कोशिका : (पेशी, पेशिका). कोणत्याही प्राण्याच्या अथवा वनस्पतीच्या शरीराच्या कोणत्याही भागाची किंवा सूक्ष्म शरीराची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तपासणी केली, तर ती व्यक्ती एक किंवा अनेक सूक्ष्म घटकांची बनलेली आढळते. संरचना व कार्ये यांच्या दृष्टीने ह्या घटकाला जीवनाचे एकक मानतात व यालाच ‘कोशिका’ म्हणतात. सु. ३०० वर्षांपूर्वी रॉबर्ट हूक (१६३५–१७०३) ह्या इंग्रज शास्त्रज्ञांनी प्रथमतः बुचाचे अतिशय पातळ काप सूक्ष्मदर्शकातून पाहिले, त्यावेळी त्यांना त्यात अनेक कप्पे दिसले. १६६७ मध्ये त्यांनी लिहिलेल्या मायक्रोग्रॅफीया या ग्रंथात ह्या कप्प्यांना प्रत्येकी ‘सेल’ (कोशिका) हे नाव दिले, कारण त्यांना ती सर्व संरचना मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे दिसली. त्यानंतर आजपर्यंत इंग्रजीत तेच नाव वापरात आहे तथापि हूक यांची त्या संज्ञेमागील निर्जीव चौकट ही मूळ कल्पना आज बदलेली आहे. त्यामध्ये त्यांनी पाहिलेल्या द्रव पदार्थास ‘पोषक रस’ असे नाव दिले होते परंतु एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हा रस म्हणजेच खरे जीवद्रव्य आहे, हे समजले नव्हते. १६७१ मध्ये इटालियन शास्त्रज्ञ मार्चेल्लो मालपीगी व इंग्रज शास्त्रज्ञ नीहेमिया ग्रू यांच्या शारीरविषयक (शरीररचनाविषयक) ग्रंथामुळे वनस्पति-शारीराचा पाया घातला गेला. पुढे जीवद्रव्याचे महत्त्व कळल्यावर श्लायडेन, मोल, नॅगेली, कोन, माक्स शूल्ट्झ, स्ट्रासबुर्गर इत्यादींनी केलेल्या संशोधनाने कोशिकेसंबंधीच्या ज्ञानात अधिक भर पडून ⇨ कोशिका विज्ञान ही विज्ञानशाखा स्वतंत्र रीतीने विकास पावू लागली. १८३८-३९ मध्ये श्लायडेन व श्वान यांनी पुढील कोशिका-सिद्धांत प्रस्थापित केला. ‘सर्व सजीवांत आढळणारी व संरचना आणि कार्य या दृष्टीने मौलिक बाबतींत साम्य दर्शविणारी जीवद्रव्ययुक्त कोशिका हा घटक जीवनाचे एकक आहे.’
काही प्रारंभिक प्राणी (आदिप्राणी) व वनस्पती (आदिवनस्पती) यांचे शरीर फक्त एका कोशिकेचे असून तिची संरचनाही फार गुंतागुंतीची असते, कारण तिच्यात सामान्य कोशिकांगाशिवाय पचन, गती, उत्सर्जन (निरूपयोगी द्रव्ये बाहेर टाकणे) वगैरेंकरिता आवश्यक अशी वैशिष्ट्यपूर्ण इतर अनेक कोशिकांगे आढळतात [→ शैवले प्रोटोझोआ]. बहुतेक मोठ्या जीवप्रकारांत शरीर अनेक कोशिकांचे बनलेले असून शरीरातील जीवप्रक्रिया ज्या भिन्नभिन्न अवयवांकडून होतात त्यांतील कोशिका त्या त्या कार्याकरिता वैशिष्ट्य पावलेल्या असतात. आधुनिक सामाजिक जीवनात आढळणारी श्रम-विभागणी अनेककोशिक शरीरातही आढळते. प्रत्येक कोशिकेचे जीवन सर्व शरीराच्या जीवनाशी एकरूप झालेले असते तथापि प्रत्येक कोशिकेत स्वतंत्रपणे आवश्यक ते फेरबदल करण्याचे सामर्थ्य टिकून राहते ही गोष्ट कोशिका-सिद्धांताशी सुसंगत आहे. समूहातील एखाद्या कोशिकेत स्रवण, विभाजन किंवा मृत्यू ह्यांपैकी काहीही होऊ शकते. सर्वांची सुसूत्र क्रियाशीलता मात्र संप्रेरकांच्या [उत्तेजक अंत:स्रावांच्या, → हॉर्मोने] प्रभावामुळे किंवा शरीरातील तंत्रिकायुक्त (मज्जातंतुयुक्त) यंत्रणेमुळे चालू राहते.
आकारमान व संख्या : कोंबडीच्या अंड्यातल्याप्रमाणे भरपूर पिवळा बलक असलेल्या मोठ्या कोशिका फारच थोड्या असतात. काही तंत्रिका-कोशिकांप्रमाणे (मज्जापेशींप्रमाणे) फक्त एकच शाखा खूप लांब (१ मी.) व काही मायक्रॉन (१ मायक्रॉन= १०-३ मिमी.) व्यास असलेल्या अशा आढळतात. वनस्पतीतील ⇨ प्रकाष्ठ व ⇨परिकाष्ठ यांतील काही सूत्रे (धागे) १-३ किमी. (आवृतबीजीत) किंवा २-८ मिमी. (प्रकटबीजीत) व ⇨ आर्टिकसीत २०-५५० मिमी. पर्यंत लांब असतात. बहुतेक सर्व कोशिका फार सूक्ष्म असून त्यांचे मोजमाप मायक्रॉन एककात करावे लागते. साधारणपणे 3 मायक्रॉनपेक्षा चौपट मोठी किंवा ०·५ मायक्रॉनपेक्षा लहान कोशिका क्वचित आढळते. काही सूक्ष्मजंतूंचा (उदा., मायक्रोकॉकस वंशातील सूक्ष्मजंतूंचा) व्यास ०·२ मायक्रॉन असतो. मृदूतकातील [→ मृदूतक] कोशिकांचा व्यास सु. ०·०१-०·१ मिमी. पर्यंत असतो. कोणत्याही एका जातीत सर्वच कोशिका इतरांपेक्षा सापेक्षतः मोठ्या किंवा लहान असू शकतात. उदा., पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत अस्थियुक्त माशांमध्ये कोशिका फारच लहान असतात, तर सॅलॅमँडरात त्या मोठ्या असतात परंतु मनुष्याच्या शरीरातील कोशिका मात्र आकारमानात मध्यम प्रकारच्या असतात. प्रकलाचे (कोशिकेतील कार्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजाचे) आकारमानसुद्धा सापेक्षतः कोशिकेच्या आकारमानाशी सुसंगत असते परंतु इतर कोशिकांगांचे तसे नसते. रोटिफेरासारख्या लहान अनेककोशिक प्राण्यांचे शरीर काही थोड्या कोशिका-शतकांचे बनलेले असते, परंतु अधिक मोठ्या जातींत कोशिकांची संख्या प्रचंड असते. मनुष्याच्या मेंदूच्या बाह्यांगात १०१० तंत्रिका-कोशिका असतात, तर सामान्य मनुष्यात २·५ x १०१२ लाल रक्तकोशिका (रक्ताणू) म्हणजे प्रत्येक रक्तबिंदूत सु. ५ x १०८ असतात.
अकोशिकीय संरचना : वर सांगितल्याप्रमाणे सर्व सजीव कोशिकामय असतात, परंतु काही सजीवांत तितका विकास नसतो वा त्यांच्याविषयी तसे मानणे कठीण वाटते. उदा., क्रियावैज्ञानिक दृष्ट्या सूक्ष्मजंतू इतरांप्रमाणे असतात, परंतु त्यांच्या संरचनेत प्रभेदन (कार्यविभागणीनुसार होणारे रूपांतर) फारच कमी असते. तीच गोष्ट विषाणूंची (अतिसूक्ष्मजंतूंची, व्हायरसांची) ते विभागून त्यांच्या संख्येत वाढ होते पण कोशिकेचे इतर गुणधर्म त्यांमध्ये नसतात [→ व्हायरस].
संरचना व कार्ये : (आ. १). कोणत्याही जिवंत आणि सामान्य कोशिकेचा महत्वाचा भाग म्हणजे अर्धवट द्रवरूप व कलिल (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेले विशिष्ट प्रकारचे द्रवमिश्रण) असा सजीव पदार्थ असून त्यामध्ये अनेक लहानमोठे व विविध आकारांचे कण विखुरलेले असतात. ह्या सर्वांभोवती अर्धवट किंवा कमीजास्त प्रमाणात पार्य (आरपार जाऊ देणारा) असलेला पातळ सजीव पापुद्रा (प्राकल पटल) असतो.
