केल्ट : मध्य व पूर्व यूरोपातील प्राचीन लोक. या इंडो यूरोपीय व आर्यवंशीय लोकांचे वंशज आजही उत्तर फ्रान्स, वेल्स, आयर्लंड आणि स्कॉटलंडच्या डोंगराळ भागांत राहतात. आल्प्स पर्वतराशींत व डॅन्यूबच्या खोऱ्यात केल्ट अश्मयुगापासून राहत होते. इ. स. पू. सहाव्या शतकात ते स्पेनमध्ये शिरले. इ. स. पू. चौथ्या शतकात त्यांनी रोम पादाक्रांत केले. त्यानंतर दोन शतके त्यांचे वर्चस्व यूरोपात होते. सीझर व ऑगस्टस या सम्राटांनी त्यांना दुबळे केले.
केल्ट लोकांची अर्थव्यवस्था ग्रामीण स्वरूपाची होती. त्यांना धातुशास्त्राची चांगली माहिती होती. तलवार, सुरा, बाण इ. आयुधांचा वापर ते युद्धात करीत असत. तसेच दुचाकी रथही वापरीत. त्यांनी ब्राँझ धातूचा शोध लावला असावा, असे म्हणतात. केल्ट लोकांची बोलीभाषा इंडो यूरोपियन भाषासमूहातील आहे.
संदर्भ : Childe, V. G. Prehistoric Communities of the British Isles, New York, 1952.
मुटाटकर, रामचंद्र