सिलिएटा : प्रोटोझोआ (आदिजीव) प्राणिसंघाच्या सिलिओफोरा वर्गातील एक उपवर्ग. नवीन वर्गीकरणात सिलिओफोरा यास उपसंघाचा व सिलिएटा यास वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे. या वर्गात सु. ५,००० जातींचा समावेश केलेला आहे. या प्राण्यांमध्ये खूपच विविधता आढळते. शरीरावर आढळणाऱ्या ⇨ पक्ष्माभिका  हे या प्राण्यांचे वैशिष्ट्य असून, त्यांचा उपयोग प्रामुख्याने हालचाल करण्यासाठी व अन्न गोळा करण्यासाठी होतो.

सिलिएटा प्राण्यांची वैशिष्ट्ये : बहुतेक प्राणी खाऱ्या, गोड्या आणि खाडीच्या पाण्यांत राहतात. काही प्राणी परजीवी असून ते समूहाने राहतात. उदा., बॅलँटिडियम कोलाय. काही प्राणी स्थानबद्घ (हालचाल न करणारे) असतात. शरीर एका कोशिकेपासून बनलेले असून त्यास विशिष्ट आकार असतो. कोशिकेच्या बाह्य आवरणास तनुच्छद म्हणतात, ते लवचिक असते. या प्राण्यांच्या शरीरावर पक्ष्माभिका संपूर्ण जीवनभर किंवा जीवनाच्या काही काळात असतात. पॅरामिशियम व ओपेलिना या प्राण्यांच्या शरीरावर सर्वत्र पक्ष्माभिका असतात, तर व्हॉर्टिसेलामध्ये पक्ष्माभिका शरीराच्या ठराविक भागावर असतात. पक्ष्माभिकांची संख्या प्रत्येक प्राण्यात वेगवेगळी असते. कोशिका-मुखाभोवती असणाऱ्या पक्ष्माभिका अन्नकण मुखाकडे पाठवितात. कोशिका-ग्रसनीत अन्नकण व पाणी यांपासून अन्नरिक्तिका तयार होतात. पाण्यातील सूक्ष्मजीव, जीवाणू व छोटे अन्नकण हे या प्राण्यांचे अन्न आहे. गुदद्वार कायमस्वरुपी किंवा तात्पुरते तयार झालेले छिद्र असते. त्याद्वारे टाकाऊ पदार्थ व पचन न झालेले अन्न शरीराबाहेर टाकले जाते. कोशिकाद्रव्यात लघुकेंद्रक व बृहत्-केंद्रक अशी दोन केंद्रके असतात. लघुकेंद्रक प्रजोत्पादन क्रियेचे नियंत्रण करते, तर बृहत्-केंद्रक शरीरांतर्गत क्रियांचे नियंत्रण करते. कोशिकाद्रव्यात एक किंवा अधिक संकोचशील रिक्तिका (विशेषतः गोड्या पाण्यातील व परजीवी प्राण्यांत) असतात. या प्राण्यांत अलैंगिक प्रजनन मुकुलनाने (शरीरावर अंकुरासारखे बारीक उंचवटे येऊन त्यांपासून नवीन प्राणी तयार होण्याच्या क्रियेने) व अनुदैर्घ्य (लांबीच्या दिशेतील) द्विभाजन पद्घतींनी होते. लैंगिक प्रजनन संयुग्मन व स्वयंयुग्मन पद्घतींनी होते.

वर्गीकरण : सिलिएटा वर्गात (नवीन वर्गीकरणानुसार) चार उपवर्गांचा समावेश केलेला आहे.

होलोट्रायकिया : या प्राण्यांमध्ये पक्ष्माभिका लहान असून सर्व शरीरावर अनुदैर्घ्य रांगा असतात. मुखात पक्ष्माभिका नसतात. काही प्राण्यांमध्ये त्या फारच लहान असतात. यामध्ये सात गणांचा समावेश होतो : (१) जिम्नोस्टोमॅटिडा, (२) ट्रायकोस्टोमॅटिडा, (३) कोनोट्रायकिडा, (४) ॲपोस्टोमॅटिडा, (५) ॲस्टोमॅटिडा, (६) हायमेनोस्टोमॅटिडा आणि (७) ट्रिग्मोट्रायकिडा. डिडिनियम, बॅलँटिडियम  व प्ल्यूरोनेमा  हे या उपवर्गातील महत्त्वाचे प्राणी आहेत.

पेरिट्रायकिया : प्रौढामध्ये शरीरावर पक्ष्माभिका नसतात, मुखात पक्ष्माभिका असतात. या उपवर्गात पेरिट्रायकिडा या एकाच गणाचा समावेश होतो. उदा., व्हॉर्टिसेला ट्रायकोडिना

सक्टोरिया : स्थानबद्घ व देठ असणारे प्राणी. सुरुवातीच्या काळात पक्ष्माभिका असतात, प्रौढात पक्ष्माभिका नसतात. चोषण संस्पर्शके असतात. यामध्ये सक्टोरिडा गणाचा समावेश होतो. उदा., आसिनेटा

स्पायरोट्रायकिया : शरीरावरील पक्ष्माभिका आखूड असतात. मुखात पक्ष्माभिका विकसित झालेल्या असतात. यामध्ये सहा गण आहेत : (१) हेटेरोट्रायकिडा, (२) ऑलिगोट्रायकिडा, (३) टिंटिनिडा, (४) एंटोडिनिओमॉर्फिडा, (५) ओडोंटोस्टोमॅटिडा, (६) हायपोट्रायकिडा. स्टेंटर, टिंटिनिडियम  व डिप्लोडिनियम ह्या महत्त्वाच्या प्राण्यांचा स्पायरोट्रायकिया या उपवर्गात समावेश होतो.

पहा : सिलिओफोरा.

जाधव, संदीप ह. पाटील, चंद्रकांत प.