कोशिकेत सर्वांत ठळकपणे दिसणारा मोठा कण म्हणजे ‘प्रकल’ होय. कोशिकेतील सर्व सजीव पदार्थास ‘प्राकल’ म्हणतात व प्रकलाशिवाय इतरांस ‘परिकल’ म्हणतात. दुधी काचेप्रमाणे हा अर्धवट पारदर्शक असून कधी फेसाळ तर कधी सूक्ष्म तंतुयुक्त, कणयुक्त किंवा विवरयुक्त असतो. कोशिकेभोवती बहुधा निर्जीव कोशिकावरण (कोशिकाभित्ती) असल्याने अनेककोशिक शरीरातील प्रत्येक कोशिकेचा प्राकल दुसऱ्यापासून वेगळा पडतो असा ग्रह होतो परंतु वास्तविक एका प्राकलाच्या बाहेरच्या पापुद्र्यातून दुसऱ्याच्या पापुद्र्यात शिरून संपर्क साधणारे परिकलाचे अनेक सूक्ष्म धागे (परिकल तंतू) असतात, त्यामुळे शरीरातील सर्व जिवंत कोशिकांत ऐक्य राहते. परिकलाच्या बाहेरच्या पण सापेक्षतः अधिक घन थरास ‘बाह्यप्राकल’ (प्राकल पटल) आणि आतील अधिक पातळ व कणयुक्त थरास ‘अंतःप्राकल’ म्हणतात. प्रकलाभोवती असलेल्या पातळ प्राकल पटलामुळे प्रकलातील सूक्ष्म कण (प्रकलक) व महत्त्वाचे सूक्ष्म धागे (रंगसूत्रे) असलेला द्रवपदार्थ (प्रकलरस) या दोन मुख्य घटकांना इतर परिकलापासून वेगळेपणा मिळतो. परिकलातील इतर कोशिकांगांमध्ये (सूक्ष्म घटकांमध्ये) कलकणूंचा (ज्यांचा स्राव कोशिका श्वसन व पोषण या कार्यात उपयोगी पडतो अशा धाग्यासारख्या वा दंडगोलाकार घटकांचा) अंतर्भाव तर होतोच शिवाय प्राण्यांच्या व काही क्षुद्र वनस्पतींच्या कोशिकांत दोन ‘कर्षकेंद्रकण’ (कोशिका विभाजनाच्या सम विभाजन प्रकारात भाग घेणाऱ्या परिकलाच्या सूक्ष्म घटकातील म्हणजे कर्षकेंद्रातील केंद्रीय कण) व एक गॉल्जी पिंड (कोशिकेत घडणाऱ्या रासायनिक-भौतिक बदलांशी संबंधित असणारा व गॉल्जी या शास्त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारा जालकाकार पिंड) असतात. वनस्पतींच्या कित्येक कोशिकात ‘प्राकणू’ नावाचे विशिष्ट कण असून त्यांतील रंगद्रव्यांमुळे त्यांना मुख्यतः हिरवा किंवा क्वचित पिवळा किंवा लालसर रंग प्राप्त होतो. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकातून तर परिकलात विखुरलेले सूक्ष्म जाळे (परिकलांतर्गत किंवा अंतःप्राकल जालक) दिसून येते. यांशिवाय कित्येक कोशिकांत विशिष्ट कोशिकांगे (उदा., स्नायूंच्या कोशिकांत सूत्रके) आढळतात व बहुतेकांत अनेक संचित पदार्थांचे कण (झायमोजेन, मेदबिंदुके म्हणजे स्निग्ध पदार्थांचे सूक्ष्म पुंजके, स्टार्च, ग्लायकोजेन इ.) सहज दिसतात.
कोशिकांगांना विशिष्ट कार्ये असतात व त्यांची फक्त त्याच दृष्टीने हृदय, मेंदू, स्नायू, मूत्रपिंड इत्यादींशी तुलना करता येते. एका पिढीतील लक्षणे पुढच्या पिढीत नेण्याचे (अनुहरणाचे) कार्य मात्र मुख्यतः प्रकलातील सूक्ष्म कणांचे म्हणजे जनुकांचे असते [→ आनुवंशिकी], कारण परिकलातील सर्वच प्रक्रियांवर त्यांचे तसे नियंत्रण असते. कलकणूंची क्रियाशीलता व कोशिकेतील श्वसनक्रिया यांचा निकट संबंध असतो. कलकणूतील एंझाइम तंत्रामुळे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांच्या संचामुळे) ऑक्सिजनाच्या साहाय्याने कार्बनी संयुगांचे विघटन होऊन (मोठ्या रेणूचे लहान रेणूंत तुकडे होऊन) रासायनिक ऊर्जा निर्माण होते व ती त्यानंतर उच्च पातळीवरच्या फॉस्फेट-बंधात साठविली जाऊन काही जैव प्रक्रियांकरिता उपलब्ध होते. उदा., एखादा स्नायू आकुंचनानंतर पुन्हा पूर्ववत होणे, प्रथिनांचे संश्लेषण (रासायनिक विक्रियेने तयार होणे) इत्यादी. कोशिकाविभाजनाची पातळी ठरविणे व कोशिकांवर चलनशील केसासारखे (प्रकेसल) उपांग वाढू देणे यांवर कर्षकेंद्राचा प्रभाव असतो. पदार्थाचे कण एकत्र गोळा करणे (उदा., स्वादुपिंडाच्या कोशिकांत झायमोजेनाचे कण) हे काम गॉल्जी पिंडाचे असते. जटिल कार्बनी पदार्थांचे संश्लेषण करण्याची प्रक्रिया मुख्यतः प्राकणूत (हरितकणूत) चालते [→ प्रकाशसंश्लेषण] आणि स्टार्च, शर्करा इत्यादींचे उत्पादन होते. सर्व प्राण्यांच्या व वनस्पतींच्या शरीरास कठीणपणा आणण्यास कमी जास्त प्रमाणात लागणारा आधारभूत निर्जीव पदार्थ (अंतराकोशिकी पदार्थ) कोशिकांत निर्माण होतो. वनस्पतींतील ह्या पदार्थास तूलीर (सेल्युलोज) म्हणतात आणि कोशिकांच्या भिंती बव्हंशी तुलीरमय असतात. प्राण्यांमध्ये या पदार्थात प्रथिन सूत्रांच्या (कोलॅजेन, इलॅस्टीन) जुड्या असतात व त्याभोवती घन पदार्थांचे आवरण असते.
चलनवलन : यामध्ये कोशिकेचे स्थलांतर किंवा चलनशील उपांगांची (केसल, प्रकेसल) हालचाल, कोशिकेतील परिकल, कलकणू, प्राकणू इ. कोशिकांगांची हालचाल या सर्वांचा समावेश होतो. अगदी निश्चल अशी जिवंत कोशिका क्वचितच आढळते. काही शैवलांत (उदा., कारा व नायटेला) कोशिकावरणाखाली परिकल कोशिकेच्या मध्याभोवती (आ. २) सतत फिरत असल्याचे (परिगमन) आढळते. काही कवकतंतू (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचे तंतू) परागनलिका, हायड्रिला आणि ⇨सवालाच्या पानांतील कोशिका इत्यादींतही परिगमन आढळते. ते सतत चालते किंवा प्रकाशामुळे वा दुखापतीमुळे सुरू होते. काही स्थल वनस्पतींत (ट्रॅडेस्कँशिया, कंचटपुष्प, भोपळा, बिगोनिया) परिकलाची कोशिकेतील हालचाल अनियमित असल्याने तिला अभिसरण म्हणतात व दोन्ही प्रकारच्या ह्या प्रवाही हालचालीस भ्रमण (प्रवाही गती) म्हणतात. श्लेष्मकवके (कुजणाऱ्या लाकडात वा मातीत राहणारी कवके), आदिजीव
(अमीबा), रक्तातील पांढऱ्या कोशिका आणि संयोजी ऊतकातील (कार्यकारी कोशिकांना आधार देऊन त्यांना एकत्र ठेवण्याचे कार्य करणाऱ्या ऊतकातील म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहातील) परिभ्रमी कोशिका इत्यादींत भ्रमण चालू असताना कोशिकांचे आकार बदलत राहून स्थलांतर घडून येते. दर सेकंदास अमीबा ०·५–४·६ मायक्रॉन व श्लेष्मकवक १,३५० मायक्रॉन या वेगाने पादाभांच्या (परिकलाच्या तात्पुरत्या फुगलेल्या भागांच्या) साहाय्याने सरपटतात (अमीबीय गती). काही चलनशील कोशिकांवर सापेक्षतः लहान, सतत व असंख्य आणि सूक्ष्म केसासारखी परिकलयुक्त कोशिकांगे असतात (आ. ३ व ४). त्यांना ‘केसले’ म्हणतात, तशाच पण मोठ्या व थोड्या (किंवा एकच) कोशिकांगांना ‘प्रकेसले’ म्हणतात. कित्येक शैवले (उदा., क्लॅमिडोमोनस, व्हॉल्व्हॉक्स इ.), वनस्पतींच्या काही प्रजोत्पादक कोशिका (चरगंतुके म्हणजे ज्यांच्या युग्मांच्या संयोगाने प्रजोत्पत्ती होते अशा चलनशील जनन-कोशिका, चरबीजुके म्हणजे चलनशील लाक्षणिक प्रजोत्पादक भाग, रेतुके म्हणजे चलनशील पुं- जनन-कोशिका), अनेक सूक्ष्मजंतू, काही सूक्ष्म प्राणी (मॅस्टिगोफोरा) इत्यादींची हालचाल प्रकेसलामुळे होते, तर काही आदिप्राणी (प्रोटोझोआ), स्वतंत्र पट्टकृमी, काही रेतुके, सूत्रकृमी, अनेक जल-डिंभ (अळ्या) यांचे स्थलांतर केसलामुळे होते. थोडक्यात म्हणजे केसल हे कोशिकेचे चलनशील कोशिकांग होय.
कोशिका-प्राकल : जिवंत कोशिकांचे निर्जीव आवरण (भित्ती) वगळल्यास उरलेला भाग म्हणजेच प्राकल यालाच जीवाचे भौतिक अधिष्ठान अथवा सर्व जैव प्रक्रियांचे केंद्र म्हणतात. तथापि ह्यातील सर्वच पदार्थ सजीव यंत्रणेत धरले जात नाहीत व आवश्यक नसतात. त्यातील जैव पदार्थ सर्वत्र, परंतु अजैव (अरगॅस्टिक) अनित्यपणे आढळतात. तसेच सर्वच कोशिकांत पदार्थांचे प्रमाण समान नसते, परंतु साधारणपणे प्रत्येकाची कमाल मर्यादा निश्चित असते. एकाच व्यक्तीत भिन्न कोशिकांत एकाच पदार्थाचे प्रमाण भिन्न असल्याचे आढळते, तसेच एकाच प्राकलातील पदार्थांचे प्रमाण भिन्न वेळी भिन्न असल्याचेही आढळते. प्राकलात सदैव चालू असलेल्या चयापचयाचा (भौतिक-रासायनिक घडामोडींचा) हा पुरावा होय.
पाणी : वजनाने सु. ७५–९० टक्के पाण्याचा अंश सर्व क्रियाशील प्राकलांत असतो. सर्व पोषक पदार्थ व शरीरबांधणीचे पदार्थ पाण्याच्या माध्यमातूनच स्थानांतर करतात. वनस्पतीत कोशिकांतील भिन्न आकारमानाच्या पोकळ्यांत (रिक्तिकांत) पाणी असते परंतु सर्व कोशिकांतील जैव धाग्यांच्या प्रत्येक रेणूभोवती किंवा रेणूच्या सान्निध्यात पाणी असते फक्त बीजे किंवा बीजुके ह्यांतील प्राकलात १० टक्क्यांपेक्षा कमी पाणी असते.
