कृष्णा नदी : दक्षिण भारतातील गोदावरी आणि कावेरी यांदरम्यानची प्रमुख नदी. लांबी सु. १,२८० किमी. जलवाहन क्षेत्र सु. २,५२,४०० चौ. किमी. कृष्णेचा उगम सह्याद्रीच्या रांगेतील धोम महाबळेश्वराच्या १,४३८ मी. उंचीच्या डोंगरात १७०५९’ उ. व ७३० ३८’ पू. येथे सु. १,२२० मी. उंचीवर होतो. येथून पश्चिमेस अरबी समुद्र फक्त सु. ६५ किमी. दूर आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगमझरे दाखवितात. या नद्या महाबळेश्वराहून वेगवेगळ्या दिशांनी वाहत जातात. त्यांना मूळ पाणीपुरवठा फक्त मोसमी पावसापासूनच होतो. महाबळेश्वर येथे दरवर्षी सु. ६२५ सेंमी. हून अधिक पाऊस पडतो त्याच्या पूर्वेस सु. २० किमी. पाचगणी येथे सु. २२५ सेंमी., तर ३२ किमी. वरील वाई येथे फक्त ६० ते ७५ सेंमी. पडतो. महाबळेश्वर डोंगराच्या उत्तरेकडून खाली येऊन कृष्णा आग्नेय व पूर्व दिशांनी वाहू लागते. सु. १० किमी. वरील धोम येथे धरण बांधले जात आहे. वाई खोऱ्याला समृद्ध करीत कृष्णा वाईच्या आग्नेयीस ३७ किमी. वर असलेल्या माहुलीस येते. येथे कृष्णेला वेण्णा नदी मिळते. येथून कृष्णा दक्षिणवाहिनी होते. माहुलीपासून ५० किमी. कराड येथे कृष्णा आणि कोयना यांचा प्रीतिसंगम आहे. महाबळेश्वरहून पश्चिमेस उतरून मग दक्षिणेकडे वाहणाऱ्या कोयनेवर कोयनानगर येथे प्रचंड धरण बांधून त्याचे पाणी बोगद्यातून पश्चिमेकडे नेऊन खाली डोंगरातूनच पोफळी येथील वीजघरात नेले आहे. कराडपासून वर कृष्णेवर खोडशी येथे बंधारा आहे. त्याच्या जोडीला कोयनेचेही पाणी शेतीला उपलब्ध होईल. सांगलीजवळ कृष्णेला पश्चिमेकडून वारणा व पूर्वेकडून येरळा ह्या नद्या मिळतात. कुरुंदवाड येथे कोल्हापूराकडून आलेली पंचगंगा नदी कृष्णेला मिळते तेथेच नदीच्या दुसऱ्या काठावर श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्ताचे जागृत देवस्थान आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती यांमिळून पंचगंगा झाली आहे. भोगावतीवर राधानगरी येथे विद्युत् प्रकल्प उभारला आहे. यानंतर कृष्णेला दूधगंगा नदी मिळते व ती कर्नाटकाच्या हद्दीत शिरते.
महाराष्ट्राच्या सातारा व सांगली जिल्ह्यांतून कृष्णा सु. ३०० किमी. वाहते. तिचे पात्र विशेषतः रहिमतपूर पर्यंत खोल व खडकाळ असले, तरी तिचे ३०–३५ किमी. रुंदीचे खोरे अत्यंत सुपीक काळ्या मातीचे आहे.
त्यात ज्वारी, बाजरी, भुईमूग, करडई, कडधान्ये, बटाटा, आले, हळद, मिरची, ऊस, तंबाखू, थोडा तांदूळ ही पिके होतात. वांगी, कांदे, लसूण, धने, चिंच, आंबा, पेरू व इतर अनेक फळे, फळभाज्या व पालेभाज्या होतात. येथील सकस गवतावर व वैरणीवर पोसलेली जनावरे धष्टपुष्ट, चपळ व देखणी आहेत. खिलार ही बैलांची जात विशेष प्रसिद्ध आहे. उगमाकडील प्रदेशात उन्हाळ्यात कित्येकदा नदी जवळजवळ कोरडी होते. तिला आणि तिच्या उपनद्यांना बंधारे व धरणे बांधून व विहिरींची जोड देऊन शेतीला पाणीपुरवठा व कारखान्यांना वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तिची उत्तरेकडील प्रमुख उपनदी भीमा तिला महाराष्ट्राबाहेर मिळत असली, तरी ती महाराष्ट्राच्या सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून अनेक नद्यांचे पाणी तिला आणून देते.
कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातून कृष्णा पूर्वेकडे वाहत कर्नाटक पठारावरून विजापूर जिल्ह्यात येते. या जिल्ह्यात तिच्या काठी काळी आणि जांभ्या दगडाची तांबडी माती दिसते. तिच्या काठच्या दरडी ६ ते १६ मी. उंचीच्या आहेत व तिच्या पात्रातील बेटांवर बाभळीची झाडे दिसतात. पूर्वेकडील प्रदेश अधिक रुक्ष आहे. विजापूर जिल्ह्यात कृष्णेला घटप्रभा नदी मिळते. घटप्रभेवर गोकाकचा धबधबा आहे. तेथील खडक भूशास्त्रदृष्ट्या अभ्यसनीय आहेत. यानंतर कृष्णा ५०० ते १,००० मी. उंचीच्या पठारी प्रदेशातून २०० ते ५०० मी. उंचीच्या पठारी भागात येते. मग तिला मलप्रभा नदी मिळते व ती रायचूर आणि गुलबर्गा जिल्ह्यांची सीमा बनते. जलदुर्ग येथे अरुंद घळईतून गेल्यावर तिला ढोण नदी मिळते. आंध्र व कर्नाटक यांच्या सीमेवर आंध्र प्रदेशाचा महबूबनगर व कर्नाटकचे गुलबर्गा व रायचूर जिल्हे एकत्र येतात. तेथे रायचूरच्या उत्तरेस सु. २५ किमी. वर कुरूगड्डी येथे भीमा नदी कृष्णेला मिळते तेथे दत्ताचे अत्यंत रमणीय देवस्थान आहे. उगार, शूखाली, कुरूगड्डी ही क्षेत्रेही कर्नाटक राज्यात आहेत.
कर्नाटक राज्यात कृष्णेच्या खोऱ्यात पावसाचे प्रमाण बेताचेच आहे त्यामुळे ज्वारी, गहू, कडधान्ये, तंबाखू, कापूस ही प्रमुख पिके आहेत. पाणीपुरवठा होईल त्यामानाने उसाचे उत्पन्नही वाढत आहे. कृष्णेची दक्षिणेकडील महत्त्वाची मोठी उपनदी तुंगभद्रा मध्य कर्नाटकामधून येते ती कर्नाटकाबाहेरच कृष्णेला मिळते. परंतु कृष्णेपेक्षाही त्या राज्याला ती अधिक उपयोगी ठरते. शिमोगा, चित्रदुर्ग, बेल्लारी, रायचूर या जिल्ह्यांतील नद्या तुंगभद्रेलाच पाणीपुरवठा करतात. मल्लापुरम् येथे तुंगभद्रेवर प्रचंड धरण बांधलेले आहे.
आंध्र प्रदेशात महबूबनगर जिल्ह्याच्या नैर्ऋत्य भागातून आग्नेय दिशेने पुढे गेल्यावर महबूबनगर कुर्नूल सीमेवरून आलेली तुंगभद्रा नदी कुर्नूलच्या पुढे संगमेश्वरम् येथे कृष्णेला मिळते. येथून पुढे कृष्णा नदी महबूबनगर, कुर्नूल, नळगोंडा, गुंतूर आणि कृष्णा जिल्ह्यांची सरहद्द बनते. तेलंगण पठारावरून ग्रॅनाइटच्या पायऱ्यापायऱ्यांवरून २०० मी. पेक्षा कमी उंचीच्या सपाट प्रदेशात उतरल्यावर कृष्णेला दिंडी, मुसी, पालेरू, मुनेरू इ. नद्या मिळतात. आंध्र प्रदेशाची राजधानी हैदराबाद मुसी नदीवर असून ती वाडापल्ली (वझिराबाद) येथे कृष्णेला मिळते. या राज्यातील नल्लमलई पर्वतराजीच्या पश्चिमेकडून कृष्णा ईशान्य दिशेने जाते व जग्गय्यापेटाच्या दक्षिणेस एकदम दक्षिणेस वळते. येथे तिचा उतार दर किमी. ला ०·३ मी. इतका कमी होतो. डोंगराळ प्रदेशातून वाट काढीत ती विजयवाडा येथे येते. तेथे ती पूर्व घाटाच्या दोन टेकड्यांमधील सु. १,३७० मी. रुंदीच्या फटीतून कोरोमंडल किनारी प्रदेशात उतरते. येथूनच तिचा त्रिभुज प्रदेश सुरू होतो. येथेच कृष्णेवर १,१३२ मी. लांब व ६ मी. उंच दगडी बांध घालून तिचे पाणी कालव्यांनी सर्व त्रिभुज प्रदेशांत शेतीसाठी खेळविले आहे. त्याशिवाय नलगोंडा जिल्ह्यात नंदीकोंडा येथे नागार्जुनसागर हा प्रचंड प्रकल्प शेतीला पाणीपुरवठा व जलविद्युत् उत्पादन या प्रमुख हेतूंनी पुरा होत आहे. कृष्णेच्या त्रिभुजप्रदेशातील कालवे गोदावरीच्या त्रिभुजप्रदेशातील कालव्यांशी जोडलेले आहेत. त्यांतून व बकिंगहॅम कालव्यातून काकिनाडा ते मद्रासपर्यंत होड्यांतून वाहतूक होते. मुखापासून सु. ८० किमी. आतपर्यंत कृष्णेतून वाहतूक होते. विजयवाड्यानंतर ६४ किमी. कृष्णेचा प्रवाह वाहतो. कृष्णा जिल्ह्यात पुलिगड्डा येथे दोन प्रवाह होऊन दिवी बेट बनते. तेथून तीन प्रवाह होऊन कृष्णा समुद्रास मिळते. याच्या उत्तरेस त्रिभुजप्रदेशातील दुसऱ्या एका फाट्याच्या मुखाशी बंदर ऊर्फ मसुलीपटम् (मच्छलीपटनम्) हे शहर वसलेले आहे. पुराच्या वेळी कृष्णा नदी इतका गाळ वाहून आणते, की त्यामुळे १० चौ. किमी. प्रदेशावर दररोज २० सेंमी. जाडीचा गाळाचा थर बसेल.
