खोसला, अयोध्यानाथ : (१८ डिसेंबर १८९२– ). भारतीय स्थापत्य अभियंते. त्यांचे शिक्षण डी. ए. व्ही. कॉलेज, लाहोर व टॉमसन कॉलेज, रूडकी येथे झाले. ते भारत सरकारच्या पाटबंधारे व वीज मंत्रालयाचे खास सचिव होते (१९५३). भाक्रा, बिआस, शबरीगिरी, रामगंगा, यमुना इ. प्रकल्पांच्या सल्लागार मंडळांचे ते अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय सिंचाई व निःसरण (निचरा) आयोगाचे संस्थापक व अध्यक्ष (१९५१–५४), रूडकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४–५९), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे अध्यक्ष (१९६०–६२), नियोजन आयोगाचे सभासद (१९५९–६२) इ. बहुमानाच्या जागा त्यांनी भूषविल्या. ते १९६२–६७ या काळात ओरिसा राज्याचे राज्यपाल होते.

प्रवेश्य मृदेमुळे धरणे व इतर संरचनांवर येणाऱ्या जलजन्य उत्प्रणोदनासंबंधी (खालून येणाऱ्या रेट्यासंबंधी) तसेच धरणामागे साठणाऱ्या गाळासंबंधी खोसला यांनी संशोधन केले असून त्यासंबंधी काही सिद्धांतही बसविले आहेत. यांशिवाय त्यांनी जल-प्रकल्पासंबंधीच्या विविध विषयांवर शास्त्रीय लेखन केले आहे.

रूडकी विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ आणि अमेरिकेतील रेनसेलियर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट या संस्थांतर्फे त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या देण्यात आल्या. भारत सरकारने १९५५ साली त्यांना पद्मभूषण हा बहुमान दिला.

ओक, भ. प्र.