केरळ: मलबार. भारताच्या नैर्ऋत्य कोपऱ्यातील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर सर्वांत दक्षिणेचे चिंचोळे राज्य. क्षेत्रफळ ३८,८६४ चौ. किमी. लोकसंख्या २,१३,४७,३७५ (१९७१). ९ १५’ उ. ते १२ ५३’ उ. आणि ७४ ४६’ पू. ते ७७ १५’ पू. दक्षिणोत्तर लांबी सु. ५४४ किमी. कमाल पूर्व – पश्चिम रुंदी मध्यभागात सु. १२० किमी. केरळच्या सीमांवर उत्तरेस व पूर्वेस कर्नाटक, पूर्वेस व दक्षिणेस तमिळनाडू ही राज्ये आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. भारताच्या १·२ टक्के क्षेत्रफळ आणि ३·९ टक्के लोकसंख्या असलेल्या या राज्याची राजधानी त्रिवेंद्रम आहे. 

भूवर्णन : केरळचे तीन ठळक उत्तर-दक्षिण नैसर्गिक विभाग पडतात : (१) समुद्रकिनाऱ्याची गाळपट्टी : सध्याचा प्रत्यक्ष किनारा प्राचीन काळच्या किनाऱ्यापेक्षा समुद्रात बराच पुढे सरकलेला आहे. आख्यायिकांतील व वाङ्मयातील ज्या ग्रामनामांत बंदर किंवा बेट या अर्थी शब्द आहेत, अशा गावांची एक ओळच आजच्या किनाऱ्यापासून सु. १३ किमी. पर्यंत आत दूर राहिली आहे. सध्याच्या किनाऱ्यापासून समुद्रात थोडे दूर रेती व गाळ मिळून झालेले ०·५ ते ११ किमी. रुंदीचे, नारळीच्या बनांनी आच्छादित असे जमिनीचे पट्टे तयार झाले आहेत. त्यांच्या आणि मुख्य भूमीच्या दरम्यान असलेला ‘कायल’ (खारकच्छ), त्याचप्रमाणे पश्चजलाने बनलेल्या आडव्या खाड्या, हे केरळचे वैशिष्ट्य आहे. किनाऱ्याला समांतर असे हे तुटक जलाशय कालव्यांनी व बोगद्यांनी जोडून पोन्नानी नदीमुखापासून त्रिवेंद्रमपर्यंत सु. ३२० किमी. लांबीचा अंतर्तट जलमार्ग करण्यात आला आहे. पावसाळ्यात नदीमुखांनी या जलाशयात गोडे पाणी येते व उन्हाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राकडून खारे पाणी येते. वेंबनाड हे मोठे खारकच्छ कोचीन बंदराच्या मुखापासून दक्षिणेकडे रुंद होत गेलेले आहे. त्याच्या मुखाजवळील गाळ व रेती उपसून काढल्यावर कोचीन बंदर मोठ्या जहाजांना उपयोगी झाले. याच्या आतील किंवा पूर्वकाठाच्या गाळजमिनींवर भाताची दुबार पिके काढण्यात येतात. (२) मध्य विभागाचा पठार प्रदेश : हा समुद्रसपाटीपासून ६० ते १९० मी. उंचीच्या जांभ्या खडकाचा आणि दाट गवताने व झुडुपांनी आच्छादित असा आहे. त्यात मधून मधून सपाट भाग, सुट्या टेकड्या व पूर्वेकडील पर्वतराजींचे उतरत आलेले फाटे आहेत. (३) पर्वत विभाग : यात पश्चिम घाटाच्या सर्वांत दक्षिणेकडील अनाइमलई (अन्नमलई) व एलाचल (कार्डमम्) या वायव्य-आग्नेय श्रेणी आणि त्यांचे फाटे येतात. या पर्वतात पाऊस खूप असून त्यांवर दाट अरण्ये आहेत. पर्वतांच्या उतारावर चहा, कॉफी, वेलदोडे, मिरी इत्यादींचे व रबराचे मळे आहेत. भारतीय द्वीपकल्पावरील सर्वोच्च (२,६९५ मी.) अनइमुडी शिखर अनाइमलई पर्वतात आहे. एलाचल पर्वतात पेरियार तलाव, पीरमेड पठार, त्याभोवती १,५५० मी. हून अधिक उंचीच्या श्रेणी आणि अगस्त्यमलई व महेंद्रगिरीसारखी सुटी शिखरे आहेत.

किनाऱ्याच्या सुट्या पट्ट्यांवर रेतीमिश्रित गाळ, आतल्या किनाऱ्याला नदीगाळ, मध्य पठारावर जांभ्या खडकाची झालेली निकृष्ट जमीन आणि पर्वतभागात नीस खडकाचा भुगा व वनप्रदेशातील कुजलेला पाला पाचोळा मिळून झालेली माती, हे केरळमधील मृदांचे मुख्य प्रकार आहेत. आधुनिक काळात महत्त्व पावलेली मोनाझाइट, इल्मेनाइट, रूटाइल, झिरकॉन, सिलिमनाइट व गार्नेट ही खनिजे किनाऱ्याच्या वाळूत सापडतात. पांढऱ्या चिकणमातीचे मोठाले साठे राज्यात असून अभ्रक, ग्रॅफाइट, चुनखडक, सिलिका वाळू आणि लिग्नाइट यांचाही आढळ झाला आहे. त्याचप्रमाणे अलेप्पी व एर्नाकुलम् जिल्ह्यांत काचधंद्याला उपयोगी पांढरी वाळू आणि क्विलॉन, त्रिचूर व कननोर जिल्ह्यांत पांढरा शाडू सापडतो. 

पश्चिम घाटात उगम पावून थोड्याच अंतरावर अरबी समुद्राला मिळणाऱ्या अनेक छोट्या नद्यांपैकी सर्वांत लांब, २२४ किमी., पेरियार नदी आहे. पर्वत प्रदेशात ९३० मी. उंचीवर तिला धरण बांधून तिचे काही पाणी बोगद्यातून पूर्वेकडे तमिळनाडूच्या मदुरा जिल्ह्याला दिले आहे. तिच्या मुखाकडून ९६ किमी. पर्यंत जलवाहतूक होऊ शकते. पोन्नानी, बैपोर, कुट्टीयादी, चलाकुडी, पंबियार, शोलायार, चलिआर, पांबा, कडालंडी, इडिक्की, कल्लदा, वलयार अशा इतर लहान लहान नद्यांपैकी कित्येक थेट समुद्राऐवजी आडव्या खाड्यांना मिळतात. त्यामुळे झालेली काही मोठी सरोवरे त्रिचूर, कोचीन आणि अलेप्पीजवळ आहेत. शिवाय त्रिवेंद्रमजवळचे वेल्लानी व क्विलॉनजवळचे शास्तानकोझ यांसारखी गोड्या पाण्याची आणखी काही सरोवरे राज्यात आहेत. केरळातील बऱ्याच नद्यांवर प्रकल्प कार्यवाहीत आहेत. राज्याच्या पश्चिम सीमेला सु. ५९० किमी. लांबीचा सलग समुद्रकिनारा आहे.  