आंध्र प्रदेशात कृष्णेच्या खोऱ्याला ईशान्य मोसमी वाऱ्यांपासूनही पाऊस मिळतो. अनेक लहानमोठ्या उपनद्यांनी आणलेल्या पाण्यामुळे कृष्णा जलसमृद्ध झालेली असते. या भागात विशेषत: त्रिभुजप्रदेशात मुख्य पीक भाताचे आहे. पुराचे वेळी जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन नजर न पोहोचेल एवढे जणू काही एकच एक भाताचे शेत दिसते. विजयवाडा, गुंतूर, बंदर, एलुरू या तांदळाच्या प्रसिद्ध मोठ्या बाजारपेठा आहेत. ज्वारी, रागी, मका, ऊस, भुईमूग, कापूस, एरंडी, तंबाखू, केळी, भाजीपाला ही इतर पिके होतात. गुरांची व मेंढ्यांची पैदासही चांगली होते. समुद्रकिनाऱ्यावर व नद्या सरोवरांतून मासेमारीही चालते. आंध्र प्रदेशातील कृष्णेच्या खोऱ्यात उद्योगधंद्यांचीही वाढ वेगाने होत आहे. या राज्यातून कृष्णा सु. ७२० किमी. वाहते.
कृष्णेच्या खोऱ्यात जांभूळ, हिरडा, नागचाफा, सुरंगी, फणस, तमालपत्र, अंजनी, शिसव, सावर, किंजळ, असाणी, कुंभी, कव्हा, चिंच, कवठ, बोर, बेल, बाभूळ, साग, धामण, शिवण, धावडा, ऐन, किनई, खैर इ. झाडे आढळतात. तसेच कुडा, वाकेरी, भारंग, वावडिंग, सातवी, घायटी, बेडकी, बिब्बा, बाव्हा, भुईकोहळा इ. औषधी वनस्पती सापडतात. वाघ, चित्ता, सांबर, भेकर, गवा, रानडुक्कर, अस्वल, तरस, चितळ, ससा, लांडगा इ. प्राणी अनेक जातीचे सर्प, पक्षी व कीटक आहेत.
कृष्णा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहत असल्यामुळे तिच्या खोऱ्यात मुख्यत्वे मराठी, कानडी आणि तेलुगू भाषा बोलल्या जातात. प्रत्येक राज्यात कृष्णेच्या पाण्याचा वापर किती प्रमाणात व्हावा, याबद्दल तिन्ही राज्यांत वाद आहेत. १९६९ साली यासाठी न्या. बच्छबत यांच्या अध्यक्षतेखाली एक लवाद नेमण्यात आला होता. त्याचा निकाल डिसेंबर १९७३ मध्ये लागून आंध्रला सु. २३ घ. मी. पाणी, कर्नाटकाला सु. २० घ. मी. पाणी व महाराष्ट्राला सु. १६ घ. मी. पाणी वापरण्याचा हक्क मिळाला आहे.
प्रत्येक राज्यात अनेक लहानमोठे प्रकल्प हाती घेऊन ते पुरे करण्याचे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्प, कर्नाटकमधील तुंगभद्रा प्रकल्प व आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर प्रकल्प हे विशेष मोठे प्रकल्प आहेत.
तिन्ही राज्यांतील लोकांना कृष्णेविषयीच्या पवित्र व धार्मिक भावनेने मात्र एकत्र बांधलेले आहे. हे सांस्कृतिक ऐक्य तिच्या खोऱ्यातील अनेक तीर्थस्थळी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवरून दिसून येते. कृष्णेचे महत्व कृष्णामाहात्म्यपुराण, कृष्णामाहात्म्यवर्णन, कृष्णालहरी इ. ग्रंथांत वर्णिलेले आहे. कन्यागतास म्हणजे गुरू कन्याराशीत येतो, तेव्हा गंगा नदी कृष्णेला भेटावयास येते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या काळात गंगातीरी करावयाची धार्मिक कृत्ये कृष्णातीरीही करतात.
संदर्भ : 1. Misra, S. D. Rivers of India, New Delhi, 1970.
2. National Committee for Geography, Mountains and Rivers of India, Calcutta, 1968.
कुमठेकर, ज. ब.
“