एव्हान्झ, आर्थर जॉन : (८ जुलै १८५१ — ११ जुलै १९४१). एक प्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. नॅशमिल्स (इंग्‍लंड) येथे एका सुखवस्तू कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सर जॉन ह्यांनी नवाश्मयुग व ब्राँझयुग ह्यांसंबंधी अनेक पुस्तके लिहिली होती. त्यामुळे आर्थरला बालपणीच पुरातत्त्वविद्येचा छंद जडला. हॅरो स्कूल आणि गटिंगेन व ऑक्सफर्ड या विद्यापीठांतून इतिहास विषयात उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडताच, त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठात अधिछात्र म्हणून नियुक्ती झाली. नंतर त्याने संशोधनास सुरुवात केली आणि विविध देशांना भेटी दिल्या एवढेच नव्हे, तर स्वखर्चाने त्याने काही ठिकाणी उत्खननेही आरंभिली. फ्रीमन या इतिहासज्ञाच्या मार्गारेट ह्या मुलीबरोबर विवाह करून काही दिवस तो रागुझा (डूब्रॉव्हनिक) ह्या ठिकाणी राहिला. परंतु तेथील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्यास ते सोडावे लागले. ग्रीक ब्राँझयुगातील मायसीनियन संस्कृतीबद्दल त्यास प्रथमपासूनच आकर्षण होते. १८८४ साली ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सुप्रसिद्ध ॲश्मोलिअन संग्रहालयाचे अभिरक्षकपद त्यास देण्यात आले. १९०८ मध्ये तेथून निवृत्त होईपर्यंत त्याने त्या संग्रहालयात अनेक आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. पुढे प्रागितिहासाचा प्राध्यापक म्हणून त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये नेमणूक झाली. १८९९ पासून १९३५ पर्यंत क्रिटमध्ये त्याने उत्खनने केली. क्रीटमधील या अपरिचित संस्कृतीस त्याने मिनोअन हे नाव दिले. त्यातून मिनोअन संस्कृतीचे अनेक अवशेष उघडकीस आले. आपल्या उत्खननांसंबंधी त्याने अनेक ग्रंथ लिहिले. त्यांतील द हॉर्समेन ऑफ टारेंटम (१८८९), क्रीटन पिक्टोग्रॅफ्स अँड प्री फिनिशियन स्क्रीप्‍ट (१८९५), स्क्रीप्‍टा मिनोआ (१९०९) व द पॅलेस ऑफ मिनॉस (१९२१—३६) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याने मांडलेल्या अनुमानांसंबंधी व कालनिर्णयांबाबत काही आक्षेप घेण्यात आले काहींनी त्याचे सिद्धांत खोडूनही काढले, तथापि त्यामुळे त्याने केलेल्या कार्याची महती यत्‌किंचितही कमी झाली नाही.

त्याच्या कामगिरीबद्दल १९१५ साली त्यास सर हा किताब व १९३४ साली सुवर्णपदक देण्यात आले. ह्याशिवाय रॉयल सोसायटीची अधिछात्रवृत्ती (१९०१), नाईटपद (१९११), सोसायटी ऑफ ॲन्टिक्वेरिजचे अध्यक्षपद (१९१४—१९) वगैरे बहुमान त्यास लाभले. त्याने १९२७ साली आपली सर्व संपत्ती अथेन्समधील ब्रिटिश स्कूल या संशोधन संस्थेस देऊन टाकली. तो वयाच्या एक्क्याण्णवव्या वर्षी ऑक्सफर्डजवळ मरण पावला.

संदर्भ : 1. Wilkins, Frances, Six Great Archaeologists, London, 1961.

देशपांडे, सु. र.