कोष्ट कोळिंजन: (हिं. कुलिंजन, सुगंधबच क. कोळंजन, द्रुमाष्ट सं. कुलिंजन इं. ग्रेटर (मेजर) गलंगल, जावा गलंगल लॅ. आल्पिनिया गॅलंगा कुल-झिंजिबरेसी). ही सु. २ मी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी मूळची इंडोनेशिया व मलाया येथील असून पूर्व हिमालयात व सह्याद्रीतही आढळतेतसेच हिची लागवडही करतात. मूलक्षोड (जमिनीत आडवे वाढणारे खोड) बहुवर्षायू, ग्रंथिल (गाठाळ), सुगंधीपाने लांब व अरुंद असून कडा पांढऱ्या आणि मध्यशीर मोठी व बळकट असते. फुले ३ सेंमी. लांब, हिरवट पांढरीओष्ठ पांढरा व त्यावर लालसर रेषा. फुले परिमंजरीवर गर्दीने मेमध्ये येतात [→ फूल]. फळ लहान, नारिंगी व लाल असून इतर शारीरिक लक्षणे ⇨सिटॅमिनी (झिंजिबरेसी) गणात वर्णिल्याप्रमाणे असतात. सुक्या मूलक्षोडाचा उपयोग ज्वर, संधिवात व श्वसनविकार यांवर करतात. ⇨आल्याप्रमाणे ते उत्तेजक, सुगंधी, दीपक (भूक वाढविणारे) असून जंतुनाशक, दुर्गंधनाशक, वायुनाशी, वाजीकर (कामोत्तेजक) व पौष्टिक आहे. ते मसाल्यात घालताततसेच त्यापासून बाष्पनशील (उडून जाणारे) तेल काढतात. फुले कच्ची खातात व बी मसाल्यात घालतात. कॅलिको छपाईत त्रिफळ्याबरोबर मूलक्षोड वापरतात. ग्रेटर गलंगल हे औषधाचे इंग्रजी व्यापारी नाव असून भारतात ते दरवर्षी आठ क्विंटल लागते.
तारका: (लॅ. आल्पिनिया ॲलुघस). ही ओषधी कोष्ट कोळिंजनाच्याच वंशातील असून तिचे गुणधर्म व सर्वसाधारण शारीरिक लक्षणे तशीच आहेत. फुलातील ओष्ठ लालसर व फळ काळे असते. तिचा प्रसार द. कोकणात आहे. मुळे ग्रंथिल व सुवासिक असतातनवीन लागवड मुळापासून करता येतेबागेत शोभेकरिता लावतात. चीनमधील जातीची (इं. लेसर गलंगल लॅ. आल्पिनिया ऑफिसिनॅरम ) मूलक्षोडे अधिक चवदार व स्वादयुक्त असतात.
जमदाडे, ज. वि.
“