खनिजे : प्राकलात लेशमात्र खनिजे सर्वत्र विखुरलेली असतात. ती लहानमोठ्या रेणूंना चयापचयाच्या किंवा संरचनेच्या कार्यात कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात एकत्र बांधतात अथवा हरितद्रव्य आणि रक्तारुणाच्या (रक्तातील तांबड्या कोशिकांतील प्रथिन रंगद्रव्याच्या, हिमोग्लोबीनाच्या) रेणूतल्याप्रमाणे त्यातच समाविष्ट असतात. रासायनिक दृष्ट्या मानलेले रेणू प्राकलात घटक म्हणून विविध प्रकारे समाविष्ट असतात.
प्रथिने : प्राकलात हा घटक घनावस्थेत विपुलतेने आढळतो. हा प्रमुख आधारभूत पदार्थ असून त्यातील सुका भाग आतील व बाहेरील पापुद्र्यांच्या निम्म्याने असतो व कोशिकांतर्गत कणांचे प्रमुख शरीरघटक यापासूनच बनतात. प्रकले व प्राकल यांच्या आधारभूत पदार्थात अनेक प्रथिने स्वतंत्रपणे किंवा विरल संयुंगाच्या स्वरूपात असतात त्यांपैकी पाण्यात विरघळणाऱ्यांना ‘अल्ब्युमीन’ व विरल लवणात विरघळणाऱ्यांना ‘ग्लोब्युलीन’ म्हणतात. प्रकलीय प्रथिने प्रामुख्याने प्राकलातील प्रजोत्पादक घटक असतात. पापुद्र्यात (पटलात) व मेंदूतील प्राकलात लिपोप्रथिनांचे प्रमाण अधिक असते. भिन्न प्रकारच्या कार्बोहायड्रेटांचा प्रथिनांशी संयोग होतो. प्राकलातून स्रवलेल्या विष्यंदी (दाट) म्यूकोप्रथिनांचे कार्य संरक्षण आणि संरचना यांबाबत असते (उदा., जेलीफिशाचे शरीर, प्राण्यांच्या ऊतकातील अंतराकोशिकी संयोजक द्रव्य, गोगलगाईने सोडलेला श्लेष्मा म्हणजे बुळबुळीत पदार्थ, पचन नलिकेतील श्लेष्मा इ.). कोशिकांतील कित्येक रंग प्रथिन-संयुगे असतात. डोळ्यांतील प्रकाशसंवेदक कोशिकांत व वनस्पतींतील प्राकणूसारख्या घटकांत नारिंगी कॅरोटिनॉइडांची जटिल संयुगे (अ जीवनसत्त्वाच्या प्रकारची संयुगे) सापडतात. अनेक पिवळ्या प्रथिनांचा रंग रिबोफ्लाविनापासून (जटिल ब जीवनसत्त्वाच्या घटकापासून) मिळतो व हे रिबोफ्लाविन सर्वत्र आढळते कारण श्वसनात त्याचे कार्य महत्त्वाचे असते. फॉस्फोप्रथिनांसारखे अनेक जटिल पदार्थ पोषणात महत्त्वाचे असतात. कित्येक बियांत, प्रथिनांच्या कणांत किंवा बाहेर स्फटिकांत, त्यांचा संचय होतो. जिवंत प्राकलात अनेक स्फटिक-संयुगांचे निक्षेपण होते (साचून राहतात). कॅल्शियम ऑक्झॅलेट सामान्यपणे आढळते कार्बनी अम्लांचे व ग्लायकोसाइडांचे स्फटिक सिट्रसाच्या (लिंबू-पपनसाच्या वंशाच्या) फळांत व पानांत आढळतात. प्राकलात प्रथिने एंझाइमांचे कार्य करतात हे कार्बनी उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता तिची गती वाढविणारे पदार्थ) असून कोशिकांतील जीवन, वृद्धी, प्रजोत्पादन इ. चालू राहण्यास आवश्यक त्या रासायनिक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवतात. प्राकलात स्वतंत्रपणे आढळणाऱ्या ⇨ ॲमिनो अम्लांचा उपयोग प्रथिन बनविण्यास घटक म्हणून केला जातो. ॲमिनो अम्लांचे संश्लेषण प्राण्यांच्या कोशिकांत होत नसल्याने तेथे त्यांचा संचय होत नाही शोषणानंतर लागलीच त्यांचे प्रथिन बनते. वनस्पतीत तसाच मुक्त ॲमिनो अम्लांचा साठा नसतो, परंतु कित्येकांत त्यांपासून अमाइडे बनतात, तर काहींत अल्कलॉइडे बनतात उदा., कॅफीन, निकोटीन, मॉर्फीन इत्यादी. अल्कलॉइडे स्थिर उपोत्पाद (उप- उत्पादने) असून रिक्तिकांत साठविली जातात त्यांचा प्राकलास काय उपयोग होतो हे अद्याप माहीत झालेले नाही.
कार्बोहायड्रेटे : जीवनास ऊर्जा पुरविणारे आणि प्राकलात सर्वत्र आढळणारे अन्नघटक. न्यूक्लिइक (प्रकली) अम्ले, बहुतेक को एंझाइमे (एंझाइमांच्या क्रियेस आवश्यक असणारे पदार्थ), संयुक्त प्रथिने आणि लिपिडे (मेद, स्निग्ध पदार्थ) ह्यांत ते असतात. मौलिक पोषक म्हणून साध्या शर्करा सर्वच प्राकलात असतात. साधारणतः (वितंचन नसणाऱ्या सजीवाखेरीज) त्यांचे रूपांतर चयापचयामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि पाणी ह्यांत होते, परंतु अनेकदा मध्यम स्वरूपाचे उत्पाद साचून राहतात. मांसल वनस्पतींतील रिक्तिकांमध्ये कार्बनी अम्ले बरीच साचलेली आढळतात. कित्येक वनस्पती.त सुक्रोज आढळते, परंतु बहुतेक अन्नसंचय पॉलिसॅकॅराइड रूपातच असतो. स्टार्च सर्वांत जास्त असून त्याचे विशिष्ट सूक्ष्म कण अधिक सामान्यपणे आढळतात. प्राण्यांत ग्लायकोजेन प्रमुखपणे असून त्याचे स्वतंत्र सूक्ष्मकण (०·१ मायक्रॉन) किंवा प्रथिनाशी संयोग पावलेले कण प्राकलात मिसळलेले आढळतात. ह्यातील ऊर्जा स्टार्चमधल्यापेक्षा अधिक जलद उपलब्ध होते. वनस्पतीत इन्युलिनासारखे इतर पदार्थ विद्राव स्वरूपात असतात (उदा., डेलिया). अन्नपोषणाशिवाय इतर कार्येही पॉलिसॅकॅराइडे करतात [→ सूक्ष्मजीवशास्त्र]. वनस्पतीतील गोंद व श्लेष्मल (बुळबुळीत) पदार्थ याच प्रकारचे असून दुखापत झाल्यास स्रवतात अनेक जलवनस्पतींच्या पाण्यात बुडालेल्या भागांतून व काही बियांतून रुजताना श्लेष्मा स्रवतो (उदा., तालीमखाना, इसबगोल, अहाळीव इत्यादी). प्राकलात व काही मांसल वनस्पतींत श्लेष्मल पदार्थ आढळतात. यांमध्ये अन्नसंचय नसून त्यांची निर्मिती चयापचयातील आनुषंगिक पदार्थ म्हणून होते. प्रत्यक्ष प्राकलाला त्यांचा काही उपयोग नसतो [→ जलवनस्पति परिस्थितिविज्ञान]
जलविद्राव्य रंगद्रव्ये : वनस्पतींत आढळणारे हे पदार्थ शर्करायुक्त संयुगे (ग्लायकोसाइडे) असून ते रिक्तिकांत साठतात आणि त्यामुळे फुलांना आल्हादकारक रंग प्राप्त होतात. त्यांचा व टॅनिनांचा रासायनिक संबंध असून त्यांच्या काही साध्या प्रकारांमुळे कच्ची फळे स्तंभक (आकुंचन करणारी) होतात. खऱ्या टॅनिनाचा (संयुक्त प्रकाराचा) उपयोग कातडी कमाविण्यासाठी करतात. त्यांचे स्रवण रिक्तिकांत होते, परंतु प्राकलास त्यांचा प्रत्यक्ष उपयोग नसतो कडवटपणा कमी होण्यास कदाचित ते उपयुक्त असावे. उष्णकटिबंधातील वृक्षांत ती सामान्यपणे आढळतात आणि जास्त प्रमाणात अर्बुदासारख्या (कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे तयार झालेल्या आणि शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठीसारख्या) वृद्धीत असतात. ओक वृक्षांवरच्या पिटिकांत त्यांचा भाग वजनाने ५० टक्के असतो.
मेदी (लिपीडे) पदार्थ : प्राकलात यांचे कार्य त्रिविध असते. अनेक वनस्पतींच्या कोशिकांतील सूक्ष्म बिंदूपासून ते प्राण्यांच्या कोशिकांतील मोठ्या थेंबापर्यंतच्या आकारमानात उदासीन मेद ह्या सामूहिक स्वरूपात गोळा होतात व संचित अन्न म्हणून त्यांचा उपयोग होतो. काही प्राण्यांच्या वसा ऊतकातील काही कोशिका मेद संचयाकरिता वैशिष्ट्य पावलेल्या असून त्यांमधील परिकल कोशिकावरणाच्या आतील बाजूस पातळ थरासारखा राहतो व उरलेली सर्वच जागा मेद-बिंदूंनी भरलेली असते. यांचा चयापचय होत असताना बिंदूंच्या पृष्ठाशी कलकणू चिकटलेले असतात. वजनाने सु. ६० टक्के मेद बियांत आढळतो. फॉस्फरस व काही कार्बनी क्षारकांबरोबर (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणाऱ्या पदार्थांबरोबर) संयोग होऊन ते लिपीड जीवप्रक्रियांत महत्त्वाचे कार्य करतात. प्राकल पटलाचा २५–५० टक्के सुका भाग फॉस्फोलिपिडांचा असून त्या संदर्भातील त्यांचे कार्य महत्त्वाचे असते. वनस्पतीत रबर, रेझिने, बाष्पनशील (उडून जाणारी) तेले व सुगंधी तेले ही साधी टर्पिन संयुगे ०·५ टक्के असतात. स्रावक कोशिकांत ती उपोत्पाद म्हणून बनतात व परिकलात सूक्ष्म बिंदूंच्या स्वरूपात किंवा कोशिकेबाहेरच्या नलिकांत जमतात. रेझिने, टर्पेटाइने, रोगणे (लॅकर्स) व शेलॅक ही उपयोगात न आणलेली संयुगे रेझीन नलिकांत [विशेषतः कॉनिफेरेलीझ म्हणजे शंकुमंत वृक्षांच्या गणात → कॉनिफेरेलीझ] आढळतात [→ चयापचय].
