ओएन, रॉबर्ट : (१४ मे १७७१ — १७ नोव्हेंबर १८५८). इंग्रज समाजवादी, समाजसुधारक व सहकाराचा प्रवर्तक. वेल्समधील माँगमरी परगण्यातील न्यूटाउन येथे त्याचा जन्म झाला. याच गावी त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या दहाव्या वर्षी नॉर्दॅम्प्टनशरमधील स्टॅम्फर्ड गावी एका कापड व्यापाऱ्याकडे तो नोकरीस राहिला. तेथे चार वर्षे काढल्यानंतर रॉबर्ट ओएन तशाच प्रकारची नोकरी स्वीकारून मँचेस्टर येथे गेला व तेथे तो आपल्या कामात इतका यशस्वी झाला की, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्याला पाचशे कामगार असलेल्या एका कापडगिरणीत व्यवस्थापकाच्या जागेवर नेमण्यात आले. १७९४ मध्ये मँचेस्टरच्या शॉर्लटन टि्वस्ट कंपनीमध्ये तो भागीदार झाला व परिणामी त्याने पूर्वीची नोकरी सोडून दिली. १७९९ मध्ये ओएनने काही भागीदारांच्या मदतीने डेव्हिड डेल नावाच्या एका कारखानदाराकडून ग्लासगो शहराजवळील ‘न्यू लानार्क मिल्स’ विकत घेतली. पुढे त्याने डेलच्या मुलीशी विवाह केला.
न्यू लानार्क येथे ओएनने कामगारांच्या परिस्थितीत व कारखान्याच्या यंत्रणेमध्ये अनेक चांगल्या सुधारणा केल्या. प्रथम त्याने आपल्या कारखान्यातील कामाचे तास सतरापासून दहापर्यंत कमी केले लहान मुलांना कामावर ठेवण्याची अनिष्ट प्रथा बंद केली कामगारांसाठी स्वस्त किंमतीच्या पण चांगल्या दर्जाच्या वस्तूंची दुकाने उघडली व त्यांच्या मुलांसाठी शाळा बांधल्या. इतकेच नव्हे, तर इतर कारखान्यांत दिल्या जाणाऱ्या वेतनाहून अधिक वेतन व तेही नियमितपणे दिले. या सुधारणांमुळे उद्योगधंद्याच्या यशस्वितेवर वा नफ्यावर विपरीत परिणाम होत नाही, असे त्याने दाखवून दिले. १८१३ मध्ये त्याने ए न्यू व्ह्यू ऑफ सोसायटी हे आपली मतप्रणाली व्यक्तविणारे पुस्तक प्रसिद्ध केले. त्याने लिहिलेले रिपोर्ट टू द काउंटी ऑफ लानार्क हे पुस्तक १८२१ मध्ये प्रसिद्ध झाले. ओएनच्या भागीदारांना त्याचा मार्ग न आवडून, त्यांनी त्याच्या कार्यात अनेक अडचणी उभ्या केल्या. त्यामुळे १८१४ मध्ये त्याने त्यांचीही भागीदारी विकत घेतली. ओएनने न्यू लानार्क येथे सुरू केलेल्या शैक्षणिक व सामाजिक पद्धती अतिशय यशस्वी ठरल्या व तेथील संस्था अत्यंत प्रसिद्धीस आल्या. देशोदेशींचे कारखानदार आपल्या प्रतिनिधींना या संस्थांकडे पाठवून तेथील पद्धतींचा अभ्यास करू लागले.
सामाजिक परिस्थित्यनुसार नागरिकांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण होत असते. कामगारांना चारित्र्यसंपन्न व कार्यक्षम नागरिक बनविण्यासाठी त्यांच्या परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे, असे त्याचे म्हणणे होते. लहानपणी मुलांना संस्कारक्षम शिक्षण दिल्यास त्यांचा भावी आयुष्यपथ कल्याणकारक व सौख्यप्रद होतो, असा ओएनचा सिद्धांत होता. त्याच्या कार्यात त्याला कुणाचा पाठिंबा मिळाला नाही, तरी नाउमेद न होता त्याने सहकारी समाजवादाचा प्रयोग सुरू केला.
आर्थिक मंदीची व बेकारीची जी लाट १८१५ च्या शांततेनंतर उसळली, तिच्यामुळे उद्भवलेल्या दोषांचे निवारण करण्यासाठी ओएनने ऐक्य आणि सहकार्य या तत्त्वांवर नगरे उभारण्याची योजना हाती घेतली. स्पर्धेला बाजूला सारून सहकार्यावर आधारलेली समाजरचना मूर्त स्वरूपात आणण्याचे त्याचे स्वप्न होते. सहकारी शेती व औद्योगिकीकरण यांची सांगड घालून त्याने नगरे वसविली आणि अनेक बेकारांना तेथे रोजगार उपलब्ध करून दिला. स्कॉटलंडमधील प्रयोग अयशस्वी ठरल्यानंतर तो अमेरिकेतील इंडियाना राज्यात गेला व तेथे त्याने ‘न्यू हार्मनी’ नावाची वसाहत उभारली, त्याच्या कुशल व्यवस्थापनाखाली प्रथम त्या वसाहतीची प्रगती होत गेली, तरी काही काळानंतर अडचणी निर्माण होऊन दोन लाख डॉलर खर्ची पडल्यावर १८२८ मध्ये त्याने वसाहतीचे विसर्जन केले.
आयुष्याचा अखेरचा काळ ओएनने इंग्लंडमध्ये घालविला. १८२९ मध्ये न्यू लानार्क उद्योगातून त्याने अंग काढून घेतले व हा काळ त्याने आपल्या मतप्रणालीचा प्रसार करण्यात घालविला. या काळात इंग्लंडमधील सहकार चळवळीला त्याचे सम्यक मार्गदर्शन मिळाल्याने तिची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. कामगार चळवळीतही त्याने हिरिरीने भाग घेतला. १८५७ मध्ये त्याचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.
ओएन न्यूटाउन येथे वयाच्या ८१ व्या वर्षी मरण पावला. सहकार्याच्या पायावर उभारलेले समूहजीवनाचे स्वप्न त्याच्या हयातीत साकार झाले नाही हे खरे असले, तरी त्याने जिद्दीने केलेल्या अपयशी प्रयोगातूनच आधुनिक लोकशाही समाजवादाची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही.
पहा : आर्थिक विचार : इतिहास आणि विकास.
संदर्भ : Cole, G. D. H. Life of Robert Owen, London, 1930.
गद्रे, वि. रा.
“