विषुववृत्तीय हवामान भारतात जास्तीत जास्त प्रमाणात केरळचेच आहे. कमाल तपमान ३२·२ से. च्या वर क्वचितच जाते व किमान तपमान २१·१ से. च्या खाली सामान्यतः येत नाही. पाऊस उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत येतो तो कोझिकोडे येथे २९७ सेंमी. तर त्रिवेंद्रमला १६० सेंमी. असतो. पर्वतप्रदेशात मात्र पर्जन्यवर्षाव ४५० सेंमी. पर्यंत होतो. दक्षिण भागातला पाऊस वर्षभर थोडाथोडा पडत राहतो कारण त्या भागाला पावसाळ्याच्या दोन्ही मोसमांचा फायदा मिळतो.

राज्याचा जवळजवळ चौथा भाग वनाच्छादित आहे. पर्वतप्रदेशातील उष्ण कटिबंधीय दाट जंगलांतून शिसवी, साग, रक्तचंदन, सीडार, वेंगाई अशा वृक्षांचे मूल्यवान लाकूड मिळते. उंच डोंगरांच्या उतारावरून चहा, कॉफी व वेलदोड्याचे मळे आहेत. सखल उतारावर रबर, मिरी, सुंठ, हळद यांचे उत्पादन होते. मध्यभागातील पठारावर टॅपिओका हे कंद आणि सपाट प्रदेशात व किनाऱ्याला भातपिके निघतात, तसेच नारळाची दाट बने आणि सुपारीच्या बागाही आहेत. येथे जमिनीला पाणी कसे द्यावे यापेक्षा पाणी काढून कसे लावावे, हा प्रश्न पडतो. उंच बांधांमधील पाटांपेक्षा शेते खालच्या पातळीवर असतात आणि पावसाळ्यानंतर शेतांतील पाणी रहाटगाडग्यांनी किंवा आता विजेच्या पंपांनी उपसून पाटांत सोडावे लागते. जरूरीप्रमाणे हे पाणी शेतात सोडता येते. काजू, फणस व आंब्याची झाडे उंच पर्वतांखेरीज सर्वत्र दिसतात. अरण्यातून हत्तीचे व गव्याचे कळप, अनेक जातींचे हरिण व वानर, वाघ, चित्ता, अस्वल, रानडुक्कर त्याप्रमाणे नाना रंगांचे व स्वरांचे असंख्य पक्षी अनेक जातींचे सर्प आहेत. किनाऱ्यालगतच्या समुद्रात बटरफिश, अँकोवी, सार्डिन, मॅकरल, कॅटफिश, शार्क इ. मासे विपुल मिळतात. खाऱ्या व गोड्या पाण्यांतही कोळंबी व झिंग्यांसारखे कवची जलचर उपलब्ध आहेत.


इतिहास व राज्यव्यवस्था : फार प्राचीन काळी ही भूमी काही नैसर्गिक कारणांनी समुद्रातून वर आल्याचा भूशास्त्रीय पुरावा दिसून येतो. सह्याद्रीच्या पश्चिमेकडची जमिनीची पट्टी परशुरामाने परशू भिरकावून समुद्र हटवून निर्माण केली, ही आख्यायिका त्या पर्वताच्या उत्तर टोकाच्या आदिवासींप्रमाणेच दक्षिण टोकाच्या केरळीयांतही रूढ आहे. केरळच्या उत्तर भागात प्रागैतिहासिक समाधि-अवशेष, ‘टोपी-कल्लू’(टोपी-दगड) आणि ‘कुडा-कल्लू’(छत्री-दगड) त्याचप्रमाणे खडकांत कोरलेली पालथ्या हंडीच्या आकाराची थडगी आढळतात. ‘केर’ या मलयाळम् भाषेतील नारळीच्या नावावरून या प्रदेशाला केरळ नाव पडले असावे ‘चेर’ हे नावही या प्रदेशाला व त्यातील रहिवाशांना फार पूर्वीपासून आहे. अशोकाच्या शिलालेखांत केरळाचा उल्लेख आहे आणि टॉलेमी, प्लिनी यांच्या साहित्यांत व पेरिप्लसमध्ये या किनाऱ्याच्या बंदरांचा निर्देश आहे. भारताच्या या भागाशी जगातील दूरदूरच्या देशांचे दळणवळण प्राचीन काळापासून चालू आहे. भूमध्य समुद्राभोवतालचे फिनिशियन, ईजिप्शियन, यहुदी व रोमनतसेच बॅबिलोनिया, इराण व अरबस्तान या देशांचे लोक इराणच्या आखातामार्गे किंवा तांबड्या समुद्रातून व्यापारासाठी येथे येत. मध्ययुगातही प्लॉरेन्स, व्हेनिस, जेनोआ इ. शहरांचा व्यापार केरळशी चालू होता प्रथम केरळात अनेक लहानलहान राज्ये होती. चेर वंशाच्या पेरुमाल राजांनी (८००–९५०) गोकर्णापासून कन्याकुमारीपर्यंत केरळ हे एकछत्री राज्य प्रथम बनविले असे मानले जाते. त्यांच्यापैकी शेवटचा चेरमान पेरुमाल ही केरळच्या इतिहासातील पहिली ठळक व्यक्ती त्याने स्वखुषीने सिंहासनाचा त्याग करून राज्याच्या वाटण्या केल्या व इस्लाम धर्म स्वीकारून मक्केची वाट धरली. २५ ऑगस्ट ८२८ हा त्याच्या प्रयाणाचा दिवस त्या दिवसापासून ‘कोळ्ळवर्षम्’ ही केरळची कालगणना सुरू होते. ती कोळ्ळम् अथवा क्विलॉन या नगराच्या नावावरून रूढ झाली, अशी समजूत आहे. दुसर्‍या एका दंतकथेनुसार आद्य शंकराचर्यांच्या निर्वाणानंतर त्यांचा शिष्य पेरुमलवंशीय राजा भास्कर रविवर्मा याने कोळ्ळम् येथे भरविलेल्या धर्मपरिषदेच्या वर्षापासून ही कालगणना धरण्यात येते. पेरूमालनंतर उत्तर केरळात कोलतिरी अथवा चिरवकल व झामोरिन अथवा सामुरीचे कोझिकोडे ऊर्फ कालिकत अशी लहानलहान राज्ये झाली. दक्षिणेकडील त्रावणकोर राज्य एका पेरुमालवंशीयकडून पूर्वेकडच्या चोल राजांनी अकराव्या शतकात जिंकले होते पण पुढल्याच शतकात स्थानिक राजांनी ते परत मिळविले. पुन्हा तेराव्या शतकात त्रावणकोरच्या आग्नेय भागावर मदुरेच्या पांड्य राजांनी आक्रमण केले होते, पण काही वर्षांनी त्रावणकोरने तो प्रदेश पुन्हा जिंकून घेतलाइतकेच नव्हे, तर पांड्य व चोलांचा १३१०-११ मध्ये मलिक काफूरने पाडाव केल्यानंतर त्यांचीच राज्ये क्विलॉनचा राजा तिरुवादी रविवर्मा कुलशेखर याने घेतली होती. चौदाव्या शतकात उत्तर केरळला मुहंमद तुघलकाचा थोडासा उपद्रव झाला. सोळाव्या शतकात त्रावणकोरवर विजयानगरची दोन आक्रमणे झाली आणि विजयानगर साम्राज्य नष्ट झाल्यानंतर मदुरेच्या नायकाची अनेक लहानलहान मांडलिक राज्ये येथे झाली. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मार्तंडवर्मा या राजाने इतर राजांना पराभूत करून नवे आधुनिक त्रावणकोर राज्य निर्माण केले. द लॅनाय नावाचा एक फ्लेमिश अधिकारी त्याचा सल्लागार आणि रामअय्यन दलवा हा मंत्री व सेनापती होता. या दोघांनी मिळून कवायती फौजा तयार केल्या, किल्ले-तटबंद्या भक्कम केल्या, कारभाराची घडी व्यवस्थित घातली, महसूलपद्धत सुधारली, राज्यात व इतर जिंकलेल्या प्रदेशांत शांतता आणि सुव्यवस्था ठेवली, अनेक प्रासाद व मंदिरे बांधली आणि व्यापार वाढविण्याच्या सोयी केल्या. नंतरचा राजा रामवर्मा यानेही उत्तम रीतीने राज्य सांभाळून म्हैसूरचा हैदर अली व पुढे टिपू यांच्या चढायांचा प्रतिकार इंग्रजांच्या साहाय्याने केला. त्यानंतर लवकरच त्रावणकोरच्या राजांनी इंग्रजांशी पक्के तह करून त्यांचे संरक्षण स्वीकारले व १७९५ मध्ये सालापासून हे एक संस्थान झाले. कोचीन नवव्या शतकापर्यंत केरळ राज्याचा एक भाग होते. चेरमान पेरूमालाने वाटण्या केल्यावर ज्यांच्या वाट्याला कोचीन आले, ते राजे स्वतःला चेरमानाचे सरळ वंशज म्हणवीत. त्यांचे कोझिकोडेच्या सामुरीशी सतत झगडे चालत. १७५९ मध्ये सामुरीच्या स्वारीला तोंड देण्यासाठी त्रावणकोरची मदत घेऊन त्याबदली काही प्रदेश कोचीनला द्यावा लागला. १७७६ ते १७९१ हैदर-टिपूचे मांडलिक झालेले कोचीन राज्य नंतर ब्रिटिशांचे अंकित झाले. केरळात पोर्तुगीजांचा शिरकाव १४९८ मध्ये वास्को द गामाच्या आगमनाने झाला. त्याच्या मागोमाग आलेल्या इतर पोर्तुगीजांनी कोचीन, कोझिकोडे आणि कननोर येथे भराभर वसाहती स्थापन केल्या. १६५६ मध्ये पोर्तुगीजांशी व्यापारी स्पर्धा करणारे डच दाखल झाले. १६६३ मध्ये त्यांनी कोचीन व तंगासेरी ही ठाणी जिंकली व १७१७ मध्ये सामुरींकडून चेटवई बेटावर ताबा मिळविला. तथापि नंतरच्या शतकार्धातच डच सत्ता अस्तास गेली कननोर १७७१ साली मोपला अली राजास विकावे लागलेचेटवई १७७६ मध्ये हैदराने जिंकली व इंग्रजांनी १७९५ मध्ये कोचीन काबीज केले. फ्रेंच लोक प्रथम १६९८ मध्ये कोझिकोडेला आले१७२६ लावी त्यांनी माहे येथे ठाणे वसविले, १७५१ मध्ये मौंट डेली आणि उत्तरेकडची काही ठाणी मिळविली. पण इंग्रजांनी १७६१ पर्यंत फ्रेंचाची माहेखेरीज सर्व ठाणी जिंकून घेतली. इंग्रजांनी केरळात प्रवेश केला तो १६६४ मध्ये कोझिकोडे येथे वखार घालून. लवकरच १६८३ मध्ये तेल्लीचरीमध्ये व १६८४ मध्ये अंजेगो येथे वखारी घालून त्यांनी आपले पाय पक्के रोवले आणि केरळातील मिरी, वेलदोडे व चंदन या मालांच्या खरेदीची मक्तेदारी मिळविली. मराठ्यांची गलबते सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून जवळजवळ शंभर वर्षेपर्यंत केरळ किनार्‍यावरची ठाणी लुटीत असत व प्रसंगी बेपोर, पोन्नानी अशा नद्यांच्या मुखांतून अंतर्प्रदेशातही शिरून धुमाकूळ घालीतइंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार १७५६ मध्ये नष्ट केले. त्रावणकोर व कोचीनखेरीज बाकीच्या केरळमधील किंवा मलबारातील कोलतिरी, पालघाट, कोझिकोडे, कननोर यांसारखी छोटी राज्ये आपापसांत झगडत होती. पालघाटचा अच्चन आणि कननोरचा अली राजा यांच्या मदतीला येण्याचे निमित्त करून हैदर अलीने उत्तर केरळवर हल्ला केला, तेव्हा हिंदू राजे त्रावणकोर व कोचीनकडे आश्रयास गेले. नंतर टिपूने केरळवर स्वारी केली. या सुमारास त्याचे इंग्रजांशीही युद्ध चालूच होते. १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपूचा पराभव झाल्यानंतर विजयी इंग्रजांना मलबार प्रांत मिळाला. नंतर केरळच्या या उत्तर भागात मधूनमधून झालेल्या मोपल्यांच्या बंडांखेरीज शांतताच राहिली. केरळवरील इंग्रजांच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष सु. दीडशे वर्षाच्या अंमलानंतर भारताच्या इतर भागांप्रमाणेच प्रजेच्या हक्कांसाठी प्रथम त्रावणकोर संस्थानात १९४१ मध्ये चळवळ सुरू झाली व काही प्रमाणात