न्यूक्लिइक अम्ले : यांचा उपयोग एंझाइमांनी संश्लेषण झालेल्या जटिल रेणु-प्रकारांना निश्चित करण्याकडे होतो. अनुहरणाचे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेण्याचे) हे प्रमुख माध्यम असून सामान्यपणे कोशिकांतील कण स्वरूपात पण क्वचित आधारभूत पदार्थांत ती विरघळलेली असतात. ती को-एंझाइमांप्रमाणे प्रारंभिक घटकांनी युक्त असतात [→ न्यूक्लिइक अम्ले].
अंतःप्राकल जालक : (एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, इआर). इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने असे आढळून आले आहे की, परिकलात अंतःप्राकल जालक नावाचे कोशिकांग आढळते हे अनेक समांतर पापुद्र्यांच्या जोड्यांनी बनलेले जाळे असते (आ. १). पापुद्र्याच्या बाहेरील बाजूस अनेक अर्धगोल कण चिकटलेले असून ते कधी स्वतंत्रपणेही परिकलात किंवा प्रकलात पसरलेले दिसतात व त्यांना रिबोसोम्स म्हणतात त्यांमध्ये रिबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) व प्रथिने असतात. अंतःप्राकल जालक व ‘रिबोसोम्स’ यांच्या सान्निध्यात मेद, प्रथिने व इतर काही पदार्थ यांची सिद्धी होते व याला डीऑक्सिरिबोज न्यूक्लिइकअम्ल (डीएनए) नावाच्या प्रकलातील रंगसूत्रद्रव्याकडून मार्गदर्शन होते हे मार्गदर्शन प्रत्यक्षपणे नसून प्रकलातील प्रकलकाकडून आलेल्या रिबोज नावाच्या शर्करेतील रासायनिक पदार्थामार्फत(रिबोन्यूक्लिइक अम्ल अथवा आरएनए) होते विशिष्ट रासायनिक पदार्थास संदेशक (मेसेंजर) आरएनए म्हणतात [→ आनुवंशिकी].
प्रकल : हा कोशिकांतील जीवप्रक्रिया व ⇨ आनुवंशिकता यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरलेला व वैशिष्ट्य पावलेला असा प्राकलाचा भाग असून कोशिकेचा जिवंतपणाच त्यावर अवलंबून असतो. तो कृत्रिम रीत्या काढून टाकल्यास जीवनाचा शेवट होतो व पुन्हा घातल्यास कोशिका जिवंत राहते. सस्तन प्राण्यांच्या रक्तातील लाल कोशिकांत प्रौढावस्थेत प्रकल लुप्त होतो. काही कोशिकांत (उदा., व्हाऊचेरिया शैवल, म्यूकर बुरशी) अनेक प्रकल असतात, तथापि सामान्यपणे एका कोशिकेत एकच प्रकल असतो. त्याचा आकार बहुधा गोलसर असला, तरी त्यावर वळ्या पडलेल्या किंवा काहीसा खंडित दिसतो. सूक्ष्मजंतू व नीलहरित शैवलासारख्या प्रारंभिक सजीवांत प्रकल अनेक कणरूपाने परिकलात विखुरलेला आढळतो. प्रकलाचे आकारमान एक मायक्रॉनपेक्षा कमी (सूक्ष्मजंतूंत) पासून ते अनेक मिमी. पर्यंत (उभयचर म्हणजे जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंड्यात) असते. प्रकलाची संरचना फार गुंतागुंतीची असते. बहुधा प्रकलाभोवती पापुद्र्यासारखी दोन आवरणे (प्रकलावरण, प्रकलपटल) असून बाहेरच्याचा संबंध परिकलातील अंतःप्राकल जालकाशी व रिक्तिकांच्या पापुद्र्यांशी जोडलेला असतो. कोशिका-विभाजनाच्या वेळी किंवा प्रकल संपूर्ण नष्ट होण्याच्या वेळी प्रकलपटल नाहीसे होते. प्रकलपटलाच्या सूक्ष्म छिद्रांतून परिकलाशी संबंध राखला जातो असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे, परंतु याबद्दल एकमत नाही. प्रकलातील मुख्य घटक म्हणजे रंगसूत्रद्रव्याच्या गुंत्याचा गठ्ठा असून प्रकलविभाजनाच्या वेळी त्याचे अनेक लहानमोठे सुताच्या तुकड्यासारखे भाग अथवा रंगसूत्रे (गुणसूत्रे) बनतात. याशिवाय प्रकलात प्रथिनयुक्त रस (प्रकलरस) आणि एक किंवा अधिक व ठळकपणे दिसणारे घन व गोल कण (प्रकलक) असतात. अनेक प्रकारची प्रथिने व वर उल्लेखिलेला डीएनए हा पदार्थ रंगसूत्रद्रव्यात प्रामुख्याने आढळतो. तो चयापचयाच्या दृष्टीने स्थिर असून आनुवंशिकतेबद्दल जबाबदार असतो. प्रथिनांचे प्रमाण व क्रियाशीलता कोशिकेच्या कार्याप्रमाणे बदलतात. आरएनए हे प्रथिन संश्लेषणाशी निगडीत असून प्रथिनाबरोबर चयपचयात कार्य करीत असलेल्या प्रकलकामध्ये साठलेले असते. प्रकलात कमीअधिक प्रमाणात लिपीड आढळते. प्रकलाचे कार्य म्हणजे कोशिकेत व व्यक्तीत पिढ्यानपिढ्या आनुवंशिक माहिती देत राहणे, तिला स्थैर्य देणे व या माहितीनुसार चयापचय-प्रक्रियेचे वैशिष्ट्य सतत राखणे हे असते (कोशिका-विभाजन हे उपशीर्षक पहावे).
प्राकलकणू : (प्राकणू). ह्या नावाचे व विशिष्टता पावलेले सूक्ष्म सजीव कण फक्त वनस्पतीत (कवकांखेरीज) आढळतात. त्यांपैकी एक (हरितकणू) प्रकाशसंश्लेषणात (प्रकाशीय ऊर्जेचा उपयोग करून कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांच्यापासून साधी कार्बोहायड्रेटे तयार करण्याच्या क्रियेत) क्रियाशील असतात व त्यामुळे सर्व हिरव्या वनस्पती स्वोपजीवी (साध्या पदार्थांपासून अन्न पदार्थ तयार करण्याची क्षमता असणाऱ्या) आहेत. वनस्पतींना हिरवा रंग हरितद्रव्यामुळे येतो व हेच प्रकाशसंश्लेषणात अवश्य असते. ह्या प्राकणूत पिवळा किंवा लाल रंग (कॅरोटीन) असतो तेव्हा त्यांना वर्णकणू म्हणतात. कोणतेच रंगद्रव्य नसल्यास त्यांना श्वेतकणू म्हणतात व हे मुख्यतः मुळांच्या किंवा खोडांच्या संग्राहक भागात आढळतात आणि तेथे साखरेपासून स्टार्च बनवितात. काही श्वेतकणू फक्त तेल बनविणारे असून त्यांना तैलकणू म्हणतात. शैवलांत बिंबे, वलये व फीत यांसारखे तसेच गुळगुळीत, खंडित, करवती (स्पायरोगायरा), तारकाकृती (झायग्निनमा) इ. विविध आकारांचे प्राकणू आढळतात. ते जास्तीत जास्त १०० मायक्रॉन लांबीचे आढळतात. उच्च वनस्पतींत त्यांच्या आकृतीत अधिक सारखेपणा असून ते बहुधा लहान चकतीसारखे व ४–६ मायक्रॉन व्यासाचे असतात. त्यांची संख्या विविध असते. शैवलाच्या कोशिकांत हरितकणूतील विशिष्ट ठिकाणीच सजीव कणात (प्राकणूत) स्टार्च बनतो. उच्च दर्जाच्या वनस्पतींतल्या हरितकणूंत (आ. ५) अनेक हिरवे,
०·५–०·८ मायक्रॉन व्यासाचे ‘तरंगक’ असून त्यांत हरितद्रव्य असते व ते स्वतः रंगहीन पीठिकांत असतात. हरितकणूंच्या रासायनिक व विश्लेषणात ३० टक्के लिपीड, ५० टक्के प्रथिन, ५–१० टक्के रंगद्रव्ये व उरलेली राख असते. इलेक्ट्रॉन सूक्ष्म दर्शकांतून शैवल हरितकणूत प्रथिन व लिपीड यांचे पापुद्रे एकाआड एक (प्रत्येकी २५० मायक्रॉन जाड) असतात. चकतीसारखे तरंगक परस्परांवर नाण्यांच्या चवडीप्रमाणे रचलेले आढळतात. हरितकणूंच्या बाहेरच्या भागात पापुद्रे नसल्याने अमीबासारखी हालचाल आढळते. शैवलांत हरितकणूंची संख्यावाढ विभाजनाने होते, तर उच्च वनस्पतींत प्राकणूंचा विकास जटिल असतो. त्यांचा उगम कलकणूसारखा (प्राकणुपूर्व) दोन पापुद्र्यांच्या कणांपासून होतो. आतल्या पापुद्र्यापासून आतील जटिल भाग बनतो. हरितकणूत स्टार्चाचे कण व लिपिडाचे बिंदू सहज दिसतात. वर्णकणूत कॅरोटिनाचे स्फटिक आढळतात. श्वेतकणूत पापुद्र्याचे तंत्र नसून फक्त स्टार्चाचे कण तरंगकात दिसतात. स्वतंत्रपणे हालचाल करणाऱ्या अनेक कोशिकांत (उदा., काही शैवले) प्रकाशाची जाणीव करून देणारा विशिष्ट लालसर प्राकलकणू असून त्यास ‘नेत्रबिंदू’ म्हणतात. कोशिकेच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) प्राकलापासूनच प्राकणूंचा विकास झाला असावा. हरितकणू, वर्णकणू व श्वेतकणू मूलतः एकच असून परिस्थितीप्रमाणे एकाचे दुसऱ्यात रूपांतर झालेले आढळते.
