कोसल : भारतातील प्राचीन जनपद. इक्ष्वाकू, कोशल, अनुगंगा, शोकल, अयोध्या, श्रावस्ती, कुणालविषय इ. याची प्राचीन नामांतरे आहेत. अयोध्या नगराभोवतालचा शरयू तीरावरील सुसंपन्न ग्रामयुक्त व धनधान्यसमृद्ध देश असे याचे वर्णन वाल्मीकि रामायणात  आढळते. ऋग्वेद  व अथर्ववेद  यांतून येथील इक्ष्वाकू व मांधातृ राजांचा उल्लेख आढळत असला, तरी रामायणकालीच या देशाचे महत्व वाढले. शरयू नदीमुळे कोसलचे उत्तर व दक्षिण असे दोन विभाग पडले होते. पुढे रामाने हे दोन भाग लव व कुश यांना वाटून दिले. लवाने उत्तर कोसलची राजधानी श्रावस्ती तेथे नेली, तर कुशाने दक्षिण कोसलची राजधानी कुशावती येथे हलविली. महाभारतकाली युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञप्रसंगी भीमाने कोसलच्या दीर्घप्रज्ञ सम्राटास पराभूत केले होते. बौद्धकाली कोसलची राजधानी श्रावस्ती येथेच होती व काशी-कोसल साम्राज्यावर प्रसेनजित राजाचे राज्य होते. गौतम बुद्धाने श्रावस्ती येथे बराच काळ वास्तव्य केले होते. प्रसेनजितानंतर कोसलचे अनेक तुकडे पडले. नंतरच्या काळात हा ‘अयोध्या-अवध’ व ‘साकेत’ या नावांनी ओळखला जात असे.               

जोशी, चंद्रहास