प्रजेला लोकशाही हक्क मिळाले. लवकरच दुसरे महायुद्ध, ‘भारत छोडो’ हे महात्मा गांधींचे देशव्यापी आंदोलन, भारतीय नेत्यांशी ब्रिटनच्या वाटाघाटी, फाळणी व सत्तांतर अशा घटना लागोपाठ घडत गेल्या. संस्थाने भारतात विलीन झाली. १९४९ मध्ये त्रावणकोर-कोचीनचे एकत्रीकरण झाले व १९५६ मध्ये भाषावार राज्ये होऊन जुन्या मद्रास राज्यातील मलबार जिल्हा व कासरगोड तालुका आणि त्रावणकोर-कोचीन व त्रिवेंद्रमचे चार तालुके आणि क्विलॉनच्या होनकोटा तालुक्याचा काही भाग एकत्र येऊन जवळजवळ एक हजार वर्षानंतर पुन्हा केरळ हे एकजिनसी राज्य स्थापन झाले. भारतीय संविधानानुसार केरळची अंतर्गत राज्यव्यवस्था बव्हंशी देशातील इतर घटक राज्यांसारखीच आहे. भारतातील पहिले कम्युनिस्ट मंत्रिमंडळ प्रथम याच राज्यात अधिकारावर आले होते. या राज्याला विधानपरिषद नाही, विधानसभा १३४ लोकनियुक्त सभासदांची असून सध्या (१९७० मध्ये) उजव्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली संमिश्र पक्षांचे मंत्रिमंडळ कारभार पाहत आहे. केरळात त्रिवेंद्रम, क्विलॉन, कोट्ट्यम्, अलेप्पी, त्रिचूर, कननोर, कोझिकोडे, पालघाट, एर्नाकुलम् व मल्लापुरम् या १० जिल्ह्यांचे ५६ तालुके आहेत. राज्यात १,६३५ खेडी, ८५ नगरे व ३ महानगरे असून ९५२ पंचायती, २८ नगरपालिका, व ३ महानगरपालिका स्थानिक कारभार पाहतात. भारतीय लोकसभेत केरळमधून निवडून गेलेले १९ सभासद असून राज्यसभेत ९ सदस्य आहेत.


आर्थिक स्थिती : राज्याच्या ३८,८६४ चौ. किमी. क्षेत्रापैकी सु. १०,००० चौ. किमी. वनाच्छादित आणि २५,००० चौ. किमी. शेतीखाली आहे त्यातील निम्म्या जमिनीला पाटाचे पाणी मिळू शकते. बाकीच्या क्षेत्रांत मळे, चराई, बिगरशेती उपयोगातल्या पडीत किंवा उजाड जमिनी आहेत. लागवडीस योग्य अशी जवळ जवळ सर्व भूमी उपयोगात आणलेली असूनही लोकसंख्येच्या भारामुळे राज्य अन्नधान्यांच्या बाबत स्वयंपूर्ण नाही. गरजेच्या सु. १/३ अन्नधान्य, बव्हंशी, तांदूळ, राज्याला आयात करावा लागतो. भात हेच राज्याचे मुख्य पीक असून त्याखाली तिसरा हिस्सा शेतजमीन आहे. पावसाच्या आणि कालव्यांच्या पाण्यावर वर्षातून दोन पिके काढण्यात येतात. १९६५-६६ मध्ये हेक्टरी ८६० किग्रॅ. उत्पादनाचे प्रमाण पडले. नारळ, टॅपिओका अथवा कॅसावा (रताळ्यासारखा कंदप्रकार), कच्ची आणि पक्की केळी, सुपाऱ्या, काजूगर, ऊस, शेंगदाणा, काळी मिरी, डाळी, सुंठ, वेलदोडे, रबर, चहा व कॉफी या मालाचेही बरेच उत्पादन झाले. त्याखेरीज इतर धान्ये, हळद, तीळ, कपाशी व तंबाखू ही पिके अल्प प्रमाणात निघाली. १९७० मध्ये राज्यात रबराचे १,०५,९३२ व कॉफीचे २०,६८९ आणि चहाचे २,५२७ मळे होते. कृषि उपयोगी यंत्रसामग्री ९,८२४ तेलइंजिने, ४,८६९ विजेचे पंप व ४१८ ट्रॅक्टर इतकी असून स्विस सरकारच्या आर्थिक सहकार्याने उंच पर्वतभागात शेतीच्या विकास योजना रूप घेत आहेत. पशुधन १९७२ सु. २८ लक्ष गाईबैल, ५ लक्ष म्हशी, १४ लक्ष बकरी, २४,००० मेंढरे आणि ९१ लक्ष कोंबडी इतके होते. १९७२ मध्ये समुद्रातून सु. ३.८ लक्ष मे. टन मासे पकडण्यात आले व देशातील या सर्वांत लहान किनारी राज्याने त्या वर्षाच्या मच्छीनिर्यातीचे ८७% परकीय चलन मिळविले. सार्डिन, मॅकरल व कोळंबी या सर्वांत महत्त्वाच्या खाऱ्या पाण्यातल्या व झिंग्या, मरळ व मॅलेट या गोड्या पाण्यातल्या मासळीच्या जाती आहेत. केरळमध्ये १४,००० लहान मोठ्या मच्छीमार होड्या, ९,००० कटामरान पडाव, १,००० यंत्रसज्ज नौका आहेत. ६·७५ कोटी रु. किंमतीच्या सु. २ लक्ष टन म्हावरांपैकी ८,००० टन गोड्या पाण्यातले होते. ८०% केरळीय मत्स्याहारी असल्यामुळे ५५% मच्छी ताजीच खपते ३५% गोठविण्यात किंवा वाळविण्यात येते व बाकी खताच्या उपयोगी पडते. निर्यात होणारी मासळी डबाबंद, गोठवून किंवा वाळवून पाठविण्यात येते. कननोर, एर्नाकुलम , विझिजोम व बेपोर येथील प्रशिक्षण शाळांतून आतापर्यंत १,६०० वर मच्छीमार शिकवून तयार झाले आहेत. मच्छीमारी व विक्रीच्या ५०० वर सहकारी सोसायट्या केरळात असून सरकारी आणि खाजगी ९ शीतगृहे, २१ मासे गोठविण्याचे कारखाने, ४ संशोधन केंद्रे व ४ मत्स्य संवर्धन तलाव उपयोगात आहेत. मच्छीमारीचा आधुनिक तंत्राने विकास करण्यात हिंदी नॉर्वेजियन प्रकल्प मदत करीत आहे. केरळच्या वनप्रदेशातून उत्पादन १९६४-६५ मध्ये सु. ३ लाख घ. मी. गोलटे, २·५ वासे, १·५ लक्ष टन सरपण, ९० लक्ष नग वेळू, ६० लक्ष पोती लोणारी कोळसा व १,३४२ किग्रॅ. हस्तिदंत याप्रमाणे होते.