कलकणू : सर्व सजीवांच्या प्रकलात आढळणारी ही सजीव व महत्त्वपूर्ण कोशिकांगे गोलसर, सुतासारखी थोडी लांबट किंवा आखूड असून कोशिकेत त्यांची सतत हालचाल व स्थलांतर चालू असते. गोलसर असताना सु. ०·२–१·० मायक्रॉन व्यास आणि लांबट असताना १–७ मायक्रॉन लांबी असते, परंतु हे आकार स्थिर नसतात. त्यांचा उगम विवाद्य आहे. त्यांचे आवरण दुहेरी असून (आ. ६) आतील पापुद्र्यापासून कणूच्या पोकळीत कमीजास्त लांबीचे आणि आडवे पातळ पापुद्रे निघतात. पोकळीत अपारदर्शक सूक्ष्मकणयुक्त आधात्री (आंतरकोशिकीय द्रव्य) असते. कोशिकेत यांची संख्या अनियमित असून कर्षकेंद्राजवळ आणि केसली अपिस्तरांच्या (एखाद्या मोकळ्या पृष्ठाला झाकणाऱ्या किंवा एखाद्या नळीच्या वा पोकळीच्या आत अस्तराप्रमाणे असणाऱ्या ऊतकांच्या) कोशिकांत टोकाकडे अधिक असतात. वजनाने या कणूत ६५% प्रथिन व ३५% लिपिडे (फॉस्फॅटिडे) असतात. एंझाइम तंत्रांनी ती भरलेली असून त्यांत एडीपी (ॲडिनोसीन डाय फॉस्फेट) बनते. चयापचय, स्नायूंचे आकुंचन, नवीन जीवद्रव्य बनविणे, मेदी अम्लांचे निम्नीकरण (टप्प्याटप्प्याने विघटन) आणि संश्लेषण इत्यादींत त्यांचे कार्य महत्त्वाचे असते.
गॉल्जी पिंड : सी. गॉल्जी यांनी १८९८ मध्ये शोधून काढलेले हे सजीव कोशिकांग (आ. १) बहुधा तीन घटकांचे बनलेले असते. ह्यातील मुख्य घटक म्हणजे वाकड्या, पातळ, पोकळ, सपाट व सूक्ष्म पत्रिकांचा गठ्ठा हा असून त्या प्रत्येकीच्या टोकापासून तुटून निघणाऱ्या लहानमोठ्या पुटकुळीसारख्या रिक्तिका हे इतर भाग होत. ह्या सर्वांचे मिळून हे तंत्र बनते. या प्रत्येकात विशिष्ट स्त्राव पदार्थ असतो त्यामध्ये फॉस्फोलिपिडे आणि अम्लीय फॉस्फेटेज यांचे प्रमाण जास्त असते. वनस्पतींच्या कोशिकांत त्याभोवती पापुद्रा नसतो. त्याचा सरासरी व्यास ०·६ मायक्रॉन आणि जाडी ०·१–०·२ मायक्रॉन असते.
निर्जीव कोशिकी पदार्थ : (अपरिकलीय कोशिकांतर्वस्तू). कोशिकांतील घडामोडीत उपलब्ध होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून बनलेल्या बव्हंशी अन्नकणांचा व इतर उपोत्पादांचा येथे समावेश होतो. जीवप्रक्रियांत त्यांचे स्थान दुय्यम असल्याने त्यांना वरील नाव दिले आहे. ह्यामध्ये स्टार्च, अंड्यातील पीतक (पिवळा बलक), ग्लायकोजेन, मेदबिंदू, स्रावकण, कृष्णरंजक (त्वचा, केस इत्यादींना रंग प्राप्त करून देणारे रंगद्रव्य, मेलॅनीन), विविध प्रकारच्या रिक्तिका इत्यादींचा अंतर्भाव होतो. यांपैकी काहींचा उल्लेख आणि माहिती पूर्वी प्राकल या सदरात आली आहे व काहींची अधिक माहिती पुढे दिली आहे.
(१) स्टार्च : ह्या महत्त्वाच्या पदार्थाचे लहानमोठे कण कोशिकांत असून ते फक्त सूक्ष्मदर्शकातूनच दिसतात त्यांचा व्यास सरासरी ५० मायक्रॉन असून बहुतेकांत एकमध्य (समाईक मध्य असलेली) वर्तुळे दिसतात, कारण त्यांच्या वाढीत आन्हिक (दिवस व रात्र यांच्यानुसार बदलणारी) लय असते. डी-ग्लुकोजापासून स्टार्चाचे संश्लेषण हरितकणूत किंवा श्वेतकणूत होते. कलकणूंचा व प्राकणूंचा निकट संबंध असतो. वाढ सुरू असताना स्टार्चाचे शर्करेत रूपांतर होत जाते. [→ चयापचय प्रकाशसंश्लेषण श्वसन].
(२) पीतक कण : अंड्यांमध्ये गर्भाला पोषक असा हा पदार्थ नेहमी आढळतो. याचे उत्पादन स्टार्चप्रमाणे कलकणूत होते परंतु यामध्ये प्रथिने व लिपिडे विशेषकरून आढळतात पीतक कणात यांचे अनेक कण एकत्र येऊन ते विशिष्ट प्रकारे मांडले जातात.
(३) स्रावकण : विशिष्ट कार्यास आवश्यक अशा वेळीच कोशिकांत तयार होऊन बाहेर टाकला जाणारा (उत्सर्जन) पदार्थ. यातील एंझाइमप्रधान अशा कणांना झायमोजेन म्हणतात. स्वादुपिंडासारख्या पाचक प्रपिंडांच्या (ग्रंथींच्या) कोशिकांत हे कण भरपूर असतात. प्राण्यांना आवश्यक असलेले म्युसीन ज्या म्युसिजेन कणांपासून मिळते तेही याच सदरात येतात अपिस्तरांच्या संरक्षणाकरिता व बुळबुळीतपणा आणण्याकरिता याचा उपयोग होतो. गॉल्जी पिंडांमध्ये हे स्रावकण जमलेले आढळले, तरी त्यांची उत्पत्ती अंतःप्राकल जालकात होत असावी असे मानतात.
(४) कृष्णरंजक : प्राण्यांना या रंगद्रव्यामुळे वा तत्सम कोशिकांतर्वस्तूमुळे रंग प्राप्त होतो. शरीरावरच्या अपित्वचेत (बाह्यत्वचेत) व इतर थरांतल्या कोशिकांत व केसांत पिवळे, तपकिरी, पिंगट व काळ्या रंगाचे सूक्ष्म कण पसरलेले असतात. काही मासे व तत्सम प्राणी आपल्या शरीरातील कृष्णरंजक द्रव्याने भरलेल्या कोशिकांच्या आकारमानात बदल घडवून सर्व शरीराचा रंग बदलतात. प्रथिनांचे विघटन होऊन हे रंगकण बनले जात असावेत रासायनिक दृष्ट्या ते अक्रिय असतात. परिकलातील लहान रिक्तिकांत ते एकदा तयार झाल्यावर दुसऱ्या कार्याभावी ते स्थिर राहतात.
(५) स्फटिक : वनस्पतींच्या (क्वचित प्राण्यांच्या) कोशिकांत बनलेले अकार्बनी पदार्थ (विशेषतः कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्झॅलेट इ.) अनेकदा वाजवीपेक्षा अधिक झाल्यामुळे स्फटिक रूपात साठतात. प्राण्यांमध्ये कित्येक प्रकारच्या कोशिकांत असेच प्रथिनांचे स्फटिक आढळतात, परंतु त्यांचे औचित्य अद्याप कळलेले नाही.
(६) रिक्तिका : प्राणी व वनस्पती यांच्या कोशिकांत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिकलहीन जागा सामान्यतः आढळतात. वनस्पतींच्या कोशिकांत कधीकधी त्या इतक्या मोठ्या असतात की, कोशिकेतील सर्वच जागा एका किंवा अनेक पण मोठ्या रिक्तिकांनी व्यापलेली असते त्याभोवती प्राकलाचा पातळ थर कोशिकावरणाच्या आतील अस्तराप्रमाणे असतो त्याला आद्याशय म्हणतात. ह्या रिक्तिकेत मध्यभागी असलेल्या परिकलबिंदूस अंतःप्राकलापासून परिकलाचे सूक्ष्म धागे जोडलेले असतात. रिक्तिकांभोवतालच्या परिकलवेष्टनास प्राकलपटल म्हणतात व त्याचे गुणधर्मही बाह्यप्राकलासारखेच असतात. रिक्तिकांत अकार्बनी लवणे, शर्करा, विद्राव्य (विरघळणारी) प्रथिने व अकार्बनी अम्ले यांचे विद्राव असतात तसेच सुरक्षित व उपयुक्त चयापचयोत्पाद किंवा टाकाऊ पदार्थही असतात. प्राण्यांतील कोशिकाबाह्य अभिसारी प्रवाही पदार्थांची अनेक कार्ये वनस्पतींतील मोठी रिक्तिका करते. विभज्येतील (विभाजन होण्याची शक्यता असलेल्या व प्रभेदित नसलेल्या कोशिकांच्या गटातील) कोशिकांत रिक्तिका फार लहान असून पुढे तीत वाढ होते व एकच मोठी किंवा अनेक लहान रिक्तिका बनतात. प्राण्यांत रिक्तिका विविध असून त्यांचा उगम कोशिकेच्या क्रियाशीलतेवर अवलंबून असतो त्यांतील पाणी व काही चयापचयोत्पादांचा नंतर उपयोग करून तेथेच जमलेल्या टाकाऊ पदार्थांची बाहेर रवानगी होते [→ प्रोटोझोआ]. वनस्पतींच्या कोशिकांमधील रिक्तिकांतील रसास कोशिकारस म्हणतात. वनस्पतीत लाल व जांभळे रंग (अँथोसायनीन) रिक्तिकांत असून काही पानांचे व फळा-फुलांचे रंग त्यामुळे तसे दिसतात. काही लहान रिक्तिकांत तेल असून त्यांचा उगम कलकणूंपासून व विशिष्ट प्राकणूंपासून होतो.
