केप्लर, योहानेस : (२७ डिसेंबर १५७१–१५ नोव्हेंबर १६२९). जर्मन ज्योतिषशास्त्रज्ञ व गणिती. ग्रहांच्या गती संबंधीचे त्यांचे तीन नियम प्रसिद्ध असून त्यांच्यामुळे न्यूटन यांच्या सिद्धांताची पार्श्वभूमी तयार झाली व आधुनिक गतिकीय ज्योतिषशास्त्राचा पाया घातला गेला. म्हणून केप्लर यांना आधुनिक ज्योतिषशास्त्राच्या चार संस्थापकांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे. त्यांचा जन्म वाइल डेर स्टाट (वूर्टेमबेर्ख, नैर्ऋत्य जर्मनी) येथे झाला. लहानपणी देवी आल्यामुळे त्यांची प्रकृती अशक्त व दृष्टी अधू झाली होती. त्यांचे शिक्षण वाइल, लेऑनबेर्ख, ॲडेलबर्ग व माउलब्रॉन येथे झाले. १५८८ साली ते पदवीधर झाले. १५९१ साली त्यांनी ट्यूबिंगेन विद्यापीठाची ‘मास्टर’ पदवी संपादन केली. तेथेच त्यांना मायकेल मीस्टलीन यांच्याकडून कोपर्निकस यांच्या ज्योतिषशास्त्रीय विचारांची ओळख झाली. त्यांनी टॉलेमी व कार्डन यांच्या नियमांचाही अभ्यास केला. १५९४ साली ते ग्रात्स (स्टिरिया) येथील ल्यूथेरियन शाळेमध्ये गणित व इतर विषयांचे शिक्षक झाले. तेथे त्यांनी फलज्योतिषाचा अभ्यास केला व त्यावर एक पुस्तकही लिहिले (१५९५). प्रॉटेस्टंटविरोधी चळवळीमुळे १६०० साली त्यांना ग्रात्स सोडावे लागले. तेथून ते प्रागला गेले व तेथील रॉयल ऑब्झर्व्हेटरीत ट्यूको ब्राए यांचे साहाय्यक बनले. ब्राए वारल्यानंतर १६०१ साली ते राजगणिती झाले. परंतु या पदाला पगार नसल्याने त्यांना उदरनिर्वाहासाठी फलज्योतिषीय पंचांगे काढावी लागली. त्यांनी सम्राट रूडॉल्फ (दुसरे) व इतर मानकरी यांच्या कुंडल्याही तयार करून दिल्या. १६१२ साली ते लिंट्स येथे गेले व तेथे त्यांची राजगणिती म्हणून नेमणूक झाली. १६२४ साली ते उल्म येथे व १६२८ साली तेथून झागन (सायलीशिया) येथे गेले. सु. १६२९ साली ते ‘व्हालेनस्टिन फलज्योतिषी’ झाले होते.

योहानेस केप्लर

त्यांचे लिखाण विपुल असून त्यात ३३ ग्रंथ, २२ गणितावरचे खंड व पत्रव्यवहार यांचा समावेश असून १६१४-१६१५ दरम्यान त्यांनी धर्मशास्त्रावरही लेखन केले होते. त्यांचा Mysterium cosmographicum हा ग्रंथ १५९६ साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथामध्ये त्यांनी सहा ग्रहांच्या ‘गोलां’च्या दरम्यान पाच सुसम ‘बहुपृष्ठाकृती’ बसविता येतात असे प्रतिपादन केले व त्यावरून सूर्यापासून ग्रहांच्या अंतरांसंबंधीचा मूलभूत नियम शोधून काढल्याची त्यांची समजूत झाली. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली व प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञ ब्राए व गॅलिलीओ यांच्याशी ओळखही झाली. १६०२ साली त्यांचा De fundamentis astrologiae certiribus हा फलज्योतिष विषयक ग्रंथ प्रसिद्ध झाला. १६०४ साली Astronomiae pars optica हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यामध्ये दृष्टी व प्रकाशकिरण यांच्यासंबंधीच्या मूलभूत कल्पना विशद केल्या असून प्रकाशाच्या परावर्तनाचे स्पष्टीकरण आणि प्रणमनाच्या (दोन माध्यमांच्या सीमापृष्ठाशी होणाऱ्या प्रकाशकिरणाच्या दिशाबद्दलच्या) नियमांशी जुळेल अशी माहिती दिलेली आहे. १६११ साली प्रसिद्ध झालेल्या Dioptrice या ग्रंथात भिंगातून होणाऱ्या प्रकाशाच्या प्रणमनाचे स्पष्टीकरण आणि एका ज्योतिषशास्त्रीय दूरदर्शकाची (दुर्बिणीची) कल्पना मांडली आहे. प्रकाशाचा व्यस्त-वर्ग नियम (प्रकाशाची तीव्रता अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते) तसेच भिंगांचे केंद्रांतर व दूरदर्शकाची वर्धनक्षमता काढण्याचे नियम या ग्रंथात दिलेले आहेत. त्यांनी प्रणमनप्रकारचा दूरदर्शक तयार केला होता. सामान्यतः ज्योतिषशास्त्रीय वेधशाळांत वापरला जाणारा व उलटी प्रतिमा देणारा प्रणमन दूरदर्शक केप्लरीय दूरदर्शक म्हणून ओळखला जातो. १६०४ साली भुजंगधारी नक्षत्रात एक नवतारा (अचानक तेजस्विता वाढलेला तारा) दिसला. तो अठरा महिने दिसत होता. त्याचे अध्ययन करून त्यांनी त्यावर एक प्रबंध लिहिला. हा नवतारा ‘केप्लर तारा’म्हणून ओळखला जातो.