उद्योग : काथ्या व संबंधित उद्योग या राज्यात महत्त्वाचे असून त्यात दहा लाखांवर लोकांना पूर्ण किंवा काही वेळ काम मिळते. मुख्यतः कुटिरोद्योग असलेल्या या धंद्याला यांत्रिकीकरणाची मदत देण्याचे प्रयोग चालू आहेत. इतर महत्त्वाचे उद्योग, चहापत्ती, रबरसंचय, विटा व कौले, काजू भाजून व सोलून डबाबंद करणे, कापीव लाकूड, तांदूळ कांडणे, हातमाग व हस्तव्यवसाय हे आहेत. कारखानदारी उत्पादन रबरी माल, लाकूडतक्ते, खते, रसायने, काच, कागद, ॲल्युमिनियम, साखर, सिमेंट, कापड, साबण, शार्क लिव्हर तेल, दुर्मिळ मृदांचे क्षार, सायकलच्या लोखंडी धावा, चिनी मातीची भांडी, भट्टीच्या विटा, तारेचे दोर, वीज उत्पादनाची सामग्री, पेट्रोलियमजन्य पदार्थ, कृत्रिम धाग्यांसाठी लगदा, कृत्रिम धागे, शेतीची व यंत्रकामाची अवजारे असे विविध स्वरूपाचे आहे. शासकीय क्षेत्रात साबण, खाद्यतेल, चिनी मातीचा माल, रबर व सूत गिरण्या या उद्योगांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून खाजगी क्षेत्रातही नवीन उद्योगधंदे काढण्यात राज्य उद्योग विकास महामंडळाने प्रोत्साहन देऊ केले आहे. नवे मळे, ग्रामोद्योग, हस्तव्यवसाय, हातमागकापड अशा धंद्यांना मदत व सहकारी संस्था काढण्यास उत्तेजन मिळत आहे. खनिजांपैकी केरळच्या किनारी वाळूतून भारताचे ९३% इल्मेनाइट उत्पादन १९६५-६६ मध्ये काढण्यात आले. अलवाये येथे शुद्ध ॲल्युमिनियमचे ठोकळे बनतात. त्याचप्रमाणे जस्ताचा शुद्धीकरणाचाही प्रायोगिक कारखाना निघाला आहे. विद्युत् निर्माण सामर्थ्य केरळात १९७१-७२ मध्ये ५·४ किवॉ. होते. पल्लिवसल, सेंगुलम्, पोरिगळकुथु, नेरिआमगलम्, पण्णिआर आणि शबरीगिरी (पांबा) ही ६ जलविद्युत् उत्पादन केंद्रे चालू असून शोलायार, इडिक्की, कुट्टियादी ही आणखी तीन केंद्रे तिसऱ्या योजनेत पुरी झाली आहेत. अलेप्पी, कोचीन, कोट्टयम्, कालिकत, पालघाट, त्रिवेंद्रम, अलवाये, कननोर व तेल्लिचरी ही मुख्य व्यापारी शहरे आहेत.  

केरळमध्ये ५५४ किमी. रुंदमापी व ३३३ किमी. मीटरमापी लोहमार्ग आहेत. रुंदमापी लोहमार्ग पालघाट खिंडीतून उतरून उत्तरेस कासरगोडपलीकडे व दक्षिणेस कोचीनपर्यंत पोहोचतो. मीटरमापी लोहमार्ग दक्षिणेच्या शेनकोट्टा खिंडीतून पूर्वेकडून उतरून क्विलॉनला येऊन उत्तरेस कोचीनला व दक्षिणेस त्रिवेंद्रमला जातो. राज्यातील एकूण १७,२५२ किमी. रस्त्यांपैकी पक्के १०,७४३ किमी. असून त्यातले ४५० किमी. राष्ट्रीय राजमार्ग आहेत. १९६६ मध्ये ९८१ राज्यवाहतूक बसगाड्यांनी सु. २ लाख किमी. रोज प्रवास करून ५ लाख उतारू व २० मालट्रक्सनी रोज १०० टन माल अशी वाहतूक केली. नद्यांतून ८३३ किमी. व कालव्यातून ९५२ किमी. मिळून एकूण १,७८५ किमी. लांबीचे जलमार्ग आणि समुद्रकिनाऱ्याला कोचीन या पहिल्या प्रतीच्या बंदराखेरीज अलेप्पी व कोझिकोडे ही मध्यम आणि त्रिवेंद्रम, क्विलॉन, कोइलतोट्टम, पोन्नानी, पडगारा, तेल्लिचेरी, कननोर, अझिक्कल आणि कासरगोड ही सामान्य बंदरे राज्यात आहेत. कोचीन व त्रिवेंद्रम येथे विमानतळ असून २ आकाशवाणी केंद्रे, सु. ३०० तार कचेऱ्या आणि ३,००० डाकघरे ही संपर्क साधने उपलब्ध आहेत.


