्म वैश्विक दृष्टिकोणाचा अभाव व त्याच्या परिणामातून मूल्ये व श्रद्धा यांचा लोप हे त्याने आधुनिक शोकात्मिकांच्या ऱ्हासाचे कारण सांगितले आहे. आधुनिक अमेरिकन नाटककार आर्थर मिलर याने मात्र आधुनिक शोकात्मिकेचे समर्थन केले आहे. ट्रॅजेडी अँड द कॉमन मॅन (१९४९) ह्या निबंधात त्याने म्हटले आहे, की सामान्य माणसालाही शोकनायकाची प्रतिष्ठा लाभू शकते. ह्या स्पर्धात्मक जगात आपले योग्य स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला संघर्षात अवघ्या सर्वस्वानिशी झोकून देण्याची इच्छाशक्ती दाखविल्यास तो शोकात्म नायकाचे स्थान प्राप्त करू शकतो, असे मिलरने म्हटले आहे. जॉन गास्नर (१९०३-६७) सारख्या समीक्षकांनी, मानवी आपत्तींचे चित्रण करणाऱ्या आधुनिक शोकात्मिकेचे वर्णन करताना नवीन संज्ञांनी युक्त अशी नवी परिभाषाच घडविली आहे. उदा., आर्थर मिलरची डेथ ऑफ ए सेल्समन ही निम्न शोकात्मिका (लो ट्रॅजेडी) आहे, तर शेक्सपिअरचे हॅम्लेट ही उच्च शोकात्मिका (हाय ट्रॅजेडी) आहे, असा भेद गास्नरने केला आहे. ह्या संज्ञा प्रतीकात्मक पातळीवर आधुनिक माणसाच्या महत्त्वाकांक्षा व कर्तृत्व ह्यांचे स्वरूप दर्शविणाऱ्या आहेत, असे म्हणता येईल.

संस्कृत साहित्यशास्त्रातील करूण रसाची कल्पना या संदर्भात लक्षणीय आहे. करूण रसाचा स्थायीभाव शोक हा आहे. शोक आस्वादय झाल्याशिवाय करूण रसाची प्रतीती येत नाही. शोकात्मिकेच्या दर्शनाने वा परिशीलनाने रसिकांच्या मनात निर्माण होणारी शोकाची भावना आस्वादय बनते, म्हणूनच त्यांना करूण रसाचा आस्वाद घेता येतो तथापि संस्कृत साहित्यशास्त्रात करूण रसाला गौण स्थान दिलेले आहे. भवभूतीने मात्र करूण रसाला श्रेष्ठत्व बहाल केले आहे. संस्कृत साहित्यात शोकात्म भावाचे चित्रण आढळत असले, तरी खृया अर्थाने शोकांतिका आढळत नाही. आधुनिक भारतीय भाषांमध्ये पाश्चात्त्य शोकात्मिकांच्या प्रेरणा-प्रभावातून काही शोकांतिका लिहिल्या गेल्या आहेत. मराठीमध्ये कृ. प्र. खाडिलकर यांचे सवाई माधवराव यांचा मृत्यु (१९०६), राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला (१९१९), वि.वा.शिरवाडकर यांचे नटसमाट (१९७१) इ.नाटकेशोकात्मिकांची उदाहरणे मानली जातात.

पहा : शोक-सुखात्मिका.

संदर्भ : 1. Corrigan, Robert W. Ed. Tragedy : Vision and Form, New York, 1981.

             2. Kaufmann, Walter, Tragedy and Philosophy, New Jersey, 1986.

            3. Leech, Clifford, Tragedy, London, 1969.

            4. Steiner, George, The Death of Tragedy, Oxford, 1980.

            ५. करंदीकर, गो. वि. ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, मुंबई, १९७८.

            ६. खोले, विलास, शोकांतिकेचा उदय, मुंबई, १९९२.

            ७. गोकाककर, सु. गो. दुंडगेकर, ना. रा. संपा. शोकनाट्याची मूलतत्त्वे, पुणे, १९७६.

            ८. दुंडगेकर, ना. रा. शोकनाट्याचे अंतरंग, बेळगाव, १९७८.

            ९. मनोहर, माधव, मराठी कॉमेडी-ट्रॅजेडी, मुंबई, १९८९.

           १०. सावंत, कृ. रा. ग्रीक आणि रोमन रंगभूमी, मुंबई, १९७२.

इनामदार, श्री. दे.