त्यांचा Astronomia nova हा ग्रंथ १६०९ साली प्रसिद्ध झाला. त्यामध्ये दोन हजार वर्षे प्रचलित असलेल्या समजुतींना धक्का देणाऱ्या दोन कल्पना होत्या. मंगळाचे निरीक्षण व सखोल अध्ययन केल्यावर त्यांना या कल्पना सुचल्या. ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार नसून विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) आहेत व या विवृत्ताच्या एका नाभीशी सूर्य असतो, ही एक कल्पना होय. दुसरी कल्पना म्हणजे ग्रह व सूर्य यांना जोडणारी रेषा ठराविक काळात विवृत्ताचे सारखेच क्षेत्र व्यापते (म्हणजे कक्षेमध्ये सूर्याजवळ जाताना ग्रह अधिक वेगाने फिरत असतो) ही होय. या कल्पना म्हणजेच केप्लर यांचे पहिले दोन प्रसिद्ध नियम होत. १६१५ साली ⇨ कलनशास्त्राला चालना देणारा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला.१६१८ साली तीन धूमकेतूंचा अभ्यास करून त्यांनी De Cometis (१६१९) हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या मते धूमकेतू सरळ रेषेत जातात ते परत येत नाहीत आणि धूमकेतूची शेपटी हा, तो विरळ होत असल्याचा आणि सूर्य त्याला दूर ढकलत असल्याचा पुरावा होय. १६१८ व १६२०-१६२१ दरम्यान खंडशः प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांनी ग्रहांसंबंधीचे नियम गुरूच्या उपग्रांनाही कसे लागू पडतात हे दर्शविले आहे. Epitome astronomiae Copernicanae (१६१८–१६२१) या ग्रंथात केप्लर यांनी कोपर्निकस यांच्या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचे विवरण केले आहे. कोपर्निकस यांच्या मतांना उघड पाठिंबा देणारे ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणजे केप्लर हेच होत. या ग्रंथावर पोप यांनी बंदी घातली होती. ग्रहांचे आवर्तकाल (सूर्याभोवतीच्या एका प्रदक्षिणेस लागणारा काल) आणि सरासरी अंतरे यांच्यातील संबंध दर्शविणारा केप्लर यांचा तिसरा नियम त्यांच्या De Harmonice Mundi (१६१९) या ग्रंथात आहे. त्यामध्ये सूर्यकुलाच्या संरचनेचे साध्या आकडेवारीने स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यांनी मांडलेल्या तीन नियमांचा ग्रहपंचांगे तयार करण्यासाठी त्यांनीच प्रथम वापर केला आणि त्याकरिता लॉगरिथमाचा वापर केला. त्यासंबंधीचा Chilias Logarithmorum हा त्यांचा ग्रंथ १६२४ साली प्रसिद्ध झाला. Tabulae Rudolphinae हे तक्ते त्यांनी १६२९ साली पूर्ण केले. त्यांमध्ये प्रणमन व लॉगरिथम यांचे तक्ते व १,००५ ताऱ्यांची यादी ही आहेत. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ग्रहांची स्थाने काढण्यासाठी हे तक्ते वापरीत. बुधाच्या अधिक्रमणासंबंधी (सूर्यबिंबावरील सरकण्यासंबंधी) लिहिलेला त्यांचा ग्रंथ १६०९ साली प्रसिद्ध झाला होता. शिवाय त्यांनी १६२९ साली बुधाच्या अधिक्रमणाबाबत केलेले भाकीत १६३१ साली खरे ठरले.

यांशिवाय त्यांच्या पुढील कल्पना व विचार हेही महत्त्वाचे आहेत. सूर्याचे ग्रहांवर असलेले आकर्षण अंतरानुसार बदलते, असे त्यांनी सांगितले. ईथर सर्वत्र असते असे त्यांचे मत होते. ग्रहांच्या कक्षांच्या पातळ्या सूर्याच्या मध्यातून जातात हे त्यांनीच प्रथम प्रतिपादले. गुरुत्वाकर्षणासंबंधीच्या कल्पना त्यांनी स्पष्टपणे मांडल्या होत्या व चंद्राच्या आकर्षणाने भरती-ओहोटी होते असे त्यांनी दाखविले होते. भोगांश [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]काढण्याची नवीन पद्धती त्यांनी शोधून काढली होती आणि ज्योतिषशास्त्रीय गणनातही सुधारणा केल्या.

केप्लर यांच्या सन्मानार्थ चंद्रावरील एका खळग्यास त्यांचे नाव देण्यात आले आहे [→ चंद्र]. ते रॅटिसबॉन (रेगेन्झबर्ग) येथे मृत्यू पावले.

नेने, य. रा. ठाकूर, अ. ना.