एरिक द रेड : ( ९५० ? — १००३ ?). ग्रीनलंडचा शोध लावून तेथे वसाहत करणारा नॉर्वेजियन. हा लहानपणीच वडिलांबरोबर आइसलँडमध्ये राहावयास आला. परंतु कित्येक लोकांशी झालेल्या भांडणांमुळे त्याला आइसलँडमधून तीन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले. पश्चिमेकडे अज्ञात मुलूख आहे अशा दंतकथेवर विश्वास ठेवून तो तिकडे गेला. ९८३च्या सुमारास त्याने ग्रीनलंडवर पाऊल ठेवले. ग्रीनलंडच्या दक्षिण व पश्चिम किनाऱ्यांचे त्याने समन्वेषण केले. आइसलँडला परतल्यानंतर त्याने नव्या मुलखाची माहिती दिली आणि आकर्षक भूमी म्हणून त्याला ‘ग्रीनलंड’ हे नाव दिले. ९८६च्या सुमारास त्याने सु. पाचशे लोक घेऊन तेथे वसाहती केल्या. या वसाहती सु. चार-पाचशे वर्षे ग्रीनलंडमध्ये अस्तित्त्वात होत्या.

एरिक द रेडचा मुलगा एरिकसन लेव्ह याने अमेरिकेचा प्रथम शोध लावला असावा असे मानले जाते सु. ९९९ मध्ये तो नॉर्वेमध्ये आला. तेथे तो ख्रिश्चन झाला व ग्रीनलंडमध्ये जाऊन ख्रिश्चन धर्माचा प्रसार त्याने सुरू केला. सु. १००३ मध्ये तो ग्रीनलंडच्याही पश्चिमेकडील अज्ञात प्रदेश शोधण्यास निघाला. तो बहुधा अमेरिकेच्या न्यू फाउंडलंडजवळील किनाऱ्याला पोहोचला. त्याला त्याने ‘विनलँड’ नाव दिले. त्याच्या या प्रवासाविषयी आइसलँडच्या सागा वाङ्‍मयात उल्लेख आढळतात.

शाह, र. रू.