केंब्रिज–१ : इंग्लंडमधील केंब्रिज परगण्याचे मुख्य शहर. लोकसंख्या ९८,५१९ (१९७१). इंग्लंडमधील मध्यकालीन धार्मिक संस्कृतीचे आणि विद्याव्यासंगाचे हे केंद्र लंडनच्या उत्तरेस ८० किमी. असून कॅम नदीच्या पूर्व तीरावर, निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर वसलेले आहे. कॅमला येथे उतार असल्याने पूर्वीपासूनच पूल आहे यामुळेच गावाचे नाव केंब्रिज पडले असावे. बाराव्या शतकात ईलीच्या भिक्षूंनी येथे स्थापिलेले विद्याकेंद्र आजच्या विद्यापीठाचे मूळ होय. सहाव्या हेन्रीच्या उदार आश्रयामुळे, पंधराव्या शतकापासून ह्या विद्यापीठाची वाढ झाली आणि अठराव्या शतकापासून केंब्रिज विद्यापीठ एक अग्रगण्य विद्यापीठ मानण्यात येऊ लागले. मध्ययुगात शिक्षण धर्माचे अविभाज्य अंग असल्याने वास्तुशिल्पदृष्ट्या भूषण ठरतील असे अनेक चर्च व मठ केंब्रिजमध्ये आढळतात. विल्यम द काँकररने अकराव्या शतकात बांधलेला किल्ला व जुनी टाकसाळ याही येथील प्रेक्षणीय वास्तू आहेत. आधुनिक काळात इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ, सिमेंट, अस्फाल्ट, छापखाने, आटा इत्यादींच्या येथील उद्योगांमुळे केंब्रिजची गणना व्यापारी केंद्रांत झाली असून येथील जुन्या नव्या पुस्तकांची दुकाने जगप्रसिद्ध आहेत. ‘ब्रिज ऑफ साइज’ सारखे कॅमवरील पूल, अनेक उद्याने, विद्यापीठामधील विविध देशांमधील विद्यार्थी यांमुळे केंब्रिजला आगळे आकर्षण प्राप्त झाले आहे.

यार्दी, ह. व्यं.