गायकी, सर आर्चिबाल्ड : (२८ डिसेंबर १८३५–१० नोव्हेंबर १९२४). ब्रिटिश भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म व शिक्षण एडिंबर्गला झाले. १८५५ साली ते ब्रिटिश भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म व शिक्षण एडिंबर्गला झाले. १८५५ साली ते ब्रिटिश भूवैज्ञानिक संस्थेत मर्चिसन यांचे साहाय्यक झाले. याच संस्थेने स्कॉटलंडसाठी काढलेल्या स्वतंत्र शाखेचे १८६७ साली ते संचालक झाले. १८७१ साली एडिंबर्ग विद्यापीठात भूविज्ञान व खनिजविज्ञान यांचे पहिले ‘मर्चिसन प्राध्यापक’ म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८८२ पर्यंत ते या दोन्ही पदांवर होते आणि तेथून पुढे १९०१ सालापर्यंत ते जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ युनायटेड किंग्डमचे महानिदेशक व लंडनच्या म्युझियम ऑफ प्रॅक्टिकल जिऑलॉजीचे संचालकही होते. प्रसिद्ध भूवैज्ञानिक जेम्स गायकी त्यांचे बंधू होत.
भूकंप, पूर यांसारख्या घडामोडींनी भूवैज्ञानिक बदल घडून येतात, अशी एक विचारप्रणाली होती. त्याला विरोध दर्शविण्यासाठी झीज होऊन हळूहळू भूपृष्ठ बदलत असते, या मताचा गायकी यांनी पाठपुरावा केला. ग्रेट ब्रिटनमधील पूर्वीच्या ज्वालामुखींचा इतिहास व ओल्ड रेड सँडस्टोन या शैलसमूहाचे स्तरविज्ञान यांच्यासंबंधी त्यांनी महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे. त्यांनी यूरोपातील आणि उ. अमेरिकेतील हिमनद्यांनी व ज्यालामुखींनी तयार झालेल्या खडकांचा प्रत्यक्ष तेथे जाऊन अभ्यास केला.
ते रॉयल सोसायटीचे फेलो (१८६५), परदेशी सचिव (१८९०–९४), सचिव (१९०३–०८) व अध्यक्ष (१९०८–१३) होते. नाइट (१८९१), के. सी. बी. (१९०७) व ऑर्डर ऑफ मेरीट हे किताब त्यांना मिळाले होते. ते लंडनची जिऑलॉजिकल सोसायटी (१८९१-९२ व १९०६–०८), ब्रिटिश असोसिएशन (१८९२) व क्लासिकल सोसायटी (१९१०) यांचे अध्यक्ष तसेच रॉयल स्कॉटिश जिऑग्राफिकल सोसायटीचे एक संस्थापक आणि अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद होते.
ते उत्कृष्ट शिक्षक, व्याख्याते आणि पट्टीचे लेखक होते. त्यांनी अमेरिकेत व कॅनडात पुष्कळ व्याख्याने दिली. त्यांनी विपुल लेखन केले असून अनेक नकाशेही काढले. त्यांची महत्त्वाची काही पुस्तके अशी : द स्टोरी ऑफ बोल्डर्स (१८५८), सिनरी ऑफ स्कॉटलंड (१८६५), आउटलाइन्स ऑफ फिल्ड जिऑलॉजी (१८७६), टेक्स्ट बुक ऑफ जिऑलॉजी (१८८२), फाउंडर्स ऑफ जिऑलॉजी (१८९७), एन्शंट व्होल्कॅलोज ऑफ ग्रेट ब्रिटन (१८९७) इत्यादी. ए लाँग लाइफ्स वर्क हे त्यांचे आत्मचरित्र १९२४ साली प्रसिद्ध झाले. ते हेझल्मीरजवळ (सरी) मृत्यू पावले.
ठाकूर, अ. ना.