कोशिका-विभाजन : सजीव कोशिकांची संख्यावाढ ज्या प्रक्रियेने घडून येते व ज्यामुळे अनेककोशिक जीवमात्रांची शारीरिक वाढ होते, त्यास हे नाव दिले असून यामध्ये परिकलविभाजन आणि प्रकलविभाजन ह्यांचा समावेश होतो. प्रकलविभाजन ही एक दीर्घ व क्रमाने घडून येणारी प्रक्रिया असून तीत दोन प्रकार संभवतात. एकात प्रकलातील रंगसूत्रांची संख्या कायम राहते म्हणजे एका विभाजनानंतर बनलेल्या दोन कोशिका मूळ कोशिकेसारख्या असतात त्याला ‘समविभाजन’ म्हणतात. याउलट दुसऱ्या प्रकारात विभाजनानंतर नवीन (जन्य) कोशिकांच्या प्रकलातील रंगसूत्रांची संख्या मूळच्या (जनक) कोशिकेतील संख्येच्या निम्मी असते म्हणून या प्रकारास ‘अर्धसूत्रण (किंवा न्यूनीकरण) विभाजन’ म्हणतात. पहिल्या प्रकारच्या विभाजनाला ‘स्थातव’ असेही म्हणतात, कारण या विभाजनामुळे शरीराच्या कोणत्याही भागाची वाढ होते. दुसऱ्या प्रकारचे विभाजन फक्त प्रजोत्पादक कोशिका निर्माण करण्यापुरते मर्यादित असते त्याचा शारीरिक वाढीशी संबंध नसतो. दोन्ही प्रकारांतील विभाजनात जनक कोशिकांतील प्रकल चार प्रमुख अवस्थांतून जातो शेवटच्या अवस्था प्रारंभिक अवस्थांच्या उलट क्रमाने घडून येतात.
(१) समविभाजन : (आ. ७). ह्यामध्ये पहिल्या अवस्थेत (पूर्वावस्थेत) प्रकलातील रंगसूत्रद्रव्याच्या जालकापासून भिन्न आकारांची रंगसूत्रे निर्माण होतात यांचा आकार व यांची संख्या भिन्न जातींत भिन्न परंतु एका जातीतील सर्व व्यक्तींत मात्र सारखी असते तसेच ही संख्या सम म्हणजे दोनाच्या पटीत (द्विगुणित) असते व प्रथम ती रंगसूत्रे प्रकलपटलात मुक्तपणे पसरलेली आढळली, तरी लागलीच त्यांतल्या प्रत्येकाची उभ्या (अनुदैर्घ्य) विभागणीने दुप्पट संख्या होऊन त्या जोड्या प्रकलाच्या मध्यावर एका पातळीत मांडल्या जातात. जोडीतील दोन घटक म्हणजेच रंगसूत्रार्ध एका विशिष्ट बिंदूत (तर्कुयुज) परस्परांस चिकटलेले असतात सर्वांच्या एका पातळीतील तबकडीप्रमाणे असणाऱ्या मांडणीस ‘प्रकलबिंब’ म्हणतात. यावेळी प्रकलपटल नाहीसे होऊन पुढची (दुसरी) म्हणजे मध्यावस्था सुरू होते. प्रकलक लुप्त होऊन प्रकल-द्रव्यापासून बनलेले अनेक धागे कोशिकेच्या दोन टोकांपासून प्रकलबिंबाकडे पसरतात. प्रत्येक टोकास एक कर्षकेंद्रकण बहुधा आढळतो. सर्व धाग्यांपासून एक काहीशी चातीसारखी आकृती बनते. तिला ‘तर्कू’ आणि धाग्यांना तर्कुतंतू म्हणतात. दोन टोकांच्या या तर्कूस द्विध्रुवी म्हणतात. कधीकधी तर्कू बहुध्रुवी असल्याचे आढळते. प्रकलपटल नाहीसे होण्यापूर्वी कधीकधी परिकलापासून बनलेले धागे दोन्ही टोकांस प्रकलपटलावर टोपीप्रमाणे पसरतात आणि पुढे प्रकलपटल लुप्त झाल्यावर प्रकलबिंबापर्यंत वाढून रंगसूत्रार्धांमधल्या तर्कुयुजांना चिकटतात. येथे मध्यावस्था संपून तिसरी म्हणजे पश्चावस्था सुरू होते. यावेळी मूळच्या द्विगुणित रंगसूत्रांच्या विभागणीने बनलेली एकूण रंगसूत्रार्धांची संख्या चौपट असते. आता तर्कुयुजांची विभागणी होऊन त्यांतील प्रत्येक त्याजवळच्या रंगसूत्रार्धाबरोबर तर्कुतंतूच्या साहाय्याने कर्षकेंद्रकणाकडे सरकत येतो, मात्र एका रंगसूत्राचे दोन भाग (रंगसूत्रार्ध) विरुद्ध टोकाकडे जातात. या प्रक्रियेमुळे प्रत्येक कर्षकेंद्रकणाजवळ पुन्हा पूर्वीच्या इतकीच रंगसूत्रांची संख्या (द्विगुणित) जमते. येथून पुढे चौथी म्हणजे अंत्यावस्था सुरू होते व प्रारंभी म्हटल्याप्रमाणे ती पूर्वावस्थेच्या उलट प्रकारची असते तीमध्ये रंगसूत्रांचे पुन्हा रंगसूत्रद्रव्याच्या जालकात रूपांतर, प्रकलाचा पुनरुद्भव व प्रकलपटलाची काही निर्मिती होऊन दोन प्रकले होतात. यालाच प्रकलविभाजन म्हणतात. याच सुमारास परिकलाचीही विभागणी सुरू होते. कोशिकेच्या मध्यावर दोन प्रकलांमध्ये तर्कुतंतूवर आणि आसपास परिकलातून निर्माण झालेले अनेक सूक्ष्म कण पसरून मध्यपटल बनते व दोन प्राकलखंड होतात.
कोशिकेतील अनेक सजीव कण याच वेळी विभागून दोन प्राकलखंडांत गेलेल असतात, त्यामुळे परिकल-विभाजन पूर्ण होते. वनस्पतिकोशिकांत ह्या प्राथमिक थराच्या (मध्यपटलाच्या) दोन्ही बाजूंस नंतर तूलीराचे (सेल्युलोजाचे) द्वितीयक व तृतीयक थर बसून कोशिकावरण बनते. येथे कोशिका-विभाजन पूर्ण होते. नवीन बनलेल्या कोशिका पुन्हा विभागून स्वतंत्र व अलग झाल्या नाहीत, तर कोशिकांचा समूह बनतो आणि अनेककोशिक शरीर अथवा त्याचे ऊतकादी अवयव बनतात स्वतंत्र झाल्यास संख्यावाढ होते. जनक कोशिकेतील प्रमुख घटकांची (प्रकल व परिकल) सारखी विभागणी झाल्याने नवीन जन्य कोशिकांचे बहुतेक गुणधर्म जनक कोशिकेप्रमाणे असतात हे स्वाभाविक आहे. रंगसूत्रांची जनक कोशिकेतील पहिली द्विगुणीत संख्या पुढच्या पिढीत कायम राहते. जन्य कोशिका सावकाशीने वाढून सामान्यपणे आकार आणि संरचना या दृष्टीने जनक कोशिकेसारख्या होतात.
वृद्धि-विभाजन चक्र : कोशिकांतील विद्यमान रेणूपासून नवीन रेणू बनविण्याची क्षमता सर्व सजीवांत असते मग ती कोशिका कितीही साधी असली तरी चालेल. यामुळे कोशिकांचा समूह वाढतो हे खरे, तथापि कोशिकांची वैयक्तिक वाढीची क्षमता मर्यादित असते. सर्वसाधारणतः कोशिकेतील वस्तुमान दुप्पट झाल्यावरच वृद्धी थांबते. विभाजनानंतर पुन्हा वृद्धीला जोम येऊन पूर्ण वाढ होईपर्यंत कोशिका विभाजन होत नाही यावरून विभाजन व वृद्धी परस्परांस पूरक असून त्यांचे चक्र सुरू असते. त्याप्रमाणे जैव-तंत्राच्या वाढीत दुप्पट होणे व निम्मे होणे ह्या अवस्था महत्त्वाच्या ठरतात. ह्या चक्रात आनुवंशिकतेचे रक्षण, जननक्षम पदार्थांचे विभाजनपूर्व दुप्पट होणे व त्यानंतर, लागलीच संख्या व गुणांच्या दृष्टीने त्यांची जन्य कोशिकांत सारखी वाटणी होणे ह्यांवर अवलंबून असते, ही प्रक्रिया समाविभाजनाने साधते. काही सजीवांत प्रकल-विभाजन होते पण परिकल-विभाजन न होता वाढ होत राहते (उदा., काही शैवले, श्लेष्म-कवके, शैवल- कवके, स्नायूसारखी प्राण्यांची ऊतके). कोशिकेच्या एका विभागणीनंतर बनलेल्या दोन जन्य कोशिकांची पुन्हा विभागणी होईपर्यंत त्यामध्ये आवश्यक ते वृद्धीसारखे बदल न झाल्यास पुढील पिढ्या क्रमशः अधिक लहान होत जातील. समविभाजनातील रंगसूत्रांची हालचाल स्नायूच्या हालचालीतल्याप्रमाणे जीवरासायनिक यंत्रणेमुळे होत असावी.
समविभाजनातील प्रकलकाचे कार्य आणि वर्तन अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. पूर्वावस्थेत लोप पावून अंत्यावस्थेत तो प्रकट होतो. त्यातला काही भाग अवस्थांतरात टिकून असतो, असे काही शास्त्रज्ञ मानतात.
