ओंकार मांधाता : भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. हे इंदोर – खांडवा लोहमार्गावरील ओंकारेश्वर रोड स्थानकापासून आठ किमी. नर्मदेमधील अडीच किमी. लांबीच्या एका बेटावर वसलेले आहे. नर्मदेच्या दक्षिण किनाऱ्यावरील अमलेश्वर आणि ओंकार मांधाता दोन्हींचे मिळून ज्योतिर्लिंग पूर्ण होते असे मानले जाते. इक्ष्वाकुवंशीय मांधातृ राजाने येथे येऊन शिवाराधना केल्यामुळे त्याला फलप्राप्ती झाली, त्यावरून या स्थानास मांधाता आणि बेटाचा आकार ॐकाराधिष्ठित चंद्रकोरीसदृश म्हणून ओंकार हे नाव मिळाले. या क्षेत्रामधील मंदिर पेशव्यांनी बांधले असून क्षेत्रानजीक ब्रह्मा व चामुंडी यांच्या मूर्ती व विष्णू आणि काही जैन मंदिरेही आहेत. मूर्तींचा दगड हिरवा आहे.
शाह, र. रू.