लोक व समाजजीवन : केरळची १९७१ मधील २·२ कोटी लोकसंख्या दशकापूर्वीपेक्षा २५·८९ टक्क्यांनी वाढलेली होती व दर चौ. किमी. ला ५४८ हे घनतेचे प्रमाण होते. काही काही भागांत तर हे प्रमाण चौ. किमी. ला १,५३८ इतके होते. देशाच्या १·२ टक्के क्षेत्रफळ असलेल्या या राज्यात देशाची सु. ४% लोकसंख्या असल्याने हे घनतेचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. स्त्रियांची संख्या दर हजारी १,०१९ असून हे प्रमाणही देशात सर्वांत जास्त आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारतात केरळचा क्रमांक पहिला आहे, एकूण ६०·१६% साक्षरतेच्या प्रमाणात ६६·५४% पुरुष व ५३·९०% स्त्रिया साक्षर आहेत. इतकेच नव्हे, तर मातृभाषेखेरीज इंग्रजी जाणणाऱ्यांचे प्रमाणही या राज्यात सर्वांत अधिक आहे. लोकवस्ती सु. ८४% ग्रामीण असून शेती हा प्रधान व्यवसाय आहे. १९७१ मध्ये काम करणाऱ्या एकूण सु. ५२ लाख संख्येपैकी शेतकरी ११ लाख व शेतमजूर १८ लाख होते. १९६१ मध्ये मच्छीमारी, वनोद्योग, मळे, खाणी, पशुपालन व संबंधित कामांवर ५ लाख, कारखान्यांत ६ लाख, व्यापारात ३ लाख, वाहतूक दळणवळणात २ लाख, बांधकामावर १ लाख, व इतर नोकरीधंद्यांत १४ लाख निर्वाह करीत होते. केरळीयांपैकी हिंदू १ कोटीवर असून त्यांची दैवते शिव, विष्णू किंवा देवी ही असतात. भद्रकाली ही केरळची मातृदेवता आहे. त्याशिवाय सर्व केरळचे श्रद्धास्थान साबरमलई पर्वतातील शास्ता ऊर्फ अय्याप्पन् हे दैवत आहे. आद्य श्री शंकराचार्य हे मूळ केरळातले नंबुद्री ब्राह्मण होते. नायर लोकांत परंपरागत नागपूजाही होते. त्या अनुषंगाने केरळातले मूळचे लोक नागवंशीय असावेत, असे अनुमान काढण्यात आले आहे. नायर या क्षत्रिय व वैश्य वृत्तींच्या मुख्य जातीत अनेक पोटभेद होते. काहींमध्ये मातृसत्ताक समाजपद्धती रूढ होती आणि त्यांच्याखेरीज इलुवन अथवा तिय्यन, कोल्लान, चेरूमान, कुरूवन, वेलवन, कम्मळन, मारान, शानान, परेय्यन, असारी, वेल्लाळ अशा व्यवसायपरत्वे अनेक इतर जाती केरळात होत्या. पण आता त्यांच्यातले भेद नष्ट होत आहेत व नंब्रुद्री या तेथील तुटक ब्राह्मण जातीचेही माहात्म्य उरले नाही. अनुसूचित जातींची लोकसंख्या १९६१ मध्ये सु. १७ लाखांवर व नायाडी, मलयन, उल्लदन, कादन अशा अनुसूचित आदिवासी जमातींची २ लाखांपेक्षा थोडी जास्त होती. केरळातल्या सु. २६ लाख ख्रिस्ती प्रजेत रोमो-सिरिअन, जॅकोबाइट सिरिअम व सेंट टॉमस सिरिअन असे पंथभेद आहेत. कोट्टयम व एर्नाकुलम् जिल्ह्यांत त्यांची संख्या जास्त आहे. सु. ३० लाख मुसलमान सुन्नी पंथाचे असून त्यांच्यात बहुसंख्य मोपले व काही लब्बाई असे दोन प्रकार आहेत. कोझिकोडे जिल्ह्यात ते सर्वांत जास्त आहेत. हिंदूंचे प्रमाण राज्याच्या दक्षिणेत विशेष आहे. लोकांचा मुख्य आहार तांदूळ असून त्याला शक्य तेथे कंद, केळी, नारळ किंवा मासे यांपैकी कशाची तरी जोड असते. मिठाशिवाय मिऱ्याचे किंवा मिरचिचे सांबर किंवा ‘सरम्’ हे एकच तोंडीलावणे त्यांना पुरते. त्यांचा वेश साधा व बहुधा शुभ्र असतो.‘मुंटू’ अथवा लुंगी, ‘तोतू’ अथवा कुडते व खांद्यावर पंचा हा पुरुषांचा पोषाख व स्त्रियांचा मुंटू व चोळी. बाहेर जाताना ताडपत्रीची किंवा कापडी छत्री ही केरळात एक आवश्यक बाब आहे. केरळीय स्वच्छतेचे भोक्ते आहेत. तैलस्नान व स्त्रियांची सुंदर केशरचना ही त्यांची वैशिष्ट्ये, घरात निजाबसायला सर्वत्र चटयांचा वापर असतो. घरे बहुधा सुटी, आपापल्या स्वतंत्र आंगणा-परसातील, नारळ-फणसांच्या झाडांनी वेढलेली, मातीच्या वा कुडाच्या भिंतींची, कौलांनी किंवा नारळीच्या झापांनी शाकारलेली अशी असतात. ग्रामीण भागात गावे वेगळी अशी दिसतच नाहीत. घरांची अंगणे एकाला एक लागूनच लांबपर्यंत असतात. प्रत्येकाच्या अंगणात विहीरही असतेच. शहरी भागात जुन्या घरांना लाकडाचा वापर बराच केलेला आढळतो. शिक्षणात प्रगत असलेल्या केरळ राज्यात १९७२-७३ साली सु. ५१ लाख मुले शाळा कॉलेजांतून शिकत होती. १,३९९ माध्यमिक प्रशाला, १०८ शिक्षक शाळा, ३ शिशुशाळा, ४ पंगुशाळा आणि पूर्व प्राथमिक व प्राथमिक मिळून ९,४७६ शाळा इतक्या शिक्षणसंस्था चालू होत्या. केरळची मलयाळम् ही भाषा ‘पझम-तमिळ’ या द्राविड भाषेतून वेगवेगळ्या बोलींच्या स्वरूपात निघाली. तिचे जुने रूप ‘पाट्टु’ या ग्रामीण गीतांतून दिसते. संस्कृतचा प्रभाव या भाषेवर बऱ्याच प्राचीन काळापासून पडला आहे. वाङ्मयनिर्मितीसाठी ‘मणिप्रवाळ’ या संस्कृत मलयाळम् मिश्र भाषेचा