कोशिका-प्रभेदन, जीर्णता व मृत्यू : निर्मितीनंतर प्रत्येक कोशिका बहुधा कमी अधिक कालप्रभेदन, जीर्णता व मृत्यू या अवस्थांतून जाते. प्रभेदनात कोशिकेत शारीरिक व क्रियावैज्ञानिक फरक पडतात आणि त्यामुळे तिचे रूपांतर होते. एककोशिक सजीवांच्या जीवनचक्रात त्यांच्या गुणधर्मांत पडणारे फरक येथे समाविष्ट करतात. सर्वसाधारणपणे गर्भ विकासातील प्रभेदन अनुत्क्रमणीय (बदल न होणारे) असते, तथापि बरेच प्रभेदन झालेल्या कोशिकांत कधीकधी प्रायोगिक उपायांनी बदल घडविता येतात. काही सॅलॅमँडरांच्या डोळ्यात कनीनिकेपासून (मध्यभागी रंध्र असलेल्या पटलापासून) भिंगाचे ऊतक निर्माण करण्याची शक्यता सिद्ध झाली आहे. कोशिका-परिकलातच नव्हे तर प्रकलातही फरक पडल्याने प्रभेदनात फरक पडल्याचे आढळले आहे. प्रभेदनामुळे कोशिकांचे व त्यांपासून बनणाऱ्या ऊतकांचे वैशिष्ट्य वाढत जाऊन श्रमविभागणीच्या तत्त्वावर जीवमात्रांच्या क्रियाशीलतेत अधिक क्षमता येते. प्रभेदनानंतर कोशिकांत काही काळ जीर्णता येते. जीवनचक्राच्या आरंभी कोशिका-पदार्थांचे उत्पादन बरेच होते व त्याचा परिणाम वाढीत होतो. कित्येकांच्या जीवनचक्रात पुढे ऱ्हास आणि उत्पादन सारख्या प्रमाणात होते व वृद्धी थांबते. यापुढे कोशिका पदार्थांचा नाश किंवा अक्रिय पदार्थ निर्मितीकडे चयापचयाची प्रवृत्ती वाढते, यालाच जीर्णता म्हणतात. याच वेळी कोशिकेत होणारे विशिष्ट फरक (संरचनात्मक व घटनात्मक) वयोवृद्धीत गणले जातात. उदा., संश्लेषक एंझाइमांचे कार्य कमी होऊन विघटनांचे वाढत जाते काही कलकणू नाश पावतात काही रंजक कणांत व अंतराकोशिकी आधारभूत पदार्थात कॅल्शियमाचे प्रमाण वाढते. असे फरक बरीच वर्षे कार्यक्षम राहणाऱ्या कोशिकांत (उदा., तंत्रिका कोशिकांत) विशेषेकरून आढळतात. संप्रेरकांच्या साहाय्याने कोशिकांतील वाढत्या वयाबरोबर होणारे फरक कमी करता येतात, तथापि जीर्णता-प्रगतीला विरोध करणारे आणि कोशिकांचा मौलिक ऱ्हास थांबविणारे कोणतेच संप्रेरक अद्याप उपलब्ध झालेले नाही.
कोणतीही जिवंत कोशिका तिची जटिल रचना चालू ठेवण्यास लागणारी चयापचयोद्भव ऊर्जा सतत मिळेपर्यंत जिवंत राहते. या ऊर्जेचे उत्पादन व कोशिकेचे जीवन आणि कार्य चालू ठेवण्यास तिचा होणारा व्यय ह्याला आवश्यक त्या चयापचयक्रिया चालू राहण्यास कोशिकेतील यंत्रणा महत्त्वाची ठरते. कोशिकांतील परस्परावलंबित घटकांचे व कार्यांचे हे तंत्र बिघडेल त्याक्षणी मृत्यू अटळ असतो. कोशिकेच्या जीवनात मृत्यू केव्हाही येतो, परंतु गर्भविकासात अधिक विस्तृत प्रमाणात मृत्यू येणे ही नित्याची बाब असते उदा., यौवन लोपी ग्रंथीचे (वृद्धीशी संबंधित असलेल्या व उरोस्थीच्या मागे असलेल्या ग्रंथीचे, थायमसचे) प्रौढावस्थेपर्यंत नाहीसे होणे, सदैव काही प्रकारचे स्रवण, त्वचा पृष्ठावरच्या कोशिकांची झीज होऊन नाश होणे इ. भिन्न कोशिकांची आयुर्मर्यादा विविध असते उदा., उच्च वर्गातील प्राण्यांतील तंत्रिका-कोशिका त्यांच्या इतक्याच दीर्घायू असतात याउलट, रक्तातील तांबड्या कोशिका सर्वांत अल्पायुषी (मनुष्यात १००–१२० दिवस असतात). काही जिवंत कोशिकांतील उत्पादन व संचय इतके होते की, सजीवत्वाचे कसलेच लक्षण पुढे त्यांमध्ये आढळत नाही (उदा., पिसे, खवले, अस्थि-आधात्री). वनस्पतीतील कठककोशिका (जाड व लिग्निनयुक्त भित्ती असलेल्या कोशिका), धागे, त्वक्षा (खोड आणि मूळ यांच्या बाह्यभागावरील बुचासारख्या पदार्थाने भरलेल्या मृत कोशिका), काष्ठ-कोशिका, वाहिन्या इत्यादींच्या भिंती (कोशिकावरणे) फारच जाड व अपार्य झाल्याने त्या कोशिका लवकरच मृत होऊन शरीरास फक्त मजबुती आणि कठीणपणा देण्याचे कार्य करतात [→ ऊतके, वनस्पतींतील].
(२) अर्धसूत्रण (किंवा न्यूनीकरण) विभाजन : कोशिका विभाजनाच्या ह्या पद्धतीत मागे सांगितल्याप्रमाणे समविभाजनातील पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा चार अवस्था असून प्रक्रियेच्या शेवटी रंगसूत्रांची संख्या निम्मी होते म्हणून या पद्धतीला वरील नावे आहेत. फार थोड्या प्राण्यांत व काही वनस्पतींत (उदा., शैवले कवके शेवाळे नेचे वाहिनीवंत अबीजी वनस्पती इ.) अर्धसूत्रणानंतर प्रजोत्पादक कोशिका (गंतुके) लागलीच न बनता, समविभाजनामुळे बनलेले शरीर (एकगुणित) पुढे बीजुके वा गंतुके निर्माण करते व गंतुकांच्या संयोगानंतर मुळची (द्विगुणित) वनस्पती किंवा प्राणी बनतात. सामान्यपणे या पद्धतीत अर्धसूत्रण हा एक टप्पा आणि त्यानंतर एकदाच घडून येणाऱ्या समविभाजनाचा दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यांत हे विभाजन पूर्ण होते. परिणामी निम्म्या रंगसूत्रांची प्रकले असलेल्या चार कोशिका बनतात. पहिला विभाग अधिक महत्त्वाचा असल्याने त्याचे विवेचन पुढे तपशीलवार केले आहे.
आरंभी (आ. ८) जनक कोशिकेच्या प्रकलपटात रंगसूत्रद्रव्यापासून बनलेल्या समरचित (सारख्या) रंगसूत्रांच्या जोड्या बनतात व प्रत्येक जोडीतील एक पैतृक व एक मातृक असते. आनुवंशिक लक्षणांच्या बाबतीत जोडीतील प्रत्येकावरचे घटक (जनुके) स्वतंत्र व त्या त्या पितरापासून (आई किंवा पिता) आलेले असतात ह्या अवस्थेला समीपस्थिती म्हणतात. जोडीतील प्रत्येक घटकाला द्वियुजी म्हणतात. यानंतर प्रत्येक जोडीतील द्वियुजीची उभी विभागणी होते. त्यामुळे तेथे चार चार रंगसूत्रार्धे दिसतात व ती आखूड आणि जाड असल्याने ह्या अवस्थेस स्थूलसूत्रावस्था म्हणतात. यापुढे प्रत्येक द्वियुजीतील दोन रंगसूत्रांमधले आकर्षण नाहीसे होऊन ती काहीशी अलग होतात, परंतु एक दोन बिंदूत चिकटून राहतात. ह्या बिंदूस व्यत्यास म्हणतात व या अवस्थेत दोन (एक पैतृक व एक मातृक) रंगसूत्रार्धांमध्ये परस्परांचा काही भाग एकमेकांत विनिमयाने वाटला जातो, ह्याला व्यत्यसन (पारगती) म्हणतात. ही घटना फार महत्त्वाची असून पितरांच्या लक्षणांच्या अनुहरणात अर्थपूर्ण असते [→ आनुवंशिकी] येथे पूर्वावस्था संपून मध्यावस्था सुरू होते. तीमध्ये समविभाजनातल्याप्रमाणे द्विध्रुवी तर्कुमध्ये प्रकल बिंबावर रंगसूत्रांच्या जोड्या (रंगसूत्रार्धयुक्त) मांडल्या जाऊन तर्कुतंतू तर्कुयुजांना चिकटलेले आढळतात. यापुढच्या पश्चावस्थेत प्रत्येक जोडीतील रंगसूत्रे विरुद्ध दिशेस ध्रुवाकडे सरकतात व अत्यावस्था सुरू होते. प्रत्येक ध्रुवाजवळ आता संख्येने निम्मी रंगसूत्रे (प्रत्येक दोन रंगसूत्रार्धात विभागलेली) असून ती लागलीच तेथे नवीन बनलेल्या दुसऱ्या विभागातील तर्कूवरच्या आडव्या मध्यरेषेवर येतात व समविभाजनातल्याप्रमाणे पश्चावस्था व अंत्यावस्था घडून येते. अशा रीतीने निम्मी रंगसूत्रांची संख्या असलेले चार प्रकल बनतात त्याच वेळी पहिल्या अर्धसूत्रण विभाजनातील व दुसऱ्यातील परिकलविभाजन पूर्ण होऊन एकूण प्राकलाचे चार खंड (म्हणजे चार एकगुणित कोशिका) बनतात. बीजुकोत्पादनात यामुळे चार बीजुके बनतात. गंतुकनिर्मितीत चार स्वतंत्र गंतुके बनतात आणि ती एकाच लिंगाची असतात. दोन एकगुणित व असमान गंतुकांच्या मीलनाने बनणाऱ्या. रंदुकात रंगसूत्रांची संख्या पुन्हा द्विगुणित (मूळच्या जनक कोशिकेप्रमाणे) होते. लैंगिक प्रजोत्पादनात गंतुकांचा संयोग होत असल्याने त्यांतील रंगसूत्रांची संख्या आधीच निम्मी झाली नाही, तर प्रत्येक नवीन पिढीच्या सुरुवातीस पूर्वीच्या संख्येच्या दुप्पट होऊन काही पिढ्यांनंतरची संख्या प्रकलात मावणार नाही ही अडचण अर्धसूत्रीकरण प्रक्रियेने टळते व हे तिचे महत्त्व आहे [→ प्रजोत्पादन आनुवंशिकी]. प्राण्यांमध्ये अंदुकाच्या (अचल स्त्री-जनन कोशिकेच्या) निर्मितीपूर्वी अंदुकजनक कोशिकेचे अर्धसूत्रण-विभाजन होते त्यापासून बनणाऱ्या दोन एकगुणित कोशिकांपैकी एका सापेक्षतः लहान असलेल्या कोशिकेचा ऱ्हास होऊन उरलेल्या कार्यक्षम कोशिकेचे समविभाजन होते त्यापासून बनलेल्या दोन असमान कोशिकांपैकी एका लहान कोशिकेचा तसाच ऱ्हास होतो व राहिलेली मोठी एकच कोशिका अंदुक म्हणून कार्यान्वित होते. ज्या लहान कोशिका ऱ्हास पावतात, त्यांना ‘त्यक्तकोशिका’ म्हणतात. रेतुकजननात, याउलट, जनक कोशिकेपासून चार एकगुणित रेतुककोशिका बनतात.
