एरिनपुरा ग्रॅनाइट : दिल्ली संघाच्या खडकांत घुसलेल्या ग्रॅनाइटाच्या राशींचे नाव. अबूचा पहाड याच्यात एका मोठ्या राशीपासून (बॅथोलिथापासून) बनलेला आहे. याच्या स्कंधासारख्या लहान राशीही आढळतात. अरवलीच्या वायव्येकडील विस्तीर्ण क्षेत्रात व पालनपूर, इडर, सिरोही, बिवार, जयपूर, अलवर इ. ठिकाणी हा उघडा पडलेला आढळतो. हा मुख्यत: फेल्स्पार, क्वार्ट्‌झ व कृष्णाभ्रक या खनिजांचा बनलेला असून याची संरचना कधी ग्रॅनाइटी तर कधी अस्पष्ट किंवा स्पष्ट पट्टित असलेली आढळते. एरिनपुरा ग्रॅनाइटाच्या जोडीने त्याच्या व त्याच्या पेग्मटाइटाच्या शिरा आढळतात. याचा काल दिल्ली संघानंतरचा व विंध्याच्या पूर्वीचा असावा.

ठाकूर, अ. ना.