कोशिका विज्ञान : (सायटॉलॉजी). कोशिकांची (पेशींची) संरचना, वर्तन, वृद्धी व प्रजनन आणि कोशिका-घटकांचे कार्य आणि रसायनशास्त्र यांच्या अभ्यासाला कोशिकाविज्ञान हे नाव दिलेले आहे. म्हणून जीवद्रव्याच्या (कोशिकेतील जीवनावश्यक जटिल द्रव्याच्या) गुणधर्मांचे अन्वेषण (संशोधन) करणाऱ्या विज्ञानाची कोशिकाविज्ञान ही एक शाखा मानली जाते.
इ. स. १८३८ च्या सुमारास करण्यात आलेल्या निरीक्षणांपासूनच कोशिकेच्या खऱ्या अभ्यासाला सुरुवात झाली असे म्हणता येईल. या निरीक्षणांवरून वनस्पती व प्राणी बव्हंशी लहान वेगवेगळ्या एककांचे किंवा कोशिकांचे बनलेले असतात, हे दिसून आले. या कोशिका अतिशय लहान असल्यामुळे नुसत्या डोळ्यांनी दिसण्यासारख्या नव्हत्या, म्हणून सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने त्यांचा अभ्यास करण्यात येऊ लागला. सुरुवातीचा अभ्यास कोशिकांच्या आकाराच्या व संरचनेच्या वर्णनापुरताच मर्यादित होता. यानंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कोशिकाविज्ञानाचा अर्थ गुणसूत्रांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संरचना आणि वर्तन यांचा अभ्यास असा करण्यात येऊ लागला. क्रमाक्रमाने शास्त्रज्ञांनी परिस्थितीतील बदलांना अनुसरून कोशिका कोणत्या अनुक्रिया (उत्तरादाखल व्यक्त होणाऱ्या क्रिया) व्यक्त करतात व जिवंतपणा राखण्याकरिता त्यांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, याचा शोध घेण्याला सुरुवात केली. या अभ्यासाला कोशिका क्रियाविज्ञान म्हणतात. कालांतराने कोशिकांच्या रासायनिक संघटनेकडे व जीवनप्रक्रियांना जरूर असणाऱ्या एंझाइम-विक्रियांकडे (कोशिकांमध्ये तयार होणाऱ्या व रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त संयुगांमुळे होणाऱ्या विक्रियांकडे) जास्त लक्ष देण्यात येऊ लागले. अशा प्रकारे कोशिकाविज्ञानाच्या कोशिका रसायनशास्त्र या नव्या शाखेची निर्मिती झाली. १९४५ पासून कोशिकाविज्ञांना जीवनप्रक्रिया चालू राहण्याकरिता जीवद्रव्याच्या रचनात्मक अखंडतेचे किती महत्त्व आहे, याची जाणीवर झाल्यामुळे कोशिकांतर्गतवस्तूंच्या सूक्ष्मदर्शकातील संघटनेकडे त्यांचे जास्त लक्ष जाऊ लागले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक प्रचारात आल्यानंतर त्याच्या साहाय्याने कोशिकेच्या संघटनेत गुंतलेल्या अनेक सूक्ष्म संरचनांची निश्चिती करता आली. कोशिकाविकृतिविज्ञानाचा (कोशिकांमध्ये निर्माण होणाऱ्या रोगांच्या अभ्यासाचा) पूर्वी केव्हाही नव्हता इतका संबंध आज वैद्यकाशी आलेला आहे.
अशा प्रकारे आधुनिक कोशिकाविज्ञानात पुष्कळ संशोधन-क्षेत्रांचा अंतर्भाव होतो. जीव म्हणजे काय याचे ज्ञान कोशिकांविषयी संपूर्ण ज्ञान असण्यावरच अवलंबून असल्यामुळे, दिवसेंदिवस जीवशास्त्रज्ञ या क्षेत्रांकडे जास्त आकर्षित होऊ लागले आहेत.
पहा : कोशिका गुणसूत्र जीवद्रव्य शरीरक्रियाविज्ञान.
कर्वे, ज. नी.