उपयोग पहिल्याने होऊ लागला. पंधराव्या ते अठराव्या शतकांत चेरुश्शेरी, नंतूतिरी व कन्नासा पणिक्कर यांसारख्या थोर साहित्यिकांनी जुन्या नव्या भाषांचा समन्वय करून जी परंपरा सुरू केली, ती पूर्णत्वाला पोहोचविणारा मलयाळम् साहित्याचा जनक एळुत्तच्छन् याच्या अध्यात्मरामायणम्, भारतम्  इ. अनेक कृती आहेत. नंतरच्या उप्णायी वारियर यांच्या नळचरितम्  सारख्या काव्यसंगीत नाट्यपर कलाकृतींनी कथकळी आणि कुंचन नंप्यारच्या आधुनिक वातावरणातील पुराणकथांनी तुळ्ळल हे वाङ्मप्रकार यशस्वी केले. भाषाविकासाच्या पुढल्या टप्प्यात राजराज वर्मा याने पुढाकार घेतला होता. विसाव्या शतकात आधुनिक शिक्षणाच्या प्रभावाने मलयाळम् वाङ्मयाचे अभूतपूर्व पुनरुज्जीवन झाले. महाकवी कुमारन, आशान, वळ्ळत्तोळ नारायण मेनन व उळ्ळूर एस्. परमेश्वर अय्यर कादंबरीकार ओ. चंतू मेनन व सी. व्ही. रामन पिळ्ळा हा काल गाजवून गेले. गेल्या अर्ध शतकात गद्य आणि काव्य यांत मोलाची भर पडली. लघुकथेने परिपूर्णता मिळविली व नाटकालाही बहर आला. मलयाळम् साहित्याने आपले द्राविड वैशिष्ट्य कायम ठेवून संस्कृतचा संस्कार आणि इंग्रजीचा प्रभाव आत्मसात केला आहे. संगीत, नृत्य व चित्रकलांनी केरळला अन्य भारतीय राज्यात क्वचितच आढळणारी  अखंड सांस्कृतिक परंपरा प्राप्त करून दिली आहे. केरळच्या लोकसंगीतात सर्पपट्टु, अय्यपनपट्टु, तळ्ळालपट्टूसारखे भरड पण तालबद्ध प्रकार, पंचवाद्यम्, केळिकोट्टूसारखे वाद्यसंगीत व चेंडा, मद्दलम् चेंगलसारखी वाद्ये असतात. केरळचे मान्य आणि स्वीकृत जरी कर्नाटक संगीत असले, तरी त्याची कथकळी नृत्याच्या साथीची धीम्या लयीतली ‘सोपान शैली’ खास केरळचीच आहे. या राज्यात अनेक महान संगीतकार होऊन गेले. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील त्रावणकोरचा राजा स्वाती तिरुनल हा त्यांचा मुकुटमणी होता त्याने संस्कृत, मलयाळम्, तमिळ, तेलुगू, कन्नड व हिंदी या सहा भाषांत मिळून असंख्य कृतींचा बहुमोल ठेवा मागे ठेवला आहे. त्याच्या राजवटीत केरळच्या संगीत परंपरेला बहर आला. त्याचा समकालीन इरयिम्मन तंपी हाही नामांकित रचनाकार होता. त्याच काळातल्या षट्‍कल गोविंद मारार या प्रतिभावान संगीतकाराचे तर खुद्द त्यागराजाने कौतुक केले होते. आजचे केरळीय संगीतकार लोकसंगीत व शास्त्रीय संगीत यांचा मेळ घालून एक नवी आधुनिक शैली निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. केरळची नृत्यकला अनेकविध प्रकारांनी संपन्न आहे. गिरिजनांच्या ३५ नृत्यांपैकी एलेलक्करादी, माणकळी, मुडियतोम अशी नृत्ये लोकनृत्यांचे कळियतोम, कोळकळी, मोपलाकळी, कुम्मी इ. ५० प्रकार व कथकळी, तुळ्ळल, मोहिनी अट्टम्‌सारखी ९ शास्त्रीय नृत्ये, याशिवाय पुनरुज्जीवित शास्त्रीय नृत्य व आधुनिक नृत्यरचनाही राज्यात प्रचलित आहेत. येथील चित्रकलेची परंपरा एक हजार वर्षांहून पुरातन आहे. प्रथम कळामेझुनू हा देवळाच्या भूमीवर पाच रंगांत काढण्याचा रांगोळीचा प्रकार होता. नवव्या शतकात रंगविलेली भित्तिचित्रे आता तमिळनाडूत गेलेल्या तिरुनंदीक्कर येथील गुंफामंदिरांत आहेत. त्यानंतर सोळाव्या शतकातील एत्तमनूर मंदिराच्या भिंतीवरचे नटराजाचे चित्र, पनयान्नरकवु मंदिरातील सूर्याचे चित्र, पद्मनाभपुरम् प्रासादातील ४१ पौराणिक भित्तिचित्रे आणि अन्यत्र अनेक देवळांच्या भिंतींवरील कलापूर्ण रंगाकृती वैभवशाली चित्रकलेची साक्ष देतात. कित्येक ख्रिस्ती प्रार्थनामंदिरांच्या भिंतींवरही रंगविलेली जुनी चित्रे आहेत. परंपरागत शैलीतील शेवटचे चित्र कायमकुलम् येथील कृष्णपुरम् प्रासादाच्या भिंतीवर रंगविलेले गजेंद्रमोक्षाचे दृश्य आहे. एकोणिसाव्या शतकात पाश्च्यात्यांच्या संपर्काने कलाविषयक कल्पना बदलल्या व तत्कालीन यूरोपीय तंत्रात प्रवीण झालेल्या राजा रविवर्माच्या कृतींनी साऱ्या भारतावर प्रभाव पाडला. आधुनिक चित्रकारांत माधव मेनन आणि के. सी. एस्. पणिक्कर यांच्या स्वतंत्र शैली लक्षणीय आहेत. शिल्पकृतींचे नमुने केरळात आठव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतचे आढळतात. कवियूर आणि विझिंगम येथील खडकांतील कोरीव आकृती, त्रिक्कोडितानम् विष्णुमंदिरातील व त्रिविक्रममंगलम् मंदिरांतील शिल्पे, गुरुवायूरची विष्णुमूर्ती, पद्मनाथस्वामी मंदिरातील शिल्पकाम ही काही उत्तम उदाहरणे आहेत. केरळातील हस्तकलांपैकी हस्तिदंत, शिंग, चंदन, शिसव, साग, नारळकरवंटी यांच्यावरील कोरीव काम, काशाची भांडी, केवड्याचे