गायकवाड, सयाजीराव खंडेराव : (१७ मार्च १८६३-६ फेब्रुवारी १९३९). भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कार. १८८१-१९३९). मूळ नाव
गोपाळराव काशीराव गायकवाड. नासिक जिल्ह्यातील कवळाणे येथे जन्म. खंडेराव महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी चिमणाबाई ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी त्यांचा दुसरा विवाह झाला. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली.
दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. गादीवर आल्याबरोबर (२८ डिसेंबर १८८१) त्यांनी आर्थिक दृष्ट्या राज्याची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केली. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत सुरळीतपणा निर्माण केला. सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३). न्यायव्ववस्थेत सुधारणा केल्या. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४) तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभूवन’ ही संस्था स्थापन केली. ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली.
सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही महत्त्वपूर्ण आहे : पडदापद्धतिबंदी, बालविवाहबंदी, मिश्रविवाह, स्त्रियांचा वारसा, कन्याविक्रयबंदी, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).
बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.
त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- आपटे, दा. ना., श्री. महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे चरित्र, ३ खंड, मुंबई, १९३६.
- जोशी, चिं. वि., श्री सरकार सयाजीराव महाराज गायकवाड यांचे चरित्र व सूक्तिसंग्रह, बडोदे, १९३६.
- दांडेकर, वि. पां., सयाजीराव गायकवाड, पुणे, १९३३.
लेखक : दामले, व. भा.