वर दिलेली समविभाजनाची व अर्धसूत्रणाची रूपरेखा निरपवाद नाही. भिन्न जातींत किरकोळ फरक आढळतात [→ बहुगुणन गर्भविज्ञान]. कोशिका-विभाजनाचे यांखेरीज काही प्रकार आढळतात [→ यीस्ट कवक सूक्ष्मजीवशास्त्र]. तथापि रंगसूत्रांची व त्यांतील घटकांची इतकी अचूक आणि सारखी विभागणी दुसऱ्या कोणत्याही कोशिका-विभाजनाच्या प्रकारात नसते.
कोशिकावरण : (कोशिकाभित्ती). मागे उल्लेख केल्याप्रमाणे वनस्पतींच्या कोशिकांना तूलीर या कार्बोहायड्रेट पदार्थाचे आवरण असते व सूक्ष्मजंतूत ह्या आवरणात कायटिन ह्या काही प्राण्यांच्या कोशिकावरणात आढळणाऱ्या शृंगद्रव्यासारख्याचा बराच अंश असतो. कोशिकावरण संरक्षक असून त्याचे उत्पादन कोशिकेतील प्राकलापासून होते कोशिका विभाजनात सांगितल्याप्रमाणे दोन जन्य कोशिकांत प्रथम मध्यपटल बनते व वनस्पतींत त्यावर नंतर कमीअधिक जाडीचे तूलीर वा काष्ठीर (लिग्निन) यांचे प्राथमिक व द्वितीयक थर बनतात. हे थर पातळ असेतोवर त्यांतून परिकलतंतू परस्पर बंध राखतात. परंतु पुढे पुढे जाडी अधिक वाढल्यावर विशिष्ट जागीच फक्त खाचा निर्माण होऊन तेथे परिकलतंतू दिसतात. कोशिकावरण हे अनेक सूक्ष्मतर धाग्यांचे (सूक्ष्मसूत्रकांचे) बनलेले असते. प्रत्येक सूक्ष्म सूत्रक तूलीर ह्या रासायनिक पदार्थाच्या (पॉलिसॅकॅराइडाच्या) रेणूंच्या साखळ्यांचे असून हे रेणू अनेक ग्लुकोजशर्करेच्या रेणूंचे बनलेले असतात. याखेरीज इतर शर्करांचा (हेक्सोज, पेंटोज इ.) अंतर्भाव असतो. काही कोशिकावरणांच्या सूक्ष्म सूत्रकांमध्ये अर्धतूलीर (हेमिसेल्युलोज) हे आधात्री असून त्यात पेंटोजशर्करा असते. यांशिवाय मध्यपटल व प्राथमिक आवरणात पेक्टिक पदार्थ (विशेषतः काही फळांत आढळणारा बुळबुळीत पदार्थ) असतात व ते दूर झाल्यास (निसर्गतः मांसल फळ पिकल्यावेळी) कोशिका परस्परांपासून वेगळ्या होतात. वनस्पतींच्या काही भागांत लाकडात आढळणारा काष्ठीर नावाचा आधात्री पदार्थ कोशिकावरणात जमल्याने ते जाड, कठीण व अपार्य बनते. पृष्ठभागावरच्या कित्येक कोशिकावरणांत मेणासारखा पदार्थ बनून पृष्ठावर त्याचा लेप बसतो [उदा., चकचकीत पानांवरचा क्युटिकलचा म्हणजे उपत्वचेचा लेप → उपत्वचा घायपात व कोरफड यांच्या पानांवरचा मेणाचा लेप] व त्यामुळे हे पृष्ठ जलाभेद्य बनते. ह्याप्रमाणेच ⇨ गवते व ⇨ एक्विसीटममध्ये अपित्वचेत सूक्ष्म रेतीचे कण समाविष्ट होऊन तिला कठीणपणा येतो [→ डायाटम] त्वक्षी (स्यूबेरीन) ह्या बुचाच्या पदार्थामुळे कोशिकावरण जलाभेद्य व उष्णतारोधक बनते [→ त्वक्षा]. चुनखडीचे कण चूर्णीय शैवलांच्या कोशिकावरणात आढळतात, तसेच वड, रबर इत्यादींच्या पानांच्या अपित्वचेच्या कोशिकावरणात ‘खटिकापुंज’ (कॅल्शियम कार्बोनेट आणि जैव पदार्थ यांच्या पुंजाचे) स्फटिक आढळतात. श्लेष्मल पदार्थही काहींच्या अपित्वचेत आढळतात. कोशिकावरणाचा नाश झाल्यास ते आतून नवीन बनते. कोशिकांचा विस्तार होताना आरंभीचे कण ताणले जाऊन त्यावर नवीन थर बसतात (स्तराधान) काहींत नवीन लघुसूत्रके पहिल्यांत घुसून विस्तारास व त्यावर बसून जाडीस कारणीभूत होतात (कणाधान). तूलीर, काष्ठ, बूच व करंडक वनस्पतींचे (डायाटमांचे) सांगाडे मनुष्यमात्रास फारच उपयुक्त ठरले आहेत. यांखेरीज राळ, गोंद, रंग, तेले आणि टॅनीन यांचाही कोशिकावरणात प्रवेश होऊन त्यामुळेही त्यांचे गुणधर्म बदलतात. कित्येक वनस्पतींचे मध्यकाष्ठ, साल व फलावरण यांची उदाहरणे या संदर्भात देता येतील.
कोशिका-पार्यता : कोशिकेत, कोशिकेबाहेर अथवा तिच्यातून पदार्थांना जाऊ देणे किंवा जाण्यास चालना देणे याला पार्यता म्हणतात. ह्या प्रक्रियेत पदार्थाचा प्रवेश बाहेरून पण प्राकल पटलातून होतो. बाह्यावकाश व कोशिकेतील परिकल यांमधली ही सीमारेषा असते. अनेकदा या पापुद्र्याशिवाय तेथील कोशिकावरणातूनही प्रवेश व्हावा लागतो. कोशिकेतील कलकणू, प्रकल, विविध रिक्तिका वगैरे बाबतींतही त्यांच्याभोवती असलेल्या प्राकल पटलामुळे पार्यतेचे नियम लागू पडतात. कोणते पदार्थ कोशिकेत येऊ द्यावयाचे किंवा बाहेर टाकावयाचे याबाबत कोशिका फार निवड करतात. पार्यतेतील निवडीमुळेच अनेक पदार्थांचा संचय कोशिकांतून आढळतो [→ वनस्पति व पाणी चयापचय].
कोशिका-चयापचय : जिवंत कोशिकांत कमी-अधिक प्रमाणात सदैव चालू असलेल्या अनेक जटिल भौतिक-रासायनिक प्रक्रियांचा येथे अंतर्भाव होतो ह्यांमुळे अन्नकणांचे निम्नीकरण होऊन ऊर्जा उपलब्ध होते आणि हिचा वापर कोशिकेची जटिल रचना बनविणे, गती व आवेगप्रेषण (तंत्रिका व स्नायू यांच्याद्वारे उद्दीपक संदेश वाहून नेणे) ह्यांकरिता मुख्यतः होतो. कोशिका-चयापचयात एंझाइमांचा फार मोठा वाटा असून भिन्नभिन्न एंझाइमे ठराविक रासायनिक विक्रियेचे उत्प्रेरक असतात. अन्नकणांचे विश्लेषण व संश्लेषण यांमध्ये अनेक एंझाइम तंत्रांचा क्रमवार उपयोग केला जातो. त्यामध्ये ऑक्सिजन घेऊन (सानिल)व न घेता (अननिल) अनेक विक्रिया चालू असतात. ऊर्जादायक व ऊर्जाग्राहक अशा दोन अवस्था चयापचयात आढळतात. शरीराचे सर्व घटक सतत बदलणाऱ्या अवस्थेत असून कोशिकांगांच्या निर्मितीचा व निम्नीकरणाचा वेग परस्परांस तोलून धरतात [→ चयापचय]. सस्तन प्राण्यांत सर्व प्रकारच्या कोशिकांत ऊर्जादायक विक्रिया चालू असून चयापचयाच्या इतर लक्षणांबाबत त्यांमध्ये भिन्नत्व आढळते. उदा., सर्व सस्तन प्राण्यांचे कोशिकाप्रकार कार्बोहायड्रेटे व मेद यांचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] करतात, परंतु प्रथिनांचे फार कमी मात्र यकृत सर्व तीन प्रकारांचे ऑक्सिडीकरण भिन्न प्रमाणांत करते. उलट, मेंदूतील कोशिकांना फक्त कार्बोहायड्रेटांतून ऊर्जा मिळते. भिन्न कोशिकाप्रकार आपली चयापययोद्भूत ऊर्जा भिन्न प्रकारे वापरतात. तौलनिक अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, चयापचयक्रिया बहुधा आनुवंशिकतेशी जोडलेल्या असून प्रत्येक एंझाइमाची निर्मिती व क्रियाशीलता स्वतंत्र जनुकाने नियंत्रित केलेली असते. चयापचयातील विविध विक्रिया कोशिकेत विशिष्ट कोशिकांगातच घडून येतात. या संदर्भात कलकणूंना कोशिकांतील ऊर्जा-यंत्रे म्हणतात. अंतःप्राकलातही अनेक विक्रिया होतात. प्रकलाचा चयापचयात फारसा वाटा नसतो. अनेक कोशिकांत संप्रेरकांचा चयापचयाशी निकट संबंध येतो. नलिकाहीन प्रपिंडांचा (ग्रंथींचा) व स्वादुपिंडासारख्या नलिकायुक्तांचा त्यांतील संप्रेरकांमुळे चयापचयावर विपुल परिणाम झालेला आढळतो.
पहा : एंझाइमे गुणसूत्रे जीन जीवद्रव्य जीवनसत्त्वे शारीर, वनस्पतींचे हॉर्मोने.
संदर्भ :
- Eames, A. J., MacDaniels, L. H. Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1947.
- Essau, K., Plant Anatomy, New York, 1960.
- Street, H. E., Plant Metabolism, New York, 1963.
- Wilson, C. L.; Loomis, W. E., Botany, New York, 1957.
लेखक : परांडेकर, शं. आ.