व कोरागवताचे विणकाम व बिदरीधर्तीचे कोफ्तगारी नक्षीकाम या कला विशेष उल्लेखनीय आहेत. गुरुवायूच्या कृष्णमंदिराचा व त्रिचूरच्या शिवमंदिराचा ‘पूरम्’ हे केरळमधील महत्त्वाचे वार्षिक उत्सव होत. शिवाय वायकोमच्या शिवालयाला यात्रिक वर्षभर जात असतात, तर दुर्गम पर्वतावर अरण्यात साबरमलई येथील शास्ता अथवा अय्यप्पन मंदिर हे संक्रांतीला मोठे गजबजलेले यात्रास्थान बनते. त्रिवेंद्रमच्या पद्मनाभमंदिराचे वर्षातून दोन उत्सव होतात. विशु उत्सव डिसेंबर-जानेवारीत भातपेरणीच्या मुहूर्ताला असतो. विशुक्कनी ही फळाफुलांची आणि विविध देवतांची आरास मांडून दिवे लावून तिचे सकाळी प्रथम दर्शन केले, तर वर्ष सुगीचे जाईल अशी श्रद्धा असते. मुसलमानांच्या दोन ईदा आणि मोहरमखेरीज कोंडोट्टी, मचिक्कट, मनतलपल्ली हे तीन नेरचे किंवा उरूस आणि चंदनवकुडम् महोत्सव ही भीमाबिविनामक संतिणीची पुण्यतिथी हे प्रमुख उत्सव आहेत. ख्रिस्ती लोकांचे नाताळखेरीज मलयतूर पेरूनल, एडतुआ पेरूनल व येशुशिष्य संत टॉमसच्या स्मरणार्थ कोरट्टीमती हे विशेष उत्सव होत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येणारा ओणम् हा केरळचा सर्वांत महत्त्वाचा प्रदेशिक उत्सव, त्याच्या दुसऱ्या किंवा तिरुओणम् या दिवशी चेर वंशाचा आदिपुरुष मानलेला बळी राजा पाताळातून येऊन आपल्या प्रजेची वास्तपुस्त करण्यास घरोघर भेट देतो, अशी समजूत आहे. त्याच्या स्वागतासाठी प्रत्येक घरांचे दार फुलांनी शृंगारलेले असते. लोक आपापसांत देणग्यांची देवाणघेवाण करतात, घरात पक्वान्ने होतात, सर्वत्र कथकळीसारखे करमणुकीचे कार्यक्रम आणि स्त्रियांचे व पुरुषांचे सांघिक खेळ होतात. ओणमप्रसंगी सर्वांत भव्य कार्यक्रम म्हणजे वळ्ळोपकली अथवा होड्यांच्या शर्यतीचा कुट्टेनाड येथे जुलैच्या पहिल्या सप्ताहात व कोट्ट्यमजवळ अरणमुला येथे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ओणमच्या पाचव्या दिवशी सर्पनौकांच्या स्पर्धाचा महोत्सव होतो. प्रधानमंत्री पारितोषकासाठी १५ ऑगस्टला अलेप्पी येथे होणाऱ्या नौकास्पर्धा हे केरळातील स्वातंत्र्यदिनाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ३१ ते ६१ मी. लांबीच्या आणि शंभरांपर्यंत माणसे आरूढ झालेल्या विविध विचित्र आकारांच्या शृंगारलेल्या नौका वाद्यांच्या तालावर वल्ही मारीत पुढे जाण्याची चढाओढ करतात, तेव्हा एक लाखांवर प्रेक्षक दोन्ही तीरांवरून उत्तेजन देत असतात. केरळचा सर्वच प्रदेश प्रेक्षणीय आहे, पण त्यातल्या त्यात पेरियार वन्यप्राणी अभयारण्य, निसर्गसुंदर टेक्काडी सरोवर आणि कोचीन, त्रिवेंद्रम, क्विलॉन, कालिकत यांसारखी ऐतिहासिक शहरे, त्याचप्रमाणे कोवलम हे सागरक्रिडास्थान व वर्कलई येथील झरे व कालव्यांचे बोगदे विशेष प्रेक्षणीय आहेत. शेकडो वर्षापासून केरळात हिंदू, ख्रिस्ती, मुसलमान व यहुदी शेजारी शेजारी नांदत आले आहेत. त्यामुळे समाजजीवनात सहिष्णुता व एकाच भाषेमुळे एकजिनसीपणा आला. विद्येच्या असामान्य प्रसारामुळे केरळचे लोक इतर राज्यांतील लोकांपेक्षा अधिक प्रगत व सुसंस्कृत ठरावेत, पण बेसुमार लोकसंख्या व मर्यादित भूमी यांमुळे अनिवार्यपणे उत्पन्न होणारी तणातणी समाजजीवनात अस्वस्थपणा आणून वर्गविग्रहादी आत्यंतिक मतप्रणालींना वाव देत आहे.


त्रिवेंद्रम ही राजधानी (लोकसंख्या ४,०९,६२७) आहे. तेथील पद्मनाभस्वामीचे मंदिर प्रसिद्ध आहे. कोचीन हे मोठे बंदर असून तेथून काथ्या, खोबरे, चहा, रबर, काजू इ. निर्यात होतात. तेथील कायलांपलीकडे एर्नाकुलम् आहे तेथे साबणाचे कारखाने आहेत. दक्षिणेस मत्तानचेरी येथे भात सडण्याच्या गिरण्या आहेत. कोचीन-एर्नाकुलम्-मत्तानचेरी हा आता एकच नगरसमूह आहे. त्रिचूर येथे सूतगिरण्या आणि कापडगिरण्या असून पालघाटप्रमाणेच तेही पालघाट खिंडीवर लक्ष ठेवण्यास उपयोगी आहे. अलवाये येथे ॲल्युमिनियमचा कारखाना आहे. अलेप्पी आणि क्विलॉन ही पूर्वीची बंदरे आता मागे पडली आहेत, तरी ती व्यापारी केंद्रे आहेत. कालिकत येथे मंगलोरी कौले होतात नदीतून वाहून आणलेल्या ओंडक्यांच्या फळ्या पाडण्याच्या गिरण्या येथे व इतरत्र आहेत. कोट्ट्यम्, कननोर, तेल्लीचेरी इ. इतर व्यापारी शहरे आहेत.

ओक, शा. नि.

पद्मनाभस्वामी मंदीर, त्रिवेंद्रमकेरळातील एक सिनॅगॉग : अंतर्दृश्यपेरियार अभयारण्यातील हत्तीचा कळपकलडी मंदिर शिखर, एर्नाकुलम् : आद्य श्रीशंकराचार्याचे जन्मस्थाननिर्सगरम्य कोवळम् पुळण, त्रिवेंद्रमदीपगृह, क्विलॉन